Tuesday 13 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १)

मी प्रचंड विनोदी हातवारे करत टॅक्सी थांबवली आणि पाऊस चुकवत आत घुसलो.
"भाय पासमे ही जानेका हय... स्टेशन."
मला गणेश मतकरीच्या कथेतलं वाक्य आठवलं,

'मुंबईच्या टॅक्सी रिक्षावाल्यांशी बोलताना तुमच्या आवाजातच काहीतरी असं असावं लागतं की नाही म्हणण्याची त्यांची हिंमतच होऊ नये.'... 
माझ्याकडे तरी तो आवाज नव्हता...
मग मी जगातली सगळी करुणा एकवटून ड्रायव्हरकडे बघितलं आणि "प्ली SSS झ" म्हटलं...
आणि फारशी आशा न बाळगता परत खाली उतरायची तयारी केली.
ओय!... पण चमत्कार झाला!
ड्रायव्हरनं चक्क मीटर टाकला...
मग गिअर टाकला...
आणि मला एक छानसं स्माईल दिलं.
येय!
चला अर्धी लढाई जिंकली आता शेवटची विरार ट्रेन जायच्या आत स्टेशनला पोचलो की जितं मया!

"थोडा मुष्कील है साब तीन मिनटमें स्टेशन पहुचना लेकिन ट्राय करेंगे इन्शाल्ला",
ड्रायव्हर मनातलं वाचल्यासारखं बोलला... आणि त्यानं स्पीड वाढवला...

कॅथलिक जिमखाना आणि तारापोरवाला मत्स्यालयाच्या मधली गल्ली डायरेक्ट चर्नी-रोड स्टेशनच्या पायऱ्यांना भिडते.
आणि तुम्हाला गल्लीच्या टोकावरूनच एक नंबर प्लॅटफॉर्मला ट्रेन लागलेली दिसते...
जशी मला आता दिसत होती...
ड्रायव्हरनं व्हॉवंकन टॅक्सी मारली आणि पुढच्या ५ सेकंदांत गाडी पायऱ्यांना भिडवली.
... 
पण तेवढ्यात ट्रेननं वेग घेतला आणि मला फिंगर देत ती सुटली. 
मी दोन कचकचीत शिव्या हासडल्या आणि दार उघडायला लागलो. 

"दो मिनट रुको साब... रहेता किदर है आप?

"मीरारोड!''

"चलो छोड देता हूं आपको... किदर रुकेगा आप स्टेशनपे रातभर. 
और बारिशभी याहूम हो रहेली है"

"ऐसा ही बारीश गिरा तो और दो घंटेमें रस्ता भी बंद होयेगा सब."

माझा मिडल-क्लास मेंदू चर्नी-रोड ते मीरारोड भाड्याचा हिशेब करायला लागला... 
रात्रीचं हाफ रिटर्न पकडून पंधराशेला बांबू आरामात... 

"अरे साब भाडे का टेन्शन मत लो खाली दहिसर का टोल भरना बस्स!"
पुढच्या क्षणाला त्या अरुंद गल्लीतून तो सफाईनं रिव्हर्स मारायला लागला होता... 

दोन सेकंद मी सगळं विसरलोच. 
कायतरी अजब ग्रेस होती त्याच्या रिव्हर्समध्ये!
नॉर्मली लोक रिव्हर्स घेताना थोडं पाठी... मग थोडा ब्रेक 
असं अडखळत जातात... 
पण याचा रिव्हर्स वेगळाच होता... 
सुईतून धागा ओवल्यासारखा... 
सिम्पल साधा कॉन्फिडन्ट.
मधली ड्रेनेजची झाकणं तो स्टेअरींगला सूक्ष्म वळसे देत सफाईनं चुकवत होता.
लिटरली पाच सेकंदांत आम्ही रिव्हर्स घेऊन परत मेन रोड वर आलो. 

मग परत मला तो काय बोलत होता ते आठवलं,
"अरे नही नही इतनी दूर फ्रीमे मत आओ आप!"

"अरे भाईजान चलो यार अपना मूड है आज गाडी चलाने का.", 
तो डोळे मिचकावत उत्तरला. 

मला केतकीचा रागीट चेहेरा आठवला आणि मग मीसुद्धा शरण गेलो. 
"नही नही आप थोडा तो भाडा लेना", मी क्षीण विरोध नोंदवला. 

"हांजी जो दिल करे दे देना... बस्स?",
ओठ मुरडत तो बेफिकीर हसला आणि हॉकीस्टिक सारखा पर्फेक्ट U टर्न मारत गाडी चौपाटीच्या बाजूनी धावायला लागली... उत्तरेकडे. 

