Tuesday 31 March 2015

ढब्बू आकाश-कंदील आणि ड्यूस एक्स माकिना

पुणे… 
प्रोफेसर शुक्ला आणि राधाचं एकदम इंटेन्स डिस्कशन चालू होतं.
एरंडवण्याच्या "वल्लभ" सोसायटीतल्या बागेत रातराणी घमघमत होती.
दोघंही नुकताच इंटर-स्टेलार पाहून आले होते आणि प्रचंड एक्साईट झाले होते.
शांत रात्रीत दोघांचा आवाज घुमत होता.
"पण हा  'टेसरॅक्ट 'काय प्रकार असतो मला कळालं नाही नीटसं"
"अरे रामू एकदम सोपं करून सांगते मी तुला", आता राधा मधला फिजिक्स प्रोफेसर जागा झाला होता.
तीन मितीतला क्यूब समजा एक काचेच्या पारदर्शक भिंतीला चिकटवून ठेवलास आणि एखादा सूक्ष्म प्राणी जो दोन मित्यांतच आहे तो भिंतीवरून लुटूलुटू चाललाय. तर त्याला फक्त क्युबची भिंतीला चिकटलेली बाजू दिसेल आणि "समजेल" जी एक चौकोन आहे.
म्हणजे तो चौकोन हे तीन मितीतल्या क्यूबचं द्विमितीय प्रोजेक्शन झालं.

आता हेच आपण तीन आणि चार मित्यांत पुढे नेऊया.
क्युबचा चार मितीय इक्युव्हॅलन्ट आकार म्हणजेच टेसरॅक्ट. 
समजा चार मितीतल्या बुद्धिमान प्राण्यांनी हा टेसरॅक्ट आपल्या पृथीवर पाठवला तर तो आपल्याला एका क्यूब सारखाच दिसेल आणि समजेल.
"हम्म आणि हे बाकीच्या आकारांना पण लागू असेल"?
"अफकोर्स उदाहरणार्थ पंचकोन षटकोन वगैरे सगळ्या आकारांना!
आणि मजा काय आहे माहितीय का? हे चार मितीतले आकार कदाचित आपल्या तीन मितीवाल्या जगात एकीकडून दुसरीकडे जायचे शॉर्टकट असू शकतील… कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी!

राधा लगेच टिशू पेपर वर आकृती काढायला लागली…
प्रोफेसर शुक्ला आपल्या बायकोकडे कौतुकाने बघत राहिले.
राधूची मान केवढी लांबसडक आहे हे त्यांना परत एकदा जाणवलं.
तिच्या केसांत आलेली चंदेरी जर चांदण्यात चमचम करत होती…
आणि निघताना मारलेल्या  'बरबेरी 'परफ्युमचा मंद गंध रातराणीत मिसळला होता.
प्रोफेसर शुक्लानी तिला मायेनं जवळ ओढलं… आणि त्यांना खाडकन जाग आली.

मुंबई: धनत्रयोदशी २०१५ रात्र
अद्भुत ८७ नंबरच्या बसमधून माटुंग्याच्या सिटीलाईट स्टॉपवर उतरला आणि त्यानं चहूवार नजर टाकली.
रात्रीचे दहा वाजले होते पण लोकांची उत्साही गर्दी काय हटत नव्हती.
पणत्यावाले, उटणीवाले, रांगोळ्यांचे ढीग आणि ते रांगेत लटकणारे शेकडो हजारो कंदील!
लाल-पिवळे-हिरवे चमचमणारे लखलखणारे झिरमिळणारे कंदील!
हा रस्ता 'कंदील-स्ट्रीट' म्हणूनच तर फ़ेमस होता आख्ख्या जगात.

अद्भुतनी रमत गमत फुटपाथ वरून एक फेरी मारली.
प्लास्टिकचे, थर्माकोलचे, गोल, चांदणीवाले वगैरे कंदील त्याने पहिल्या फटक्यात नापास केले.
ते काय कुठेही मिळतात… पण कंदील स्ट्रीट खास करून फ़ेमस होती क्लासिक ओल्ड फॅशन्ड "ढब्बू" आकाश कंदिलांसाठी!
बांबूच्या काड्यांचा टिपिकल षटकोनी आकार आणि निगुतीनी लावलेला रंगीबेरंगी पतंगीचा पातळ कागद…
त्यातनं पडणारे रंगीले कवडसे आणि फरफरणाऱ्या शेपट्या.
बरेच छान छान कंदील होते पण त्याची अजून घंटी वाजली नव्हती…
आणि तो इतक्या लांबून येउन 'समझौता एक्स्प्रेस'मध्ये नक्कीच बसणार नव्हता.
सिटीलाईटचा मेन रोड छानून झाला त्याचा आणि मग त्याने शोभा हॉटेल कडून आत कट मारली 
इकडे गर्दी किंचित कमी होती कंदिलाच्या रांगाही होत्या पण थोड्या तुरळक.
तो चालत आणखी समुद्राच्या दिशेनी सरकला आता जवळ जवळ कंदील नव्हतेच आणि थोडं अजून शां sss त!
अकरा!… च्यायला आता कंदील फायनल करायलाच पायजे नायतर घरी शिव्या पडणार.
तो परत वळला आणि त्याला ती झिपरी पोरगी दिसली.
त्याला बघून खुदकन हसली दातांमधली खिडकी दाखवत.
भोकरासारखे काळेभोर डोळे होते तिचे…
ढगळ काळा विटका फ्रॉक आणि पसरलेले हात… एखाद्या छोटू जादूगारासारखी वाटत होती ती!

"दादा एकच कंदील बनवलाय या वर्षी घेऊन टाका."
आत्ता पहिल्यांदा त्याचं कंदिलाकडे लक्ष गेलं.
ढब्बू आकाशकंदिलच होता तो पण त्याच्यात एवढं काही विशेष वाटत नव्हतं.
चक्क थ्रू-आउट करड्या रंगाचा होता तो… अश्या बोअरिंग कलरचा कंदील कोण बनवतं काय?
शिवाय त्याच्यातला लाईट पण चालू नव्हता त्यामुळे तो आणखीच दीनवाणा दिसत होता.
"छट्ट मला नाय आवडला तो!"
"पण तू मला आवडलास दादा… तुझ्यासाठी एपदम सस्त… फक्त सातशे रुपै", तिचे भोकर डोळे मिस्कील हसत होते.
"हो सातशे रुपये ठेवलेत तुझ्या काकानं"… त्यांनं तिला हलकेच धपाटा मारला.
"अरे दादा लाईट लावल्यावर बघ तरी कसा दिसतो."
तिनं बोटांची कायतरी विचित्र पण लयदार हालचाल केली आणि अचानक कंदिलातला लाईट चालू झाला:
एका क्षणात तो करडा हार्मलेस कंदील रंगीत झाला.
रंग काही तरी निसरडे होते त्याचे… लाल-पिवळा की हिरवा-जांभळा की सोनेरी?  रंग जणू बदलत होते क्षणाक्षणाला!
आणि तो आतून कुठून तरी येणारा ब्रिलीयंट प्रकाश:
लिंबाच्या गोळ्यांसारखा पिवळा आंबट-गोड…
हिरवा… चाफ्याच्या मादक वासाचा…
सोनेरी… जग जिंकल्याच्या विजयाचा…
निळा… शांत निवांत…
लाल… लसलसत्या शरीर सुखाचा…
लेड झेपलिनच्या 'काश्मीर' ची आदिम धून येत होती कंदिलातून…
आणि समुद्राची खारी हवा…
पण समुद्र दादरचा नव्हता… तो बहुतेक मालवणच्या किनार्यावर पोचला होता काही क्षण!

