Wednesday 28 September 2011

(गोष्टुली : २) कुणीतरी येणार येणार गं


चिमण्या पावलांची चाहूल लागल्या पासून तो तिला जीवापाड जपत होता.
डोहाळेजेवण, वनभोजन सगळं अगदी साग्रसंगीत झालं होतं ...तिचे डोळे तृप्तीने जडावले होते.
थोडं हिमोग्लोबीन कमी होतं पण डॉक्टर म्हणाले ,'फारसं काळजीचं कारण नाही'....
 आणि तो दिवस उजाडला!
त्याला ऑफिसमध्ये ती गोड बातमी कळली. 

नऊ महिन्यांपूर्वी केलेल्या अर्जाचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले होते.
उद्या त्यांचं बाळ कर्जतच्या अनाथाश्रमातून घरी येणार होतं.


-नील आर्ते

Tuesday 27 September 2011

गोष्टुल्या!


या आहेत छोट्याश्या गोष्टी: गोष्टुल्या!
ट्विटर, फेसबुक आणि एसएमएसवर मावणाऱ्या.
पण यांना नाव , सुरुवात-मध्य-शेवट सगळं काही आहे.
आणि हो तुमच्या माझ्यासारखी अफलातून पात्रंसुद्धा!


(गोष्टुली : १) तिचं हसू 
ती गो sssssss ड हसली आणि तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला.
ते तिचं खास ठेवणीतलं "ब्रेक-अप" स्माईल होतं!

-नील आर्ते

Saturday 24 September 2011

मुंबई कोलाज: शिवाजी पार्क


 टीब्सची आंबट-तिखट चवीची आमचूर वाली चिकन फ्रॅन्की, पार्काच्या कट्ट्यावरचा मारुती व्हॅनमधला मलई गोळेवाला!

 ओवन-फ्रेशमधलं मश्रूम रीसोत्तो आणि गूई चॉकलेट केक.
प्रकाशची मिसळ आणि आस्वादची गोड कचोरी. 
भागीरथी मॅन्शनमधला मंदारकडचा गणपती आणि विसर्जनाला केलेला सुसाट डान्स.
कॅडलरोड वरच्या सण्ण-सण्ण जाणाऱ्या कार्स. 

 मोहन निवास मधलं माई मावशीचं घर, तिथली थंड फरशी आणि तिचा कुसका दीर,
इकडे एकदा मुन्गळ्याने कडकडून चावून माझं रक्त काढलं होतं.

 समर्थ व्यायाम मंदिर आणि त्यांची रॉक क्लाइम्बिन्गची वॉल.
उद्यान गणेश आणि बंगाल्यांची मोट्ठे डोळेवाली देखणी देवी.

 गांधी पूल, सकाळचं चमचमत पाणी आणि व्हॉलीबॉल.
टॉपचा डायविंग बोर्ड, उजवीकडचा सोन-वर्खी  समुद्र....पोटातला गोळा आणि सगळ्या शंका १.५ सेकंदात पार करणारी टरकॉइझ पाण्यातली उडी!
शॉवरमधली भसाड्या आवाजात गायलेली गाणी, अस्लम भाईच्या कॅन्टीनमधला आम्लेट पाव,वडा उसळ आणि कैरीचं झाड. 
गेटबाहेरचा मोठ्ठ्या मिश्यावाला दाणे विकणारा चाचा. 

 स्लॅशसमोरचा ८७ चा बस-स्टॉप.
मी नेहमी स्लॅशकडचे ट्रेंडी कपडे हौसेनी बघत बसायचो पण आत जायची डेअरिंग व्हायची नाही.

 स्काउट हॉल मधलं पुस्तक प्रदर्शन, आणि बरिस्तासमोरचा बाईकवाल्यांचा शो ऑफ!
मैदानावरची नेट प्रक्टिस आणि चिखलातला फुटबॉल.
संध्याकाळी कट्टयावर लगडलेले विविध ग्रुप्स आणि फसफसता उत्साह.
वॉक करणाऱ्या चाबूक मुली आणि मुलांच्या टेबल फॅन सारख्या फिरणाऱ्या माना!!!

