Friday, 13 July 2012

बडबड कासव आणि त्याचं मुक्त चिंतन

साहिलचे भित्रे डोळे आळीपाळीने तिघांवरून फिरत होते.
एक प्रचंड आडमाप देहाचा होता. 
दुसरा उंच पण शिडशिडीत होता.
तिसरी मुलगी होती.
एखाद्या शाळकरी मुलीएवढ्या लहान चणीची...पण हत्यारे प्रचंड सराईतपणे हाताळत होती.  

त्या तिघांमधला कॉमन फॅक्टर होता त्यांची मुखवट्याआडची थंड निर्विकार नजर.
आयुष्यभर रक्त-वेदना बघितलेली, टार्गेटसाठी काहीही करायची तयारी असलेली भावनाहीन नजर!

साहिलचे हात खुर्चीला बांधलेले होते आणि सुटका अशक्य होती.
शेवटी त्याचा बांध फुटला आणि तो भडाभडा बोलायला लागला:

"मला मरायचं नाही हो.प्लीज मला मारू नका, वाचवा मला प्लीज...प्लीज सर!
मला नं साल्सा करायचाय खूप छान, 
साला मी खूप खराब नाचतो हो, क्लासमध्ये सगळ्यात स्लो...पण शिकेन मी. माझा हातांनी मुलीला द्यायचा लीड पण इम्प्रूव करेन मी.
जिया म्हणते ,'यु हॅव झिरो लीड'...पण मी काय करू हो...ती खरं तर माझी मैत्रीण...
मला खूप आवडते, मीच तिला साल्सा क्लास मध्ये आणली पण छान नाचणाऱ्या रिषभचीच ती पार्टनर झाली आणि तिने त्याला प्रपोजच केलं.
दोघांनी आनंदाने येऊन मलाच पहिलं सांगितलं खास मित्र म्हणून...जीव तुटला हो माझा!
पण देव त्यांना सुखात ठेवो मला फक्त चांगलं साल्सा करायला शिकायचंय. 
डान्स फ्लोअर वर एका छान मुलीला नाचवायचं, फिरवायचं, लिफ्ट्स आणि ड्रॉप्स करायचे ...
त्याच्या आधी मी नाही हो मरू शकत मला मारू नका प्लीज!
अजून तर खूप काही बाकी आहे आयुष्यात...
मला मस्त शिट्टी वाजवायला शिकायचंय...तोंडात दोन बोट घालून सगळ्यांचे कान वाजवणारी सणसणीत शिट्टी!
आणि उंच पतंग बदवायला शिकायचंय...लहानपणी राहूनच गेलं हो!
आणि मुक्यांची साईन  लँग्वेज शिकायचीय...ते बोलतात ना झपाझप हातवारे करून तेव्हा त्यांचा सगळा चेहेरा उजळतो.
मला त्यांना साईन लँग्वेज मध्ये फिजिक्स शिकवायचंय...
मी  एम एस सी फिजिक्स आहे हो....फिजिक्स खूप आवडतं मला आणि खास करून त्यातलं 
'हायझेनबर्ग'चं 'अन-सर्टनिटी प्रिन्सिपल': 
'कोणत्याही गोष्टीची जागा आणि वेळ दोन्ही एका मर्यादे पर्यंतच निश्चित करू शकतो .आपण जागा परफेक्ट करायला गेलो तर वेळेतली चूक प्रचंड वाढते आणि वेळ पक्की केली तर जागेतली'         

आपलं लाईफ पण असंच असतं सालं,
करीअर छान करावं तर रिलेशनशिप्स सफर होतात आणि नुसतं प्रेमच करत बसलं तर करिअरचा भोसडा होतो.

तरी पण प्रेम करायचंय हो मला ती पण एक इच्छा आहे.
एक अशी मुलगी, अशी बायको कि जिच्या बरोबर मी मस्त म्हातारा होईन आणि आम्ही एकत्र राहू...चुकत माकत, हसत खेळत, भांडत आणि एकमेकांची टेर खेचत."

आणि तो खदा खदा हसता हसता ढसा ढसा रडू लागला !त्या तिघांनी हत्यारे खाली ठेवली...त्यांचं काम जवळ जवळ संपल्यातच जमा होतं.
साहिलच्या डोक्याला सिस्टर मरियमने सराईत हातांनी बँडेज बांधून टाकलं.

