Saturday 30 December 2017

दीपक मामा (भाग २)

समज तुझा मित्र बऱ्याSSS च वर्षांनी तुझ्या घरी आलाय. 
यू. एस. ला असतो वगैरे... 
पण एक टाइम तुम्ही ज्याम धमाल केलीये. 
आज घरी कोण नाहीये, बायको माहेरी वगैरे गेलीये. 
फक्त तू एकटाच... 
आणि तो आला, तुम्ही उराउरी भेटलात, गप्पा चालू झाल्या... 
हा कुठे असतो, ती कुठे असते, यंव नी त्यंव. 
चहा झाला. 
एक तासानी मित्र म्हणतो, "चल निघतो मी."   
तुम्ही म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
परत गप्पा चालू होतात. 
दोन वाजतात. 
मित्र परत निघतो.  
तुम्ही म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS
एक काम कर मस्त जेवूया, स्वैपाकाच्या मावशी साधंच पण अल्टीमेट जेवण करतात. 
शिवाय कालच मस्त घट्ट दही लावलंय, अगदी तुला आवडतं तसं. 
मित्र होय-नाही करत थांबतो. 
तुम्ही गप्पा मारत जेवता. 
मग सिगरेटी पेटतात. 
आरामखुर्च्यांत दोघंही शांतपणे बसता. 
तसंही खऱ्या मित्रांना एकसारखं बोलायची गरज नसतेच ना!
मित्र परत प्रयत्न करतो, "चल भाई निघतो आता."
तुम्ही परत म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
बसल्या बसल्या डोळे मिटता दोघंही. 
उठता तेव्हा स्ट्रेट पाच वाजलेले असतात. 
परत... "
आता मामाच्या आधी मीच म्हणतो, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
मामा हसतो,
"
मग तुम्ही आलं घालून मस्त चहा करता...
चहा झाल्यावर मात्र मित्र पायात चप्पलच घालतो.
तुम्ही त्याला नाक्यापर्यंत सोडायला खाली उतरता.
नाक्यावर आणखी १५ मिनटं तुमच्या गप्पा रंगतात.
आणि फायनली सकाळी दहा वाजता फक्त अर्धा तास भेटायला आलेला मित्र...
संध्याकाळी ६ वाजता रिक्षात बसतो... नाईलाजाने. 
तर निखिल..."

दीपक मामा फायनली समेवर येतो,

"पहिला गियर टाकताना दाबलेला क्लच असाच सोडायचा. 
नाईलाजाने निरोप  द्यावा लागणाऱ्या मित्रासारखा... प्रेमाने...
थां S ब रे SS जाशील रे SSS करत.
हे लक्षात ठेवलंस की  जन्मात तुझी  गाडी कधी  पहिल्या  गियरवर बंद नाही पडणार !"


"चला सुरुवात झाली तर एकदाची" मी मनात म्हटलं.


क्रमश:






Wednesday 27 December 2017

दीपक मामा (भाग १)

दीपक मामा...
खरं तर तो माझा मामा नव्हेच. माझ्या मामीचा तो भाऊ. पण सगळ्या भावंडांबरोबर मी पण त्याला मामाच म्हणायचो.
आमची मामी म्हणजे तिच्या तरुणपणी गिरगावातलं बडं प्रस्थ. गिरगावातलं तेव्हाचं एकमेव ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्या मालकीचं.
पण आमच्या मामानं तिला फुल्ल फिल्मी स्टाईलमध्ये गटवलेली वगैरे... पण तो वेगळाच किस्सा... पुन्हा कधीतरी.

तर दीपक मामा... आणि त्याच्या वडलांचं आणि नंतर त्याच्याकडे वंशपरंपरेनी चालत आलेलं ड्रायव्हींग स्कूल. इथे गिरगावातला जवळ जवळ प्रत्येक कारेच्छू ड्रायव्हिंग शिकलाय.

त्याची ड्रायव्हिंग शिकवण्याची बडबडदार शैली आख्ख्या एरियात फेमस आहे.

एखादा शिकाऊ विद्यार्थी / नी स्टिअरिंग, क्लच, ब्रेक सगळं सोडून खो खो हसतायत आणि दीपक मामा गडबडीनं गाडी कंट्रोल करतोय हे दृश्य तुम्हाला गिरगावातल्या गल्ल्यांमध्ये अवचित कधीही कुठेही  दिसू शकतं.

