Saturday, 27 July 2019

त्रिकथा २: आ दा पा दा

मी माधव डोळस उर्फ माध्या डोळस.

एक टाइम माझी पण थोडीशी हवा होती अंडरवर्ल्ड मध्ये.
शिवाय माझं नावही म्हणे २०-३० वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी नामचीन गुंडाशी मिळतं जुळतं होतं.

मला खरं तर आधी भारी वाटायचं हे सगळं.
डेअरिंग याहूम आपल्यात पहिल्यापासून.
केशूचा तर उजवा हात होतो मी... आणि डावा हात मदन्या.
पण केशूभाई म्हणायचाच, 'खरा जिगर माध्यातच आहे'
मदन्यात डेअरींगपेक्षा क्रौर्य जास्त होतं...
कुठे झुरळाला चटकेच दे, कुत्र्यांचे पायच बांध, आंधळ्या भिकाऱ्याला टपलीच मार असं काय काय करायला भारी आवडायचं त्याला.

त्यात मदन्यानं कुठूनतरी ती नार्कोझ सिरीज बघितली आणि केशूभाईला दाखवली.
त्यानंच केशूभाईच्या डोक्यात ते पुण्याचा पाब्लो एस्कोबार बनायचं भूत घातलं.
केशूभाई जास्तच खतरनाक जास्तच विकृत बनत चालला होता दिवसेंदिवस.

मला मात्र हळूहळू कंटाळा यायला लागला होता या सगळ्याचा.
त्यात त्या नदीवरच्या दंगली झाल्या दोन्ही जमातीतली शेकडो माणसं मेली.
मी कशात नव्हतो, पण एकदा केशूभाईला फोनवर आमदारबाईशी खुसपुसताना ऐकलं...
त्यानंच बाईच्या सांगण्यावरून दंगल भडकावलीय ह्याची जवळ जवळ खात्री होती मला.

मी मग जरा विचार करायला लागलो...
त्यात झिलिक पण प्रेग्नंट झाली आणि तिच्या पोटातली ती धडधड ऐकून वेगळंच कायतरी वाटायला लागलेलं.
धतिंग आणि खाणं, दोनच शौक होते आपले...
पण हळूहळू भाईगिरी सोडून द्यावीशी वाटायला लागलं होतं

खाण्यात मात्र पाणीपुरी फेव्हरीट!
आपला ठरलेला भैया पण होता पाणीपुरीवाला... गुप्ता!
चांगला होता बिचारा... गायीसारख्या मोठ्ठ्या पाणीदार डोळ्यांचा.
सेनापती बापट रोडवर त्याचा तो लाल अलवणातला लहानसा ठेला लावायचा.
कधीकधी बरोबर पोरगा असायचा.
त्याचीच छोटी कॉपी, तसेच पाणेरी डोळे...
गुप्ताच्या पाया-पायात घोटाळत... मांजराच्या पिल्लासारखा.
फारसं बोलायचा नाही तो...
मोठ्ठया डोळ्यांनी बघत मात्र रहायचा टुकूर टुकूर!

रोज न चुकता पाणीपुरी खायचो मी त्याच्याकडे.
अजब चव होती त्याच्या हाताला.
मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...  
या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,
माझ्या  जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.

त्यादिवशी सुद्धा...

खरं तर माझी सगळी सेटींग झाली होती.
पुण्यातला माझा शेवटचा दिवस होता तो.
केशूभाईच्या फोनमधली ती दंगलीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग मी सुमडीत माझ्या फोनवर घेतली आणि केंजळे सायबांना पाठवली.

आता इकडे केशू, मदन्या आणि त्या आमदार बाई बाराच्या भावात
आणि आम्ही तिकडे क्राईम ब्रँचच्या खबरी फंडातून केंजळसायबांनी दिलेले दीडलाख घेऊन कोलकात्याला छू.

मग कदाचीत कोलकात्याला बुर्जी पावची गाडी टाकली असती.
पण तिकडे लोक खातात तरी का आपल्यासारखे बुर्जीपाव? कोण जाणे??
का गुप्तालाच घेऊन जावा आणि पाणीपुरी टाकावी?

काय बरं म्हणतात तिकडे पाणीपुरीला?
पुचका  वाटते.

