Sunday 22 April 2018

सिरीज पहिली: आन्तूराश (Entourage)

पल्या मुंबईत काही एरियाजमधली मुलं भारी म्हणजे भारीच स्ट्रीट स्मार्ट असतात,
उदाहरणार्थ गिरगाव, भेंडीबाजार, लालबाग, बँड्रा - माउंट मेरी स्टेप्स आणि इतर अनेक.
(तुमच्या एरियाचं नाव ऍड करा बिन्धास्त :))
पण गम्मत म्हणजे हे सगळे भाग कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणावे असेच.
त्या त्या एरियातल्या पोरांची एक खास अदा असते, चालूपणा असतो, 
गोष्टी सहजासहजी न मिळाल्यानं दुनियादारीची एक तगडी समज असते,
दोस्ती दुष्मनीचे घट्ट हिशेब असतात इत्यादी इत्यादी...

क्वीन्स हा न्यूयॉर्कमधला अस्साच एक फारसा श्रीमंत नसलेला भाग,
आणि व्हिन्सेंट चेस उर्फ 'व्हिन्स'  हा क्वीन्समधला एक देखणा तरुण.
थोडं नशीब थोडं टॅलेंट असं काय काय जमून येतं...
व्हिन्स धाडकन एका रात्रीत सुपरहिट्ट पिक्चरचा सुपरस्टार होतो...
आणि हॉलीवूडला पोचतो.

पण एल. ए. च्या मायानगरीत तो एकटा येत नाही तर आपल्या तीन घट्ट दोस्तांना घेऊन येतो.
शिवाय त्यांना (पोसत असला तरी) पोसतोय असं वाटू नये म्हणून आपल्या क्रूमध्ये लुटूपुटूची काम देतो.
मॅनेजर, ड्रायव्हर, पर्सनल ट्रेनर नं काय काय,
ही गोष्ट आहे त्याची अन त्याच्या ताफ्याची...
म्हणूनच Entourage (उच्चार: आन्तूराश हे नाव.

मग त्या चौघांचा जो काही हैदोस चालू होतो.
आपण नवीन जॉब मिळाल्यावर घरापासून लांब अत्रंगी रूममेट्स बरोबर रहाताना जी धम्माल करतो ना...
त्याला ३०० ने गुणा म्हणजे तुम्हाला थोडीशी आयडिया येईल कदाचित.

खरं तर ही वरवर बरीचशी 'बॉईज'ची सीरीज वाटू शकते.
म्हणजे बूटी, बूब्ज, आलिशान गाड्या, बिव्हर्ली हिल्समधली गॉर्जस घरं असं सगळं सगळं ठासून आहे आन्तूराश'मध्ये, आणि ते बघायला मजा येतेच, हो म्हणजे खोटं का बोला.
अल्टिमेट 'दांडेकर' फँटसीचा आरोप लोकं करतातच 'आन्तूराश'वर बरेचदा.  

पण...
थोडं आत खरवडलंकी कळतं अरेच्चा ही तर दोस्तीची गोष्ट आहे.
सुरवातीला आपल्याला ही श्रीमंत मित्राच्या जीवावर मजा मारणारी खुशालचेंडू पोरं वाटतात.
पण मग कळतं की या मोहाच्या, भुसभुशीत, इन्सिक्युअर्ड फिल्मी दुनियेत हेच खरे व्हिन्सची सपोर्ट सिस्टीम आहेत.
देखणा, उधळ्या, वूमनायझर स्वाव्ह व्हिन्स आणि त्याचे मित्र:
व्यवहाराविषयीचं उपजत जजमेंट सहसा न चुकणारा, व्हिन्सला तोंडावर सुनावू शकणार छोटूसा 'ई' (एरीक),
गांजा मारण्याव्यतिरिक्त फारसं काहीच न करणारा आळशी पण प्रेमळ 'टर्टल',
आणि राडा करायला एव्हररेडी असलेला स्ट्रगलींग ऍक्टर जॉनी 'ड्रामा'.
रत्न आहेत रत्न एकेक.
एकमेकांशी कॉन्स्टन्ट भांडणारे, एकमेकांची घे घे घेणारे बॉईज!
पण एक्झॅक्टली असेच तर असतात मित्र...
फोन करून "लवडू कुठे निजवतोयस" हा पहिला प्रश्न विचारणारे,
आपला पोपट झाल्यावर ख्या ख्या करून हसणारे,
आणि अगदी अगदी अंत पाहून झाला की झप्पकन येऊन आपले सगळे घोळ निस्तरणारे.

प्रत्येक सीनला कॉलनीतल्या मित्रांची आठवण येईल तुम्हाला हमखास.

सीरीज पुढे जाते तसं हळूहळू आपल्याला ऊलत जातं:
हा ऐषोआराम त्यांना आवडतोय,
प्रचन्ड झोलर आहेत हे सगळे,
मुलींपाठी हुंगेगिरी करणारे आणि त्यापायी रोज नवा घोळ घालणारे वासू आहेत.
पण त्यांच्या गाभ्याची कांब मात्र बँकेबिलीटीच्या टणक पोलादानी बनलीय.
वेळ आली तर दोस्तीसाठी आणि तत्वासाठी अर्ध्या सेकंदात सगळी ऐयाषी सोडायला तयार होतील ते.
व्हिन्स एकदा बोलतोही,
"I came from nothing, and as much as I like the toys, I really don't need them" 

किंवा:

मित्राच्या गर्लफ्रेंडच्या पाठी लागलेल्या स्टुडिओ बॉसला 'ड्रामा' तडी देतो...
त्याचा राग म्हणून तो बॉस ड्रामाचा पत्ता हिट सिरियलमधून कट करतो आणि ड्रामाला सांगतो,
"You are not a good enough actor to threaten your boss."
ड्रामा' ताडकन उत्तरतो,
Well, I'm a good enough friend.
दोस्तीची स्टिरॉइड्स देणारा हा सीन मी 'य' वेळा पाहिलाय.

एकंदरीतच डायलॉग्ज आणि सीन्स तूफान आहेत.
खास करून 'अरी गोल्ड'चे.
शिवराळ, हायपर, मॅनिप्युलेटिव्ह, प्रचन्ड कॉकी अरी!
विन्सचा ज्यू एजंट.
ट्रस्ट मी:
कधी बॉसवर जास्तच फ्रस्ट्रेट झालात,
किंवा एखादं मोठं निगोशिएशन करायचंय...
किंवा कोणालातरी सुनवायचीय...
तर अरी गोल्डचा एखादा सीन बघून जा.
(खास करून अरी गोल्ड आणि त्याचा गे एजंट लॉइडचा पेन्टबॉल गन सीन)
फाडून याल तुम्ही फाडून!
एकतर प्रचंड यशस्वी व्हाल किंवा... जॉब जाऊ शकतो/ प्रचंड नुकसान होऊ शकतं/ मारामारी होऊ शकते :)
पण तुम्हाला हलकं हलकं वाटेल नक्की!

बिली वॉल्श हे अजून एक ध्यान,
क्रिएटिव्ह फ्रीडमसाठी काही म्हणजे काहीही करणारा प्रचंड ब्रिलियंट आणि चक्रम डायरेक्टर.

इंटिग्रिटी, दोस्ती निभावणं, बिन्धास्त गट-फीलवर रिस्क घेणं या थीम्स वरचेवर येत राहतात या सीरीजमध्ये.

आणखी एक गोष्ट व्यक्तीश: मला इथे भारी रिलेट झाली:
म्हणजे कसंय ना,
करिअर, इन्व्हेस्टमेंट, किंवा रिलेशनशीप अशा बऱ्याच महत्त्वाच्या डिसीजन्सपूर्वी आपण आपल्या खास मित्राचं मत विचारतो...
तोही पहिल्यांदा आपल्याला जे ऐकायचंय तेच सांगतो...
मग थोडा वेळ गप्प बसतो..
आणि न रहावून फाडकन त्याचं खरं मत सांगतो आपल्याला आवडो न आवडो.
ते ह्या सिरीजमध्ये फार लोभसपणे होतं बरेचदा.
बरं व्हिन्स आणि त्याची पोरं नेहमी जिंकतात असं नाहीच.
त्यांचेही छत्तीस होतात बरेचदा, निर्णय घेताना घालमेल होते, निर्णय मेजर चुकतात पण या सगळ्यातलं नाट्य आणि त्याची मजा आहेच.

आधी सांगितल्याप्रमाणे ही बरीचशी बॉईजची सीरीज पण यातल्या स्त्रियाही प्रचंड लाईकेबल आहेत.
अरीची बायको 'मिसेस गोल्ड', एरिकची गर्लफ्रेंड 'स्लोन', स्टुडिओ हेड 'डॅना', विन्सची पब्लिसिस्ट 'शॉना'... सगळ्याच.

गोष्ट ही पात्रांची असते आणि यातली पात्र तर ध ध ध माल आहेत.
अजूनही रोजच्या धकाधकीनं खूप गांजलो की मी रात्री 'आन्तूराश'चा एक एपिसोड टाकतो.
आणि दुसऱ्या दिवशी कडक तयार होऊन अरी गोल्डसारखी डरकाळी फोडतो...
लॉ SSS यड!!!

ट्राय करा इट वर्क्स!



2 comments: