Monday, 13 October 2014

नळी-बाव


गोष्ट "ऐकण्यासाठीइथे क्लिक करा
----------------------------------------टणाच्या रश्श्याचा घमघमाट सुटला होता… दोन दोन पेग व्हिस्कीनं अरुकाका, एस. के., आणि पुनीत तिघांच्याही पोटात आग लागली होती!
तेव्हढ्यात मम्मीनी ताटंच घेतली.
चौघंही टेबलावर बसले.

स्टीलची चकचकीत ताटं… चकचकीत वाट्या… कांदा-टॉमॅटो-दह्याची कोशिंबीर… गरमागरम मऊसूत चपात्या… वाटीतला वाफाळता लालभडक मटणाचा रस्सा… आणि खास पुनीतसाठीच्या वाटीत मोठ्ठा नळीचा तुकडा!

पुनीत खुशारला, "मम्म्या आय लव्ह यू!"
त्यानं तीन चार किसेस हवेत फेकले आणि नळी गरम गरम असतानाच चोखली.
आतला बोन-मॅरोचा घसघशीत गोळा बक्कन त्याच्या तोंडात गेला!
किंचित तुपकट… उबदार… गुलगुलीत राखाडी-पांढऱ्या रंगाचा तो ऐवज पुनीतच्या घशातून खाली उतरला आणि त्यानं सुखानं डोळेच मिटले!

मम्मीना प्रेमाचं भरतं आलं, "माझं लेकरू गं ते पाय मोडून बसलंय बिचारं… खा बाळा खा… हाडात शक्ती यायला पाह्यजे लवकर लवकर… माझं पोर ते… ही मेली दळिद्री लोकं कुठेपण फुटपाथवर झोपतात आणि आम्हाला त्रा…"

एस. कें. नी त्यांच्या मांडीला हळूच चिमटा काढला तेव्हा कुठे त्या गप्प झाल्या.

"काय मग अरुशेठ कोणता नवीन प्रोजेक्ट चाललाय सध्या?" त्यांनी सफाईनं विषय बदलला.

आवडीचा विषय निघाल्यावर अरुकाका तरारला, "अरे सध्या आम्ही मायक्रॉइड्सवर काम करतोय!"

"मायक्रॉइड्स म्हणजे?"

"सांगतो… नॅनो-बॉट्स ऐकलेयत ना तुम्ही? म्हणजे सूक्ष्म यंत्रमानव!"

"नॅनो कार माहितीये माला", पुनीत फिदीफिदी हसला… "त्या दिवशी गाडी ठोकली तेव्हा एक नॅनो पण चेपली… ओय ओय"… एस. कें. नी त्याच्या धडक्या पायावर टेबलाखालून जोरात पाय मारला!

"अरू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस… अहो तुमच्या पोराला अजून पेग देऊ नका आता, लगेच टाईट होतो तो… तू बोल पुढे!"

"तर आम्ही थोडा वेगळा विचार केला: नॅनो बॉट्स पूर्णपणे यांत्रिक असतात पण त्यांच्यात काही जैविक गुणधर्म आणता आले तर?"
उदाहरणार्थ मुंग्या किंवा वाळवी किंवा मधमाश्यांइतकी कार्यक्षमता आणि बुद्धिमत्ता!
ह्या मठ्ठ सूक्ष्म यंत्रांना चांगला मेंदू आणि थोडाफार कॉन्शस देता आला तर?
… म्हणजे मानवाएवढा नाही पण एखाद्या मुंगीएवढा?"पुनीतच्या मट्ठ मेंदूला हा सगळा डोस हेवी व्हायला लागला होता… शिवाय कोणीच त्याच्याकडे बघतसुद्धा नव्हतं… "मम्मी अजून नळी-बाव पायजे माला", पुनीत लाडात आला.

मम्मीना परत प्रेमाचं भरतं आलं, "अगदी अस्सा आहे ना माझा पुन्नू… लहानपणीसुद्धा 'नळी-बाव नळी-बाव' करत चार चार मटणाच्या नळ्या चोखायचा… घे बेटा", त्यांनी आपल्या ताटातली नळी पण पुनीतच्या ताटात टाकली.

"अहो गप्प बसा जरा… अरु तू सांग पुढे", एस. कें. मधला उद्योगपती जागा झाला होता.

"थोडक्यात काय लहान लहान जीवांची बुद्धी आणि यंत्रांचा आज्ञाधारकपणा हे दोन्ही एकत्र करायच्या दिशेनी आमचं काम सध्या चालू आहे."
म्हणजे नॅनो बॉट्स पेक्षा मोठे पण इटुकलेच आणि यंत्र आणि सजीवांचं हायब्रीड असलेले म्हणून आम्ही त्यांना त्यांना आम्ही मायक्रॉइड्स म्हणतो."
विचार कर ना हे मायक्रॉइड्स काय काय करू शकतील:
अवघड जागेची ऑपरेशन्स म्हण किंवा कोपऱ्यात सांदी-फटीत जाऊन करायची अनेक किचकट कामं.
छोट्या मोठ्या कामांसाठी गाडीचं इंजिन उघडायची पण गरज नाही!