गुप्तावरून मला पाणीपुरी आठवली त्याची.
मी घड्याळ बघितलं.
माझा पाणीपुरीचा टाइम झालेला.
बरोब्बर साडेतीन तास होते केंजळे सायबांना भेटायला.
त्यांना भेटून पैशांचं पाकीट घेतलं की डायरेक् स्टेशनवर.
झिलिक कामावरून परस्पर तिकडेच येणार होती.
मग १० च्या लातूर हावरा एक्सप्रेसनी कलटेश!
डायरेक कोलकाता.
तिकडे झिलिकचा भाऊ होताच.

माझ्या डोक्यात कीडा वळवळला...
पाणीपुरीची तलफ आली.
तसाही आज शेवटचा दिवस पुण्यातला.
नाही म्हटलं तरी हुरहूर लागलेली.

पण नको जाऊदे तिच्यायला आज पोटपण खराब होतं...
सकाळपासून ढाम-ढूम चालू होतं.
ते सुद्धा नुसतं 'झागवालं' नव्हे तर डेंजर वासवालं.
माझ्याच नाकातले केस करपायची पाळी आली होती.
झिलिकनं जाताजाता धमकी दिली होती...
जाताना डब्यात प्रदूषण केलंस तर चालत्या ट्रेनमधून फेकून देईन म्हणून... ह्या ह्या ह्या!
जाऊ दे नको जायला आज...

दहाव्या मिंटाला गुप्ताकडे होतो मी :)
एक एक पाणीपुरी मन लावून खाल्ली मी.
ह्या शहराची शेवटची चव साठवून घेतली.
गुप्ताला पैसे दिले, छोटूला टाटा केला तेवढ्यात गुप्तानी मसाला पुरी पुढे केली.
हो म्हणजे चाटनंतरची कडक पुरीवर बटाटा, मसाला आणि शेव टाकलेली फ्री पुरी हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.
कोलकात्यात अशी फ्री पुरी देतात का?
मला उगीचच सेंटी वाटलं,
मी पुरी तोंडात कोंबली... 
... 
... 
... 
तितक्यात केशूभाई आणि मदन्या बुलेटवरून फुदफुदत आले.

दोघांची नजर बघून मला चर्र झालं.
केशूभाई सरळ माझ्याकडे आला,
"तुझा फोन लागत नाय."
(मी सिम फेकून नवीन घेतलं होतं.)
"बॅटरी ऑफ आहे केशूभाई."
केशूभाईनी दोन क्षण रोखून बघितलं...
बुलेट साईडला लावली...
आणि अंगावर धावला... गुप्ताच्या.
त्यानं फाडकन गुप्ताच्या कानफडात मारली.
पाठून मदन्यानी त्याचा पाण्याचा मटका उचलून खाली आपटला.
रस्त्यावर तिखट शेवाळी पाणी पसरत गेलं.


गुप्ता हेलपांडत होता.
पोरगा मात्र त्याच्या पायाला चिकटूनच होता.

मला कळेनाच क्षणभर की गुप्ताला का मारतायत ते... सालस माणूस होता तो.

मी मदन्याला ढकलून दिलं आणि केशूभाईला आवरायची धडपड करायला लागलो...

"जाऊ दे ना केशूभाय, काय झालं?"

"अरे माध्या मार भेंचोत...
हे भय्या लोक...
तिकडे ठाण्यात एक भय्या पाणीपुरीच्या मटक्यात मुततोय, बघितला नाय काय व्हिडीओ व्हाट्सअप वर...
यांना सगळ्यांना सरळ केला पायजे... #$$%"

मला केशूभाई आवरत नव्हता.
खरंतर तिकडे ठाण्यात कोणीतरी कायतरी केलं म्हणून इकडे बिचाऱ्या गुप्ताला मारण्यातलं लॉजिक काय कळत नव्हतं,
पण आपण सगळेच दिवसेंदिवस जास्तच येड्या गांडीचे होत चाललो होतो...

तितक्यात मदन्यानं कुठूनतरी एक प्लास्टिकची बाटली काढली... आतमध्ये सोनेरी पिवळट लिक्विड हिंदकळत होतं.
मला काही कळायच्या आतच त्यानं ती बाटली गुप्ताच्या तोंडात खुपसली...
"पी मूत आयघाल्या"
खदाखदा हसत होता मदन्या...
गुप्ता घाबराघुबरा होत ठसकला!

मी केशूभाईला सोडून गुप्ताकडे धावलो...
मदन्यानं तेवढ्यात पोराला खस्स्कन ओढला आणि त्याच्या तोंडात तो बाटली खुपसणार...
इतक्यात मी मदन्याच्या बरगडीत एक लाथ घातली...
तो हेलपांडून खाली पडला!
माझ्या डोक्यात बऱ्याच दिवसांनी रागाचा एक दाट लालसर ढग तयार होत होता...
असा ढग तयार झाला की खूप शांत वाटायचं मला... शांत आणि तल्लख आणि फाष्ट.
पुढच्याच २० सेकंदात मी खाली पडलेल्या मदन्याला पार फोडून टाकला.
त्याच्या चेहेऱ्याच्या जागी रक्तामांसाचा चिखल राह्यला होता फक्त!

हळूहळू माझा राग ओसरला आणि मग मला कळलं काय लोचा करून ठेवला होता मी ते.
जायच्या आधी ह्या लफड्यात पडायलाच नको पायजेल होतं... पण गुप्ताच्या पोराचे ते मोठ्ठे डोळे नाचत राह्यले असते डोक्यात मध्ये पडलो नसतो तर.

मी हळूच पाठी वळलो...
केशूभाई कोणाशीतरी फोनवर बोलत होता.
... पळून जावं का?
तीन तास काढून डायरेक्ट झिलिकला स्टेशनावर बोलावता येईल.
हळूहळू गर्दी जमायला लागली होती.
तेवढ्यात केशूभाई लगबगीनं जवळ आला.
"चल इकडून लवकर आधी... मदन्याला आपली पोरं उचलतील नंतर येऊन"
त्यानं बुलेट काढली.
मी नाईलाजानं पाठी बसलो.
इकडून लवकर छू होणं पण जरुरी होतं.
जाता जाता ते पोलीस-बिलिसचं लफडं मला नको होतं.
केंजळेसायबांनी सांभाळूनही घेतलं असतं पण वेळ गेला असता.
मला आता १० ची गाडी दिसत होती.
माझी घालमेल घालमेल.
कशाला ती पाणीपुरी खायला गेलो आणि झवती माकडं अंगावर घेतली असं वाटायला लागलं.

आमची बुलेट गोखलेनगरच्या चौकातून लेफ्ट मारून दीप बंगला चौकाकडे सुसाट चालली होती.
पण हा सगळा केशूभाईचा एरिया होता.
मला सेफ वाटेना.
मी हळूच आजूबाजूला बघायला लागलो.
कुठे काय दांडू-बिंडू दिसला तर सरळ केशूभाईच्या डोक्यात घालून बुलेट घेऊन पशार व्हायचं शिजायला लागलं... माझ्या डोक्यात.

दीप बंगला चौकात नेहेमीप्रमाणे गाड्यांचा कल्ला झालेला.
मला बाजूच्या भंगाराच्या हातगाडीवर रॉड दिसला एक.
मी हळूच तिकडे हात सरकवणार...
तितक्यात बाजूच्या बाइकवाल्यानं माझ्या डोक्यात फाडकन हेल्मेट मारलं आणि सगळा काळोख झाला.
...
...
...
  
मी हळूच डोळे किलकिले केले.
एका गाडीच्या आत होतो मी.
बहुतेक केशूभाईची वॅगन-आर
पुढे ड्रायव्हिंग सीटवर संत्या होता.
बाजूला केशूभाई.
मागे माझ्या बाजूला सनी.
हात गच्च बांधले होते माझे आणि डोकं घणघणत होतं.
सनीला कळलं मला शुद्ध आल्याचं... फाडकन माझ्या कानशिलात बसली.
ओठात खारट रक्त जमा झालं.

केशूभाईनी पाठी बघितलं आणि पाब्लो-बिब्लोसारखा टेरर लुक द्यायचा प्रयत्न केला.
मला तशाही स्थितीत हसू यायला लागलं.
अजून एक ठाप्पकन बसली मला.

केशूभाईनी माझ्यापुढे रिझर्वेशन नाचवलं हावरा एक्सप्रेसचं.
मला डोकं आपटून घ्यावंसं वाटायला लागलं.
तरी झिलू सांगत होती ऑनलाईन मेसेज आलाय त्या कागदाची काय जरूर नाय म्हणून.
पण मी आपलं सेफ्टी म्हणून खिशात ठेवला होता प्रिंट-आऊट.
तोच पडला असणार खिशातून, मघाशी मारामारीत.

"काय भावड्या आम्हाला न सांगता पळून चाललाय अचानक?
काय गेम काय्ये?
आमची काय टीप-बीप देतो का काय?
रिक्षा पण विकतायत म्हणे तुमच्या मिसेस?"

परत थाड-थाड दोन बसल्या.

माझा फोन केशूच्या ताब्यात होता आणि तो उघडायचा प्रयत्न करत होता.

मी हळूच बाहेर नजर टाकली रस्त्याचा अंदाज घ्यायचा प्रयत्न केला.
कुठेतरी भोर गावाचा बोर्ड ओझरता दिसला.

आणि माझी ट्यूब पेटली आम्ही वरंधा घाटातल्या केशूच्या फार्म-हाऊस वर चाललो होतो.
म्हणजे मी जवळ जवळ दोन-अडीच तास आऊट होतो.
किती वाजले असतील साडे-नऊ दहा?
ट्रेन गेली असेल.
दोनतीनदा वाजलासुद्धा फोन... झिलू असणार.
वाट बघून ती रडवेली झाली असेल.
मला लहान मुलासारखं मोठ्ठ्यानं भोकाड पसरावसं वाटलं.
केशूनी त्याची माणसं हाल हाल करून मारून टाकणार मला त्या निर्जन जागी.
कसलं कोलकाता नी कसलं काय. कुठून त्या गुप्ताच्या लफड्यात पडलो असं झालं मला.

मी गळून बघत राह्यलो काळ्या काचेतून बाहेर.
गाडी आता घाटात पोचली होती.
संत्याचं ड्रायव्हिंग म्हणजे सुसाट.
माझा खास दोस्त खरं तर संत्या... मीच लावलेला त्याला केशूकडे.
पण आज मला कापताना तो पाठी पुढे बघणार नाही याची गॅरंटी होती.

"पासवर्ड सांग रे भोसड्या", केशू खेकसला.

तितक्यात गाडीनं एक सफाईदार वळण घेतलं...आणि माझ्या पोटात गुरगुरलं.
खराब पोट विसरूनच गेलो होतो मी
का का का खाल्ली मी पाणीपुरी?....
मला फुस्सकन पादायला आलं...
ढुसकीचा गंध गाडीभर दरवळला...
दोन सेकन्दात सगळ्यांची नाकं वाकडी झाली.
"कोण रे तो आयघाल्या?"
केशूभाईनं शिव्या हासडत गाडीच्या काचा खाली केल्या,
रानटी चाफ्याचा घमघमाट आत आला... 
घाटात कुठेतरी फुलला असणार...
संत्या ठसाठस शिंकायला लागला... हो लहानपणापासून त्याला चाफ्याची ऍलर्जी होती.
एक सेकंद त्याचं लक्ष ढळलं...
समोर शार्प टर्न आला...
आणि मी जीव खाऊन हॅन्डब्रेक खेचला.

गाडी गर्र्कन फिरली आणि कठडा सोडून खाली उतरली.
पंधरा-वीस फूट खाली रस्त्याला लागूनच थोडं पठार होतं गाडीनं तिथं पहिली कोलांटी मारली आणि मी दरवाज्यातून बाहेर फेकलो गेलो.
कशावर तरी थाड्कन डोकं आपटलं माझं.
गाडीनं तशीच दुसरी कोलांटी मारली आणि गाडी पठार सोडून खालच्या खोल दरीत गेली