तर असंच एके दिवशी मीही गाडी शिकायचं ठरवलं.
आता मी आठवड्याचे पाच दिवस पुण्यात आणि वीकेण्डला मुंबईत.
म्हणजे ते पोस्ट मॉडर्न तुटलेपण ऑलरेडीच आमच्या आयुष्यात...
धड इथे नाय धड तिथे नाय वगैरे...
म्हणजे पुण्यात छान मुलगी टिंडरवर मॅच झाली झाली तोपर्यंत आपण मुंबईत पोचणार...
आणि तिला दिसणार डिस्टन्स: १२५ किलोमीटर. 
तसंच व्हाईस-व्हर्सा.
म्हणजे अबोध प्रेमाच्या कळ्या जन्मत:च कोमेजणार वगैरे.
पण सॉरी ते जाऊ दे... आय डायग्रेस.

Monday 27 November 2017

आज्जी... गंsss

ज्जी पिक्चर खरं तर एका असाइनमेन्टचा भाग म्हणून बघितलेला.
स्वतःबरोबरच डेट करायची असाइनमेन्ट... धम्माल करायची, स्वतःला पॅम्पर करायचं अशी ती असाइनमेन्ट होती.
आणि त्यासाठी 'आज्जी'ला गेलो.
ते चुकलंच जरासं...

काही पिक्चर एवढे अंगावर येणारे आणि ब्रिलियंट असतात की त्यांना अप्रतिम, सिनेमॅटिक जेम, ढासू स्क्रिप्ट वगैरे वगैरे म्हणणंही खूप एक्सप्लॉईटेटिव्ह वाटू शकतं.
म्हणजे कौतुक तर करायचंय पण त्यातला कन्टेन्टच इतका खरागर्द, काळाशाsssर आहे की स्तुतीचे या मितीतले सगळे शब्द भंपक वाटू शकतील...
अशी गोची झालीय माझी.
पण रहावत तर नाहीयेच.

हायवेवरून निवांत चाललेली आपली आरामशीर ए.सी. कार कुणीतरी अचानक थांबवून आपल्याला बाहेर खेचावं...
आणि बळजबरीनं दाखवावा समोरचा रक्ता-मांसाचा चिख्खल... हायवेवर रोड-कीलमध्ये मारल्या गेलेल्या ढोराचा.
तशी घट्ट मानगूट पकडली या मूव्हीनं.
मी तसा स्वतः:ला बऱ्यापैकी स्ट्रॉंग वगैरे समजणारा पण इकडे मात्र मला क्षणोक्षणी पळून जावंसं वाटत होतं.
आणि त्याचवेळी समोर काय चाललंय ते खिळवून सुध्दा ठेवत होतं... सापाच्या तोंडातल्या उंदरासारखं.
सगळा मूव्ही बघताना ओटीपोटातून चालू होऊन आख्ख्या शरीरात पेटके पसरत होते...
भयाचे, रागाचे, दु:खाचे, वेदनेचे (आणि एक आनंदाचासुद्धा).   

फार काही रिव्हील करणार नाहीये मी पण तो एक मॅनिक्वीनचा सीन... नो फकिंग वर्ड्स!

आणि सुषमा देशपांडे...
या बाईंना मला एकदा भेटायचंय आणि फक्त त्यांचे दोन्ही हात घट्ट हातात घेऊन कपाळाला लावायचेत...
आणि खुप सारं थँक्स म्हणायचंय...
अजून काय सांगू?

आता मूव्ही भडक आहे, बीभत्स आहे किंवा गिमिकी आहे असं काही जणांचं आर्ग्युमेण्ट असू शकतं.
पण पर्सनली मला तरी ते सगळं प्रचंड रिलेव्हन्ट वाटलं.
असं होऊ शकतं (किंवा काही प्रसंगांबाबत व्हावं) असं वाटण्याचं श्रेय आपल्या समाजाकडे आणि या चित्रपटाकडे परफेक्ट विभागून जातंच

आणि शेवटी चित्रपट अनुभवणं ही पर्सनल गोष्टच असते मुदलात.
घरी आलो तेव्हा आईला, बहिणीला, जिवाभावाच्या मैत्रिणींना छातीजवळ घट्ट पकडून त्यांच्या कपाळाचे मुके घेत रहावे अशी काहीतरी खूप खूप माया दाटून आलेली.
'रेगे' आणि 'सैराट' बघितल्यावर सुद्धा असंच काय काय विचित्र वाटत राह्यलेलं... हा मराठी सिनेमाचा विजयच.

