Tuesday, 26 November 2019

मुंबई कोलाज: बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!

झालं असं की मी माझ्या फायनॅन्शियल ऍडव्हायझरला एक बारीक शंका विचारायला फोन केला.
(हे असं बोललं की आपण करोडोंत खेळत असल्याचा फील येतो... असो)

तर हा मनुक्ष अस्सल मुंबईकर.
एका बाबांचा निस्सीम भक्त.
बाबांना जाऊन काही वर्षं झालेली वगैरे.
त्याच बाबांचा अवतार 2.0 मुंबईत येणार असल्याने हा सध्या प्रचंड एक्सायटेड!

आणि त्याची चूक-बरोबर श्रद्धा ह्या पोस्टचा मुद्दा नाहीयेच...
मुद्दा वेगळाच हय!

तो त्याच्या चेंबूरी-सिंधी-चटपटीत बंबैय्या हिंदीत बोलला,
"निलेश भाय थोडा बिझी हूँ दो दिन
xxxxxx बॉम्बे आ रहे है
बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!"

अयाई गं...
मुंबईचा आख्खा धेडगुजरी फ्लेवर शब्दोशब्दी ठासून भरलाय ह्या वाक्यात!

गुगल ड्राइव्हमध्ये खोल खोल कुठेतरी लपून ठेवलेला एक्सचा टॉपलेस फोटो अवचित समोर यावा
आणि छातीत एक आठवणीची बारीक कळ उमटावी...
तसा "मिसिंग मुंबई"चा बारीक ऍटॅक आला मला...

एक एक शब्द नीट बघूया जरा यातला.

उसका:
मुंबईकर तसंही "आपके" / "उनके" वगैरे आदरार्थी भाव कोणालाच देत नाहीत.
अगदी "उसके"ही नाही!
"उसका"तला शेवटचा आकार हा खास मुंबईचाच.
उदाहरणार्थ:
"उसके गाडीमे जायेंगे" म्हणा
आणि आता...
"अरे सेजल उसका गाडीमे जायेंगा ना" म्हणा
दुसऱ्या वाक्यात खाट्टकन् तो...
शनिवारी रात्री तीन मुलं आणि दोन मुली छान तयार होऊन, कल्याण / वाशी किंवा मिरारोडवरून, वडलांच्या मिनतवाऱ्या करून घेतलेली वॅगन-आर घेऊन मरीन ड्राइव्हला जाण्याचा फील आपोआप येतोना...
तो "उनके" किंवा "उसका"मध्ये नाहीना येऊ शकत बॉस!

बॉडीमे:
हा शब्द तर स्पीक्स फॉर इटसेल्फ!
"माझी चोर-बॉडी आहे रे चुत्या!"
हे वाक्य छातीच्या फासळ्या दाखवत म्हणणारा एकतरी किडकिडीत पत्र्या पोरगा प्रत्येक नाक्यावर असतो.
आणि मजा म्हणजे सम हाऊ हा चोर-बॉडीवाला बारक्या हटकून मारामारीत पुढे असतो.
सिंगल फासळी आणि डेअरींगचं कायतरी अजब कनेक्शन आहे कसं कोण जाणे.

घुस:
सकाळची विरार-चर्चगेट लोकल आणि वसई स्टेशन... पिरियड!

गयेला:
हे आयेला / गयेला चा तर मुंबईला कॉपीराईट घेता यावा आरामात.
मुंबईची टपोरी लँग्वेज दाखवण्यासाठी लाखो पिक्चर्सनी क्लिशेड केलेलं.
पण बऱ्याच दिवसांनी ऐकलं...
आणि काही क्लिशेड गोष्टींना:
उदारणार्थ नवाजुद्दीनच्या शिव्या, मरीन ड्राइव्ह, अजय-अतुलच्या ढोल यांना पर्याय नाही हे पटलंच.

हय्:
इकडे सगळा गेम त्या एंडच्या पाय मोडक्या "य्" वर आहे.
म्हणजे तुम्ही "बाबा उसका बॉडीमे घुस गयेला..." बोलून शुद्ध "है" बोललात तर ते पाया सूप, सीख पराठा, मटन बिर्याणी खाऊन नंतर पियुष मागवण्यासारखं आहे.
सो "हय्"च 

...
...
...

बाबा उसका बॉडीमे घुस गयेला हय्!

मुंबुड्या आय लव्ह यु SSS!!!


-नील आर्ते


  







2 comments:

  1. बरेच दिवसांनी मुंबई कोलाज लिहिलंस. 

    तुम लिखते रहो हं वाचते हय 

    ReplyDelete