झिपरीनं त्याला गदागदा हलवलं आणि कंदिलातला लाईट (कसा कोण जाणे) बंद केला.
अद्भुत थोडा भानावर आला.
"आवडला ना कंदील? It's out of this world bro!",अस्खलीत इंग्लिशमध्ये ती बोलली!
"बरं पाचशे दे चल!"
त्यानं पाचशेची नोट तिच्या हातात टेकवली.
पडके दात दाखवत गोड हसली झिपरी आणि तिनं कंदील अल्लाद त्याच्याकडे दिला.
लाईटची काळजी करू नको दादा "ते लोकं"  "तिकडून" लावतील लाईट तू घरी पोचलास की… चल पुढच्या वर्षी भेटू!
अद्भुत निघाला आणि चार पावलं पुढे जाऊन परत वळला.
त्या गोड पोरीला अजून थोडे पैसे द्यायचे होते त्याला.
पण झिपरी गायब झाली होती… कंदील अडकवायचा रिता बांबू फक्त निश्चल-निर्विकार-'निश्कंदील' उभा होता.

पुणे: नरक चतुर्दशी २०१६ सकाळ 
बिछान्यावर पडून प्रोफेसर शुक्लांनी गच्च डोळे मिटले… परत राधाबरोबरच्या त्या निवांत रात्रीत घुसायचा प्रयत्न केला.
पण स्वप्न तुटलं ते तुटलंच!
त्यांनी अनिच्छेनी डोळे उघडले.
मळकट चादर, शिळ्या खरकट्या भांड्यांचा येणारा सूक्ष्म वास, आणि अंगभर पसरून राहिलेला थकवा!
हलकेच सुस्कारत ते उठले आणि हळूहळू तयार झाले.
१० : ३५… ठीक आहे फिल्म इंस्टिट्युट प्रभात रोडवरच होती. चालत पाच मिन्ट लागली असती.
११ चं लेक्चर मिस झालं नसतं… बहुतेक!
दाढी करावी का? नको जाऊ दे उशीर होईल!
राधा असती तर दाढी केल्याशिवाय जाऊच दिलं नसतं.
त्यांच्या छातीत डावीकडे कळ आली… राधाची आठवण आली की तशी कळ यायचीच.
त्यांनी करड्या पांढऱ्या खुंटावरून हात फिरवला आणि कपडे केले.
कुलूप लावून निघताना आजू-बाजूला नजर टाकली: आजूबाजूच्या तिन्ही फ्लॅट बाहेर दिवाळीच्या रांगोळ्या होत्या.
राधा पण काढायची… बा SSS रिक कणा मोडायची रांगोळीचा… पाठ भरून यायची तिची…
आणि मग खुदकन हसून म्हणायची, 'रामू म्हणूनच रांगोळीला "कणा मोडणं" म्हणतात कळलं'?
परत कळ आली छातीत… प्रोफेसर शुक्लांनी काही निर्धार केला…
लावलेलं कुलूप उघडलं...
आत जाऊन ड्रॉवरमधलं पिस्तूल त्यांनी कोटाच्या खिशात टाकलं आणि परत कुलूप लावून ते जिन्याच्या पायर्या उतरू लागले.

मुंबई: नरक चतुर्दशी २०१५ पहाट ५ वाजून १० मिनटे
अजून फटाक्यांची ढामढूम चालू झाली नव्हती.
अर्ध्या तासात ती चालू झालीच असती पण सध्या तरी सगळेकडे सामसूम होती.
चंद्रू हळूच चाळीच्या कॉमन चौकात आला.
अद्भूतदादाच्या  कंदिलातून एवढे ढासू कलर झळकत होते की समोरचा चंद्रूचा कंदील एकदम बिच्चारा दिसत होता.
चंद्रूनी हलकेच ओठ चावले आणि थम्स-अपची रिकामी बाटली जमिनीवर ठेवली…
मग अर्जुनासारखा पाठीत खोचलेला अग्निबाण काढला आणि बाटलीत सेट केला…
त्यानं बाणाचं टोक त्या 'डोक्यात जाणाऱ्या' कंदिलाकडे वळवलं…वात पेटवली आणि घराकडे धूम ठोकली.

