Saturday 6 September 2014

आख्तुंग ६ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर बरोब्बर १५ वर्षांनी: १८ नोव्हेंबर २०२८ 
अंकुश शिर्केचा चाळीसावा वाढदिवस 
वरळीची ओशन व्ह्यू बिल्डींग: 
अंकुश तिच्याशी लिफ्टमध्येच खेळायला लागला होता पण सिक्युरिटी कॅमेराकडे बोट दाखवून तिनं त्याला थोपवलं होतं.  

ते दोघं अंकुशच्या तिसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आले. 

समोरचा व्ह्यू बघून तिनं टूण्णकन उडीच मारली!
मोठ्ठ्या फ्रेंच विन्डो मधून दिसणारा अफाट समुद्र… दुपारच्या उन्हात चांदी वितळवल्यासारखा दिसत होता.
किंचित डावीकडे सी-लिंक वरून इटुकल्या गाड्या चालल्या होत्या. 
आणखी डावीकडे महालक्ष्मी आणि समोरच माहीम-वांद्र्याची स्कायलाईन! 

"दोनच मिनटं दे मला जान आत जाऊन फ्रेश होऊन येते मी आणि गिफ्ट मी आल्याशिवाय उघडू नकोस"

महुआनी आठवणीने पर्स आणि फोन बरोबर घेतला. 
'हो उगीच अंकुशने उघडायला नको'

अंकुश आरामात सोफ्यावर पाय ताणून बसला, या वरळीच्या फ्लॅटवर तो सुद्धा बऱ्याच दिवसांनी आला होता . 
समोर जुने पेपर पडले होते. पहिल्याच पानावर दादा शिर्केचा फोटो होता. महिन्याभरापुर्वीची त्याच्या हत्येची बातमी मोठ्ठ्या अक्षरात होती. आणि गोळी लागण्यापूर्वीचा दादाचा शेवटचा फोटो… प्रचारसभेत तलवार घेतानाचा. 

अंकुशला दादाच्या आठवणीनी थोडं वाईट वाटलं… आणि थोडी भीतीसुद्धा!
बरं आपण नव्हतो सभेत नायतर आपला पण गेम होता!!
त्यानं उगीच एक नजर खिडकीवर टाकली. 
'ह्या फ्लॅटवर बरंय 'सी-साईट'चा असल्यामुळं समोरून कोण गोळी मारणार नाय 
पन दादाचे शत्रू कमी नव्हते. उगीच आपल्यालापण गोळी बसण्यापेक्षा दुबईत गायब झालेलं बेष्ट!'
त्यानं सहजच परत त्या प्रचारसभेच्या फोटो कडे नजर टाकली. एक मुलगी दादाला तलवार देत होती… तिनं अगदी शालीनपणेवगैरे मान खाली घातल्याने तिचं तोंड दिसत नव्हतं. 
पण अचानक त्याच्या लक्षात आलं: 
तिच्या हातावर गोंदलेले  तीन मासे अस्पष्टपणे दिसत होते. 


बरोब्बर त्याच वेळी 
वांद्रे रेक्लमेशन लीलावती हॉस्पिटल:
अकराव्या मजल्यावरच्या स्पेशल फ़ाइव्ह स्टार सूट मध्ये कालच एक पोरगेलासा पेशंट अ‍ॅडमिट झाला होता.
सिम्पल फूड पॉयझनिंगची केस होती.
वॉर्ड-बॉय ट्रॉलीमध्ये दुपारचं जेवण घेऊन आला त्यानं जेवण सर्व्ह केलं आणि अलगद ट्रॉलीच्या खालच्या भागातून एक गिटार केस पेशंटला सरकवली.
जाताना त्यानं हळूच नर्सला डोळा मारला… तिनं चार्ट चेक केला अजून दोन तास तरी डॉक्टरांची व्हिजीट नव्हती.
सूटच्या दारावर तिनं "डू नॉट डिस्टर्ब पेशंट रेस्टिंग" चा बोर्ड लावून टाकला.

ओशन व्ह्यू बिल्डींग:
फ्रेश होऊन महुआनं मेकअप टच-अप  केला,  डार्क ब्राऊन लिपस्टिक पुन्हा एकदा ओठांवर फिरवली आणि ती बाथरूमच्या बाहेर आली.

