Friday, 6 November 2020

...नोई

जमुना तावातावानी बोलत होती,

"सो बेसिकली अँटीबॉडीज कशा बनतात ते आपल्या सगळ्यांना माहितीय..."

पृथ्वीला हसू यायला लागलं. 

आता खरं तर त्या रूममध्ये भारतातली किंबहुना बहुतेक जगातलीसुद्धा व्हायरॉलॉजीतली किडे माणसं बसली होती.  

पण पृथ्वी इतकी वर्षं राहून बायकोला नाही म्हटलं तरी थोडा फार ओळखायला लागला होता. 

समोर कितीही बाप माणसं असोत, जमुना अगदी कोअर बेसिक्स पासून सुरुवात करायची. 

आणि तसंही पृथ्वीची हरकत नव्हती, असं एक्साईट होऊन बोलताना तिच्या दोन्ही गालांवरचे खळीदार खड्डे खणत बुजत रहायचे. 

पृथ्वीला थोडंसं हॉर्नी फील झालं. 

ही समोरची कर्व्ही आणि रुंद स्वीमर खांद्यांची, ओतीव चॉकलेटसारख्या रंगाची, कोनॅक डोळ्यांची, पंजाबी ड्रेसातून डोकावणाऱ्या ब्राच्या लाल पट्टीबद्दल फक-ऑफ बेफिकीर असणारी, कदाचित नोबेल पारितोषिकाच्या उंबऱ्यावर असलेली स्त्री आपली बायको आहे ह्याचा त्याला एकाच वेळी अभिमान आणि विषाद वाटला. 

विषाद... कारण... जाऊ दे!

'आख्ख्या मानवजातीच्या अस्तित्वाची मिटींग चालू असताना आपलं सेक्सलाईफ महत्त्वाचं नाहीये', पृथ्वीनं स्वतःला बजावलं आणि  तो फोकस करू लागला. 

जमुना ताडताड बोलत होती,

"ह्या क्षणी आपल्याला अपघातानी का होईना पण माहिती झालंय की:

समजा हा डेडली व्हायरस म्हणजे एक सूक्ष्म मॉलिक्युलर लेव्हलची काठी समजली तर क्रमानी कमी होणाऱ्या आकाराच्या प्रोटीनच्या तीन चकत्या घातल्या तर तो निष्प्रभ होतोय. काहीसं असं:" 
"दॅट वॉज फकिंग रिस्की", पृथ्वी दात-ओठ खात पुटपुटला. 

"ठीकाय रे राजा", जमुना स्युडो-मधाळ आवाज लावत बोलली.   

"माझा प्रिय नवरा रागावलाय माहितीय मला मी स्वतःवरच हा प्रयोग केला म्हणून. सॉरी लव्ह", पण खरं सांगू का ते मानवजातीचं भवितव्य वगैरे ठीकाय पण कॉलेजात सुबोध जावडेकरांची "सायनाईडची चव" वाचल्यापासूनच माझ्या बकेट लिस्टमध्ये होतं असं काहीतरी करायचं."

तिनं डोळे मिचकावले. 

"फकिंग सायको!" पृथ्वी कौतुक + कंटेम्प्टच्या स्वरात पुटपुटला! 

"एनी वेज तर पटपट आत्तापर्यंत काय माहितीये आपल्याला त्याची उजळणी करूया:

१. ह्या व्हायरसरूपी काठीवर आपण तीन चकत्या आकाराच्या उतरत्या क्रमातच टाकू शकतो. 

जर छोटया चकतीवर मोठी चकती टाकली तर रिसेप्टर्स तयार होणार नाहीत सो अँटीबॉडीज तयार होणार नाहीत. 
२. सध्यातरी होस्टची बॉडी AB - ह्या चिकार दुर्मिळ रक्त गटाचीच हवीय. जो माझा आहे आणि पृथ्वीचासुद्धा. 
    
३. सर्वात मोठ्ठा प्रॉब्लेम: योग्य सिक्वेन्सनंतरसुद्धा बनलेल्या अँटीबॉडीज फक्त बायकांसाठी चालतायत. पुरुषांना नाही.", 
जमुना गंभीर होत म्हणाली. 

बाणेरच्या हिरव्यागार टेकडीतल्या कुशीतल्या निवांत लेनमधल्या नोव्हा बायोफार्माच्या सुबक बिल्डिंगमधल्या पहिल्या मजल्यावरच्या वॉररूममधलं वातावरण काच्चकन् गढू SSS ळ झालं!
सगळी टीम अस्वस्थ चुळबुळत राहिली. 

शेवटी जमुनाच पुन्हा बोलती झाली, 
"समहाऊ अपघातानीच बाय फ्लूक आपल्याला ह्या तीन प्रोटीन रिंग्ज मिळाल्या... 
पण माझ्या शरीरातल्या अँटीबॉडीज वापरून बनवलेलं व्हॅक्सीन सध्यातरी X क्रोमोझोम्स च्या जोडीसाठीच चालतंय, जर क्रोमोझोम च्या जोडीत Y असेल (XY: पुरुष XXY: दिव्यलिंगी इत्यादी) तर मात्र ते काम करत नाही"

पुन्हा सगळ्यांची अस्वस्थ चुळबूळ... पृथ्वीनं घसा खाकरला आणि अडखळत म्हटलं,

"म्हणजे आपण लवकर उपाय नाही शोधला तर आख्खी पुरुष जमात नामशेष घातलीय!!!" 

ही शक्यता तशीही सगळ्यांना माहीत होतीच पण तिला शब्दांत ऐकल्यावर पडल्यावर मात्र शरीर मिळालेल्या व्हॉल्डेमॉर्टसारखी अक्राळ विक्राळ झाली ती. 

जमुनाच्या डोळ्यांत भीती तरळली पण तिनं झपकन् स्वतः:ला सावरलं, 

"ओय आम्हांला तुम्ही पुरुष लोक्स हवे आहात...  

सेक्ससाठी नव्हे त्यासाठी दुसरे हजार मार्ग आहेत आमच्याकडे, 

पण पंखे पुसायला नी चिवड्याचे डबे शेल्फावरून काढायला ओके? 

तुम्हा सगळ्यांची विकेट गेली तर ओले टॉवर कोण टाकणार बेडवर? आणि ढमाढम पादणार कोण?? आणि मुख्य म्हणजे पॉर्न इंडस्ट्री कशी चालणार??? सो डोन्ट वरी आम्ही तुम्हाला असं सहजासहजी नाहीच जाऊ देणार"

ती हसायचा कृत्रिम प्रयत्न करत राह्यली... पण अचानक लहानखुरी इंटर्न नृपा विव्हळत अभद्र सुरात रडायला लागली. 

तिला तशीच वाहू देत सगळे सुन्न बसून राहिले. 

-------------------------------------------------

त्याच दिवशी रात्री जमुना + पृथ्वीचं घर:

दोघंही अबोल बसून फ्लॅटच्या गॅलरीतून दिसणारा पुणे-बेंगलोर हाय वे बघत होते. 

सतत वाहता हायवे मढ्यासारखा निपचित झाला होता. 

पायी चालणाऱ्या गरीबांचे तांडेही थांबल्यासारखे झाले होते. 

गरीब कष्टकऱ्यांनी अपार सहनशीलता दाखवली होती

पण आता सगळ्यांचीच दोरी तुटेस्तो ताणली गेली होती. 

त्या विचित्र विषाणूनी माणसं पटापटा मरत होती.  

जगाची लोकसंख्या पाच टक्क्यांनी घटली होती गेल्या महिन्यात आणि असंच चालू राहिलं तर... 

जमुनाला अजून एक लार्ज भरून गाटकन् प्यावासा वाटला. 

"च्यायला पृथ्वी असेल तरी का महिन्याभरानी, किंवा आपले बाबा, किंवा कोपऱ्यावरचा गब्दुल वाणी किंवा विकी कौशल किंवा ब्रॅड पीट किंवा नदाल किंवा नभ?"

तिनं विचार झटकत लॅपटॉपवरच्या सिम्युलेशन वर उगीचच नजर टाकली.

