Monday 27 July 2015

तळ्यात... (निखिल क्षिरसागर याच्या इंग्रजी कथेचा स्वैर भावानुवाद)

जूनही मला तो दिवस आठवतोय जेव्हा मी नेसीचा पह्यला फोटो 'बघला'…
हो लहानपणी मी 'बघितला'ला 'बघला' म्हणायचो…
खरंतर स्कॉटलंड मध्ये राहूनही माझं मराठी बरंच चांगलं होतं… आमच्या मांसाहेबांची कृपा…
बरं ते सोडा…
असं विषयांतर करत मी कुठच्या कुठे घुसतो.

तर काय सांगत होतो शाळेतून आल्याआल्या शुभं करोति म्हणायला मांसाहेब डोकं खात होत्या.
खरं तर दुपारचे फक्त चार वाजले होते पण आमच्या त्या छोट्याश्या 'इन्व्हर-नेस' गावात ऑलरेडी हिवाळी तिन्हीसांजा झाल्या होत्या…
आणि मी उगाचच श्लोक म्हणायचे सोडून टणाटण उद्या मारत होतो.
शेवटी आयोनी वैतागून माझ्या 'च्याबो'वर  न्यूजपेपरचा एक सटका मारला पण आम्ही म्हणजे चपळनाथ…
"च्याबो" सेफ आणि पेपर जमिनीवर!

त्या पेपरावरच मला तो फोटो दिसला:
धुरकट दिसणारं आमचं लॉक-नेस तळं आणि त्यात कायकी ती 'मॉन्स्टर'ची अस्पष्ट आकृती.
खरंच मॉन्स्टर होता की आईच्या कुठल्यातरी इंडियन मसाल्याचे डाग कोण जाणे…
पण आजूबाजूचे सगळे शेजारी पुढचे दोन दिवस मोट्ठे डोळे करून तो मॉन्स्टरच असल्याचं शपथेवर सांगत होते.

मलातर बंडला वाटल्या सगळ्या पण मी काय बोल्लो नाय… कुठे परत 'च्याबो'वर फटके खा… च्यायला!

पण हळू हळू लोकांचे वेडे चाळे वाढतच गेले नं काय…
'लॉक-नेस मॉन्स्टर'ला प्रेमाने नेसी काय म्हणायला लागले,
गाईड आवेशाने 'पुराव्याने शाबित' दाखले काय द्यायला लागले,
म्युझिअम काय स्थापन केलंन नी काय काय.

मी आपला मोठा होता होता मजा बघत होतो.
आमच्या शांत कंट्री साईडचं हळूहळू टुरिस्ट-ट्रॅपमध्ये रुपांतर होत होतं.
लोकं जगभरातून येउन फोटो काढून घ्यायचे तळ्यावर.
त्यांना सूक्ष्म आशा असायची की आपला फोटो निघतानाच पाठी तळ्यात खळबळ होईल…
लांब मानेचा तो अज्रस्त्र पशू गुरगुरत दर्शन देईल आणि पुन्हा पाण्यात सूर मारेल.

काय घंटा कोण यायचं नाय ते सोडा…
फोटोत यायचं फक्त एक तळं… अंमळ मोठं इतर तळ्यांपेक्षा…
आणि त्याचं काळंशार पाणी…
ते सुद्धा विचित्र चवीचं…
प्यायलं की सगळी आतडी ढवळून यायची…
कापडी पिशवी उलट केल्यासारखं वाटायचं आख्ख्या शरीरभर… अंगाला कसलीशी हुरहूर लागायची.
सॉरी… विषयांतर नको!



पण मला आवडायचं आमचं ते तळं.
तो मॉन्स्टरचा सगळा फार्स सोडला तर खूप सुंदर होतं आमचं लॉक-नेस तळं.
संध्याकाळच्या उतरत्या प्रकाशात त्याचं काळंशार पाणी अथांग चमकायचं गूढपणे…
आणि सगळी हुरहूर निवली की आतून शांत शांत वाटत जायचं.

तुम्ही बसा घेऊन त्या नकली मॉन्स्टरला
मला माझं तळंच मस्त!

त्या रात्रीपण निवांत चमकदार पौर्णिमा होती.
मी रमतगमत हाय-लॅन्ड्स मध्ये फिरत होतो.
अचानक काय वाटलं कुणास ठाऊक मी सगळे कपडे काढले आणि तलावात हळूच उतरलो…
मंद लहरींची कांकणं न तोडता तरंगत राह्यलो.
तळ्याचं पाणी घटाघट प्यायलो… आधीचा ठसका हळूहळू शांत झाला.
माझ्या आत पाणी आणि बाहेर पाणी…
आतलं पाणी हळू हळू वाढत गेलं…
माझा जीव सुपाएवढा झाला… मान लां sssब… आणि शरिर  मोठ्ठं!

बघायला कुत्रंसुद्धा नव्हतं… फक्त चारदोन मासे… त्यातले दोन मी उगीचच मटकावले…
तृप्तीनं खुशीत गुरगुरलो आणि पाण्यात खोलवर घुसलो…
भवतालची पिठोरी रात्र तेवढी मायेनं बघत राह्यली.

--------------------------------- समाप्त ---------------------------------

निखिल क्षिरसागर याच्या इंग्रजी कथेचा स्वैर भावानुवाद
मूळ इंग्रजी कथा इथे वाचा:  
http://weirdstorieslikelochness.blogspot.in/