Sunday, 27 August 2017

डोळे 'भरून'... (भाग ३)

परत आत्ता:
आदिलचा फोन वाजत होता...
शौर्यानं भानावर येत तो घेतला,
"ओय चल तयार हो फटाफट. आपण जेवायला जातोय तुझ्या आवडत्या 'रॉकस्टार'मध्ये"

पुढच्या पाच मिनिटांत आदिल धडकला खाली.
त्याची काळीशार 'व्हेन्टो' आणि तिचा तो जर्मन बांधा...
दोन क्षण डोळ्यांत साठवत राहिला आदिल...
आणि मग एक सुस्कारा सोडून पॅसेंजर सीटवर बसला...
नेहमी खरं तर शौर्यच चालवायचा 'व्हेन्टो' दोघं एकत्र असले की...
पण आज नको...
नजरेचा काय भरोसा नाय च्यायला.

सी लिंकवरनं गाडी बिंग बिंग चालली होती...
शौर्याला त्यांचे असंख्य लॉंग ड्राईव्ह्ज आठवत राहिले,
"आठवतंय आदिल? आपण कोकणात उतरत होतो... गगनबावडा घाटातून...
आणि एका अडनिड वळणानंतर अवचित समोर आलेला तो गुलमोहर...
गच्चम फुललेला... लालभडक."

"ऑफकोर्स... आणि तुझ्या दंडावर पण एक गुलमोहर होता... लालभडक रक्ताचा.
गोळी चाटून गेली होती तुला."

"हो. पण तो एक क्षण आपलं मिशन, पाठीअसेल्या जिवावर उठलेल्या गाड्या, दंडावरची जखम सारं काही विसरायला झालं होतं... ते लाल गारुड बघून."


"आणि पुढच्याच क्षणी त्या सेक्सी गुलमोहराला उडती पापी फेकून पाठच्या गाडीचा टायर फोडला होतास तू तुझ्या ग्लॉकनी"

"हा हा येस्स!"

"आणि मनालीच्या घाटातला तो बाइकवाला आठवतोय?
कसला चालला होता त्या वेड्यावाकड्या वळणांवरून... कॉन्फिडन्ट...
त्याची ती पोपट ग्रीन स्पोर्ट्स बाईक: अलट-पलट होणारी.
आणि एका टर्नवर त्याचा गुडघा चिकटला होता जमिनीला... ऑलमोस्ट.
काय ब्रिलियंट व्हिजन होतं ते."

"हो ना आणि पुढच्याच वळणावर ठोकून दरीत फेकला आपण त्याला.
इलाज नव्हता... जैश ए मुहम्मदचा फिदायीन होता तो.
पण येस्स अप्रतिम रायडर."

दोघंही काही क्षण गप्प झाले...
आपापल्या पर्सनल दृश्यांची रिळं डोळ्यांपुढे चालवत...
अबोल राहून एकमेकांना स्पेस देणाऱ्या जिगरी दोस्तांसारखे.

मग हळूच आदिल म्हणाला,
"आमची बॅकअप टीम लवकर पोचली असती तर इतके दिवस तुला अडकून पडावं लागलं नसतं."

"सोड ते आता. तेवढा गॅम्बल असतोच स्ट्राइक्समध्ये हे तुलाही माहितीय.",
शौर्य हलकेच हसत म्हणाला.

"तरीपण"... आदिल चुकचुकला.

क्रमशः

  

No comments:

Post a Comment