Thursday 24 November 2011

मुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग १)

का पोराच्या बाबांना हार्ट-अ‍ॅटॅक आला आणि डोम्बिवलीवरून खूप दगदग व्हायची म्हणून ते वांद्रे कॉलनीत शिफ्ट झाले.
तो पोरगा तेव्हा डोंबिवलीच्या आठवणीने खूप रडायचा...त्याचे मित्र, त्याचं घर आणि मिलिंद बोकिलांच्या 'शाळा' पुस्तकातल्यासारखी ती "गोड" डोंबिवली.

पण मग त्याने हळूच आजूबाजूला बघितलं आणि त्याला दिसलं प्रत्येक चौकातल मोठ्ठ मैदान, नवीन अफलातून मित्र, रिक्षाने पाच मिन्टांत समुद्रावर जाण्यातली गम्मत.
चौकातली छान छान झाडं, जग्याची पेरूची बाग, हर्शलच्या बागेतली जांभळी आणि जास्वंदीच्या झाडाचा टांगा.
त्याला कॉलनी खूप वेगात आवडायला लागली होती:

२६ जानेवारीची पूजा, त्याच्या आधीच्या पूजेच्या मिटींगा आणि त्यातली ती टाईमपास भांडणं.

७ नंबरच्या पोरांच्या कबड्डी मॅचेस,
ज्ञानेश्वर मंदीर आणि समोरच्या पुजारी पानवाल्याकडच्या जीरा गोळ्या.

कॉलनीमागची सुंदर खाडी आणि तिच्यात खोल घुसणारी फुटक्या पाईपची पाऊलवाट,
खाडीत घुसून होळीसाठी तोडलेली झाडं आणि ढोपरापर्यंत चिखल माखून आल्यावर आईचा खाल्लेला मार.

कॉलनीतल्या चौका-चौकातली चिंचेसारखी पानं असलेली झाडं...(http://en.wikipedia.org/wiki/Peltophorum_pterocarpum)
ही एप्रिल महिन्यात ऐन परीक्षेत मंद सुवासाच्या पिवळ्या फुलांचा भरभरून सडा टाकायची म्हणून यांचं नाव परीक्षा झाड!

पतंग, भोवरा, गोट्या, भूत भूत, डबा ऐसपैस, शीग रूपवा रुपवी असे  एक लाख खेळ!
सुट्टीतली घराबाहेर दोर्या बांधून आणि त्यांच्यावर पुस्तकं लटकावून केलेली लायब्ररी..आपलं कलेक्शन वाढवायला पोरं बिनधास्त हिरा पेपर मार्ट मधून कॉमिक्स ढापून आणायची!
जाधवकडच्या भाड्याच्या सायकली...आणि पंक्चर करून आणल्यावर त्याच्या खाल्लेल्या अस्खलीत शिव्या.

पावसाळ्यात शाळेत जाताना गटारात पकडलेले सप्तरंगी मासे आणि चतुर ...काही माश्यांना चक्क २ दिवसांनी हात पाय फुटायचे आणि मग कळायचं की ते बेडूक होते ;)
घरात इकडे तिकडे आरामात फिरणारे एक अब्ज पायवाले गोंडस 'पैसा' किडे. 

दही हंडी आणि चिखलातला फुटबॉल.
वरच्या थरातल्या कोणीतरी खालच्यांच्या अंगावर केलेली सू सू!

गणपतीतल्या घराघरात जाऊन म्हटलेल्या मनसोक्त आरत्या आणि निश्चलकडच्या गौरीच्या ३२ प्रकारच्या भाज्या.

जय अंबे क्रीडा मंडळाचा दांडिया आणि चुकीच्या टिपर्या मारत शेकून घेतलेली बोटे.

दिवाळी:
रात्री जागून केलेले अवाढव्य कंदील.
पहिल्या अंघोळीच्या पहाटे चौकात हळू हळू वितळणारा आनंदी अंधार...कोरे कपडे ...एका हातात फटाक्यांची पिशवी आणि दुसर्या हातात उदबत्ती.
खडूस लोकांच्या घरात टाकलेले उदबत्तीला बांधलेले टाईम बॉम्ब..
पीठ बॉम्ब..आणि तो फुटल्यावर पिक्चर मध्ये दाखवतात तसा आगीचा लोळ.
भाऊबीजेच्या रात्री सगळे फटाके संपवून टाकल्यावर लागणारी हूरहूर.