पुणे: नरक चतुर्दशी २०१६ दुपार
आजचं स्क्रिप्ट-रायटिंग आणि स्टोरी-टेलींग डिव्हायसेस वरचं प्रोफेसर शुक्लांचं लेक्चर तुफान रंगलं होतं…
बऱ्याच दिवसांनी जुने प्रोफेसर शुक्ला परत आल्यासारखे वाटत होते.

 "… तर आपण आता आजचं शेवटचं प्लॉट डिव्हाईस बघूया त्याचं नाव आहे 'ड्यूस एक्स माकिना'
लॅटीन वाक्य आहे हे आणि शब्दश: अर्थ: 'मशीनमधला देव'
पूर्वीच्या ग्रीक नाटकांत बरेचदा असं व्हायचं…
नाटककाराची पात्रं  एका डेड एंडला येउन अडकायची की आता गुंता सुटता सुटेना…
मग अचानक स्टेजवर मोठ्ठ्या क्रेन मधून देव अवतरायचा आणि आपल्या दैवी शक्तीने सगळा गुंता सोडवायचा"

"मस्त ना"?,
पुढच्या बाकावरची इरा चिवचिवली
"म्हणजे आपल्या मनमोहन देसाईंच्या मर्दमध्ये कसं अमिताभ देवीची आरती गात असतो जीव तोडून… 'ए मां मेरी मां से मिला दे मुझे' आणि मग निरूपा रॉयच्या मागे लागलेल्या सैनिकांना देवीचा वाघ पळवून लावतो"

"एक्झॅक्टली मिस इरा",

इराची जिवणी खुशीत रुंदावली!

'ही समोर बसलेली तल्लख पोरं, त्यांचे चमचमते डोळे… खिडकीतून येणारा तो सोनसळी कवडसा सगळं मिस करू आपण!'
प्रोफेसर शुक्लांना थोडं वाईट वाटलं…
खिन्न हसत ते बोलू लागले,
"खरं सांगू फोक्स इट्स ऑल बुल-शीट!
अशी मिरॅकल्स फक्त सिनेमात होतात… खऱ्या आयुष्यात तुम्हाला दु:खाशी लढावंच लागतं इच्छा असो व नसो.
ऑप्शन्स दोनच असतात आपल्याकडे:
लढायचं… रोज… रक्त-बंबाळ होत!
किंवा हरलो म्हणून कबूल करायचं!
सो गुड बाय फोक्स!"
त्यांनी पिस्तुल काढून स्वत:च्या कानशिलावर टेकवलं आणि चाप ओढणार इतक्यात…
कुठूनतरी अज्ञातातून एक अग्निबाण सरसरत आला आणि त्यांच्या हातावर फुटला!
पिस्तूल खणकन खाली पडलं…
प्रोफेसर शुक्ला ओशाळं हसले… आणि म्हणाले,
सो फोक्स धिस इज व्हॉट आय कॉल "ड्यूस एक्स माकीना!!!"


-नील आर्ते














10 comments:

  1. Artemius...mastach...sahi twist. Naav Deus Ex Makina asta tari challe aste. That wud've gained attention quickly..

    ReplyDelete
    Replies
    1. :)...hmm may be you have a point..let me think!

      Delete
  2. @ nilesh arte
    aapala email adderss milel ka

    reply-belgishilpa@gmail.com

    ReplyDelete
  3. झकास कथा. या इ भन्नाट शेवट 👌🏽👌🏽

    ReplyDelete
  4. अप्रतिम कथा. झपाक्कन अंगावर येणारा शेवट

    ReplyDelete