एखाद्या क्लूच्या आशेनी... पण तिचं ज्युपिटर नोटबुक लुळावलेलंच.  

नभ थोडासा चुकार ढगासारखा तिच्या मनात घोळत राहिला... 

पृथ्वी ऍबसेन्ट माईंडेडली बिअर मारत होता लांबवर बघत.

जमुना तटकन म्हणाली, "काल नभचा फोन आला होता!"

पृथ्वीचं नाक आक्रसलं, "इकडे काय करतोय तो?"

अरे गेस्ट सायन्टीस्ट म्हणून आला होता कॉस्मोलॉजीवर लेक्चर्स द्यायला. 

लॉकडाऊनमुळे इकडेच अडकून पडला. त्याला पासाडेनाला परत जाताच नाही आलं. 

जस्ट हाय बोलायला फोन केला होता."

"इकडे लोक मरतायत आणि त्या कॉस्मोलॉजी आणि आकाशगंगेचं काय लोणचं घालायचं?", पृथ्वी तुसडला. 

जमुनाला कुठून सांगितलं त्याला असं वाटलं... 

दोघंही सुम्म हायवे बघत ड्रिंक्स सीप करत राह्यले. 

-------------------------------------------------

त्याच दिवशी रात्री नृपाचं घर:

नृपापण चाळा म्हणून पुन्हा पुन्हा लॅपटॉपवर सिक्वेन्स टाकून सिम्युलेशन पहात होती. 

स्त्रीच्या शरीरातल्या व्हायरसवर संरक्षक प्रोटीनच्या तीन चकत्या उतरत्या आकारात चढवल्या की अँटीबॉडी एखाद्या चेन रिअक्शन सारख्या फटाफट जनरेट होत होत्या. 

पण पुरुषांवरती सेम प्रोटीन स्वतंत्रपणे बनवल्यास काम करत नव्हतं. 

तरीही तिनं उगीच चाळा म्हणून दहा बारा प्रयत्न केले पण शून्य उपयोग. 

खाली तिच्या पायाशी वैदीश खेळत बसला होता... लाकडी चकत्यांशी... गप्पपणे रेकॉर्डेड बाईच्या मराठी सूचना ऐकत . 

लॉकडाऊनच्या जस्ट आधी त्याचा तिसरा वाढदिवस झाला होता तेव्हा कोणीतरी गिफ्ट दिलेला गेम. 

तीन काठ्या आणि तीन चकत्या... आणि त्या चकत्या मूव्ह करायचा रेकॉर्डेड ऑडिओ.

त्याला असे खेळांचे-कोड्यांचे ऑडीओ, गोष्टी, बडबड-गीतं   ऐकायला परवानगी होती पण फोन / यु ट्यूब /  टी. व्ही. वर जवळ जवळ बंदीच होती. तिला त्याची कॉग्नीटीव्ह स्किल्स नैसर्गीकपणेच वाढू द्यायची होती. 

तिचं आणि प्रीतमचं शेवटचं भांडण वैदीशला फोन देण्यावरूनच तर झालं होतं. 

आणि प्रीतमनं हात उचलेला...

सगळा एपीसोड वैदीशच्या समोरच झालेला... 

त्या शॉकनेच वैदीश अजून बोलत नसेल का? तीन वर्षांचा झाला थोडं तरी बोलायला हवं त्यानं. 

तिनं काळजीनं ओठ चावला. 

का काही डिसऑर्डर असेल?

डॉक्टर म्हणालेले 'काळजी नको करायला बोलेल तो' पण तिचा धीर सुटत चाललेला दर आठवड्यानी    

आणि आता तर महिन्याभरात... लहान मुलग्यांना सुद्धा झपाट्याने इन्फेक्शन होत चाललेलं.  

सगळे पुरुष जाणार म्हणजे वैदिशसुद्धा... तिला परत रडायचा ऍटॅक येणार असं वाटलं.  

नृपा वैदीशच्या छोटुश्या लालसर गालांकडे बघत राह्यली काही मिनटं अशीच दातानी ओठ चावत.

