Saturday, 2 June 2018

स्वमग्न लोनसमत्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते "अलिबाबा चाळीस चोर"...
लहानपणी बघितलेलं...
गिरगावच्या साहित्यसंघात...
सुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.
बहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.
खास करून गुहेतला खजिना:
त्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...
त्यांचं ते पिवळं गारूड अस्संच!

माझ्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडून डावीकडे वळलं की भस्सकन NH4 हायवेच लागतो.
त्याच्या किंचित आधी हा हँडसम उभा असतो आजकाल...
बाजूच्या रखरखटावर पिवळाई शिंपडत.
त्याला रास असती तर ती लिओ असणार असं मला उगीचच वाटतं.
आणि नाव असतं तर: ईशान अवस्थी.
पेशा असता तर: प्रोफेसर.
आणि हा राजबिंडा प्रोफेसर आख्ख्या वर्गानी बंक मारला तरी तत्व म्हणून रिकाम्या क्लासरूमला शिकवेल असंही वाटत राहतं.

आठवत रहातात मग असे स्वमग्न आत्मे इथं तिथं पाहिलेले...
आपल्याच मस्तीत आतल्या डोहात बुड्या मारणारे...
बाहेरल्या जगाला एफ. ओ. देत भरभर आनंद सांडणारे.

ती मित्राच्या हळदीला 'वाजले की बारा'वर बेभान नाचणारी स्थूल बाई आठवते... जिचा नवरा अस्वस्थ चुळबुळ करत होता...
ती गोरेगाव स्टेशनावर पाहिलेली कानातल्या हेडफोन्सबरोबर मोठ्ठ्यानं 'शेप ऑफ यु' गाणारी मुलगी आठवते... जिच्या सावळ्या गालांवर मुंबईचा घाम ओघळत होता.
'व्हिप्लाश'च्या शेवटच्या सीनमधला जीव खाऊन ड्रम्स वाजवणारा अँड्र्यू आठवतो... जेव्हा तो ओरडतो, "आय'ल क्यू यु इन!"  

हा बहावाही एक दिवशी खच्चून ओरडणार नक्कीच ते पिवळं सुख मावेनासं होऊन...
मी वाट बघतोय!

-नील आर्ते


Friday, 11 May 2018

सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर

सूचना:
या लेखात स्पॉयलर्स आहेत. खास करून ब्लॅक मिररच्या या एपिसोड्स विषयी: नॅशनल अँथम, फिफ्टीन मिलियन मेरिट्स, मेन अगेन्स्ट फायर, एन्टायर हिस्टरी ऑफ यु


धी आपण गाडीतून मस्त चाललेले असतो फॅमिलीबरोबर... सगळं सामान भरून लांब...
किंवा बाईकवरून डेमला पाठी घेऊन... टोचत असतात मखमली सुखद भाले आपल्या पाठीला...
किंवा एकटेच एंट्री टाकतो क्लबमध्ये... कडक शर्ट पॅन्ट मारून...

म्हणजे असं इन्व्हिन्सीबलच वाटत असतं आपल्याला...
पण अचानक कुठूनतरी कोणतरी भलं माणूस येतं आणि सांगतं,

"बॉस आपका डिक्की खुल्ला है..."
किंवा
"मॅडमका ओढणी टायरमे फसनेवाला हय..."
किंवा
"दोस्ता तुझी झिप् उघडी आहे..."

आणि बाल-बाल वाचतो आपण त्या संभाव्य आर्थिक/शारीरिक/मानसिक डॅमेजपासून!

'ब्लॅक मिरर'नं सुद्धा तसंच जागल्याचं काम केलंय... किमान माझ्यासाठी तरी!!

इथे ब्लॅक मिरर म्हणजे काळाशार आरसा... स्क्रीन...
आपल्या फोनचा, टॅबचा, टीव्हीचा, लॅपटॉपचा
काळा आरसा आणि त्याची काळी जादू...
या काळ्या जादूला आमच्या मालवणीत चपखल शब्द आहे: 'देवस्की'!

देवस्की म्हणजे एखाद्या माणसाचं गुंतत जाणं अनाकलनीय अभद्र गुंत्यात.
बरेचदा समजून-उमजून!

Saturday, 28 April 2018

सिरीज दुसरी: कॅलिफॉर्निकेशन


कॅ
लिफॉर्निकेशन माझ्या आयुष्यात आली तेव्हा कायतरीच विचित्र स्टेजमध्ये होतो मी.
पुरुष ज्या ज्या चुका करतो त्या सगळ्या करून झालेल्या आणि त्यांची किंमत चुकवायचा 'शीटी' दौर चालू होता.
आपल्याला हे हवंय की ते हवंय (इकडे मात्रा वेलांटीने रिप्लेस करता यावी) की नुसतंच उंडारायचंय अशी सगळी घालमेल घालमेल चालू होती.
आणि रप्पकन आयुष्यात हँक मूडी आला.
त्याचं पुरुषसूक्त घेऊन.

मला ना लहानपणी आठवतंय,
काही चांगलं प्रोफाउंड नाटक-पिक्चर असलं ना की बहुतेकवेळा माझे बाबा खूर्चीवरून उसळून ओरडायचे, "ही साली माझी स्टोरी आहे माझी."
आणि आई मंदमंद हसत रहायची समजूतदारपणे.
कॅलिफॉर्निकेशन बघताना असे प्रसंग कैक वेळा आले.
हो म्हणजे 'आय ॲम माय फादर्स सन' वगैरे.

Sunday, 22 April 2018

सिरीज पहिली: आन्तूराश (Entourage)

पल्या मुंबईत काही एरियाजमधली मुलं भारी म्हणजे भारीच स्ट्रीट स्मार्ट असतात,
उदाहरणार्थ गिरगाव, भेंडीबाजार, लालबाग, बँड्रा - माउंट मेरी स्टेप्स आणि इतर अनेक.
(तुमच्या एरियाचं नाव ऍड करा बिन्धास्त :))
पण गम्मत म्हणजे हे सगळे भाग कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणावे असेच.
त्या त्या एरियातल्या पोरांची एक खास अदा असते, चालूपणा असतो, 
गोष्टी सहजासहजी न मिळाल्यानं दुनियादारीची एक तगडी समज असते,
दोस्ती दुष्मनीचे घट्ट हिशेब असतात इत्यादी इत्यादी...

क्वीन्स हा न्यूयॉर्कमधला अस्साच एक फारसा श्रीमंत नसलेला भाग,
आणि व्हिन्सेंट चेस उर्फ 'व्हिन्स'  हा क्वीन्समधला एक देखणा तरुण.
थोडं नशीब थोडं टॅलेंट असं काय काय जमून येतं...
व्हिन्स धाडकन एका रात्रीत सुपरहिट्ट पिक्चरचा सुपरस्टार होतो...
आणि हॉलीवूडला पोचतो.

पण एल. ए. च्या मायानगरीत तो एकटा येत नाही तर आपल्या तीन घट्ट दोस्तांना घेऊन येतो.
शिवाय त्यांना (पोसत असला तरी) पोसतोय असं वाटू नये म्हणून आपल्या क्रूमध्ये लुटूपुटूची काम देतो.
मॅनेजर, ड्रायव्हर, पर्सनल ट्रेनर नं काय काय,
ही गोष्ट आहे त्याची अन त्याच्या ताफ्याची...
म्हणूनच Entourage (उच्चार: आन्तूराश हे नाव.

Friday, 20 April 2018

तीन सिरीज

ला नेहमीच वाटत आलंय की सिनेमा, पुस्तकं, नाटकं, गाणी आणि सगळ्याच कलाकृती...
कलाकारासाठी पर्सनल असतातच येस्स!
पण रसिकासाठी त्याहून कैकपटीने जास्त पर्सनल असतात!
तो बनवणारा त्याला काय बनवायचं ते मस्त बनवतोच.
पण ते घेणाऱ्याला काय घ्यायचंय ते प्र - चं - ड सब्जेक्टिव्ह असतं.

म्हणजे "मॅट्रिक्स" बघून काही लोकांना त्यातले स्टंट्स आवडलेले,
काही लोकांना त्यातले 'प्राडा'चे ढासू स्टायलिश कपडे आवडलेले,
काही लोकांना भगवदगीता, बुद्ध, ताओइझम, निहीलिझम, अस्तित्ववाद असं काय काय मिळालेलं,
काही लोकांना पातळ शिडशिडीत कियानू आवडलेला,
तर काही लोकांना थंड सुरीसारखी सेक्सी धारदार कॅरी ऍन मॉस आवडलेली...
पण आत्ता आपण मॅट्रिक्सविषयी नको बोलूयात.
कारण मॅट्रिक्सवर मी चालू झालो की मला थांबवणं खरंच म्हणजे खरंच कठीण आहे सो कंट्रोल!

तर...
मला खूप दिवसांपासून या तीन विशिष्ट सीरीजविषयी बोलायचंय,

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर सुदैवाने या तीन सीरीजशी माझी गाठ पडली हे मस्तच.

"अर्रे यार हे तर आपणच आहोत किंवा आपला खास यार-दोस्त असाच आहे,
किंवा हा च्युत्यापा आपण अस्साच केलेला,
किंवा आपणही असाच फकअप केलेला रिलेशनमध्ये,
किंवा हे असंच आजकाल आपण सगळॆ डोकं गहाण ठेवून वागतो..."

असं विविध कायकाय मला या सीरीज बघताना अक्षरश: लाखो वेळा वाटलेलं...

बेदरकारी, लॉयल्टी, इंटिग्रिटी, जज न करणं, क्षमाशीलता, प्रेम, सोशल मिडीयापासूनची सावधगिरी आणि इतर अनेक माणकं माझ्यावर उधळली...
दिलखुलास...
यातल्या पात्रांनी.
मला हसवलं, रडवलं, घाबरवलं, जोश दिला आणि बरंच कायकाय.