एक पाच सेकंदांनंतर ढूमक्कन स्फोटाचा आवाज आला.
जाळाचा प्रकाश वरपर्यंत आला आणि त्या क्षणमात्र प्रकाशात मला दोन गोष्टी धूसर दिसल्या:
एक म्हणजे माझा फोन.
केशूच्या हातातून उडाला असणार बहुतेक गाडी पलटली तेव्हा.
आणि... दुसरं...
...
...
...
मी पुन्हा बेशुद्ध झालो...
पुन्हा शुद्धीवर आलो...
बाजूला कुठेतरी माझा फोन वाजत होता.
मी डोळे उघडून शोधला
पण किर्र अंधार होता.
फोन एकसारखा टिरटिरत होता.
लाईट खरं तर दिसायला हवा होता फोनचा पण कायतरीच गच्च अंधार होता.
मी कसातरी अंदाजानी शोधून फोन घेतला...
फोन वाजत होता पण मला कॉल घ्यायचं बटण दिसेचना च्यायची...
आणि तेव्हा माझी ट्यूब पेटली मला दिसायचं बंद झालं होतं!

मी अंदाजाने स्वाईप मारलं आणि फोन कट झाला.
पुन्हा आला...
आता उलटीकडे स्वाईप केलं.
लागला... नशीब!
झिलिकचाच फोन होता.
मला शोधून शोधून भैसाटली होती ती.
तिला कसंबसं शांत केलं,
गाडी उलटायच्या आधी मी "न्हिवे" ५ कि. मी. चा दगड बघितला होता ते तिला समजावून सांगितलं.
तिनी लगेच रिक्षा काढली हो म्हणजे पुण्यात "सखी-रिक्षा" चालवायची ती...
आणि मग स्वतःशीच हसत-रडत डोळ्यापुढची काळीशार शाई बघत शांतपणे पडून राह्यलो.

आज तीस वर्षं झाली या सगळ्या गोष्टीला...

कोलकात्यात कधीच कुणालाच माझी बॅक-ष्टोरी नाय सांगितली...
पण आज "ऑनलाईन ब्रेल पुणे टाइम्स"मध्ये बातमी वाचली मदन्याविषयीची आणि हे सगळं कुणालातरी सांगावंसं वाटलं.

त्यावेळी आमदारबाईंना शिक्षा झालीच माझ्या क्लिपच्या पुराव्यावर
केशूभाई मेलाच जळून त्या कारच्या स्फोटात.
मदन्या मात्र सुटला संभाषणात त्याचं नाव स्पष्ट नव्हतं म्हणे.
मग काय मेलेल्या केशूभाईची जागा मदन्यानं लगेच घेतली. 
मदन्या एवढा मोठा होईल वाटलं नव्हतं पण आपल्याकडे जात-जमात-धर्म-प्रदेशाच्या नावावर मोठं होणं तसंही कुठं अवघड आहे म्हणा. 

पण आजची बातमी वाचून जीवाला बरं वाटलं...   

काय म्हणालात?
मला स्फोटाच्या प्रकाशात दोन गोष्टी दिसल्या आणि मी एकच सांगितली? (माझा फोन)
हा बघा खरा सुज्ञ वाचक वगैरे. मानलं राव तुम्हाला -/\-

हां तर झिलिक दोन तासांनी पहाटे मला घ्यायला आली तेव्हा मला (डोळे जाण्याआधी) दिसलेली दुसरी गोष्ट आम्ही रिक्षात टाकली... 
ती म्हणजे अडीच करोड रुपये भरलेली पैशाची बॅग. 
ते नोटबंदीचे दिवस होते आणि केशूनी कुठूनतरी जुन्या नोटा बदलून आणली असणार ती कॅश. 
पहाटेच्या गाडीनी आम्ही डायरेक कोलकाता!

आणि कोलकाता तशी फार स्वस्त सिटी आहे बरं का!

अडीच करोड + दीड लाख रुपये आम्हाला आरामात पुरले,
बुर्जीपावची गाडी टाकायला... 
माझ्या पोराला, नयन त्याचं नाव, शिकून मोठ्ठा डोळ्यांचा डॉक्टर बनवायला... 
दुसऱ्या एका अनाथ पोराचा शिक्षणाचा खर्च उचलायला... 
वगैरे वगैरे... 

आणि आता तर नयननी हौस म्हणून हॉटेल पण टाकलंय... 
काय बरं त्याचं नाव... 
हां आठवलं... 


-नील आर्ते


    
   





































 


















            

2 comments: