Friday, 29 November 2013

झगार्ड ३:

 त्यानं झटपट लॉग ऑफ केलं आणि तो निघाला. फक्त सहा वाजले होते. संध्याकाळचा गुलाबी प्रकाश हळूहळू जांभळा होत होता पण रस्त्यावर अजून बऱ्यापैकी उजेड होता. आज चक्क दिवसाउजेडी तो कामावरून सुटला होता.
धिस वॉज अ मोमेंट टु बी चेरीश्ड! तो समोरच्या मावशीच्या गाडीवर गेला आणि त्यानं स्टीलच्या ग्लासातनं पाणी घेऊन ती सोनेरी कॅप्सुल गिळून टाकली!
'मावशी एक वडा पाव आणि कटिंग द्या… थांबा वडे गरम काढताय ना दोन्ही एकदमच द्या मग!'

मावशींनी एक हिरवट पांढरा गोळा घेतला त्याला चण्याच्या पातळ पिठाची "शंभो" केली आणि तो अलगद कढईत सोडला… मग दुसरा… मग तिसरा… ….
ते चुर्र चुर्र करत, मस्तीखोर पोरांसारखे एकमेकांना इकडे तिकडे ढकलत कढईत सेटल झाले!
त्यांच्या आजूबाजूला ते फुर्र फुर्र करणारे तेलाचे बुडबुडे!
हळूहळू ते पिवळे गोळे सोनेरी झाले… मग मावशींनी अलगद तेल निथळलं आणि त्या सगळ्यांना एक पलटी दिली!
मग बस्स दोनच मिनटांत ते थाळीत पडले.
त्यानं त्याचा वडा कढईत  असतानाच हेरून ठेवला होता... चार वेडीवाकडी कुरकुरीत नाकं फुटलेला मॉडर्न-आर्ट  मधल्या चेहेऱ्यासारखा तो वडा! त्यानं त्याच्यावर बोट ठेवलं आणि मावशीनं हसून मान डोलावली.
तिची पातळ सुरी पावामधून हलेकच फिरली आणि पावाचे बुडाशी जोडलेले दोन भाग झाले, आधी चिंच-गुळाची गोड चटणी मग हिरवी ओली चटणी आणि वर भुरभूरवलेलं लाल तिखट!
पर्रर्र्रफेक्ट त्याला हवं तितकच कमी नाही की जास्त नाही…
मग कुरकुर नाकवाले वडेबुवा अलगद पावात घुसले!
मावशीनं तो वडापाव त्याला हॅन्डओव्हर करता करताच निन्जाच्या चपळाईनं दुसऱ्या हातानं कटिंग ओतली!
तिही त्यानं ताब्यात घेतली आणि एक दिलखुष नजर सभोवार फिरवली…
संध्याकाळची वेळ, लोकांची लगबग, समोरून चाललेल्या सिम्बायोसिसच्या दोन छान मुली… सगळं त्यानं डोळ्यात भरून घेतलं आणि वडापावचा एक लचका तोडला; तोंड थोडं उघडंच ठेवून त्यानं बटाट्याची वाफ बाहेर जाऊ दिली आणि मग गरमपणाचा अंदाज घेत हलकेच तो घास चावला… एका कुरकुरीत नाकासकट!
तोंडात घास न गिळता तसाच ठेवत त्यानं कटिंगचा घोट मारला आणि आलंवाला तो कमी गोड चहा घासाच्या आसपास आणि आत पसरला!
'हेवन जस्ट हेवन!'
त्याच्या डोक्यावरचा लाल दिवा लुकलुकू लागला आणि तो स्टूलावर बसत स्तब्ध झाला.

क्रमश:

3 comments:

 1. Hats off to Observation and description is just out of the BOX!!! :)

  Zakaaaaas!!!

  ReplyDelete
  Replies
  1. Abhars Santosh,
   May be its my own way of clicking mental pictures :)

   Delete
 2. " आणि वडापावचा एक लचका तोडला; तोंड थोडं उघडंच ठेवून त्यानं बटाट्याची वाफ बाहेर जाऊ दिली आणि मग गरमपणाचा अंदाज घेत हलकेच तो घास चावला… एका कुरकुरीत नाकासकट!
  तोंडात घास न गिळता तसाच ठेवत त्यानं कटिंगचा घोट मारला आणि आलंवाला तो कमी गोड चहा घासाच्या आसपास आणि आत पसरला!
  'हेवन जस्ट हेवन!'"

  jiyo!

  ReplyDelete