पण हे रिव्ह्यू नाहीयेत बरं का.
रादर... ही दाद आहे इतकं काही ऑस्सम बनवल्याबद्दल.
हे थँक्स आहे जास्त चांगला माणूस व्हायच्या वाटेकडे बोट दाखवल्याबद्दल.
आणि म्हणूनच हे सगळं मला तुम्हाला भडाभडा सांगायचंय.

आणि हो.
शक्यतो प्रयत्न सिरीज माझ्या गाभ्याला का आणि कशी भिडली ते सांगण्याचा आहे, पण लिहिण्याच्या ओघात काही स्पॉयलर येऊ शकतात.
सो बी अवेअर.


... लवकरच.

Monday, 9 April 2018

फॉर द लास्ट फकिंग टाइम पीपल

स्वस्त रुचकर जेवण, पाट्या आणि ऍटिट्यूडसाठी (इन दॅट ऑर्डर) साठी प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतल्या "बादशाहीची" एक ब्रँच बाणेर मध्ये आलीय हे मस्तच.
त्यानिमित्तानं...
मला बरेच दिवसांपासून हे बोलायचं होतंच.

फॉर द लास्ट फकिंग टाइम पीपल,
आमचं (हो आमचंच) पुणे कधीच बदललंय...
खालील काही ठळक मिथ्स प्रचन्ड क्लिशेड आणि इनव्हॅलिड होऊन जमाना झालाय रे बाबांनो!

१. आमची कुठेही शाखा नाही:
वाचा बादशाहीबद्दलची पहिली ओळ.
एकुणातच पुण्यातली नामांकित दुकानं आणि हॉटेलं 'लेफ्ट-राईट-सेंटर' शाखा काढतायत.
चितळ्यांच्या तर पुण्यातल्या प्रत्येक मेजर एरियात शाखा आहेत.
आणि हो माझ्या मुंबईकर मित्रांनो, त्या प्रत्येक शाखेत तितक्याच ताज्या बाकरवड्या मिळतात यार...
सो बाणेरवरून लक्ष्मी रोडला मरवत जायची गरज खरंच नाहीये, ट्रस्ट मी!        

२. एक ते चार:
मी जे जे  बाणेर / विमाननगर / वानवडी सारखे कॉस्मो एरियाज बघितलेयत तिकडे प्रॉपर सगळी दुकानं रणरणत्या दुपारी चालू असतात आणि आत्ता बहुतेक चितळे सुद्धा ...
आणि झोपले चितळे तर झोपू देत थोडे दुपारी... सकाळी लवकर उठतात ते कळलं!
आमचा परममित्र मुंबईचा 'पार्ले बिस्कीट' मधला इंजिनिअर अवीसुद्धा दुपारी हळूच पार्किंगमध्ये जाऊन गाडीत डुलकी काढतो.
सो बिग डील!

Saturday, 7 April 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १२)

एका आठवड्याने:
मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला, सगळे पेपर्स घेतले...
केतकी आणि बाळाला घेऊन खाली उतरलो...
केतकी अजूनही घुश्श्यातच होती...
मागच्या आठवड्याचा राग अजून गेला नव्हता.

आम्ही गेटवर जाऊन रिक्षा शोधणार...
तितक्यात एक सोनसळी आणि काळ्या रंगाची मिनी कूपर सुळ्ळकन येऊन आमच्या समोर थांबली...


तिला सुंदर गिफ्ट बो बांधला होता.
आतून पटकन एक चटपटीत पोरगा उतरला आणि त्यानं गाडीची डिजिटल चावी आणि एक छानसा लिफाफा माझ्या हातात दिला.
केतकीचे डोळे बशीएवढे मोठे झाले होते.
मला काही कळेना...
मी लिफाफा उघडला,
आतमध्ये लिहिलं होतं:
"थँक्स फॉर एव्हरीथिंग"  
आणि खाली अल्फाजची लफ्फेदार सही होती.

झप्पकन बाजूनी एक टॅक्सी गेली आणि ड्रायव्हरनी मला हात दाखवल्याचा भास झाला.

---------------------------------------- समाप्त ----------------------------------------


तळटीपा:
*रासबेरी पाय*
हा छोटासा साधारण क्रेडिट कार्डाएवढा कम्प्युटर प्रोसेसर असतो.
अधिक माहिती:
https://www.raspberrypi.org/help/what-%20is-a-raspberry-pi/

*बिटकॉइन मायनिंग*
बिटकॉईन्स हे इलेक्ट्रॉनिक चलन (Cryptocurrency) आहे.
१ बिटकॉइन = साधारण सव्वासात लाख रुपये (आजचा रेट)
बिटकॉइन मायनिंग ही बिटकॉईन्स मिळवण्याची पद्धत आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त प्रोसेसर स्पीड असलेले कम्प्युटर्स आवश्यक असतात.
अधिक माहिती:
https://en.wikipedia.org/wiki/Bitcoin
https://www.youtube.com/watch?v=GmOzih6I1zs