डॉक्टर पर्बतने  आपल्या आडमाप देहाला आणि नावाला न शोभणार्या मृदुपणे साहिलचा हात हातात घेतला आणि ते म्हणाले,
'यंग मॅन आपली भारतातली पहिली "अवेक ब्रेन सर्जरी" पूर्ण झालीय.
पूर्ण सर्जरी मध्ये बडबडत राहून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल थॅन्क्स...
तुझा ब्रेन ट्युमर आपण काढून टाकलाय आणि थिंग्स आर लुकिंग रिअल गुड!

बाय द वे हे आपले लंबू डॉक्टर मिलन झकास पतंग उडवतात...कधी रविवारी ये तुला शिकवतील ते..आणि शिट्टी तर मी पण सरस वाजवतो पण हॉस्पिटलमध्ये नको...तुला मी बाहेर शिकवीन.
हि सिस्टर मरियम तर सर्टिफाईड साल्सा ट्रेनर आहे ती तुला लीड्स शिकवू शकेल.
आणि साईन लँग्वेज चे वर्ग तर आपल्याच हॉस्पिटल मध्ये दर शनिवारी दुपारी भरतात.
राहता राहिलं तुला झकास बायको शोधण्याचं काम...ते मात्र तुलाच करावं लागेल...गुड लक :)'

--------------------------
ता. क. या गोष्टीला टाईम्स   ऑफ इंडियातल्या एका बातमीचा आधार आहे 
एका रुग्णाचा ब्रेन ट्युमर काढताना पूर्ण वेळ तो डॉक्टरांशी गप्पा मारत होता.
डॉक्टर हे करतात कारण त्यांना समजावं लागतं की नक्की केवढा भाग ते कापू शकतात..रुग्णाच्या बोलण्यात अडखळ आली की लगेच धोक्याचा इशारा समजून ते थांबतात.
-नील आर्ते13 comments:

 1. जब्बरदस्त भावा....

  ReplyDelete
 2. भ न्ना ट......खरं तर कथा म्हणून ठेवणार होते पण ती तळटीप लिहिलीयस त्याने वाचावंसं वाटलं....मस्त रे.....
  अप्रतिम...
  रच्याकने, लहान मुलांची पण एक साइन लॅंग्वेज असते...तुला गरज पडेल तेव्हा कळव...मी नक्की शिकवेन...... ;)

  ReplyDelete
  Replies
  1. आभार हेरंब / पर्णा :
   निंदकाचे घर असावे शेजारी आणि "प्रशन्सकाचे यु. एस. मध्ये"
   हे तुम्हा दोघांना लागू ;)

   Delete
 3. खऱ्याखुऱ्या आयुष्यात भन्नाट कथा रोज घडत असतात...त्या रचणाऱ्याच्या कल्पनाशक्तीची कमाल वाटावी.
  एखाद्या चित्रपटातील दृश्य बघतोय असे वाटले. :)

  ReplyDelete
  Replies
  1. This comment has been removed by the author.

   Delete
  2. <<<<<<<<
   चित्रपटातील दृश्य बघतोय असे वाटले
   <<<<<<<<<<

   खरं सांगू का एकतरी इंसेप्शन,सिक्स्थ-सेन्स,युजुअल सस्पेक्टस,देल्ली बेली,कमीने,गैर,स्नॅच सारखी कडक कथा लिहीण माझ्या मरण्यापूर्वी करायच्या बकेट लिस्ट मध्ये फार पूर्वीपासून आहे :)

   प्रे फॉर मी !!!

   Delete
 4. भन्नाट रे कन्सेप्ट!
  आवडेश...

  ReplyDelete
  Replies
  1. thank you राजा !

   -"निलेश" ;)

   Delete
 5. कालपासूनच तुमचा ब्लॉग वाचायला लागलोय...सगळ्या कथा जबरदस्त आहेत...कथा कादंबरी सिनेमा यात मला आवडणारा प्रकार म्हणजे सुरवाती पासूनची घडी विस्कटून टाकणारा शेवटचा twist...तुमच्या बर्याच लिखाणात तो आहे .... मजा येतेय वाचायला :) आणि twist नसलेलं बाकीचं लिखाण हि खूप वाचनीय आहेच...thanks for your interesting writing !!!!

  ReplyDelete
  Replies
  1. हर्षल,
   खूप खूप आभार :)
   मला स्वत:ला सुद्धा twist endings आवडतातच…
   6 the Sense, Usual Suspects, Sherlock Holmes इ. इ.
   बाकी बोलत राहूच!

   Delete