Thursday, 25 August 2011

साठे सर

 पूर्व पार्ल्यातील पोह्यांना (स्विमिंग शौकिनांना :) साठे सर माहिती नाहीत असं होऊच शकत नाही. सर जवळ जवळ पन्नास वर्ष स्विमिंग शिकवतायत , पण अजूनही उत्साह तेवढाच दांडगा.माझी त्यांची ओळख तशी अलीकडली , चार वर्षांची !

 तो पण एक किस्साच , मी थोडा फार हौशी डाईव्हर .....एक दिवस माझ्या मनानं घेतलं पूलच्या सर्वात उंच मजल्यावरून हेड फर्स्ट सूर मारायला शिकायचं. पण अडचणी  बऱ्याच होत्या : आधीच मी मित्रांमध्ये "कडक-सिंग" म्हणून बदनाम , त्यात मार्गदर्शनाच्या नावानी बोंब ! मी हळू हळू १ मीटर , ३ मीटर , ५ मीटर, ७.५ वरून चुकत माकत थोडी फार डाईव्ह बसवली आता  बाकी फक्त Top फ्लोअर : १० मीटर !
 पण सालं १० मीटरवर गेलं की डोकच काम नाय करायचं , गोट्या फीट !
तरीसुद्धा डेअरिंग करून मारल्या उड्या , पण व्हायचं काय की उंचावरून खाली डोकं वर पाय असा आलो की फोर्सने माझं डोकं आणि पाय पाण्याच्या पातळीला समांतर व्हायचे आणि मी पाण्यात साटकन पाठीवर आपटायचो !
  काही केल्या हा प्रॉब्लेम काही सुटेना , नैराश्याचं मळभ दाटून यायला लागलं , वाटू लागलं की आपण कडक-सिंग होतो आणि कडक-सिंगच रहाणार !
कोणीतरी सांगितलं की पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे स्विमिंग पूलवर साठे सर असतात ते कदाचित तुला गाईड करतील .

 झाले मी पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे पूलवर थडकलो आणि आपल्याला बघताच क्षणी माणूस आवडून गेला:
वय वर्ष सत्तरच्या आसपास , एके काळी "य" स्विमिंग केल्याची साक्ष देणारे मजबूत खांदे , पण बांधा खरंतर कमी उंचीच्या मुष्टी-योद्ध्याशी जवळीक सांगणारा, उन्हात मनसोक्त पोहल्याने रापलेला मुळचा गोरा रंग आणि चेहऱ्यावर एकाच वेळी श्रीराम लागून्सारखं देखणेपण आणि बाळासारखे निर्व्याज भाव !

 त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला आणि ते सटकन उत्तरले ,"अरे म्हणजे तू ओव्हर जातोयस , बहुतेक लोक जास्त उंचीवरून अंडर जातात तू ओव्हर जातोयस".
माझी झापडं काहीच न कळल्यानं उघडी ...मग त्यांनी मला अंडर आणि ओव्हर म्हणजे काय ते सोप्प्या भाषेत समजावून दिलं.
"काळजी करू नको उद्या सकाळी ८ वाजता पूलवर ये आपण बसवू तुझी डाईव्ह".
 दुसऱ्या दिवशी माझ्या आधी ते पूलवर हजर ! मी चुकत माकत जंगली पद्धतीने शिकलेलं सगळं त्यांनी आधी unlearn करायला लावलं. tuck , pike इत्यादी डाईव्हचे प्रकार समजावून सांगितले. 
आम्ही परत अगदी साध्या डेकपासून श्री गणेशा चालू केला आणि माझी डाईव्ह हळूहळू बसू लागली.

 त्यांच्या पोतडीत छोट्या छोट्या फार छान युक्त्या असतात. उदाहरणार्थ :
जी डाईव्ह मी ७.५  मीटर वरून ठीकठाक मारायचो तीच डाईव्ह शेवटच्या १० मीटरवरून मारताना मात्र फाटायची. खरं तर दोन्ही फ्लोअरमध्ये फार तर ८ फुटांच अंतर पण डोक्यात psychological block बसलेला. साठे सरांची आयडीआ : "अरे आपण मध्ये आणखी एक लेवल टाकू , .७.५ मीटरवर एक स्टूल ठेवू. तेवढेच २ - २.५ फूट वाढतील ना !" तेव्हा मनोमन पटलं की हा माणूस जीनियस आहे !
एकंदरीतच गोष्टी हडेलहप्पी पद्धतीने करण्यापेक्षा , स्टेप बाय स्टेप शास्त्र-शुद्ध पद्धतीने करण्यावर भर!

खरं तर ते आता  कागदोपत्री रिटायर्ड झालेले पण रोज संध्याकाळी आणि बरेचदा सकाळीसुद्धा त्यांची पूलवर फेरी असते.खासकरून एप्रिलमधल्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या उन्हाळी स्विमिंग वर्गात त्यांची नजर घारीसारखी फिरत असते. रंगीबेरंगी चड्डी घातलेलं चेहऱ्यावर रडावे भाव असलेलं चिमणं पाखरू ते अलगद वेचून बाजूला काढतात आणि मग चालू होतो त्या पाखराचा स्पेशल क्लास ...'मार हात - मार पाय ...' साठे सर त्या बच्चूला चिथावत त्याच्याबरोबर काठाने धावतात तेव्हा त्याच्या अंगात काहीतरी संचारलेल असतं , डोळे चमकत असतात आणि मग त्यांना राहवत नाही ते झटकन कपडे काढतात आणि पाण्यात उडी ठोकतात.

 अशी हजारो पोरं त्यांच्या हाताखाली तयार झालीयत . आता तर त्यांचे विद्यार्थी जगभर विखुरलेत आणि ते त्यांना कुठून कुठून स्विमिंगवरची परदेशी मासिकं ,सी.डी. ज असं काय काय पाठवत असतात.
आता तर साठे सरांच्या हाती इंटरनेटच आयुध आलंय आणि ते टीन-एजरला लाजवणाऱ्या उत्साहाने माहिती गोळा करायला वापरतात.

पूर्व पार्ल्यात हनुमान रोड वर , दत्त रामानंद सोसायटीत त्यांची लहानशी सुबक मठी आहे , तिकडे ते स्वीमिन्गच्या नशेत एकटेच रहातात. माझा कधी मूड ऑफ असला की मी हटकून त्यांना भेटायला जातो ...त्यांचं ते स्विमिंगवरचं धबधबा बोलणं ऐकलं की सारं नैराश्य पार पळून जातं :)

या जिनिअसला आपला सलाम !

-नील आर्ते

2 comments: