Wednesday, 21 September 2011

मुंबई कोलाज : दादर वेस्ट

 यडीअल बुक डेपो, पुस्तकांचा कोरा करकरीत आणि बाजूच्या मुतारीचा मिश्र वास,
फास्टर फेणेची अशक्य सुंदर पुस्तकं.
उभा वडा, छबिलदासची खोल खोल आणि कधी कधी बाउन्सर जाणारी नाटकं, धुरू हॉलमध्ये अनोळखी लग्नात घुसून हादडलेल जेवण.
प्लाझाचा लाफिंग बुद्ध, आणि टिळक ब्रिज वरचा पहाटेचा भाजी बाजार.
गोमंतकच्या बाहेरची ला SSSSSSS म्ब रांग, खांडके बिल्डींगमध्ये मावशीकडे खाल्लेला लालचुटुक मटणाचा रस्सा.

 लक्ष्मी कंगन कॉर्नर जवळ कशावरून तरी आई-बाबांचं झालेले मोठ्ठ भांडण आणि आता ते 'घफस्टोट' घेणार अशी उगीचच वाटलेली अल्लड भीती.
पाणेरी, सोनेरी, काचेरी, भंबेरी  ..अशी काय काय साड्यांची दुकानं आणि प्रदीप स्टोअरच्या बाहेरचा रफुवाला.
शिवाजी मंदिरातला तिसऱ्या घंटेनंतरचा गर्भ काळा अंधार आणि बाबांबरोबर परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहिलेलं "कलम ३०२". 
छत्र्यांचे जगप्रसिद्ध डॉक्टर, कबुतर खाना आणि अतिरेक्यांच्या %#$% चा परत %^$%@.

 गणपतीत चालू होणारी आणि दिवाळीची वर्दी आणणारी व्यापारी पेठ, रानडे रोड वरचा दिवाळीच्या आदल्या दिवशीचा केऑस, आणि अ‍ॅडॅक्समधली आयुष्यातली पहिली इलॅस्टिकची फुल पॅन्ट.

......तुम्हाला काय वाटलं शिवाजी पार्क विसरलो ना ?? NO F#$%@G WAY! 
खास शिवाजी पार्कचा वेगळा कोलाज याच ठिकाणी याच वेळी उद्या :)


2 comments:

  1. दादर वेस्टात ती लाडू सम्राटाची दुकानं होती माहिते?? किंवा असतील अजूनही...मला लहानपणी वाटायचं कडक बुंदीचे लाडू अक्ख्या जगात फक्त छबीलदासच्या गल्लीपासून पुढेच मिळतात...:)

    ReplyDelete
  2. अपर्णा, लाडू सम्राट अजूनही आहे !
    आणि छेडाकडची ब्रोकन बिस्किट्स आठवतात का ? त्यातली मी फक्त बॉरबॉन वेचून खायचो

    ReplyDelete