गच्ची:
पतंगींची काटा-काटी.
टप्प्यावरून मारलेल्या उड्या,
खजुराहोच्या वरताण काढलेली चित्र,
वर्गणी काढून सहा जणांत प्यायलेली एक बीअरची बाटली. (मुळू मुळू रडणारा तो पोरगा थोडा मोठा झाला होता! )
चोरटी मेकआउट सेशन्स..आणि खास मित्रांनी दिलेला पहारा!

नडींग:
समोरच्या चौकातल्या  पोरांबरोबरची खुन्नस...एक लाख मारामार्या.
डोक्यात खळकन फुटलेली ट्यूब लाईट आणि भळाभळा ओघळणारं रासबेरी.
कॉलनीतल्या मारामारीची पण एक खास स्टाइल आहे..
गुडघ्यात किंचित बसून दोन्ही हातांच्या मुठी वळून अंधाधुंद  हात फिरवणारा पोरगा दिसला की समजून जावं.. हा कॉलनीत मारामारी शिकलाय.

उसळ, नारळ, सुबल्या, टेम्पा, मडक्या, कांद्या, पोन्क्ष्या, कॅडी, हड्या, नल्या अशी पोरांची अफलातून नावं.

कॉलनी शब्द-कोष:
  1. सही मे दही: एकदम मस्त!
  2. सुमडीत: हळूचकन, कोणाला न समजता!
  3. आडी: प्रेयसी.
  4. डेम: वरीलप्रमाणे.
  5. टेबल: डेटवर जाणे.
  6. टेपा लावणे: थापा मारणे.
  7. बॉम्बर: थापाड्या 
  8. 'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा': टेपा लावणाऱ्याला थांबवण्यासाठी हा गजर केला जातो.
  9. आमी काय बॉल गिळला?: खोट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी.
  10. वंटास: गायब होणे.
  11. 'नेवला न्यू आयटम फाईट': विशेष काही अर्थ नाही ..मूड आल्यास कधीही हे वाक्य ओरडावे.
  12. 'वर बघ' ..'हात बदल': रस्त्यांनी जाणार्या मुलाला त्रास देण्यासाठी.
  13. डबा टाकणे: 'शी' ला जाणे.
  14. किक येणे: 'शी' ला येणे.
  15. आडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो ..सोडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो: मॅच जिंकून आल्यावर ओरडायचे विजयगीत. 

खालील शब्द थोडे जास्त सेन्सॉर्ड आहेत:
जिज्ञासूंनी विचारणा केल्यास पर्सनल ई मेल वर अर्थ पाठविण्यात येईल:
  1. टग्ग
  2. सड्डम 
  3. पापड तळणे
  4. चीमोऱ्या
  5. टीपा बघणे 
  6. बापट पिक्चर 
  7. कांदाचिरी 
  8. राजू 
  9. पडी
लवकरच..गव्हर्मेंट कॉलनी (भाग २)
-नील आर्ते







5 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. मला नेहमी खंत वाटायची एवढया मोठ्या कॉलनीत असा एकही माइका लाल कसा पैदा नाही झाला जो कॉलनीचे हे म्याडपण शब्दात मांडू शकेल....आज ती खंत तू दूर केलीस.
    मस्तच....
    एकदम लहानपनात डुबकी मारून पवित्र झाल्यासारखं वाटलं.
    एक एक शब्द वाचून त्यात लपलेले हजारो किस्से पुन्हा जिवंत झाले... आता ते छळ छळ छळणाररे....

    चौक ते शाळा, बसस्टोप, बीकेसी, bandstand, उडीपी....ते चेतना कॉलेज असे एक नां अनेक विषय आता पुन्हा कॉलनीत शिरू देत.


    दुसऱ्या भागावर थांबू नकोस असेच अनेक भाग येत राहूनदेत आपण त्यांचे एक पुस्तकच पब्लिश करू....

    ReplyDelete
  3. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  4. मजा आणलीस मित्रा...प्रत्येकाचे बालपण थोडेफार बदल करून असेच असते
    सुंदर कोलाज काम !

    ReplyDelete
  5. भें** हे वाचून इतका नॉस्टॅल्जिक झालो की बालपण शोधू लागलोय. आणि काहीच आठवत नाहीये... खपली माझी झोप. :(

    ReplyDelete