तिनं पुन्हा लॅपटॉप ओढला. 

बाईच्या काठीवर तीन चकत्या उभ्या होत्या. हीला तिनं नाव दिलं सगळ्यांची आदिमाता: सोर्सची बाई

तिनं अजून एक आभासी व्हायरस टाकला सिम्युलेशनमध्ये पुरुषाचा. त्याला नाव दिलं: टार्गेटचा पुरुष 

मग बाईच्या काठीवरच्या पहिल्या दोन चकत्या काढल्या आणि व्हर्चुअल पेट्रीडिशमध्ये ठेवल्या. 

पण दोन सेकंदातच प्रोग्रॅम किंचाळायला लागला.

पेट्रीडिशमधलं प्रोटीन निष्प्रभ होऊ लागलं झपाट्यानं. 

तिला लगेचच कारण कळलं प्रोटीनच्या चकत्या मानवी शरीरातच सुरक्षित राहू शकत होतं. 

प्रत्येक चकती दुसऱ्या मोठ्या चकतीवर काळजीपूर्वक टाकायला काही तास तरी लागणार होते आणि तो पर्यंत बाकीच्या चकत्या फक्त मानवी शरीरातच राहू शकत होत्या. 

एवढा वेळ पेट्रीडिशमध्ये त्या रहाणं अजिबातच शक्य नव्हतं.

ती सुन्नपणे लॅपटॉप बघत राह्यली. 


पाठी वैदीशच्या खेळातली रेकॉर्डिंग चालू होती. 

इतक्यात अजून एक आवाज आला, "हा SSS"

तिनं चमकून बघितलं, 

वैदीश असे सुस्कारे सोडायचा कधी कधी मूडमध्ये असला की. 

तिला उगीचच थोडं छान वाटलं आणि ती वळली. 

तितक्यात परत आवाज आला, "...नोई, नोई"

वैदीश चक्क बोलत होता ती खेळातल्या बाईची रेकॉर्डिंग ऐकून!

"...नोई, नोई, हा SSS नोई, नोई,   हा SSS नोई"

त्याचे पहिले शब्द... 

नृपानं आधी छातीतून घर्रघुर्र असा काहीतरी विचित्र आनंदी आवाज काढला.  
मग वैदीशला गोलगोल उचलून फिरवला.
मग तो खिदळायला लागल्यावर त्याला खाली ठेवला  

मग तिनं अजून एक आभासी व्हायरसचा होस्ट टाकला सिम्युलेशनमध्ये हाही पुरुषच.

ह्याला म्हटलं बफरचा पुरुष 

तिला ही नावं बघून ऋषिकेश गुप्तेच्या फेमस कथेची आठवण झाली अन तशाही परिस्थितीत थोडं हसू आलं.   

तर आता तीन व्हायरसच्या काठ्या झाल्या.  

एक बाईच्या शरीरात आणि दोन पुरुषांच्या शरीरात एक एक. 

आता ते असं दिसत होतं. मग तिनी झटपट चकत्या मूव्ह केल्या. 
शेवटची मूव्ह:
सर्वात लहान चकती सोर्सच्या बाईवरून टार्गेटच्या पुरुषावर... 
तिला सूक्ष्म धडधड सुटली...
शू येणार असं वाटायला लागलं. 
तिनं आधी दोन्ही हातांच्या फिंगर्स क्रॉस केल्या आणि तशाच हातानं अलगद शेवटची चकती माउसनं हलवून पुरुषाच्या दांडीत टाकली.    
 
सिम्युलेशन घुम्म झालं... १ सेकंद ... २ ... ५... 
आणि झराझर टार्गेट पुरुषाकडे व्हर्च्युअल अँटीबॉडीज बनू लागल्या. 

आणि मग ती वैदीशच्या खेळण्याच्या बॉक्सची सटासट चुंबनं घेत सुटली. 

खेळण्याच्या बॉक्सवर लिहिलं होतं, 
वय वर्ष तीन आणि पुढील मुलांसाठी उत्तम शैक्षणिक खेळ:
टॉवर ऑफ हॅनोई 


    

   


No comments:

Post a Comment