तर लोकहो,
प्लीज बघा हा मूव्ही.
तुम्ही माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये असाल आणि नाही आवडला 'आज्जी' तुम्हाला तर...
तिकीट दाखवा आणि माझ्याकडून रिफंड घेऊन जा...
प्रॉमिस!

-नील आर्ते


 






    

Wednesday 18 October 2017

सर्व नव्या-जुन्या, धडपडणाऱ्या, तडफडणाऱ्या, फडफडणाऱ्या लेखकांना:

... आणि तुला येईल एखादा फोन, एखादा मेसेज...
अज्ञातातून अवचित. 
जगाच्या कुठल्यातरी बिलोरी कोपर्यातून...

कथा आवडल्याचं सांगणारा.
किंवा त्यातल्या ञुटी आतड्यातून सांगणारा.
जपून ठेव तो मेसेज...
कारण तोच असतो दुर्मिळ काजू आयुष्याच्या कमर्शियल मसालेभातातला!


-नील आर्ते

Tuesday 17 October 2017

मंदार भारदे यांच्या परवाच्या दिवाळीविषयीच्या लेखाविषयी

हा लेख व्यक्तिश: मला खूप खूप आवडला. ( मूळ लेख इथे वाचता येईल)  
दिवाळी मलाही अजूनही असंच आणि इतकंच वेडं करते त्यामुळे प्रचंड रिलेट झालो. 
गणपतीपासूनच मला तिचे वेध लागतात... नवरात्र म्हणजे खरं तर मेजर रॉकस्टारची कन्सर्ट ओपन करणाऱ्या अपकमिंग बँडसारखी असते. 
आणि दसऱ्यापासून तिचा रंगगंध भिनायला लागतो...
कोजागिरीशीसुध्दा माझ्या आयुष्यातले काही खूप सुंदर पिठूर क्षण जोडलेले आहेत.    
धनत्रयोदशीच्या रात्री मी एकटाच भुतासारखा फिरत असतो कॉलनीतल्या रस्त्यांवरून... कंदील बघत... उद्याच्या पहाटेच्या त्या आनंदी अपेक्षेचे घोट रिचवत. 

आणि मग एकदाची ती पहाट होते... अंत पाहून शेवटी धाडकन स्टेजवर अवतरणाऱ्या रॉकस्टारसारखी. 
ते तेल उटणं... ओवाळणाऱ्या भावंडांविषयी भारदे जे म्हणालेयत मला ते तसंच आणि तितकंच म्हणायचं.
ती पहाट तशीच रहावी तिची सकाळ होऊच नये असं वाटत राहतं. 

पण सकाळ होतेच...  
नंतरही सगळी धमाल असते..
पण... 
पर्सनली माझ्या मनात तरी... इट्स ऑल डाउनहील फ्रॉम हिअर ऑन. 

आयुष्य म्हणजे या दिवाळीपासून पुढची दिवाळी येईपर्यंत केलेला टाईमपास असं सेफली म्हणता यावं माझ्या बाबतीत... बहुतेक :)
खरं जगायचं ते दिवाळीतच. 

सध्यातरी इतकंच... कारण भुतासारखं फिरायची वेळ झाली :) 

-नील आर्ते 

Sunday 3 September 2017

डोळे 'भरून'...

शौर्य फ्लॅटच्या गॅलरीत आला... सहजच. त्यानं छातीभरून श्वास घेतला. मुंबईचा वास, मुंबईची हवा.
बाराव्या मजल्यावरून त्यानं डावीकडे नजर टाकली... कालीना युनिव्हर्सिटीचा अंमळ हिरवा पट्टा.
आणखी लांबवर दिसणारा एअरपोर्टचा कंट्रोल-मनोरा. तो मनोरा नेहमी त्याला 'बुदबळा'तील वजिरासारखा वाटायचा. 'बुदबळं' त्याच्या आजीचा शब्द. भारी गोड वाटायचं त्याच्या कानांना ते.
आजीच्या आठवणीनं हलकेच हसत त्यानं नजर उजवीकडे फेकली.

बॅन्ड्रा-कुर्ला कॉम्प्लेक्सच्या रस्त्यापलीकडे तिवरांच्या झाडीचा छोटासा तुकडा अजून शाबूत होता.
त्यापलीकडे खाडी... पाणी... हलके झुळमूळ वाहत असलेलं पाणी!
आपल्या घरातून पाणी दिसावं अशी त्याची कैक वर्षांची इच्छा पूर्ण झाली होती नवीन फ्लॅट घेतल्यावर.... आणि आत्ता लगेचच...
मनातनं ते विचार काढून टाकत गॅलरीतून त्यानं सरळ खाली बघितलं:
गव्हर्न्मेंट कॉलनी आणि भारतनगरच्या मधल्या पट्ट्यात पसरलेली ज्ञानेश्वर नगर झोपडपट्टी.
अधल्यामधल्या छपरांवर घातलेल्या त्या इलेक्ट्रिक ब्लू रंगाच्या ताडपत्र्या...
वरून दिसणारी अगणित छपरं, काही राखाडी काही इलेक्ट्रिक ब्लू आणि वरती केबलच्या थाळ्या.
ते ग्रे आणि ब्लू तुकड्यांचं विचित्र पॅटर्न तो बघत राहिला...

आणि एका राखाडी पत्र्यावर अवचित ती मुलगी आली.
चादरी वाळत घालायला... पावसाच्या ब्रेकमध्ये.
हार्डली चौदा-पंधरा वर्षांची असेल ती. शिडशिडीत, बहुतेक मुस्लिम.
तिनं जर्द निळ्या रंगाचा कुर्ता घातला होता आणि फुश्चिया फिटेड लेगिंग्ज
निळा आणि फुश्चिया त्याचं आवडतं कॉम्बिनेशन, सुखविंदर आणि रेहमानसारखं.
इतक्यात अजून एक मुलगी छपरावर आली... तिच्या मदतीला... बहुतेक तिची लहान बहीण.
तिचं पण कॉम्बिनेशन छानच होतं: फिकट पेस्टल हिरव्या रंगाचा कुर्ता आणि तशाच पेस्टल गुलाबी रंगाचा सैलसर पतियाळा.
पावसाळी हवेत राखाडी छपरावर लगबगीनं चादरी वाळवत घालणाऱ्या त्या मुलींचं कंपोझिशन...
निळं फुश्चिया हिरवं गुलाबी...
चंद्रमोहन कुलकर्णींच्या चित्रासारखं...
त्यानं डोळ्यांत भरून घेतलं आणि तो आत वळला.

डोळे 'भरून'... (६ वा आणि शेवटचा भाग )

दुसऱ्या दिवशी 
डॉ. मोटेंच्या चेकअप रूममध्ये:

डॉक्टर बाबाराव मोटे जागच्या जागी एक्साइटमेन्टनी उसळ्या मारत होते,
"इंटरेस्टींग... इंटरेस्टिंग व्हेरी व्हेरी इंटरेस्टींग..."

"अहो डॉक्टर... इंटरेस्टिंग आहे ते कळलं SSS पुढे बोला.",
पार्थसारथींनी वैतागून म्हटलं. 

डॉक्टर सांगू लागले,
"गुड न्यूज अशी आहे की बॅक्टेरियांचा काउंट किंचित का होईना कमी झालाय. 
म्हणजे वीस मिलियन होता तो अठरा मिलियन झालाय.
ऍंटीडोट बनवण्यासाठी आपल्याला आणखी एक दिवस डेस्परेटली हवा होता... तो मिळालाय.
आता आपण शौर्यचे डोळे वाचवू शकू... 
पण मी विचार करतोय की हे झालं कसं?
शौर्य काल दिवसभर काय काय केलंस सांग बघू?"

"विशेष काही नाही, सगळ्या गोष्टी बघून घेतल्या डोळेभरून"

"काही स्पेशल बघितलंस किंवा केलंस?"

शौर्य अडखळत म्हणाला,
"एका छान मुलीबरोबर... रात्री... वुई मेड लव्ह!"

मोटे विचारात पडले,
"हम्म... सेक्सचे फिजिओलॉजिकल फायदे आहेतच... पण डोळ्यांसाठी एवढा फरक पडेल... वाटत नाही... अजून काही?"

 शौर्य ओशाळला,
"ढसाढसा रडलो मी काल रात्री."

"रडलास... हम्म ओके... म्हणजे अश्रू... येस्स!",
मोटेंचा चेहेरा उजळला,
"सिम्पल व्हेरी सिम्पल... काय झालं असणार सांगतो:
आपल्या डोळ्यांतून पाझरणाऱ्या अश्रूंचे विविध प्रकार असतात. 
एक म्हणजे 'बेसल टिअर्स'.  जे मी पहिल्या मीटिंगमध्ये सांगितल्याप्रमाणे कायम बाहेरच्या इन्फेक्शन्सशी लढत असतात. 
शौर्यच्या डोळ्यांतल्या जिवाणूंचं मुख्यत्वेकरून ह्याच बेसल टिअर्सबरोबर युद्ध चाललं होतं आणि तेव्हातरी जिवाणू जिंकत होते.
पण मग काय मज्जा झाली..."
डॉक्टर मोटे परत उसळ्या मारू लागले,

Saturday 2 September 2017

डोळे 'भरून'... (भाग ५)

शौर्य आणि जमुनाच्या गप्पा रंगत गेल्या...
लंचनंतर आदिलनं त्यांना एकटं सोडत अलगद कल्टी मारली.

ते दोघं उबेर पकडून शौर्यच्या फ्लॅटवर आले तेव्हा रात्रीचे दहा वाजून गेले होते.
आजूबाजूच्या बिल्डिंग्ज आणि खालच्या झोपडपट्टीतसुद्धा दिवे लागले होते.
जमुना बघत राहिली... उंचावरून दिसणारी ती लखलखती मुंबई... डोळे भरून.
आणि शौर्य तिला बघत राहिला... डोळे भरून.
तिला ते जाणवलंच...
मिस्कील हसत ती म्हणाली,
"तुझ्या फ्रेंडची ओपनिंग लाईन भारी चीप होती...
मी तर चौकडीच मारली होती तुम्हा दोघांवरही... पण मेटालिकाचा फॅन म्हटल्यावर मला रहावेना.
पण काहीही होतं ते, तुझे डोळे जाणार आहेत वगैरे... नॉन्सेन्स."

शौर्य हलकेच उत्तरला,
"पण ते खरं असेल तर"

"चल घटकाभरासाठी मान्य करूया की ते खरं आहे...
काय काय मिस् करशील तू असं काही झालं तर?"

शौर्यनं एकदा आजूबाजूला बघितलं,
"सगळंच...
ही पसरलेली मुंबई... खालची झोपडपट्टी...
विंडसस्क्रीनमधून भर्र उलगडणारा एक्सप्रेस-वे...
पंकज भोसलेचे रविवारचे सिनेमावरचे लेख आणि नंतर जाऊन बघितलेले ते सिनेमे...
चित्रं: चंद्रमोहनची, व्हॅन गॉगची, पॉल क्लीची...
फेसबूकवरल्या रेणुका खोतच्या बेधडक पोस्ट्स...
त्या त्या समोरच्या ज्वेलरीच्या ऍड मधल्या केवड्यासारख्या दिसणाऱ्या श्रुती मराठेचं होर्डिंग...
'पुणे बावन्न'मधले सईचे ते गारुड करणारे डोळे...
माधुरीचं स्माईल...

आणि अर्थातच आयुष्यात आलेल्या खऱ्याखुऱ्या असंख्य बायकांची व्हिजन्स:
विविध वयाच्या जाड्या-बारीक काळ्या-गोऱ्या प्रत्येकीत काहीतरी जीव ओवाळून टाकावं असं...

Thursday 31 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ४)

दोघं 'रॉकस्टार'मध्ये पोचले.
शौर्यची खूप आवडती जागा.
कामा रोडवरच्या आतल्या शांत गल्लीत एका रॉकवेड्या पारसी बाबानं चालू केलेली.
मोठ्या मोठ्या हाईपवाल्या रॉक कॅफेंपेक्षा कैकपट अधिक निवांत, सुंदर... आणि चांगलं म्युझिक वाजवणारी.

आल्या आल्या शौर्यनं डोळे भरून त्याच्या आवडत्या फोटोकडे बघितलं.
समोरच लावलेलं ते जेम्स हेटफील्डचं मोठ्ठ पोस्टर... मेटालिका या त्याच्या आवडत्या बॅण्डचा लीड सिंगर.
बहुतेक 'व्हिप्लाश' वाजवतानाचा.
त्याचं ते देखणं पाय फाकवून उभं रहाणं...
आडवी धरलेली गिटार...
मनगटातलं काळं रिस्टबॅन्ड...
कपाळावर आलेले लांब सोनेरी केस...
गलमिश्या...
आणि किंचाळणाऱ्या तोंडातून दिसणारे ते जगप्रसिद्ध उभट भयसुंदर दात.

Sunday 27 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ३)

परत आत्ता:
आदिलचा फोन वाजत होता...
शौर्यानं भानावर येत तो घेतला,
"ओय चल तयार हो फटाफट. आपण जेवायला जातोय तुझ्या आवडत्या 'रॉकस्टार'मध्ये"

पुढच्या पाच मिनिटांत आदिल धडकला खाली.
त्याची काळीशार 'व्हेन्टो' आणि तिचा तो जर्मन बांधा...
दोन क्षण डोळ्यांत साठवत राहिला आदिल...
आणि मग एक सुस्कारा सोडून पॅसेंजर सीटवर बसला...
नेहमी खरं तर शौर्यच चालवायचा 'व्हेन्टो' दोघं एकत्र असले की...
पण आज नको...
नजरेचा काय भरोसा नाय च्यायला.

सी लिंकवरनं गाडी बिंग बिंग चालली होती...
शौर्याला त्यांचे असंख्य लॉंग ड्राईव्ह्ज आठवत राहिले,
"आठवतंय आदिल? आपण कोकणात उतरत होतो... गगनबावडा घाटातून...
आणि एका अडनिड वळणानंतर अवचित समोर आलेला तो गुलमोहर...
गच्चम फुललेला... लालभडक."

"ऑफकोर्स... आणि तुझ्या दंडावर पण एक गुलमोहर होता... लालभडक रक्ताचा.
गोळी चाटून गेली होती तुला."

"हो. पण तो एक क्षण आपलं मिशन, पाठीअसेल्या जिवावर उठलेल्या गाड्या, दंडावरची जखम सारं काही विसरायला झालं होतं... ते लाल गारुड बघून."

Thursday 12 January 2017

पुनश्च हरी ॐ

टिळकांची मुदलातली धार आहेच या वाक्याला... आणि नवीन वर्षावर तुटून पडायला हत्यार धारदार हवंच.
तसं तर मुंबईत या पिढीत मजेत हसत खेळत वाढलेला असल्यामुळे फाळणीचा/भूकंपा/पुराचा व्यक्तिश: अनुभव नाहीच...
पण समृद्धी, मायेची माणसं, तगडी सपोर्ट सिस्टीम सगळं तोडून मोडून गेल्यावर परत शून्यातून सुरुवात करताना
असंच एखादं वाक्य घशातले आवंढे गिळत छातीचा दगड करत त्या निर्वासितांनी म्हटलं असेल का?
अरे हो... नाही कसा २६ जुलैला स्वतःचं आणि मित्रांची घरं पुरुषभर पाण्यात तरंगताना बघितलीयतच की...

पण खंत करण्याचा पॉईंट नाहीच आहे ना वरच्या वाक्याचा... आपलं ठरलंय तसं.
पॉईंट आहे तो टिळकांच्या क्लिनिकल शांतपणे पुढची लॉजिकल स्टेप उचलण्याचा...
घर गेल्यावर...
जॉब गेल्यावर...
ब्रेकअप झाल्यावर...
व्यसन सुटल्यावर...
पुरेसं दुःख करून त्या त्या जखमेची देणी देऊन झाली की...
एक दिवस शांतपणे पुढे चालायला लागण्याचा...
परत वीटेवर वीट जोडण्याचा :)

सो पुनश्च हरी ॐ

-नील आर्ते