 एस. पी. जी. मध्ये टेनिस खेळणाऱ्या एका फटका मुलीवर माझ्या मित्राचा मेजर क्रश होता.
तिचं नाव आम्ही स्टेफी ठेवलं होतं आणि रोज संध्याकाळी ५ वाजता तिला फक्त जिमखान्याच्या आत जाताना बघायला आम्ही खास बांद्रयावरून जात असू :)

 सगळं आठवलं की वाटते तेव्हा आपण तरुण आणि वाय. झेड.  होतो
आणि आता .....फक्त वाय. झेड. !!!

(लवकरच बॅन्ड्रा वेस्ट )





Wednesday 21 September 2011

मुंबई कोलाज : दादर वेस्ट

 यडीअल बुक डेपो, पुस्तकांचा कोरा करकरीत आणि बाजूच्या मुतारीचा मिश्र वास,
फास्टर फेणेची अशक्य सुंदर पुस्तकं.
उभा वडा, छबिलदासची खोल खोल आणि कधी कधी बाउन्सर जाणारी नाटकं, धुरू हॉलमध्ये अनोळखी लग्नात घुसून हादडलेल जेवण.
प्लाझाचा लाफिंग बुद्ध, आणि टिळक ब्रिज वरचा पहाटेचा भाजी बाजार.
गोमंतकच्या बाहेरची ला SSSSSSS म्ब रांग, खांडके बिल्डींगमध्ये मावशीकडे खाल्लेला लालचुटुक मटणाचा रस्सा.

 लक्ष्मी कंगन कॉर्नर जवळ कशावरून तरी आई-बाबांचं झालेले मोठ्ठ भांडण आणि आता ते 'घफस्टोट' घेणार अशी उगीचच वाटलेली अल्लड भीती.
पाणेरी, सोनेरी, काचेरी, भंबेरी  ..अशी काय काय साड्यांची दुकानं आणि प्रदीप स्टोअरच्या बाहेरचा रफुवाला.
शिवाजी मंदिरातला तिसऱ्या घंटेनंतरचा गर्भ काळा अंधार आणि बाबांबरोबर परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहिलेलं "कलम ३०२". 
छत्र्यांचे जगप्रसिद्ध डॉक्टर, कबुतर खाना आणि अतिरेक्यांच्या %#$% चा परत %^$%@.

 गणपतीत चालू होणारी आणि दिवाळीची वर्दी आणणारी व्यापारी पेठ, रानडे रोड वरचा दिवाळीच्या आदल्या दिवशीचा केऑस, आणि अ‍ॅडॅक्समधली आयुष्यातली पहिली इलॅस्टिकची फुल पॅन्ट.

......तुम्हाला काय वाटलं शिवाजी पार्क विसरलो ना ?? NO F#$%@G WAY! 
खास शिवाजी पार्कचा वेगळा कोलाज याच ठिकाणी याच वेळी उद्या :)


Monday 19 September 2011

मुंबई कोलाज : दादर इस्ट

स्वामीनारायण मंदीर (इकडे आमचा शैलू आणि शिल्पा पहिल्यांदा भेटले)!
स्टेशन बाहेरच्या इराण्याकडची ट्रेकर लोकांची मैफल.
हिंदू कॉलानीतली गर्द झाडं, शांत गल्ल्या आणि लाकडी जिने.
मुंबई पुणे बस स्टॅन्ड वरचे  चलाख ट्रॅव्हल एजंट्स आणि शिवनेरी वेटिंग रूम मधले सकाळचे प्रसन्न अभंग. रुईयातली तरुणाई, मणी'ज कडची अनलिमिटेड चटणी आणि बालदीतल सांबार.
कैलाशकडची दाट गोड लस्सी.

सगळ्यात अलीकडच्या रुळावर थांबलेल्या सुस्त मेल्स.

४ नंबर प्लॅट्फॉर्मवर सकाळी ७ वाजता येणारी इंटरसिटी आणि सोमवार सकाळची हुरहूर,
१ नंबर प्लॅट्फॉर्मवर शुक्रवारी रात्री ९ वाजता येणारी तीच इंटरसिटी आणि वीकएंडचा जोश! 

कोहिनूर हॉलमध्ये अटेंड केलेली लाखो लग्न आणि विधींनी पकल्यावर गोड जेवणाआधी हळूच मारलेली बिअर. 
एन जी के क्लास मधला रगडून केलेला अभ्यास आणि १० वीचं दडपण! 
गावावरून आल्यावर बाबांनी टॅक्सीवाल्याशी केलेला लफडा आणि प्रवासात विस्कटलेल्या चुकार कुरळ्या केसांत खूप व्हल्नरेबल, गो ssssss ड दिसणारी आई!

असं खूप काही काही!

(उद्या अर्थातच दादर वेस्ट :))

Saturday 17 September 2011

मुंबई कोलाज : गिरगाव

मुंबई कोलाज :
हे आहेत माझ्या डार्लिंग मुंबईच्या विविध भागांतले वास , आवाज , रंग आणि स्पर्श... एखाद्या कोलाज सारखे एकाच वेळी तरतरी आणणारे आणि हुरहूर लावणारे. चालू करतोय गिरगावपासून :

गिरगाव : चर्नीरोडचा ब्रिज , गायवाडीतला चिक्कीवाला , प्रार्थना समाजातला उदबत्तीचा वास, ओपेरा हाउस वरचे हिऱ्यांचे सौदागर आणि फाफडा जिलेबी (अतिरेक्यांच्या %#$% चा %^$%^ ), ती पत्रिकांची दुकाने, सी पी टॅन्क वरच्या गायी, चाळींच्या शेरीतला आंबूस वास आणि राजुदादाच्या सेंटचा घमघमाट, फडकेवाडीचा गणपती, प्रकाशची ती सूक्ष्म टेबल्स आणि स्वर्गीय साबुवडा, मिणमिणत्या चिमणीतला गंडेरीवाला. 
शेणवे वाडीतले राडे आणि मठाबाहेरचे गजरे....आणि या सगळ्यात असूनही नसलेला समुद्र!

उद्या (दादर इस्ट )






Saturday 3 September 2011

तो एक ब्लॉगर होता

तो एक ब्लॉगर होता ....रोज ब्लॉग टाकायचा आणि चेक करायचा एकसारखा ...
नवथर प्रेमिकाच्या उत्साहाने...
कोणाला आवडले कोणी कमेंट्स टाकल्या ...कोण फॉलो करतेय का ?
नवी कमेंट आली की तो तरारून यायचा .
आणि ६ चे ७ फॉलोअर झाले तेव्हा तर नाचता नाचता त्याचा टॉवेल सुटला .

तो एक ब्लॉगर होता ...पण त्याला भूकही लागायचीच आणि त्यामुळे अर्थातच कामही  करावं लागायचं.
पण प्रोग्राम लिहिता लिहिता ....एक्लिप्स आणि rally च्या गुंत्यात आणि...बोअरिंग मिटींग्समध्ये..
तो laptop अर्धवट झाकून साळसूदपणे टाईप करायचा ...
पावसाच्या थेंबांची गाणी ...प्रेमभंगाची तडफड आणि दही हंडीची नशा !!!

तो एक ब्लॉगर होता....त्याला सिरीअसली वाटायचं की लोकांनी दिवसभर त्याचा ब्लॉग चेक करायला हवा किमान फेसबुकवर लाईक तरी,
पण वेडे लोक मुलांची admission , कर्जाचे हप्ते , आजारपण वगैरे क्षुल्लक गोष्टींतच अडकून राहायचे ,
आणि त्याचा ब्लॉग तसाच राहायचा ....नटून छान तयार होऊनही बॉय-फ्रेंड ने टांग दिलेल्या पोरीसारखा ....वाट बघत.


पण तो फारसं वाईट वाटून घेत नसे ....कारण तो एक ब्लॉगर होता .
सकाळी उठून त्याने नव्या उत्साहाने ब्लॉग उघडला आणि ...
३ नवीन कमेंट्स होत्या ...मनापासून लिहिलेल्या ...
त्याचं पुन्हा फुलपाखरू झालं कारण तो एक ब्लॉगर होता....आणि ते तिघंसुद्धा :)

-नील