Sunday 30 October 2011

ज बऱ्याच वर्षांनी 'तो' झिपमध्ये अडकला आणि बऱ्याच वर्षांनी ब्रम्हांड आठवलं!
लहानपणी 'तो' अडकलेला तेव्हा बाबा मदतीला आलेले.

आता बाबा नाहीत पण ब्रम्हांड मात्र आठवलंच.
डोळ्यांत टचकन पाणीच आलं...नव्हे बाबांच्या आठवणीने नव्हे...खूप झोंबल्यामुळे.
बाबांच्या आठवणीने रडू कधीच येत नाही....छातीत दुखतं मात्र खूप!

त्या वेळी बापाने आपल्या पोराला अलगद हळूच संकटातून सोडवलेलं...आणि मग वेदना आणि शरमेनी लाल झालेल्या पोराला दिलखुलास हसून थोपटलेलं.

आता मात्र पोरालाच स्वतःचा बाप होऊन स्वतःची मदत करायला लागली,
स्वतःची आणि स्वतःच्या छोट्या भावाची सुद्धा!

-नील आर्ते

Friday 28 October 2011

मुंबई कोलाज: वांद्रे पूर्व

बाबांबरोबर मी लहानपणी बरेचदा ठाण्याला जायचो.... रात्री उशीरा परत येताना सायन वरून उजवीकडे वळलो की खाडीचा तो चिरपरिचित वास नाकात घुसायचा आणि ड्राईव-इनच्या पडद्यावरचा पिक्चर रस्त्यावरूनही दिसायचा...
मग पेंगुळलेल्या मनाला खात्री पटायची की आपण घरी आलोय...वांद्र्यात! आणि उगीचच खूप छान वाटायचं.

बेहराम-पाडा आणि खेरवाडी! सगळं काही आलबेल असलं तरीही दोघांमधला अगदी सू sssssssssss क्ष्म ताण (जो ९२ नंतर कधीच पूर्ण जाऊ शकणार नाही. )

खेरवाडीतली २७ नंबरची नवरात्रीतली  स्निग्ध नजरेची देखणी देवी, "पास-नापास" मंडळाचा गणपती.
मनोहरकडचे समोसे, ३४ नंबरची भायगिरी.

अमेय मधली कोथिंबीरवडी, हाय-वे गोमंतक मधले स्टीलच्या चकचकीत थाळीतले ताजे फडफडीत सेक्सी फिश फ्राय, बोरकरची उकडलेला बटाटा मिक्स केलेली मिसळ!

एम. आय. जी. क्लबचे ग्राउन्ड, त्याच्यावरचा आजोबा पिंपळ आणि त्यावर हिवाळ्यातल्या कोवळ्या सकाळी बघितलेले बुलबुल, दयाळ, बार्बेट आणि इतर अनेक गॉर्जीअस पक्षी.  
गेट जवळचं आंब्याचं उतावळ झाड ज्याला जानेवारी एंड मध्येच इटुकल्या कैऱ्या लागतात. 

क्लब मध्ये साजऱ्या केलेल्या एक लाख थर्टी फर्स्ट आणि अंगात आल्यासारखा केलेला डान्स!

दातांचे डॉक्टर डिगीकर, त्यांचे पांढरे शुभ्र केस आणि दात कोरताना चालू असणारी विविध भारतीवरची जुनी भावगीतं.

शांत साहित्य सहवास आणि आतलं फणसाच झाड, त्याला लटकणारी अज्रस्त्र वटवाघळ!
वरती गच्चीवर अभी सावंत बरोबर घासलेलं बी. एस. सी. चं फिजिक्स...
आणि खाली पार्किंगमध्ये त्याचीच वयाच्या सव्वीसाव्या वर्षी निघालेली अंत्ययात्रा!

स्वामी नारायण मंदिरापाठी मिळणाऱ्या "अणुबॉम्ब"च्या बिया, ज्या पाण्यात टाकल्यावर बरोब्बर एक मिनिटांनी ठाप्प करून फुटायच्या.

गुप्ताजी भेळवाला, त्याच्याकडची मऊसूत रगडावाली पाणीपुरी आणि तोंडात टाकल्यावर होणारे तिखट आंबट गोडसर चवींचे स्फोट!

आणि तशाच एक लाख तिखट आंबट गोडसर आठवणी!

तुम्ही एक नोटीस केलंय?
नेहमी "बॅन्ड्रा वेस्ट" असतं आणि "वांद्रे पूर्व" ...
बॅन्ड्रा वेस्ट म्हणजे मीनीज घालणारी फुल्टू फटका बोल्ड मुलगी!
आणि वांद्रे पूर्व म्हणजे तिची सलवार कमीज घालणारी चष्मीस, शांत, पण तितकीच ग्रेसफुल मोठी बहिण! 