मी थोडासा सेटल झालो आता गाडीत. 
मग सवयीनी सीट बेल्ट लावून टाकला. 
ड्रायव्हरनं तिरका लूक दिला आणि हलकेच म्हणाला, 
"अच्छी आदत है साब... बेल्ट लगाना चिय्ये"...
मिनटं, दोन मिनटं तो समोर बघून गाडी चालवत राहिला आणि अचानक त्यानं विचारलं,
"आप को भी गाडी चलाने आता हय क्या?"

कॉलेजच्या दिवसांत बाबांची  ऐपत नसताना हट्टाने घेतलेली सेकंडहॅंड ८००... 
गाडीनी रोज काढलेली इंजिनची कामं...   
गाडी विकून टाकल्यावर चालणाऱ्या सगळ्यांच्या कुजकट चेष्टा...
सगळं झप्पकन आठवलं मला आणि तोंडात कडू चव आली.

"चलाता था बहोत साल पैले... अभी जमाना हुआ गाडी हाथ मे लेके ", मी हळूच म्हणालो.
आणि ठसकत कसलातरी आनंद झाल्यासारखा विचित्र हसला तो.

टॅक्सी बिंग बिंग चालली होती.
बाहेर रोड लॅम्पचा पिवळट प्रकाश आणि कोसळणारा पाऊस.
कुठल्यातरी अघोरी शक्तीनं भरल्यासारखे वायपर्स रपारपा पाणी उडवत होते...
फक्त एक दशांश सेकन्दासाठी...
मग परत काचेवरून पाणी ओघळायचं आणि आकार विरघळायचे.
पुढच्या गाडीचा लाल टेललाईट... मिचमिचणारे रात्रीचे पिवळे सिग्नल्स... आणि एकता कपूरच्या सिरियल्सची होर्डिंग्स...
सगळं एकात एक मिसळून अ‍ॅब्स्ट्रॅक्ट चित्र तयार होत होतं.

"'एक बोलू साब?"
ड्रायव्हरसाहेब गप्पा छाटायच्या मूडात होते.
"भोत कम लोग ऐसा टॅक्सीमें आगे बैठता हय... ड्रायव्हरके बाजू...
नयतो लोग पीछे बैठता हय... वटमे सेठके माफीक."

"नही नही बॉस मेरेको आगेही अच्छा लगता है.... अकेला पीछे बैठनेको अजीब लगता है यार."

मला अचानक मानेला ढेकूण चावल्यासारखं वाटलं,
"भाई खटमल तो नही है गाडीमे?", मी घाबरून विचारलं.
हो म्हणजे केतकीच्या अशा अवस्थेत मी घरी ढेकूण नेले असते तर तिनी जीवच घेतला असता माझा.

"नही साब, आप बैठो आरामसे ", तो विचित्र हसत म्हणाला.

मी मग हळूच त्याला निरखून घेतलं,
चेहरा अंधूक कुठेतरी पाहिल्यासारखा वाटला मला, पण कुठे ते आठवेना.
बसलेली गालफडं... खुरटी चंदेरी दाढी... वेडेवाकडे कापलेले केस...
आणि ते मेलेल्या माशासारखे विझू-विझू डोळे.
त्याचं सीटवरचं पोश्चर कायतरी अजब होतं... म्हणजे सीट आणि त्याच्या पाठीत द्वैत असं नव्हतंच.
पूर्ण पाठ सीटला चिकटली होती आणि डोकं सुद्धा.
रामदास पाध्येंचा पुतळा सीटवर ठोकून बसवल्यासारखं वाटत होतं थोडंसं.
शिवाय सीटवर टॉवेल टाकलेले होते.
एक सीटच्या हेडरेस्टवर त्याचं डोकं भिडतं तिथे आणि दुसरा थोडा मोठा त्याच्या मांडीवर.
गाडीत कापूर आणि रक्ताचा संमिश्र वास पसरला होता आणि त्या करकरीत गोड वासानी थोडी गुंगी येत होती.

मी त्याला निरखत होतो आणि तो मात्र टॅक्सी चालवत होता....
मन लावून ग्रेसफुली.

अचानक त्याचे डोळे बारीक झाले...
समोर ऑइल सांडलं होतं आणि त्यावर स्किड होऊन एक बाइकवाला घसरत झपाट्याने रस्त्याच्या कडेला चालला होता... फुल्ल स्पीडमध्ये.

क्रमश:

2 comments: