Saturday, 16 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ४

१८ नोव्हेंबर

रात्रीचे बारा वाजून गेले होते. आकाशातून उल्का कोसळत होत्या. चमत्कारी बाबाने मोठा होम रचला होता. तोंडाने विचित्र मंत्र म्हणत तो घुमायला लागला.

- इकडे चक्रदेवनी गाडी काढली. आणखीन दोघांना प्रसाद देवून झाला होता. त्या मुलींना घेवून दादा शिर्के कुठे असेल याचा ठाव ठिकाणा लागला.

होमासमोर दादा शिर्के आणि त्याची पत्नी डोक्याला भस्म लावून हात जोडून बसलेले. उल्कांचा जोर वाढत चालला. त्यासरशी बाबाने बाजूच्या थाळीतली कसलीशी पूड मूठ भरून घेतली आणि मंतरुन होमात फेकली. ज्वाला उंच उंच जावू लागल्या. ते बघून बाजूला हात पाय बांधून बसवलेल्या त्या पाच मुली आणखीनच घाबरल्या. रात्रीच्या भयाणतेत रातकिडे अधिकच भर घालत होते.

- इन्स्पेक्टर चक्रदेवांनी कारचा यू टर्न घेतला. उजव्या हाताने स्टीयरिंग सांभाळत डाव्या हाताने कॉल केला.“हॅलो... हॅलो खेर... खेSSSर... हा ऐक... एक इम्पॉर्टंट टिप आहे... हॅलो.... ऐकतोयस ना?”“हॅलो सर... मी आत्ता स्टेशनमधेच आहे. २ मिनिटात मीटिंग आहे सो फार वेळ नाही बोलू शकत. सॉरी, कालच्या प्रकरणात आमदाराने फूल फिल्डिंग लावलिय. बहुतेक ट्रान्सफर नक्की आहे. नवीन इन्स्पेक्टर त्याचं मांजर असल्यासारखा वागतोय. सो काही करता येणार नाही. सॉरी! बाय”कॉल कट झाला.“शिट्ट!!!” चक्रदेवने फोन बाजूच्या सीटवर आदळला आणि गाडी टॉप गियरला टाकली.“चलाSSS उठाSSS” बाबा उभा राहून दोन्ही हात उंचावून आकाशात डोळे लावून मोठ्या आवाजात बोलत होता. “अवकाशातील त्या पवित्र शक्तीने आपल्या हाकेला ओ दिला आहे. तिला तिचा प्रसाद अर्पण करूया.”
दादा शिर्के उठला. बाबाजवळ गेला. “घे त्या मडक्यातलं भस्म आणि फास त्या पोरींच्या डोक्यालाSSS”
बाबाचा आवाज घुमला. दादा शिर्केने माडक्यातल मूठभर भस्म काढून घेतलं आणि तो त्या मुलींच्या दिशेने वळला. पुढे काय होणार आहे याची कल्पनाही नसलेल्या त्या पाचहीजणी भेदरून दादा शिर्केकडे पाहू लागल्या.

- सब इन्स्पेक्टर खेर काही मदत करू शकत नव्हता आणि इतर कुणी आपल्यावर विश्वास ठेवणार नाहीत. एका सस्पेंडेड इन्स्पेक्टरच्या सांगण्यावरून धावून तर मुळीच जाणार नाहीत. पोलिसांना कळवण्यात काही फायदा नव्हता. त्यांना पुरावे स्पष्टीकरण देण्याइतका वेळही नव्हता. पाच जीव धोक्यात होते. आपण एकटेतर निश्चित काही करू शकणार नाही याची कल्पना होतीच.शेवटी काहीतरी ठरवून चक्रदेवने एक फोन केलाच.“हॅलो...?”“संकेत चक्रदेव बोलतोय. ओळखलं का? एक काम होतं.”“सलाम साएब. तुमाला नाई कस ओळखणार? बोला काय सेवा करू?”“सस्पेंड झालोय महितेय ना?”“त्याने आपल्याला काय फरक पडतो? आपण पर्सनल रिलेशन ठेवतो. तुमच्या कामाशी काय देन घेन नाय आपल्याला. तुमच्यासाटि कायपन.”“बरं ऐक. अर्जंट आहे. जितकी पोरं मिळतील तितकी गोळा कर. दांडे, तलवार, गुप्ती, चाकु, चेन, हॉकीस्टिक, स्टंप जे काय मिळेल ते घेऊन यायला सांग. एक सॉलिड राडा करायचा आहे.”“लगेच हजर करतो साएब. कोणाला ठोकायचय?”“ते नंतर सांगतो. पंधरा मिनिटात पोरं तयार कर. गाड्या भरून तयार रहा मग सांगतो कुठे भेटायाचं ते.”

“होम संपन्न झालाSSS. आता फक्त बलीदान विधी शिल्लक आहे.” बाबाने शेजारी उभ्या असलेल्या शिष्याला खुणावलं. तो शेजारी बांधून ठेवलेल्या बोकडाला घेवून आला. बाबाने दादा शिर्केच्या हाती तलवार दिली आणि कपाळाला भस्माचा टिळा लावला. दादा शिर्के बोकडाच्या जवळ आला. डोळे मिटून त्याने तलवार हवेत वर उचलली आणि एक दीर्घ श्वास घेतला. डोळे उघडून एकवार त्या होमाच्या आगीला बुजणार्‍या बोकडाकडे बघितलं आणि सर्वशक्तिनिशी त्याच्या मानेवर वार केला. पुढच्याच क्षणी बोकडाचं डोकं होमात विलीन झालं. त्याच्या गरम रक्ताच्या चिळकांड्या आसमंतात उडाल्या आणि समोरच बसलेल्या मुलींनी किकाळी फोडली.

- चक्रदेव केव्हाचे हायवेच्या एका बाजूला गाडी लावून उभे होते आणि समोरून तीव्र हेडलाइट सोडत अपेक्षित दोन स्कोर्पियो वेगाने येताना दिसल्या.

बाबाने जवळच्या एका कटोर्‍यात पाणी घेतलं. होमातलं गरम भस्म त्यात मिसळल. आपल्या पोतडीतून एक पुडी उघडून त्यातली पूड पाण्यात ओतली. ती ढवळत दादा शिर्केला सोबत घेवून तो मुलींच्या पुढ्यात उभा राहिला. “त्या तलवारीच्या रक्ताचा टिळा लाव त्यांच्या कपाळावर.” दादाने पहिल्या मुलीच्या कपाळावर अंगठा टेकवला.
- “कुठे जायचय?” गाडीतून उतरताच त्याने विचारलं.
“डोंगराच्या पलीकडच्या बाजूला.”“तळ्याकडे?”"होय!"

“यात एका विषारी झाडाची पूड मिसळलीय.” हातातला कटोरा बाबाने शिर्केकडे दिला. “पुढल्या तास दोन तासात त्यांचे प्राण जातील.”
“एवढा वेळ? लगेच नाही मारून टाकून चालणार?”
“नाही. मृत्यू नैसर्गिकच हवा. त्यांना इजा करून नाही चालणार. हे पाज त्यांना.”

- चक्रदेव आणि सहकारी जिवाच्या आकांताने धावत होते. अख्खा डोंगर वीस मिनिटं सलग धावून ते टोकावर पोहोचले. तलाव समोर दिसत होता खाली. त्याच्या एका बाजूला जंगलात होमाचा प्रकाश स्पष्ट दिसत होता. अर्थात अजून तेवढाच डोंगर उतरण बाकी होतं.

पाचव्या मुलीच्या तोंडावरून शिर्केने कटोरा बाजूला केला.
“आपला विधी संपन्न झाला. आता आपण निघू शकतो.” बाबा.
“आता मूल होईल आम्हाला?” शिर्केच्या बायकोने विचारलं.
“आपण आपल्याकडून परमेश्वराला आवाहन केलं आहे. आता झालच पाहिजे. बाकी त्याची मर्जी.”
“आणि या पोरींच काय?” दादा शिर्के.
“हे आमचे सेवक आहेत की. त्यांना बाजूच्या झाडीत नेऊन टाकतील. आपण घरी जाईपर्यन्त त्यांची शिकार झालेली असेल.”

- होमाचा उजेड जवळ जवळ येत होता. धावून धावून सगळ्यांचा निम्मा जीव निघाला. समोरची मोठी झाडी ओलांडून सर्वजण मधल्या मोकळ्या जागी आले. होम विझत आलेला. आसपास कुणीच नव्हतं.
“शिट्ट!” चक्रदेवनी होमावर लाथ मारून तो मोडून टाकला. एवढी सगळी मेहनत वाया गेली होती.“साएब इकडे या पटकन.” एकजण ओरडला. सगळे तिकडे धावले. टॉर्चच्या प्रकाशात झाडीत पाच मुली आडव्या तिडव्या पडलेल्या दिसत होत्या. चक्रदेव धावत आत गेले आणि नाडी तपासली.“आत या आत या पटकन! श्वास चालू आहेत. हॉस्पिटल मध्ये नेवू.”
......................................

हॉस्पिटलच्या रिसेप्शनमध्ये चक्रदेव आणि सहकारी बसले होते. कुणालाच काही बोलण्याची इच्छा होत नव्हती. पाचही मुलींवर आत उपचार चालू होते. चक्रदेवांचा फोन वाजला.
“हेलो”
“साएब वाईट बातमी आहे. तो संज्या मेमाने आणि त्याचे ते दोन्ही साथीदार आपल्या तावडीतून गेले.”
“अरे असे कसे पळाले? तुम्हाला लक्ष ठेवायला संगीतलेल ना त्यांच्यावर?”
“साएब ते पळाले नाहीत. त्यांची मानसं येवून तेंना सोडवून घेऊन गेली. आपल्या पोरांना बेदम मार बसलाय.”
चक्रदेवांनी कॉल कट केला.
डॉक्टर बाहेर आले. चक्रदेव लगबगीने त्यांच्या जवळ गेले. डॉक्टरांनी चक्रदेवांच्या खांद्यावर हात ठेवून नकरार्थी मान हलवली.
“पा... पाचही?” चक्रदेवांचा गळा भरून आला.
काहीही न बोलता डॉक्टर होकारार्थी मान हलवून आत निघून गेले.
संकेत चक्रदेव हतबल होवून बाहेर मोकळ्या हवेत आले.
पहाटेने चांगलाच गारठा पकडला होता.
पूर्वेला किंचित उजेड दिसत होता.
सूर्योदय होत होता.
मात्र त्यांच्या मनात अंधार दाटून आला.
डॉक्टर नाडकर्णी गेले.
इन्स्पेक्टर चक्रदेव निलंबित झाले.
संज्या आणि त्याचे साथीदार त्यानंतर कधीच कुणाला दिसणार नाहीत.
शिर्केपर्यन्त पोहोचण्याचा एकमेव धागा तुटला होता.
तो उजळ माथ्याने फिरणार होता.
पाच मुलींचा बळी गेला होता.
पुरोगामी महाराष्ट्रात आणखीन एक गुन्हा अज्ञाताच्या नावाने दाखल होणार होता.
पुढे काय?

-प्रसन्ना करंदीकर 

No comments:

Post a Comment