गव्हर्मेंट कॉलनीत अशा साध्या + चाबूक बहिणींच्या जोड्या खूप होत्या हे कॉलनीतला कोणताही पोरगा मान्य करेल ;)
अर्थातच खूप खूप लवकर : गव्हर्मेंट कॉलनी!!!

-नील आर्ते











Tuesday 25 October 2011

माटुंग्याच्या लेन मधून आणलेला षटकोनी ढब्बू आकाश कंदील.
त्याचे पहाटे तीन वाजता पडणारे लाल पिवळे उबदार कवडसे.
नमाच्या शाळेतील पोरांनी बनवलेल्या गॉर्जीअस पणत्या.
म. न. से. नी दारात अडकवलेल उटणे.
आईच्या शंकरपाळ्यान्चा बांद्रा स्टेशन वर येणारा खरपूस वास. 
फटाके ....सोड ना ... पैसा, कान, बालमजूर, पर्यावरण सगळ्यांचे छत्तीस. 
FCUK चा विक्केड काळा शर्ट.

उद्या आणि परवा आणि तेरवा सुद्धा ऑफिस नसल्याची गुदगुदलीदार जाणीव .
आणि चार वाजता उठून दिवाळी पीत पीत लिहिलेलं हे स्टेटस अपडेट. 


इन शॉर्ट हॅप्पी हॅप्पी हॅप्पी दिवाळी !!! :)

-नील आर्ते

Saturday 15 October 2011

"शनिवारचा" स्टड

प्रिल मधली शनिवार संध्याकाळ, शिवाजी पार्कचं सी सी डी तरुणाईने फुललेलं.
त्याने एन्ट्री टाकली आणि सगळ्या पोरींचं काळीज लक्कन हललं.
ट्रेंडी स्पाईक्स, "जॅक-जोन्स" ची मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स आणि "डिझेल"चा तलम स्लीवलेस टी शर्ट.
शिवाय कमरेवर उगीचच स्टायलीत बांधलेला लाल चेक्सचा "स्कॉच एन सोडा"चा फ्लॅनेल शर्ट.  
सव्वा सहा फूट उंची, शिडशिडीत बांधा पण फोर आर्म्स आणि दंडात दिसणारी प्रचंड ताकत.

सी सी डी मधल्या विविध मुली विविध कारणांसाठी तात्काळ त्याच्या प्रेमात पडल्या:

मियाला त्याच्या वाईड नेक टी शर्ट मधून दिसणाऱ्या रुंद  छातीवरला तीन मूर्तींचा एक्झॉटीक टॅटू आवडला,

सुहानीला त्याचे रुसक्या पोरासारखे किंचित फुगलेले गाल खूप क्युट वाटले,

आणि साल्साला आवडली त्याची नजर: एकाच वेळी किंचित रागीट, आश्वासक आणि निरागस, 
चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

सगळ्या मुलींच्या प्रेमळ + त्यांच्या बॉय फ्रेंड्सच्या जळू नजरांना फाट्यावर मारत आपल्याच मस्तीत त्याने एक टेबल पकडलं आणि तो शांतपणे टिश्यू-पेपर्सवर काहीतरी लिहित बसला.

साल्सा तर वेडावली होती, माहित नाही किती वेळ गेला १० सेकंद? ५ मिनटं? की २ तास?

अचानक तो उठला,
हसत दाणदाण पावलं टाकत तो साल्साकडे आला, आणि त्याने तो टिश्यू-पेपर साल्साला दिला. 
साल्सा थुयथुयली, नक्की त्याचा नंबर देत होता तो. 
तिच्या डोक्यावर अलगद प्रेमळ हात ठेवून तो आला तसा परत फिरला आणि निघून गेला.

साल्सानी खुशीत टिश्यू उघडला आणि ती बावचळली अक्खा टिश्यू पेपर राम-नामाने भरला होता, आणि कुठेतरी हनुमान जयंतीची आरती जोरात चालू होती.
-------------------------------------------------


वाचकहो या गोष्टीला खालील श्लोकाचा आधार आहे :
अश्वथामा बळीर्व्यासो हनुमानाश्च  विभिषण कृपाचार्य च परशुरामां सप्तैता चिरांजीवानाम  
अर्थ : अश्वथामा, बळी, व्यास,  हनुमान, विभिषण, कृपाचार्य, आणि परशुराम  हे सात चिरंजीव आहेत.
-नील आर्ते


Wednesday 12 October 2011

(गोष्टुली: ४) वास


न्हाळ्यातली  प्रसन्न सकाळ!
सकाळी ८ वाजता पुण्यातल्या त्या छोट्याश्या सार्वजनिक बागेत अजूनही सुखद गारवा होता.
बहावा पिवळाधम्मक फुलला होता ...
माळ्याने निगुतीने लावलेला कवठी चाफा, पहाटे पडलेला प्राजक्ताचा सडा, वेडं बकुळीचं झाड,
आणि पाचोळ्याच्या शेकोटीचा धूर या सगळ्याचा मिश्र धुंद वास भरून राहिला होता. 
 बागेतील एका शांत कोपऱ्यात खुशीत त्याने सगळा वास छातीत भरून घ्यायची तयारी केली ...

