Sunday 9 August 2015

(देह-फुलं: २) थरथर

निर्मोही टिळक-मंदीर लायब्ररीतून बाहेर पडली आणि हे ssss धो धो पाउस चालू झाला…
खुशीत हसली ती, "पड बाबा पड"!
छत्री नव्हतीच तिच्याकडे, दोन मिनटं टपाखाली उभी राहून ती पाउस बघत राह्यली…
हरखून…
छोटू बाळासारखी…
'थांबावं का दहा मिनटं? होईल पाउस कमी?? की भिजावं सरळ???
पहिलाच सणसणीत पाऊस आहेय या वर्षाचा…

मागच्यावर्षी समीप बरोबर भिजलेलो आपण कुठे कुठे:
मरीन ड्राइव्ह, नॅशनल पार्क, 
राजमाची… 
ट्रेकला चालता चालता… 
बाकी सगळे मुद्दामहून पाठी-पुढे राह्यलेले…  
आणि ती दोघं… एकटीच… भिजत-थरथरत… 
पानांचा आणि ओल्या मातीचा गच्च वास येणाऱ्या वाटेवर… ती त्याला थरथरत बिलगलेली!
विल्स नेव्ही-कटचा वास येणारं त्याचं ओलसर टी शर्ट आणि भिजकी दाढी… 
त्यातले ते त्याचे जाडसर ओठ… 
आधी दोघांची नाकं चुरमडली एकमेकांवर… मग ओठ आणि मग जिभा!

शिरशिरी आली निर्मोहीला…
आख्ख्या देहाला समीप आठवला…
कोणाला तरी गुदमरून टाकणारी गच्च मिठी मारावीशी वाटत होती!