Saturday 6 April 2024

पुस्तक परिचय: घोस्ट रायटर आणि इतर विज्ञानकथा

ह्या पुस्तकाविषयी बोलायचं तर आधी थोडं लेखक आशिष महाबळविषयी बोलावं लागेल. 

आणि आशिषविषयी बोलायचं तर आधी थोडं आमच्या साय-फाय कट्ट्याविषयी. 

तर ह्या साय-फाय कट्ट्यावर मराठीतले बरेच हौशी आणि अनुभवी विज्ञानकथा लेखक मंथली चॅलेंजेस वर हिरहिरीने कथा लिहितात. 

एकमेकांच्या आणि जगातील उत्कृष्ट सायन्स फिक्शन्सविषयी चर्चा करतात वगैरे. 

आशिषची आणि माझी ओळख आणि मैत्री तिथलीच. 

आता गंमत काय आहे ना की कोणत्याही जोड शब्दात बसणारी माणसं किंवा कलाकृती ह्या शब्दाच्या अल्यापल्याड ५०-५० टक्के विभागलेल्या कधीच नसतात. 

(उदाहरणार्थ सोशिओ-पॉलिटिकल,  ट्रॅजी-कॉमिक वगैरे)

ती नेहेमीच एका सायडीला जास्त किंवा बहुतेकदा बरंच जास्त वजन टाकून असतात. 

तसंच साय-फायचं ही. 

साय-फाय मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंकसारखी वाटत आलीये.

म्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...
आता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी "काल्पनिक,
सामाजिक संदर्भ" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.
आणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा "अल्कोहोलच्या"
बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)

हेच रूपक पुढे रेटायचं झालं तर घोस्ट रायटर मधील बहुतेक कथा कडक स्कॉच ऑन द रॉक्स सारख्या म्हणता येतील. 
काही थोडंसच थम्स-अप असलेल्या रम सारख्या 
आणि थोड्या काही लॉन्ग आयलंड आईस्ड टी वगैरेसारख्या