Thursday, 28 August 2014

आख्तुंग ४ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

डॉ. नाडकर्णींचा खून व्हायच्या सात दिवस आधी: ८ नोव्हेंबर २०१३
डॉ. नाडकर्णी प्रचंड एक्साईट झाले होते,
"तुझा भाचा म्हणजे एक चमत्कार आहे संकेत!
मी खरं तर डोळ्यांची डॉक्टरकी थांबवून पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलंय बरीच वर्षं. 
पण कसली अफलातून केस आहे तुझ्या भाच्याची:
सामान्य माणसापेक्षा तिप्पट लांबवरच बघू शकतोय तो. 
आणि वस्तूचा रंग लाल असेल तर जवळ जवळ दहा पट लांबचं… अगदी स्पष्ट!"

चक्रदेव भंजाळले,
"पण कसं?"


"सोप्पंय रे एकदम, आपला डोळा म्हणजे काय एक भिंग मुदलात… 
पण आपल्या डोळ्याचं हे भिंग छान लवचिक असतं! 
सो जेव्हा आपण लांबची वस्तू बघतो तेव्हा ह्या भिंगाची वक्रता वाढते आणि फोकस अ‍ॅडजस्ट होतो.
हे भिंग जितकं जास्त लवचिक तितकी लांबवर पाहण्याची क्षमता जास्त!
उदाहरणार्थ गरुडाचे डोळे: त्यांचं भिंग प्रचंड लवचिक असतं म्हणूनच ते उंच आकाशातून जमिनीवरचं सावज टिपू शकतात. 
आख्तुंगच्या डोळ्यातल्या भिंगाची लवचिकता पण तशीच आहे… सामान्य माणसापेक्षा कैक पटींनी जास्त!"

"पण लाल रंगाचं काय?"

"ती सुद्धा गम्मतच आहे एक: 
लाल रंग प्रकाशाचं विकिरण (scattering) सर्वात कमी करतो. त्यामुळे तसाही माणसाला लाल रंग लांबून पटकन दिसतो. म्हणूनच तर रस्त्यावर किंवा रुळांवर धोका दाखवायच्या वेळी लाल रंग वापरतात कारण तो जास्त लांबवरून दिसतो."
त्यात माझा अंदाज आहे की आख्तुंगच्या डोळ्यातल्या लाल रंग ग्रहण करणाऱ्या पेशी ज्यांना आपण L - Cones म्हणतो त्याही सुपर-सेन्सिटिव्ह आहेत. 
म्हणूनच काल ४०० मीटर लांब बिल्डींगमधल्या मुलाच्या टी शर्ट वरची लाल अक्षरं तो सहज वाचू शकला!

थोडं भंकसमध्ये बोलायचं तर त्याला चांगली स्नायपर रायफल आणि थोडं ट्रेनिंग दिलं तर तो दोन किलोमीटरवरचा वाईनचा ग्लास आरामात उडवेल किंवा लाल टिळा लावलेल्या माणसाचं कपाळ सुद्धा!
आणि पोलिस आपले शोधत बसतील फारतर एक किलोमीटरच्या परिघात!

जोक्स अपार्ट… हा पोरगा म्हणजे डोळ्यांच्या विज्ञानासाठी वरदान आहे वरदान!
हा आठवडा थोडा बिझी आहे मी… दोन-तीन भोन्दू बाबांना एक्स्पोज करायचंय.  
पण पुढच्या आठवड्यात आपण आख्तुंगची केस अजून स्टडी करू. 
-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते 

No comments:

Post a Comment