Wednesday, 27 December 2017

दीपक मामा (भाग १)

दीपक मामा...
खरं तर तो माझा मामा नव्हेच. माझ्या मामीचा तो भाऊ. पण सगळ्या भावंडांबरोबर मी पण त्याला मामाच म्हणायचो.
आमची मामी म्हणजे तिच्या तरुणपणी गिरगावातलं बडं प्रस्थ. गिरगावातलं तेव्हाचं एकमेव ड्रायव्हिंग स्कूल त्यांच्या मालकीचं.
पण आमच्या मामानं तिला फुल्ल फिल्मी स्टाईलमध्ये गटवलेली वगैरे... पण तो वेगळाच किस्सा... पुन्हा कधीतरी.

तर दीपक मामा... आणि त्याच्या वडलांचं आणि नंतर त्याच्याकडे वंशपरंपरेनी चालत आलेलं ड्रायव्हींग स्कूल. इथे गिरगावातला जवळ जवळ प्रत्येक कारेच्छू ड्रायव्हिंग शिकलाय.

त्याची ड्रायव्हिंग शिकवण्याची बडबडदार शैली आख्ख्या एरियात फेमस आहे.

एखादा शिकाऊ विद्यार्थी / नी स्टिअरिंग, क्लच, ब्रेक सगळं सोडून खो खो हसतायत आणि दीपक मामा गडबडीनं गाडी कंट्रोल करतोय हे दृश्य तुम्हाला गिरगावातल्या गल्ल्यांमध्ये अवचित कधीही कुठेही  दिसू शकतं.

तर असंच एके दिवशी मीही गाडी शिकायचं ठरवलं.
आता मी आठवड्याचे पाच दिवस पुण्यात आणि वीकेण्डला मुंबईत.
म्हणजे ते पोस्ट मॉडर्न तुटलेपण ऑलरेडीच आमच्या आयुष्यात...
धड इथे नाय धड तिथे नाय वगैरे...
म्हणजे पुण्यात छान मुलगी टिंडरवर मॅच झाली झाली तोपर्यंत आपण मुंबईत पोचणार...
आणि तिला दिसणार डिस्टन्स: १२५ किलोमीटर. 
तसंच व्हाईस-व्हर्सा.
म्हणजे अबोध प्रेमाच्या कळ्या जन्मत:च कोमेजणार वगैरे.
पण सॉरी ते जाऊ दे... आय डायग्रेस.तर एका पंच पंच उष:काली आई आणि मामीनं ठरवलं की आता आपलं घरचंच ड्रायव्हिंग स्कूल असल्याकारणाने मी...
म्हणजे अनुक्रमे आईचा मुलगा आणि मामीचा भाचा याने...
पुढचे तीन म्हयने दर शनिवार रविवार...
मामाकडे जायचं...
ड्रायव्हींग शिकायला. (टा डा डा!!!)

शिवाय गिरगावात काहीना काही कारण काढून जायला मला आवडतंच...
माझ्या डोळ्यापुढे प्रकाश (साबुवडा), विनय (मिसळ), पणशीकर (बटाटा पुरी), ताराबाग (पाणीपुरी) अशी तिकडली विविध खाद्यदेवळं तरळली आणि एका बेसावध क्षणी मी हो म्हणून टाकलं...

पुढच्याच शनिवारी गिरगावात धडकलो.
आधी पणशीकरकडे बटाटापुरी चेपली आणि आंबेवाडीत जाऊन दीपकमामाला फोन लावणार...
इतक्यात सणसणीत 'ट्टाक्-ट्टाक्' ऐकू आलं...

आता ट्टाक्-ट्टाक् म्हणजे भारी प्रकार आहे एक.
मुंबईत लांबवर नाक्यावर असलेल्या मित्राचं, किंवा उंचावर गॅलरीत असलेल्या आपल्या 'डाव'चं लक्ष हमखास वेधून घेण्याचं आवाजी अस्त्र आहे हे.
पण नॉट टू बी कन्फ्युज्ड विथ फास्टर फेणेचं ट्टॉक् बरं का!
सी... ट्टॉक् करताना फा. फे. (किंवा आपण)  खालचा जबडा फारसा खाली फेकत नाही,
शिवाय ओठांचा थोडा 'O' करतो. 'ट' वरचा तो चंद्र या चंबूमुळेच होतो आणि तो 'ट्टॉ' होतो.
पण ट्टाक्-ट्टाक्मध्ये तुम्ही ओठ सरळ ठेवता आणि जीभ टाळ्याला लावून खालचा जबडा सणसणीत खाली पुश करता.
तो हाय पीच साउंड या फोर्सनीच येतो.
म्हणजे रात्रीच्या निवांत वेळी गिरगावात सदाशिव लेनमध्ये केलेलं ट्टाक्-ट्टाक् मुगभाटात आरामात ऐकू जाऊ शकतं.
 
तर असंच दमदार ट्टाक्-ट्टाक् मला मॅजेस्टिक बुक डेपो वरून ऐकू आलं.
दीपकमामा उभा होता साक्षात,
दोन बोटांत पकडलेली सिगरेट, जाडसर भिवया, रुंद चौकोनी चेहेरा, जाड काचांचा चष्मा...
आणि चक्क व्हॅम्पायरसारखे कडांनी डोकावणारे धारदार सुळे.
म्हणजे अंमळ उग्रच.
पण तो हसला की छान खळ्या पडतात आणि उग्र वाटणारा चेहरा अचानक मिस्कीलमध्ये ट्रान्सफॉर्म होतो.
म्हणजे खूप नॉर्मल सिम्पल मुलगी हलक्या काजळानी एका क्षणात सेक्सीमध्ये कन्व्हर्ट व्हावी तसं.

एनीवेज, सिगरेट संपल्यावर लगेचच आमचा पहिला धडा चालू झाला.
त्यानं मला शिस्तीत क्लच, ब्रेक, ऍक्सीलरेटर वगैरे समजावून सांगितलं...
सॉरी सॉरी चुकलो... ऍक्सीलरेटर नव्हे 'पेट्रोल'!
आख्खा भारत ज्या गोष्टीला ऍक्सीलरेटर म्हणतो त्याला मामा पेट्रोल म्हणतो!
पण खरं तर बरोबरच आहे ते... त्याचं खरं काम पेट्रोलचा फ्लो कमी जास्त करण्याचंच असतं.
म्हणजे अमेरिकेत त्याला गॅस म्हणतात तसंच ते.

तर मग मी आता फुल्ल तयारीत की आपण आता गाडी स्टार्ट करायची वगैरे...
पण मामा म्हणाला,
"थांब! एक किस्सा सांगतो...


क्रमश:

No comments:

Post a Comment