Saturday, 10 October 2015

रंगे-कान

फार फार दूरच्या गॅलक्सीवर एक आटपाट ग्रहावर एका चिमुकल्या राज्यात :

------------------------------------------------------------
वेळ:
नुकतीच नवे महाराज गादीवर आल्याची
स्थळ:
महाराजांचा खलबतखाना

प्रधानजी:
महाराज तुम्हाला काँग्रॅट्स हं सत्ता मिळाल्याबद्दल.

महाराज:
प्रधानजी तुम्हाला सुद्धा काँग्रॅट्स… खरं तर कोणी "काँग्रॅट्स" केलं की आम्हाला खिक्कन हसूच येतं
द्या टाळी!

प्रधानजी (तत्परतेनं टाळी देत):
हाहा महाराज तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे ना…

महाराज:
बरं भंकस पुरे आत्ता कामाला लागायला हवं.
मला सांगा आत्ता जनतेपुढे काय काय अडचणी आहेत?

प्रधानजी:
तशा बर्याच अडचणी आहेत… हजारो… कदाचित लाखोसुद्धा…
पण मला वाटतं आपण लो हॅन्गिंग फ्रुटपासून सुरुवात करावी.

महाराज:
म्हणजे?

प्रधानजी:
म्हणजे असं काय तरी की जनतेला वाटेल की आपण कार्य हे SSS  जोमदार चालू केलं पयल्या फटक्यात.

महाराज:
मग चालवा तुमचं सुपीक डोकं.

प्रधानजी:
एक कल्पना आहे तशी…
काय्ये ना आपल्या राज्यात तशा दोन-तीन प्रमुख टोळ्या आहेत.
आणि प्रत्येक टोळीचं चिंन्ह एक एक प्राणी आहे.
ती ती टोळी त्या त्या प्राण्याला भारी मानते.
पण दुसऱ्या टोळया मात्र बिंधास त्या पवित्र प्राण्याला मारून खातात नं काय.
म्हणजे आपल्या सार्वभौम राज्याच्या समता आणि बंधूभावाला धोकाच की हा.
तर मी काय म्हणतो हे जे जे पवित्र प्राणी उर्फ प.प्रा. आहेत ना त्यांना खाण्यावर आपण बंदी टाकूया.
म्हणजे सगळ्या टोळ्या खूष नं काय!

महाराज:
बेष्ट आयडिया… फिरवा द्वाही सगळीकडे!
------------------------------------------------------------दुसऱ्या दिवशी…

दवंडीवाला:
आजपासून अमलात आलेल्या प.प्रा. रक्षक कायद्यान्वये:
पोवळू टोळीचा प.प्रा. 'पोवळ्या',
आणि पाचू टोळीचा प.प्रा. 'पाचूडी',
आणि फुल्ली टोळीचा प.प्रा. 'फुल्लम'
यांना खाण्यास बंदी घालण्यात आलेली आहे हो SSSSS

तरी कोणाच्याही ताटात या प.प्रां.चे मांस आढळल्यास त्यांच्या ढुंगणावर चाबकाचे पाच सणसणीत फटके बसतील हो SSSSS
------------------------------------------------------------

एका आठवड्याने…

महाराज:
काय मग प्रधानजी प.प्रा. मांस बंदी कितपत हिट झालीय जनतेमध्ये?

प्रधानजी:
अहो महाराज सुपर हिट्ट एकदम!
तसे काही काही करंटे अजून चोरून खातायत प.प्रा. पण त्यावरही उपाय आहे माझ्याकडे.
अरे अज्जू इकडे ये…
महाराज हा माझा भाचा ज्युनियर सायन्टिस्ट आहे.
(कोपऱ्यात अंग चोरून उभा असलेला अज्जू हळूच पुढे येतो)
अज्जू सांग महाराजांना तुझी आयड्या!

अज्जू (अडखळत बोलू लागतो):
कसं आहे ना आम्ही या सगळ्या प.प्रां.च्या डी. एन. ए. बरोबर संयोग करणारी एन्झाइम्स शोधून काढलीयत.
आणि गम्मत म्हणजे ही एन्झाइम्स आपल्या कानाच्या मळातल्या फॅटी अ‍ॅसिड्सबरोबर क्रिया करून चक्क बायो-ल्युमिनिसन्स देतात

(महाराजांच्या चेहेऱ्यावर बाउन्सर गेल्याचे भाव)

प्रधानजी (अज्जूच्या डोक्यात टप्पल मारत):
अरे गधड्या जर सोप्पं करून सांग!

अज्जू:
सोप्प्या भाषेत सांगायचं तर आमची लस टोचल्यावर कोणी पोवळ्याचं मांस खाल्लं की एका तासात त्याचे कान भगवा प्रकाश फेकतील, पाचूडी खाल्ला तर हिरवा प्रकाश आणि फुल्लम खाल्ला तर निळा प्रकाश!

(महाराजांची ट्यूब हळूहळू पण लख्ख पेटते)

महाराज:
अच्छा म्हणजे अशा लोकांना आपल्याला रंगे-हात पकडता येईल…
वेट… रंगे-कान!
हाहाहाहा!
------------------------------------------------------------

एका आठवड्याने

महाराजांचा दरबार खच्चून भरलाय.
वेबकॅमद्वारे राज्यभर थेट प्रक्षेपण चालू आहे.

महाराज:
तर लोकहो राज्यातील सर्वाना 'रंगे-कान' लसी टोचून झाल्या आहेत अगदी आम्ही, प्रधानजी आणि सर्व दरबारी जनांसकट.
तुमच्या सहकार्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद…

इतक्यात भप्पकन लाईट जातात.
'च्यायची दरबारात पण लोड-शेडींग?'
कोण तरी पुटपूटतं…
दाट अंधार होतो पण सिंहासनावरून शेंदरी प्रकाश येत रहातो महाराजांच्या कानातून.
सेवक मेणबत्त्या पेटवतात.
त्या मिणमिणत्या प्रकाशात आधी सगळ्यांचे चेहेरे चकीत दिसतात आणि मग हिंस्त्र!
महाराजांना आपल्या कानांतून येणारा प्रकाश जाणवतो… त्यांचा चेहेरा भेदरलेला.

प्रधानजी कडाडतात:
काय हे महाराज, राजानेच कायदा मोडावा मग प्रजा काय करेल?
ह्या गुन्ह्याला तर देहांत प्रायश्चित पण कमी ठरेल!

महाराज:
अहो पण मी नाही खाल्लं मांस खरंच.
(प्रधानजी इशारा करतात आणि चार रक्षक महाराजांच्या दिशेनी सरकतात.)
मी तर सकाळ-संध्याकाळ पोवळ्याचं मूत्र पितो… पवित्र म्हणून!
वेट मूत्रामध्ये डी. एन. ए. असतो ना…  की नसतो?
असतो ना? सांग ना रे अज्जू?? म्हणूनच कानातून प्रकाश येतोय ना माझ्या???

अज्जू खांदे नॉन-कमिटल उडवत लब्बाड हसतो…
प्रधानजी अज्जूकडे बघून हलकेच डोळा मारतात…
आणि हलकेच बायकोचा मेसेज चेक करतात… "काँग्रॅट्स फ्युचर महाराज!"
हात पाय झाडणाऱ्या महाराजांना रक्षक पकडून आत नेतात…
त्यांच्या किंचाळ्या वाढत जातात…
आणि पडदा पडतो.


-नील आर्ते
5 comments:

 1. हम्म असे शाब्दिक फटकारे मारून काही फरक पडणार आहे का? तो विचार करतेय. काय रे आपण पुन्हा कुठल्या आदिम वगैरे काळात तर चाललो नाही न हळूहळू?

  ReplyDelete
  Replies
  1. आपल्या परीने आपण लढत रहायचं.
   विं. दां. नी म्हटलंच आहे ना,
   ऐका टापा! ऐका आवाज!
   लाल धूळ उडते आज
   त्याच्यामागून येईल स्वार
   या दगडावर लावील धार!
   इतके यश तुला रगड
   माझ्या मना बन दगड

   Delete