Saturday 9 July 2011

केस (भाग १)

 वायूला आईने सकाळी सहा वाजताच गदागदा हलवून जागं केलं. 'वाईट बातमी बातमी . मेमेचे दादा गेले रे ' . वायूची झोप उडाली. मेमे मावशी आणि तिचे मिस्टर दादा दोघांचाही तो प्रचंड लाडका ...तसं दादाचं वय झालेलंच होतं पण तरीही वायूच्या छातीत कळ आलीच. 

 'ठीक आहे ममा मी तयार होतो , पटकन निघू आपण ' , तो झपकन उठला आणि सवयीप्रमाणे समोरच्या आरशात त्याची नजर गेलीच. दोन्ही कानशिलावरून मागे हटणारी हेअर लाईन बघून त्याच्या छातीत दुखलंच...परत त्याला स्वताचीच लाज वाटली , ' प्रसंग काय आणि आपण केसांबद्दल ऑब्सेस कसले होतोय '.
परत त्याच्या मनात चुकार विचार घुसलेच.  डॉ. पात्रांच्या औषधाने फारसा फरक पडला नव्हता . आपले केस झपाट्याने मागे चालले आहेत असं त्याला राहून राहून वाटत होतं.तो भराभर तयार झाला. आई आणि सायली तयारच होत्या. तशाही परिस्थितीत सायलीचे भरगच्च केस बघून त्याच्या मनात आलंच , 'कसले केस आहेत सायूचे , साला पोरींना बरं , टक्कल पडायची भानगड नाही , by default त्यांचे केस मस्तच असतात ! ' तिच्या सरळ दाट केसांवर , आणि पाणीदार डोळ्यांवरच तर तो कॉलेज मध्ये फिदा झाला होता.
 त्याने भरकटणार मन सावरलं..केसांचे विचार झटकले आणि दादांचं जाणं एकदम त्याच्या अंगावर आलं.तो दादांचा एकदम लाडका भाचा होता , त्यात त्यांना मुलबाळ नसल्याने मेमे मावशी आणि दादा त्याला मुलासारखाच मानत.
 लहानपणी दादा कधीही घरी आले की त्याला मोठ्ठ cadbury चॉकलेट आणायचे , आणि तो thank you बोलला कि प्रेमाने त्याला कडेवर उचलून घ्यायचे. त्यांची ती कपाळावर रुळणारी स्टायलीश झुलपं आणि अंगाला येणारा नेव्ही कट विल्स सिगारेटचा वास. अजूनही कोणाच्या शर्टाला सिगारेटचा वास आलं कि त्याला हटकून दादा आठवायचे.

 ते झटपट मावशीच्या flat वर पोचले.मेमे मावशी बरीच सावरल्यासारखी वाटत होती. तुरळक लोकं होती . दादांना हॉलमधेच ठेवलं होतं. ते शांत झोपल्यासारखेच वाटत होते. चेहऱ्यावर नेहमीचेच प्रसन्न भाव...पटकन उठून सिगारेट लाईट करतील असंच वाटत होतं. लख्ख गोरा रंग,रुबाबदार चेहेरा आणि पांढऱ्या रेश्मासारखे सरळ चमकदार केस !
 वायूचं मन परत भिरभिरल, 'दादा, वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा कसले केस आहेत यार तुमचे.तुम्ही तर चाललात आता मला द्याना ते ...प्लीईईज ! आयला दादांची पातळ लालचुटुक (एवढी वर्ष फुंकून सुद्धा ..) जीवणी किंचित विलग झाली का ? ते मिस्कील हसतायत , ते जिवंत आहेत ...वायू पुढे झेपावला ...''दादा दादा" !दोन चार जणांनी त्याला झटकन सावरलं. दादांचा चेहरा तसाच होता प्रसन्न खट्याळ.
 पाठी एक विशाल महिला कुजबुजली ,''पोराचं कित्ती ग बाई प्रेम !!" वायू ओशाळत मागे झाला. पुढच्या तासाभरात सगळा कार्यक्रम आटोपलाच.दादांनी देहदान करायचे ठरवले असल्यामुळे फारसे सोपस्कार नव्हतेच.
 वायूला खरंतर गळल्यासारखं वाटत होतं , पण उशिरा का होईना ऑफिसला जाणं भाग होतं, इलाज नव्हता ... clients बरोबर मिटींग्स होत्या. त्यानं रस्त्यात आई आणि सायूला सोडलं आणि तो कामाच्या रगाड्यात बुडून गेला पण दादांचं जाणं आणि त्याचे माघार घेणारे केस दोन्ही मनात आलटून पालटून ठुसठुसत राहिलंच 

३ महिन्यांनी ............

No comments:

Post a Comment