आणि व्हाईटनरची  बाटली परत नाकाला लावली!


-नील आर्ते

Friday 7 October 2011

मुंबई कोलाज: बॅन्ड्रा वेस्ट


स्टेशनचं ब्रिटीशकालीन गेट आणि समोरचा 'यादगार' फालुदा : 
तिथे लटकवलेल्या नवसाच्या सुरया, फालुद्यावरची माव्याची खापरी आणि कधी कधी पोट खराब झाल्याने लागलेली "गाळण" :),
लकीची बिर्याणी आणि त्यातले खरपूस बटाट,
हिल रोडवरची गर्दी आणि तरतरीत सावळ्या 'माका-पाव' मुली,  
हर्श बेकरी आणि गोडसर मेयोवाला (विनीतच्या भाषेतला :)) "पॉवर" बर्गर.


माउंट मेरी फेअर मधली गजबज, काळ्या चण्यांचा प्रसाद आणि त्यावरून पास केलेले एक लाख "ढामढूम"  जोक्स.
बॅन्ड-स्टॅन्ड वरची कपल्स, छक्के आणि पोलिसांच्या शिट्या.
कॅम्पचा ज्यूस!
बॅन्ड-स्टॅन्ड सी सी डी त  बसून प्यायलेली वाफाळती कॉफी आणि समोरचा उफाळता पावसाळी ग्रे समुद्र.
रॉक्समधले खेकडे पकडायचा वेडसर प्रयत्न, 
आणि कपारीतला लाजरा खेकडा लपल्यावर स्वतःही लपणारा थोडासा "टाईट" पुरी :)

कॅन्डीज मधले गोव्याचा फील देणारे रंगीबेरंगी दिवे आणि बनाना मिल्क-शेक.
लीलावतीमधली बाबांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि फाटलेली %$#@.

रफिक भायच्या 'सेकण्ड चान्स' मधले अशक्य सुंदर स्टायलीश शूज,
कार्टर रोडवरचे गडगंज श्रीमंत पण 'वन्टाय ,वन्टाय' करत जीवाला जीव देणारे वैभवचे मुस्लीम मित्र.
स्टमक मधलं चायनीज!

गेइटी-गॅलेक्सी मधले समोसे आणि शेवटचा शो सुटल्यावर कब्रस्तानाजवळून भीत भीत मारलेला शॉर्ट्कट.

सेंट सबॅस्टीयन स्कूल मधले शामकचे डान्स क्लासेस.
जरी मरी मंदिर आणि बांद्रा तलावातली बदकं.

लिंकिंग रोड, चपलांची दुकानं आणि मुलींचे घासाघीस करून घामेजलेले पण अख्ख्या जगाची दौलत मिळाल्यासारखे फुललेले चेहेरे :)

एका दिवाळीत मी आणि नमानी केलेली बेहोष खरेदी आणि शेवटी रात्री १२ वाजता स्टाफ बरोबर बंद केलेलं शॉपर्स स्टॉप!

ह्यूज,फेंडी, कॅज्युअल्स, किंक, साय ब्रांश, रुचिरा (हे पोरींचं फेवरेट) .......असंख्य ट्रेंडी कपडे वाली बुटीक्स,
आणि जगातले सगळे ब्रॅन्ड्स!

मी कधी एल. ए. ला गेलो नाही (खरं तर अजून विमानातच बसलो नाहीये :) ) पण असं ठाम वाटतं की लिंकिंग रोड, पाली हिल, कार्टर रोड नक्की एल. ए., सनसेट बुले व्हा, बेवर्ली हिल्स सारखं असणार.
कदाचित थोडं कमी स्वच्छ पण शुअर शॉट जास्त प्रेमळ!


(लवकरच मेरी जान वांद्रे पूर्व )

Tuesday 4 October 2011

(गोष्टुली: ३) गुन्हा


त्याचे डोळे गिल्टी प्लेझरनी चमकत होते, 
समोर पडलेल्या देहातील निर्जीव डोळे धुरकट काचेसारखे दिसत होते.
त्याने अजून सटासट घाव घालून त्याचे बारीक तुकडे केले ..रक्त थिजलेल होतं पण एक ओघळ चाकूवर आलाच.
त्याने ओलसर ओठांवरून जीभ फिरवीत आजूबाजूला बघितलं ..सगळा पुरावा बेमालूम नष्ट करायला हवा होता. 
तो पकडला गेला असता तर वाट लागली असती.

सगळी सोसायटी फक्त व्हेज लोकांसाठी होती ..मासा तळण्यापेक्षा कालवण केल्यास वास फारसा बाहेर गेला नसता!


-नील आर्ते