Saturday 13 February 2016

प्रिय अल्बर्ट काका यांस,

प्रिय अल्बर्ट काका यांस,
स. न. वि. वि. आणि मन:पूर्वक अभिनंदन.
स्वर्गात (आता हे मानण्या न मानण्यावर म्हणा) किंवा जिकडे असाल तिकडे मज्जाय बुवा आज एका माणसाची :)
'टोल्ड या' म्हणत कॉलर टाईट करूनच टाका…
क्षीण का होईना पण आवाज आलाय 'कृष्णा'-बेबी आणि 'विवर'-स्टडच्या धडकेचा…

कोणीतरी चिरगूट सडा-सिंग बोललाच,
"इतका बारीक आवाज आला तो ही इतक्या वर्षांनी त्याचं काय एवढं?"
त्याला काय सांगायचं यार?
कशी यशाची-प्रेमाची इटकू-बिटकू-इवलाली झुळूक काफी असते धडपड्या जीवाला ते?

आता त्या दिवशीचंच बघाना, मोठ्ठ्या ग्रुपमध्ये सगळे डिनरला बसलेलो आणि ती बाजूलाच.
म्हणजे आपलं बोलणंबिलणं काय नाय हां तिच्याशी जास्त… ती म्हणजे फ्रेंडच्या फ्रेंडची फ्रेंड…
कुठे चिपका उगीच… 
पण ते भोकर डोळे बघितले की छातीचा कापूस होतोच.
ते सोडा… 
तर पनीर हंडी मागवलेली आणि आम्ही अकराजणं…
दहा जणांत अर्धं अर्धं पनीर वाटलेलं… तिला शेवटचा तुकडा आणि आपल्याला इल्ला.    
पनीर म्हणजे आपला वीक-पॉइन्ट पण ग्रुपमध्ये चालतं यार… आपण कूल…
एकदिवशी पनीर नाय खाल्लं तर काय मरत नाय…   
माझी आपली समोर बसलेल्या विक्कीशी भंकस चालू…
त्याला टाळ्या देउन झाल्या…
आणि सहज प्लेटमध्ये बघितलं तर पनीर प्रगट…
तिच्या प्लेटमधलं पनीर गायब…
मॅडम बघतायत तिसरीकडेच…
देवा… दिल गार्डन गार्डन झालं आपलं!    
त्या पनीरची अंगठी करून  बोटात घातली असती राव मी…

शेवटी पनीर काय किंवा क्षीण आवाज काय… समझने वाले को इशारा काफी है… क्या चाचू?
आणि विंदा सरांनी म्हणून ठेवलंयचना, "तितके यश तुला रग्गड" वगैरे…
सो कॉन्ग्रॅट्स पुन्हा एकदा आणि हॅप्पी व्हॅलन्टाइन्स डे. 
आणि हो… ढासू हेअर-कट हां :)

-नील आर्ते   




    


Wednesday 10 February 2016

(देह-फुलं: ४) घळ

सुजना शॉवरमधून बाहेर आली आणि आरशासमोर थबकली.
टॉवेल गुंडाळलेला आपला देह ती न्याहाळत राह्यली.
तिच्या चंदेरी केसांवर अजूनही कुठे कुठे पाणी चमकत होतं.
कपाळावर, गालांवर, डोळ्यांच्या कडेला काळानं साठोत्तरी खुणा उमटवल्या होत्या…
पण मान मात्र तशीच होती अजून… ताठ… हंसावलेली…
आणि मानेखाली तिची ती घळ… किंचित रुंदावलेली!

टॉवेल सोडून आपलेच उभार निरखले तिनं…
स्वच्छ नितळ सावळी जोडी… वयोमानानं थोडी उतरलेली…
एकाच वेळी उत्फुल्ल… आणि समजूतदारसुद्धा!

