Saturday 21 July 2018

त्रिकथा १: अंधाराची ^खरी चव

दोस्तांनो तुम्ही कधी त्या "अंधाराची चव" नावाच्या हॉटेलात गेलतात का?
आपल्या टुमदार पेन्शनर शहरात ते चालू झालं तेव्हा प्रचन्ड हाइप झालं होतं आठवतंय?
म्हणजे त्यांचा मेन सेलींग पॉईंट होता की ते आपल्या गिऱ्हाईकांना चक्क आंधळेपणाचा तात्पुरता आणि थरारक अनुभव देऊ करायचे वगैरे...

आयडीया तशी सिम्पल होती त्यांची,  की रेस्टॊरंटमध्ये शिरताना तुम्ही तुमचे फोन्स, लॅपटॉप्स वगैरे डिजिटल लळालोम्बा बाहेरच ठेवून आत जायचं...
कम्प्लीट काळ्याशार अंधारात.
त्यांचा स्टाफ तुम्हाला हाताला धरून घेउन जाणार...
बसायला मदत करणार...  
तुमची जी पण काय ऑर्डर असेल ती बनवणार...
जेवण सर्व्ह करणार... 
सगळ काही किर्र-मिच्च अंधारात!

तुमचं ते अंधार-जेवण झालं आणि बडीशेप-बिडीशेप चघळत तुम्ही लख्ख प्रकाशात बाहेर आलात की मग ते तुम्हाला सांगायचे की,
हॉटेलचा आख्खा स्टाफ: वेटर्स, ऑर्डर घेणारा कॅप्टन, मॅनेजर आणि शेफसुद्धा सगळे अंध आहेत खरोखरचे!

म्हणजे आयडीया तशी मुदलात चांगली होती पण या सगळ्यात एक मेजर उणीव होती... 
म्हणूनच बहुतेक त्या हॉटेलनं फारसं न चालता मान टाकली... 
आणि मग मी...

पण थांबा!
पहिल्यांदा तुम्हाला मी थोडीशी बॅकग्राउंड सांगतो:
मी एक प्रचंड टॅलंटेड (असं लोक म्हणतात) शेफ आहे.  
पण माझा बाप फुलटू अंडरवर्ल्ड टच होता.  
एका क्षणी त्याला कायतरी उपरती झाली आणि सगळे वाईट धंदे सोडून तो माफीचा साक्षीदार बनला. 
अर्थात अंडरवर्ल्ड म्हणजे काय तुमचं नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन नाय की वाटलं नको आणि केलं कॅन्सल. 
बाहेर यायची किम्मत त्याला चुकवावी लागलीच आणि त्याचे डोळे गेले. 
(तो किस्सा इथे: आ दा पा दा)
गम्मत म्हणजे डोळे गेल्यापासून त्याचा चवीचा सेन्स हजारपटीनी वाढला असं तो छाती ठोकून सांगायचा. 
म्हणजे उदाहरणार्थ पाणीपुरी त्याची फेव्हरेट... 
आधीही खायचा तो आवडीनी. 
पण... 
आंधळा झाल्यापासून पाणीपुरी खाताना चवीचे अक्षरश: स्फोट व्हायचे त्याच्या मस्तकात... 
मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...  
या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,
त्याच्या जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.
आनंदानी डोळे मिटून झेलपांडत नाचायचा तो.        

आणि तेव्हाच माझ्या लक्षात आली ग्यानबाची मेख:

तुमच्या सेन्सेसना तुम्ही इतकं सहजासहजी चुत्या नाही बनवू शकत.
म्हणजे तुम्हाला अंधाऱ्या खोलीत कोंडलं म्हणून तुम्ही काही खरोखरचे आंधळे नाही होत.
आणि हाच तर मेजर लोचा होता "अंधाराची चव"च्या बिझनेस मॉडेलमध्ये.
म्हणजे गिऱ्हाईकांच्या डोक्यात कुठेतरी चालू असणारच ना की हे सगळं लुटूपुटूचं आहे म्हणून.
मग कसे बरं एकवटतील त्यांचे ५ मायनस १ सेन्सेस?
नाहीच ना शक्य.
म्हणजे पॉर्नमध्ये आणि खऱ्या सेक्समध्ये फरक असतोच ना...
मग फूड -पॉर्नचं ही तसंच...

तर लोकहो... मुद्द्याची गोष्ट अशी की...
ह्या बंद पडलेल्या "अंधाराची चव"च्या गल्लीत ज SSS स्ट २०० मीटर मीटर पुढे चालत गेलात की तुम्हाला दिसेल एक चकाचक नवीन हॉटेल.
पाटीवर नाव असेल: "अंधाराची  ^खरी चव"
आणि खाली प्रोप्रायटर म्हणून अस्मादिकांच नाव असेल, डॉ. नयन माधव डोळस.

बरं त्या काकपदा(^)सकट ऍड केलेल्या "खरी" शब्दाची गम्मत सुज्ञ वाचकांना कळली असेलच.
(फक्! 'हे सुज्ञ वाचक' वगैरे टाकलं की ना. सी. फडकेंसारखा बिग शॉट लेखक असल्यागत वाटतंय.)

तर... "अंधाराची  ^खरी चव" मध्ये तुम्ही आलात की अंधार बिंधार काय नसणार.
ती चिंधी कामं आपण नाय करत.
व्यवस्थित लख्ख प्रकाश असणार.
फक्त...
तुम्ही आल्या आल्या आमची फटका होस्टेस तुमच्या कानात कायतरी पुटपुटणार...
आणि तुम्ही दोन मिनटं विचार करून मान डोलावली की...
...
...
...
मी सुळ्ळकन् तुमचे डोळे काढून टाकणार खरोखरचे!



घाबरू नका मी अशी हजारो ऑपरेशन्स केलीयत माझी खास पेटंटेड टेक्नॉलॉजी वापरून.
पाच मिनटं पण नाय लागणार मला आणि दुखणार तर अजिबात नाही आपली गॅरंटी.
पण तरीही बहुतेक लोकं त-त-प-प करायला लागतात.
नो प्रॉब्लेम!
अशा टरकू लोकांना आम्ही एक सुंदर डेझर्ट फ्री देऊ करतो त्यांच्या इन्स्टा-बिन्स्टा वर टाकायला.
आणि गोड हसून फुटवून लावतो सरळ.

पण...
काही माईके लाल तयार होतातसुद्धा चवीसाठी असं झोकून द्यायला.
वर्षातनं एखादा वगैरे...
पण ठीकाय तसंही माझ्यासाठी हे हॉटेल धंद्याच्या पार पलीकडे आहे.
माझ्या डॉक्टरीमधून मी तुफान पैसे कमवतो.
शेफगिरी ही माझी हौस आहे आणि हौसेला मोल नसतंच.
कमी असले तरी अशा खवैयांसाठीच तर हे हॉटेल चालवतोय आम्ही.
   
अशा नवांध खवैयांसाठी मग चालू होतो एक अविस्मरणीय प्रवास. 
चवींचा, वासांचा, नादाचा, स्पर्शाचा:  
जिभेला चटके देणारं वाफाळतं आंबट तिखट रस्सम, 
छाती जाळत उतरणारी कस्टम मेड ओल्ड मॉंक रम,
कर्रम कुर्रम कानात वाजणारे पोह्याचे पापड, 
नाकात घमघमाट सोडणारे ऑलिव्ह ऑईलमधले सुके बोंबील,
अजूनही थरथरणारं ताजं ताजं फक्त काळी मिरी टाकलेलं मांस (कोणत्या प्राण्याचं हे आमचं ट्रेड सिक्रेट ;))   
आणि माझी खास स्पेशालिटी :
व्होडका पाणी-पुरी...
एक एक पाणी पुरी मी माझ्या हातानी कस्टमर्सना भरवतो... 
आणि त्यांच्या डोळ्यांतून घळाघळा पाणी वहायला लागतं... 
कारण त्यांच्यासाठी हे सगळं खरं असतं.  
खऱ्या डोळ्यांची किंमत देऊन मिळवलेली खरी चव!

असं प्रॉपर सेव्हन कोर्सवालं जेवण जेवले की ते तृप्त होऊन धडपडत उठतात आणि मग आमची फटाका होस्टेस त्यांना परत माझ्या सर्जरी रूम मध्ये आणते आणि मी त्यांना बेशुद्ध पाडतो. 

का म्हणजे काय?
त्यांचे डोळे परत करायला अर्थात. 
हो म्हणजे मी काय तुम्हाला राक्षस बिक्षस वाटलो की काय?

फ्रीजमध्ये ठेवलेले त्यांचेच डोळे मी झरझर परत बसवतो, माझ्या सेल रिजनरेशन टेक्निकनी फारतर दोन मिनटं लागतात परत दृष्टी यायला.

आणि मग काय... आनंदी आनंद गडे 'बहुतेक'वेळा.
म्हणजे एकतर आपण वेडं साहस केल्याचा नशा,
त्यात चार सेन्सेसना फाडू 'गॅजम देणारं अप्रतिम जेवण,
आणि दृष्टी सुद्धा परत...
म्हणजे विन-विनच ना!
हां आता त्यांचे परत आलेले डोळे पांढरे होतात बिल बघून पण 'अं. ^ख. च.' आंडू पांडू लोकांसाठी नाहीच आहे.
एकंदरीत बहुतेक लोकं खूष होतातच हमखास.

पण...
(सूज्ञ वाचकांनी वरचा "बहुतेक" शब्द नोटीस केलाच असेल.)   
परवाच आम्हाला एक मनुष्यशिरोमणी भेटला आणि त्यानं चक्क तक्रार केली:
झोमॅटोवर फीडबॅक सुद्धा सो सो दिला.

त्याचं ठाम म्हणणं होतं की,
"जेवण अप्रतिम होतं नो डाउट! पण माझे डोळे च्यायला परत का दिले?
एका परफेक्ट जेवणासाठी डोळेच काय जीवही द्यायला तयार होतो मी!
खूप कमी क्षण येतात आयुष्यात असे... पाठचा पुढचा विचार न करता ऐंद्रिय आनंदासाठी न्यौछावर होण्याचे.   
पण तुम्ही मुर्खासारखं हीण मिसळलंत माझ्या विशुध्द अनुभवात."

आम्हाला तो ढोंगी नी घाबरट नी बूर्झ्व्हा नी काय काय बोलला. 

पण मानलं त्याला आपण...
साला बावन्नकशी खराखुरा खवैय्या होता!
असे हिरे रोज रोज नाय मिळत!!  
म्हणूनच...  
मी त्याला आमच्या मॅनेजमेंटकडून खास मेल टाकलाय, 
त्याला आमच्या लवकरच उघडणाऱ्या नवीन हॉटेलच्या प्रिमीयरचं आमंत्रण दिलंय. 
आमच्या नवीन हॉटेलचं नाव आहे... 

अंधाराची खरी^खुरी चव 

आणि इकडे मेनूच असा असेल की त्याला तक्रारीला जागा रहाणार नाही... प्रॉमिस!



-नील आर्ते 

निखिल क्षीरसागर याच्या "The Real taste of darkness" या कथेचा स्वैर भावानुवाद.
मूळ इंग्रजी कथेची लिंक: The Real taste of darkness 


  

  
      



















  






1 comment: