Thursday 31 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ४)

दोघं 'रॉकस्टार'मध्ये पोचले.
शौर्यची खूप आवडती जागा.
कामा रोडवरच्या आतल्या शांत गल्लीत एका रॉकवेड्या पारसी बाबानं चालू केलेली.
मोठ्या मोठ्या हाईपवाल्या रॉक कॅफेंपेक्षा कैकपट अधिक निवांत, सुंदर... आणि चांगलं म्युझिक वाजवणारी.

आल्या आल्या शौर्यनं डोळे भरून त्याच्या आवडत्या फोटोकडे बघितलं.
समोरच लावलेलं ते जेम्स हेटफील्डचं मोठ्ठ पोस्टर... मेटालिका या त्याच्या आवडत्या बॅण्डचा लीड सिंगर.
बहुतेक 'व्हिप्लाश' वाजवतानाचा.
त्याचं ते देखणं पाय फाकवून उभं रहाणं...
आडवी धरलेली गिटार...
मनगटातलं काळं रिस्टबॅन्ड...
कपाळावर आलेले लांब सोनेरी केस...
गलमिश्या...
आणि किंचाळणाऱ्या तोंडातून दिसणारे ते जगप्रसिद्ध उभट भयसुंदर दात.

Sunday 27 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ३)

परत आत्ता:
आदिलचा फोन वाजत होता...
शौर्यानं भानावर येत तो घेतला,
"ओय चल तयार हो फटाफट. आपण जेवायला जातोय तुझ्या आवडत्या 'रॉकस्टार'मध्ये"

पुढच्या पाच मिनिटांत आदिल धडकला खाली.
त्याची काळीशार 'व्हेन्टो' आणि तिचा तो जर्मन बांधा...
दोन क्षण डोळ्यांत साठवत राहिला आदिल...
आणि मग एक सुस्कारा सोडून पॅसेंजर सीटवर बसला...
नेहमी खरं तर शौर्यच चालवायचा 'व्हेन्टो' दोघं एकत्र असले की...
पण आज नको...
नजरेचा काय भरोसा नाय च्यायला.

सी लिंकवरनं गाडी बिंग बिंग चालली होती...
शौर्याला त्यांचे असंख्य लॉंग ड्राईव्ह्ज आठवत राहिले,
"आठवतंय आदिल? आपण कोकणात उतरत होतो... गगनबावडा घाटातून...
आणि एका अडनिड वळणानंतर अवचित समोर आलेला तो गुलमोहर...
गच्चम फुललेला... लालभडक."

"ऑफकोर्स... आणि तुझ्या दंडावर पण एक गुलमोहर होता... लालभडक रक्ताचा.
गोळी चाटून गेली होती तुला."

"हो. पण तो एक क्षण आपलं मिशन, पाठीअसेल्या जिवावर उठलेल्या गाड्या, दंडावरची जखम सारं काही विसरायला झालं होतं... ते लाल गारुड बघून."