Monday, 2 December 2013

झगार्ड ४:

 देशपांडेनी दबकतच झगार्डच्या टुमदार बैठ्या ऑफिसात प्रवेश केला.
समोरच एक चटपटीत रिसेप्शनिस्ट बसली होती, तिनं एक दिलखुष स्माईल देशपांडेंकडे फेकलं आणि विचारलं, 'सरांना भेटायचं ना झगार्ड पॅकेजसाठी? दोन मिनटं बसा ना… सर येतीलच!"
समोरच खाउन टाकाव्याश्या वाटणाऱ्या कॅन्डी रेड रंगाचा सोफा होता. त्यात देशपांडे बसले आणि त्यांनी आजूबाजूला नजर फिरवली…छान प्रसन्न फील देत होतं ते ऑफिस!
सगळी सजावट एकदम 'क्लासी' होती. पण सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेत होती समोरच्या केबिनच्या दारावरची मोठ्ठी फ्रेम, तिच्यावर लिहिलं होतं:

"जीवनात ही घडी अशीच राहू दे... प्रीतीच्या फुलावरी वसंत नाचू दे"

'बाबांचं आवडतं गाणं होतं हे… कोणता बरं पिक्चर???' देशपांडे स्मरण शक्तीला ताण देऊ लागले,

"पिक्चर 'कामापुरता मामा' गीतकार-संगीतकार यशवंत देव आणि गायिका लता मंगेशकर",
बाजूला अलगद येउन उभा राहिलेला तो माणूस बोलला!
देशपांडे थोडे दचकलेच!
''रिलॅक्स सर… मी जोमन शेणॉय… ह्या आमच्या छोट्याश्या कंपनीचा, झगार्डचा ओनर कम सी. इ. ओ.!", तो मिस्कील हसत बोलला.
मस्त माणूस होता तो… छोटूसाच पण रेखीव, लहान मुलासारखे लुकलुक डोळे असलेला, त्यात त्यानं थेट साल्वादोर दालीसारख्या अक्कडबाज मिशा ठेवल्या होत्या… त्यामुळे तो थोडासा ती अ‍ॅडमधली ती मोठ्या माणसाचा वेष केलेली मुलं असतात ना तसा दिसत होता.

'या ना सर आपण माझ्या केबिनमध्ये बसून बोलू आरामात', दोघं त्याच्या केबिनमध्ये शिरले.
"बसा नं सर आरामात, आधी मी तुम्हाला एक छोटंसं ब्रीफिंग देतो, आमच्या कंपनीची बॅकग्राउन्ड आणि कामाची पध्दत तुम्हाला सांगतो… कसं आहे ना क्लायेंटला विश्वासात घेणं कधीही उत्तम काय?

तर साधारण पन्नास वर्षांपूर्वी एकूण लोकसंख्येच्या काही टक्के लोक सायको-अ‍ॅक्टिव्ह ड्रग्ज घ्यायचे: कोकेन, क्रिस्टल मेथ, एल. एस. डी. वगैरे… त्यातल्या बऱ्याच लोकांना नशेत असताना वेळ मंदावल्यासारखा वाटायचा
उदाहरणार्थ फक्त शू ला जाऊन यायला तासभर लागायचा किंवा पार्टीची रात्र तीन चार दिवस सलग चालल्यासारखी वाटायची…किंवा नशा न करणाऱ्या लोकांनासुद्धा कधी कधी स्वप्नात खूप वेळ गेल्यासारखा वाटतोच ना पण डुलकी फक्त तासभराची लागलेली असते!
थोडक्यात काय तर घड्याळ वगैरे ठीक आहे पण घड्याळ नसताना माझं 'झटकन' आणि तुमचं 'झटकन' वेगवेगळं असू शकतं. हे शास्त्रज्ञांना बरच आधी कळलं होतं.
पण कोणती रसायनं आपल्या मेंदूच्या काळ मापण्याच्या प्रणालीवर किती आणि कसा परिणाम करतात याचा अचूक अंदाज यायला शास्त्रज्ञांना २०३० साल उजाडावं लागलं!
आणि याचाच रिझल्ट म्हणजे आमची खास पेटंटेड…" , इथं जोमननं एक नाटकी पॉज घेतला,
 "जीवनात ही घडी अशीच राहू दे उर्फ जे. एच. जी. ए. आर. डी. उर्फ झगार्ड ट्रीटमेंट!"

जोमनचे लुकलुक डोळे अजूनच चमकायला लागले होते,
"म्हणजे आपल्या ताणतणाव कटकटीच्या आयुष्यात आनंदानं थुइथुइ करणारे म्हणा, निवांत म्हणा किंवा तृप्त करणारे म्हणा क्षण फार कमीच असतात, आणि आपल्यातल्या प्रत्येकाला कधी ना कधी वाटून गेलेलं असतं की हाच क्षण अमर होऊन जावा… काहीच नसावं याच्या मागे नी पुढे!"
म्हणजे आपल्या प्रिय व्यक्तीची मिठी, स्पर्धेत मिळालेलं मेडल, रॉक क्लाईम्बिंग करताना भरून आलेलं अ‍ॅड्रेनिलीन, ऑरगॅजमचा तो उत्कट क्षण किंवा वडापावच्या घासावरचा चहाचा तो गरम घोट… त्या क्षणातच रहाता आलं तर आपल्याला थोडा जास्त वेळ? म्हणजे तासभर? किंवा रात्रभर??
आणि नेमकी हीच सर्व्हिस पुरवतो आम्ही ती सुद्धा ड्रग्जच्या दुष्परिणामांशिवाय."

जोमननं पुन्हा फिल्मी स्टाइलमध्ये मान तुकवली, "बोला तुम्हाला कोणतं पॅकेज देऊ?"

क्रमश:

9 comments:

 1. " "जीवनात ही घडी अशीच राहू दे उर्फ जे. एच. जी. ए. आर. डी. उर्फ झगार्ड ट्रीटमेंट!""

  You are bafflingly impossible, Nil!

  ReplyDelete
 2. "जीवनात ही घडी अशीच राहू दे उर्फ जे. एच. जी. ए. आर. डी. उर्फ झगार्ड ट्रीटमेंट"........
  आहाहा ........एकदम चुमेश्वरी कल्पना ...........

  ReplyDelete
  Replies
  1. :) Leena,
   >>>>
   चुमेश्वरी
   >>>>
   Someday somewhere I would like to borrow that word!

   Delete
  2. चालेल की….
   मी पण ढापलाच आहे ,कारण दुसरा apt शब्द सापडला नाही ;)

   Delete
 3. Kya baat hai???
  Waaaah Waaaah :)

  ReplyDelete