Sunday, 12 March 2017

मांजा: फायनल आणि ३ रा भाग

संक्रांतीची संध्याकाळ:
आख्ख आकाश पतंगींनी भरलं होतं.
लाल, हिरव्या, जांभळ्या, गुलाबी, पिवळ्या पतंगी...
आणि त्यांचे बा SSS रिक दिसणारे मांजे...
बदामी, घासलेटी, तारवाला, साखळीछाप मांजे... अगदी फुलपुडीचे दोरेसुद्धा.

नारळला कोणी आज सुखाने फक्त पतंग उडवू देणार नव्हतंच, त्याने नाईलाजाने दोन पतंगी कापल्या होत्या.
तपेलीच्या दोन ऑलरेडी 'कायपो छे' झाल्या होत्या आणि तो तिसरीची कणी बांधायला बसला होता.
आणि मन्या...
मन्यानी सात पतंगी कापल्या होत्या... नॉट आऊट... त्यात दिलावरच्या दोन.
खिडकीतून प्रेरणानं त्याला चक्क अंगठा आणि पहिल्या बोटाचा गोल दाखवून लाईन दिली होती.
पतंगीसारखाच मन्या हवेत होता...

आणि गच्चीत पिनाक आला.

हातात भला मोठा ढेल पतंग... गुलाबी रंगाचा...  मध्ये निळाशार चांद.
आणि रक्तासारखी लाल लांबलचक शेपूट.
भर्र वाऱ्यात फुरफुरणारा पतंग... शर्यतीच्या घोड्यासारखा.
आणि दुसऱ्या हातात फिरकी... पूर्ण भरलेली... हिरवट सोनेरी मांजाने.

माहित नाही का पण सगळे अगदी गप्प झाले होते.
पिनू इकडेतिकडे न बघता सरळ मन्याच्या विरुद्ध बाजूला गेला आणि त्याने पतंग कठड्यावरून खाली सोडली. पुढच्या क्षणाला त्याची पतंग वर झेपावली... त्याच्या पुढच्या क्षणाला ती सरसर जायला लागली. 
फिरकीतून सटासट मांजा सुटत होता आणि पतंग वर... अजून वर. 
निळा चांद गुलाबी रंगात मिसळला. 
लांबवर छोटूसा ठिपका दिसायला लागला वळवळणाऱ्या शेपटीसकट... विजयी शुक्रजंतूसारखा. 

दिलावरनं त्याच्या गच्चीतून नवा शिकाऊ बकरा हेरला आणि पतंग पिनूच्या पतंगीवर टाकली. 
तो सपासप घसटी मारायला लागला... 
आणि... आणि... त्याचीच पतंग कटली. 
दिलावर कपाळावर हात मारत फिरकी गुंडाळायला लागला. 
पिनू खुषीत हसला आणि शांत झालेल्या गच्चीवर पुन्हा आनंदी कल्ला झाला. 
मन्या सोडून सगळेच पिनूच्या नावानं ओरडत होते,
"सही छोट्टे!" "हक् है तेरेको जिनेका!" "हय पिनू!" "भाई शिकला पोरगा पतंग!"

पिनूनं मिस्कील हसत त्याची पतंग तपेलीच्या पतंगीवर टाकली आणि हलकेच घसटी मारली... 
तपेलीचा दुरंगा गुल्ल झाला.  
पण तो खाली जायच्या आतच त्यानं दुरंगा वरच्यावर आपल्या मांजावर लटकावला आणि हळूहळू खाली उतरवत तपेलीच्या हातात दिला. 
तपेलीनं आधी आ वासला आणि मग कौतुकानं पिनूच्या पाठीत धपाटा घातला. 

आता त्याचा मांजा सरसरत नारळच्या पतंगीकडे चालला होता,
पण पिनू हळूच काहीतरी मांजाजवळ जाऊन पुटपुटला आणि डांगूलनं नारळच्या पतंगीखालून हळूच स्वतःला सोडवला आणि त्याला एकटा सोडला. 

मग डांगूल वळला मन्याकडे     
   
उंचच उंच आकाशात दोनच पतंगी होत्या आता.
मन्या आणि पिनाक...
मन्याची जास्तच उंच उडत होती कारण तपेलीची पतंग लटकावण्याच्या नादात पिनूनं आपली पतंग बरीच उतरवली होती.
पण त्यानं हलकेच टिचकी दिली आणि पिनूची पतंग सपसप आकाशात चढू लागली.
मिनिटभरात ती मन्याच्या पतंगीला भिडली.
मन्या चवताळला.
त्यानं घसटी मारायला चालू केली सपासप दोन्ही हातांनी.
पिनू मात्र ढील देत होता अजून अजून.
मन्यानं तोंडात शिवी पुटपुटत फायनल हिसका मारला...
डांगूलनं आपले अणुरेणू फिरवत सूक्ष्म अणकुचीदार दात बाहेर काढले आणि चावा मारला.
बरोब्बर मन्याच्या कण्णीखाली.
दुसऱ्याच क्षणी मन्याची पतंग गुल्ल!

मन्या क्षणभर बघत राह्यला आणि मग दात ओठ खात पिनाकच्या दिशेनी सरकला...
पण थबकला.
गच्चीवरच्या मावळत्या उन्हात पिनाकचे डोळे वेगळेच चमकत होते.
आणि हातात तो बारीक धारदार मांजा... लवलवणारा.
का कोणास ठाऊक पण मन्याला धीर झाला नाही पिनूवर हात उचलायचा.
तो हळूहळू पाठी झाला.
त्याचे कान शरमेनी गरम झाले होते... सगळा उत्साह गळलेला...
तो खांदे पाडून परत फिरला...

इतक्यात...

त्याच्या पायात मांजाचं वेटोळं बसलं आणि तो भिरकावला गेला...
आधी कठड्याकडे आणि मग खाली... खूप खाली.

----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते


 
       


             
       
   
       

   

            

No comments:

Post a Comment