Saturday 12 January 2013

नजर हटी दुर्घटना घटी (?)

 क्खा दिवस आणि अक्खी संध्याकाळ ड्राईव्ह करून पश्मिनचं शरीर आंबून गेलं होतं. इतका वेळ त्यानं कटाक्षानं झोपेला दूर ठेवलं होतं पण आता मात्र रात्र झाली होती. त्याचं गात्र न गात्र थकलं होतं. लवणाऱ्या पापण्या मिटताना किंSSSSSचित जास्त वेळ घेत होत्या...मन हळूहळू निवांत होत होतं आणि दिवसभराच्या ड्राईव्हचा पिक्चर त्याच्या डोळ्यापुढून सरकत होता.

 एक्स्प्रेस-वे वरची ती काळी डौलदार ऑडी आणि त्यातल्या त्या स्टडनं बाहेर फेकलेली प्लास्टीकची बाटली...कार थांबवून तीच बाटली त्याच्या स्पाईक्स काढलेल्या डोक्यावर तीनदा टणाटणा आपटाविशी वाटली होती पश्मिनला. क्यू-सेवन चालवत होता पण झाटूची चिंधीगीरी काय सुधारत नव्हती.

'दादा-पादा' च्या नंबर प्लेट्सवाल्या गाड्या,
'बघतोस काय मुजरा' कर आणि 'नाद नाय करायचा' वाल्या माजोर्ड्या पाट्या...
कुठे कुठे 'झर्याची मैना' वाली गोंडस पाटी!

नीता फूड मॉल वरचा गोटी एवढा इवलुसा वडा (किंमत फक्त वीस रुपये).

असं काय काय आठवत राहिलं त्याला!

समोरून स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!

त्याची विचारांची वीण थोSSSडी सैल झाली...मग आणखीन थोडी:
रांचीच्या केसांचा तो वेडावणारा वास...नवीन कुठचातरी शाम्पू आणलाय वाटते तिनं...
हवा थोडी कमी वाटतेय का पुढच्या टायरमध्ये?...
नीता फूड मॉल वर चौकडी आतापासून...वीस रुपये?...चोर साले...
आपला लाल चौकडीचा शर्ट कुठे गेला काय माहित...
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!...

त्याच्या पापण्या अलगद मिटल्या...एक सेकंद...दोन सेकंद...चार सेकंद
विचार अजून उसवले आणि मग विरायला लागले!
स्साप्प स्साप्प येणारे गाड्यांचे दिवे...पिवळे लाल!

मग त्याच्या मेंदूचा कुठला तरी खट्याळ भाग अलगद कुजबूजला, "पश्मिSSSन राजाSS ड्राईव्ह करताना कोणी झोपतं का कधी वेडोबा?...खिक्क!!!"

आणि त्यानं राप्पकन डोळे उघडले, त्याची छाती थाडथाड उडत होती...डुलकी किती वेळ लागली होती कोण जाणे...पण वरती पंखा गरगरत होता!
रांचीनं त्याच्या कोरड्या पडलेल्या ओठांची 'च्युइंक-च्युक' आवाज करत झकास पापी घेतली आणि मिस्किलपणे विचारलं, "झोपेत पण स्टिअरिंग-व्हील सारखे हात काय फिरवत होतास रे?
पश्मि SSSन राजाSS झोपताना कोणी ड्राईव्ह करतं का कधी वेडोबा?...खिक्क !!!"


-नील आर्ते