कबीर डोकं घुसळायचा त्यांच्यावर…
म्हणायचा पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर इथेच आहे… हमिनस्तू  हमिनस्तू  हमिनस्तू!
मग घट्ट लपेटायचा त्यांना चादरीत आणि उष्ण नि:श्वास सोडत रहायचा त्या घळीवर…
काहीतरी पुटपुटत चक्क गप्पा मारायचा त्यांच्याशी…
एकदा तर त्यानं कविता केलेली त्यांच्यावर…
मग ओढून घ्यायची ती त्याला आपल्या छातीवर आणि म्हणायची,
"घेऊन टाक तुझेच आहेत ते."
मग तो डोकं उचलून म्हणायचा,
"नाही ते तुझे आहेत फक्त तुझेच…
मी आहे एक वाटसरू ज्याला तू दिलीयस फक्त परवानगी आणि आसरा या मायाळू सावलीत…
जिथे मी लपू शकतो घटकाभर… जगाच्या भगभगीत प्रकाशापासून…
पण एरवी त्यांचं काय करायचं… ते किती आणि कोणाला दिसू द्यायचे हा सगळा हक्क तुझा आहे फक्त तुझा!"

आज कबीर खूप आठवत राह्यला तिला…
पण असे काय दु:खाचे कढ वगैरे येत नव्हते, उलट छान वाटत राह्यलं तिला.
तितक्यात फोन फरफरला… लीना होती.
हॅप्पी पासष्टी बेब्स… आज बर्थ-डेला अ‍ॅवार्ड घेतेयस हे मस्तच…
बरं संध्याकाळी फंक्शनला भेटूच… मुआ मुआ मुआ…
नेहेमीसारखं चिवचिवून लीनानं फोन ठेवला.

'संध्याकाळी काय घालायचं ठरवायला हवं'
सुजनानं वॉर्डरोब उघडला,
ऑरेंज कुर्ता आणि पॅन्ट्स…
निळा कुर्ता आणि पॅन्ट्स…
लाल कुर्ता आणि जीन्स…
पण विलक्षण कंटाळा आला तिला ते सगळे कपडे बघून, गात्रं गळून गेल्यासारखं झालं…
जाऊच नये वाटलं…
आणि अचानक तिला तो दिसला: एल. बी. डी.
ती आणि कबीर लंडनला असताना घेतलेला… वीस एक वर्षांपूर्वी.
विव्हियन वेस्टवूडचा तो सुपर-डुपर लो-कट काळा शॉर्ट ड्रेस!
तिनं अलवारपणे तो हॅन्गरवरून काढला आणि त्याच्या काळ्या सॅटीनवर गाल घासले.
घालावा आज... पण नको खूप क्लीव्हेज दिसेल… तिनं परत आत ठेवला.
तितक्यात कुठून तरी हॉट-पॅन्ट्स पडल्या… त्या तर अजून जुन्या…
कधीतरी एका पार्टीत तिनं हॉट-पॅन्ट्स घातलेल्या आणि कोणत्यातरी पोरींनी "किती काळे पाय ते" वगैरे कायतरी कुजकट कमेंट्स पास केलेल्या...
तेव्हा कबीरनं समजावलेलं,
"अरे सोड ना बेब्स… तुझ्याइतक्या चांगलं नाचू शकत नायत म्हणून जळते त्यांची.
कसली गोड दिसत होतीस तू…
फाट्यावर मार त्यांना… आणि त्या काय आपल्याला जेवायला देतात काय? गेल्या उडत!"

कबीरच्या आठवणींनी ती मग दिवसभर मंद मंद हसत राह्यली.

संध्याकाळी:
------------------------------------------------------------------------------------------
खच्चून भरलेल्या हॉलमध्ये तिनं एन्ट्री टाकली आणि अचानक सगळे शांत झाले.
तिला खुद्कन हसूच यायला लागलं…
एका कोपऱ्यातून लीनी 'फाकडू' ची खूण करत होती तिला तिनं ओठांनीच कीस फेकला…
आणि ती सगळ्या नजर झेलत पुढे झाली…
छातीवर आगगोळे घेणाऱ्या खुल्या बुरजासारखी!

-सुझन सरेण्डन यांना सादर अर्पण!