अंकुशकडे बघून ती मधाळ हसली,
"उघड आता तुझं गिफ्ट"

अंकुशनी धसमुसळेपणानी गिफ्ट रॅपरच्या चिंध्या केल्या आतून 'झारा'चा लालचुटूक शर्ट डोकावत होता!

अंकुश डोळे मिचकावत हसला,
"लय भारी कलर हाय! आत्ता घालतो!! ठॅन्क यु जान!!!… त्यानं हळुवारपणे तिच्या पालथ्या पंजावर हात ठेवला आणि तीन माशांच्या गोंदणावर ओठ टेकवले!"

लीलावती हॉस्पिटल:
सूटच्या प्रायव्हेट गलरीत आख्तुंगनं झटपट रायफल सेट केली!
उजवीकडे माहिमचा किनारा दिसत होता… त्याच्यापुढे शिवाजीपार्क आणि त्याच्या पुढे लांबवर वरळीची ओशन व्ह्यू!

ओशन व्ह्यू बिल्डींग:
अंकुशनं तिला गच्च आवळली आपल्या मिठीत प्रेमानं… आणि सायलेन्सरचं टोक तिच्या पोटाला टेकवून गोळी मारली!

लीलावती हॉस्पिटल:
आख्तुंगनं डोळा बारीक केला ओशन व्ह्यू चा टॉप फ्लोअर त्याला दिसत होता पण एव्हढ्या लांबवर डिटेलिंग होत नव्हतं. एक नक्की की अजून लाल ठिपका आला नव्हता.

ओशन व्ह्यू बिल्डींग:
"साली रांड…मादर%#! तरी मला तुझा चेहेरा ओळखीचा वाटून राह्यला ना भाव,
आत्ता ट्यूब पेटली आमी ते पाच पोरींचे बळी दिले व्हयनीला पोर व्ह्ण्यासाठी त्यातल्या एकीची चेहेरेपट्टी तुज्यावानीच व्हती. तुजी आक्का व्हती ना ती?
त्या आयघाल्या इनिस्पेक्टर चक्रमद्येवचंच डोकं असनार ह्ये समदं!
पण काय्ये ना… प्वाटात गोळी लय वंगाळ प्रकरण… मान्सं दोन दोन दिवस जित्ते राहतेत… तडफडत रडत भेकत!
चल चटचट नावं सांगून टाक तुज्या टीमची आनि काय प्लान हाये तुमचा त्ये. पुढच्या मिनटाला सुखानं वर पाटवतो तुला. नायतर काय आपल्याकडे भरपूर टायम हाय. दुबईचं शिफ्टिंग कॅन्सल!"

अंकुशनं त्याच्या 'ग्लॉक'ची नळी तिच्या पोटाच्या जखमेत खुपसली आणि महुआचे टप्पोरे डोळे वेदनेनी धुरकट झाले!
पाड्यात आक्काबरोबर तोडलेली करवंदं, शहरातल्या कॉलेजचा पहिला दिवस, आख्तुंगच्या ओठांचा ओलसर स्पर्श… असं काय काय रॅन्डम आठवलं तिला!

लीलावती हॉस्पिटल:
आख्तुंगनं श्वास ऱ्हिदम मध्ये आणला.
त्याचा डोळा, श्वास, ऱ्ह्दयाचे ठोके, टेलिस्कोप, रायफलची नळी, मधला चमचम समुद्र, लांबवर अंधुकशी दिसणारी खिडकी सगळं एकतान झालं होतं.
शांतपणे वाट बघत होता तो… आता कोणत्याही क्षणी… लाल ठिपका!

ओशन व्ह्यू बिल्डींग:
महुआ पांढरे शुभ्र दात दाखवत हसली,
तिनं असेल नसेल ते बळ एकवटून अंकुशला घट्ट मिठ्ठी घातली आणि फ्रेंच विंडोकडे पाठ केली.
तिच्या पांढऱ्या शर्टाची पाठ लाल भडक रक्ताने चिप्प झाली होती. 





**************************      समाप्त     *****************************
-नील आर्ते

No comments:

Post a Comment