Saturday 30 December 2017

दीपक मामा (भाग २)

समज तुझा मित्र बऱ्याSSS च वर्षांनी तुझ्या घरी आलाय. 
यू. एस. ला असतो वगैरे... 
पण एक टाइम तुम्ही ज्याम धमाल केलीये. 
आज घरी कोण नाहीये, बायको माहेरी वगैरे गेलीये. 
फक्त तू एकटाच... 
आणि तो आला, तुम्ही उराउरी भेटलात, गप्पा चालू झाल्या... 
हा कुठे असतो, ती कुठे असते, यंव नी त्यंव. 
चहा झाला. 
एक तासानी मित्र म्हणतो, "चल निघतो मी."   
तुम्ही म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
परत गप्पा चालू होतात. 
दोन वाजतात. 
मित्र परत निघतो.  
तुम्ही म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS
एक काम कर मस्त जेवूया, स्वैपाकाच्या मावशी साधंच पण अल्टीमेट जेवण करतात. 
शिवाय कालच मस्त घट्ट दही लावलंय, अगदी तुला आवडतं तसं. 
मित्र होय-नाही करत थांबतो. 
तुम्ही गप्पा मारत जेवता. 
मग सिगरेटी पेटतात. 
आरामखुर्च्यांत दोघंही शांतपणे बसता. 
तसंही खऱ्या मित्रांना एकसारखं बोलायची गरज नसतेच ना!
मित्र परत प्रयत्न करतो, "चल भाई निघतो आता."
तुम्ही परत म्हणता, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
बसल्या बसल्या डोळे मिटता दोघंही. 
उठता तेव्हा स्ट्रेट पाच वाजलेले असतात. 
परत... "
आता मामाच्या आधी मीच म्हणतो, "थां S ब रे SS जाशील रे SSS"
मामा हसतो,
"
मग तुम्ही आलं घालून मस्त चहा करता...
चहा झाल्यावर मात्र मित्र पायात चप्पलच घालतो.
तुम्ही त्याला नाक्यापर्यंत सोडायला खाली उतरता.
नाक्यावर आणखी १५ मिनटं तुमच्या गप्पा रंगतात.
आणि फायनली सकाळी दहा वाजता फक्त अर्धा तास भेटायला आलेला मित्र...
संध्याकाळी ६ वाजता रिक्षात बसतो... नाईलाजाने. 
तर निखिल..."

दीपक मामा फायनली समेवर येतो,

"पहिला गियर टाकताना दाबलेला क्लच असाच सोडायचा. 
नाईलाजाने निरोप  द्यावा लागणाऱ्या मित्रासारखा... प्रेमाने...
थां S ब रे SS जाशील रे SSS करत.
हे लक्षात ठेवलंस की  जन्मात तुझी  गाडी कधी  पहिल्या  गियरवर बंद नाही पडणार !"


"चला सुरुवात झाली तर एकदाची" मी मनात म्हटलं.


क्रमश:






Wednesday 27 December 2017

दीपक मामा (भाग १)

दीपक मामा...
खरं तर तो माझा मामा नव्हेच. माझ्या मामीचा तो भाऊ. पण सगळ्या भावंडांबरोबर मी पण त्याला मामाच म्हणायचो.
आमची मामी म्हणजे तिच्या तरुणपणी गिरगावातलं बडं प्रस्थ. गिरगावातलं तेव्हाचं एकमेव ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्या मालकीचं.
पण आमच्या मामानं तिला फुल्ल फिल्मी स्टाईलमध्ये गटवलेली वगैरे... पण तो वेगळाच किस्सा... पुन्हा कधीतरी.

तर दीपक मामा... आणि त्याच्या वडलांचं आणि नंतर त्याच्याकडे वंशपरंपरेनी चालत आलेलं ड्रायव्हींग स्कूल. इथे गिरगावातला जवळ जवळ प्रत्येक कारेच्छू ड्रायव्हिंग शिकलाय.

त्याची ड्रायव्हिंग शिकवण्याची बडबडदार शैली आख्ख्या एरियात फेमस आहे.

एखादा शिकाऊ विद्यार्थी / नी स्टिअरिंग, क्लच, ब्रेक सगळं सोडून खो खो हसतायत आणि दीपक मामा गडबडीनं गाडी कंट्रोल करतोय हे दृश्य तुम्हाला गिरगावातल्या गल्ल्यांमध्ये अवचित कधीही कुठेही  दिसू शकतं.

तर असंच एके दिवशी मीही गाडी शिकायचं ठरवलं.
आता मी आठवड्याचे पाच दिवस पुण्यात आणि वीकेण्डला मुंबईत.
म्हणजे ते पोस्ट मॉडर्न तुटलेपण ऑलरेडीच आमच्या आयुष्यात...
धड इथे नाय धड तिथे नाय वगैरे...
म्हणजे पुण्यात छान मुलगी टिंडरवर मॅच झाली झाली तोपर्यंत आपण मुंबईत पोचणार...
आणि तिला दिसणार डिस्टन्स: १२५ किलोमीटर. 
तसंच व्हाईस-व्हर्सा.
म्हणजे अबोध प्रेमाच्या कळ्या जन्मत:च कोमेजणार वगैरे.
पण सॉरी ते जाऊ दे... आय डायग्रेस.