'ठ्ठॉक ठ्ठॉक…' पुनीत मम्मीनी दिलेली नळी जोरात ताटात आपटत होता… आता नळी गार झाल्यामुळे आतला बाव बाहेर येत नव्हता.
'पुच्च्यूक पुच्च्यूक…' त्यानं दोनदा परत चुखून बघितलं पण नो लक्क!
मग एक डोळा मिटून त्यानं नळीत खोलवर बघितलं… होता होता आत बाव होता… भरपूर लुसलुशीत तुपकट बाव… पण ह्या नळीचं तोंड अगदी अरुंद होतं त्यामुळे लोचा होत होता.

अरुकाका ताटावरून उठला आणि खरकट्या हातांनीच त्यानं आपली बॅग जवळ ओढली.
पुनीत एक मिन्ट थांब तुझा बाव काढूया आपण!
त्यानं बागेतून एक जिन-तानच्या गोळ्यांच्या डबीसारखी चपटी डबी काढली. आतमध्ये दहा बारा दाणे होते.
आपल्या बडीशेपेच्या गोळ्या असतात ना त्याच्या साधारण अर्ध्या आकाराचे!
हे आमचे मायक्रॉइड्स आता निष्क्रिय आहेत… त्यांना आपण अ‍ॅक्टिव्ह करूया.
त्यानं ते सगळे दाणे एका बशीत ओतले आणि एका बाटलीतला लाल द्रव त्यांच्यावर ओतला.

"हे काय? रक्त?"

"नाही हे बायो फ्लुइड आहे, यात रक्ताचे काही घटक आहेत आणि इतर बऱ्याच गोष्टी… हे आमच्या मायक्रॉइड्सचं खाणं कम बॅटरी-चार्ज!"
लाल द्रव पडल्यावर ते दाणे बशीतच हळूहळू थरथरायला लागले…
तेवढ्यात अरुकाकाने लॅपटॉपवर काही कमांड्स सेट केल्या आणि एखाद्या जादूगाराच्या आवेशात खाट्टकन एन्टर मारलं!
दाणे अजून जोरात थरथरायला लागले आणि मग झप्पकन ते बशीतून बाहेर आले आणि तुरुतुरु चालत टेबलावरून पुनीतच्या ताटाकडे गेले… तिकडून नळीजवळ…
मग त्यांनी शिस्तीत रांग केली सैनिकांसारखी आणि एक-एक जण आत घुसला नळीच्या तोंडातून…
मग १०-२० सेकंद फक्त गुं-गुं असा क्षीण आवाज येत राहिला आणि मग ते सगळे छोटे सैनिक बाहेर आले.
प्रत्येकाने थोडा थोडा नळी बाव आपल्याबरोबर आणला होता तो त्यांनी ताटात एकत्र जमा केला आणि ते शिस्तीत ताटाच्या बाजूला जाऊन उभे राहिले!

"हा घे पुनीत तुझा नळी-बाव… सगळाच्या सगळा!", अरुकाका मिस्कील हसत होता.

पुनीतनं एक डोळा मिटून नळीत बघितलं, नळी लख्ख साफ झाली होती आणि सगळ्या बावाचा घसघशीत गोळा त्याच्या ताटात!

"तर हे आहेत आमचे छोटुले सैनिक उर्फ मायक्रॉइड्स… अशी छोट्या छोट्या सांदी कोपऱ्यातली कामं करण्यासाठी कस्टमाइझ्ड करता येतं त्यांना… इन फॅक्ट मी त्यांना नावं पण ठेवलीयेत सगळी आपल्या आवडत्या शेक्स्पिअरच्या पात्रांची: हा मॅक्बेथ, हा हॅम्लेट, ही डेस्डीमोना, हा ऑथेल्लो आणि हा एस. के. चा आवडता शायलॉक!"

'हे घे', अरुकाकानं भिंग सरकवलं.

पुनीतनं भिंग लावून बघितलं:
एखादं मोठ्ठ डोकं आणि हाता-पायाच्या काड्या असलेलं मुडदूस बाळ जर बडीशेपे एव्हढं छोटं झालं तर कसं दिसेल… तसे दिसत होते ते सैनिक.
तोंडाच्या जागी त्यांना कुरतडण्यासाठी बा SSS रीक तीक्ष्ण दात होते आणि हातापायांना अणकुचीदार नख्या…
इतक्यात शायलॉकनं अचानक भिंगातून थेट पुनीतकडे बघितलं आणि तो फिस्सकन हसला!
पुनीतनं दचकून ताटच उडवलं आणि सगळं मटण बावासहीत त्याच्या प्लॅस्टरवर पडलं.

एस. के. प्रचंड इम्प्रेस झाले होते, "आयला! माझ्या दाढांत जाम फटी आहेत अऱ्या... नेहमी मटणाचे तुकडे अडकतात… तिकडे या तुझ्या सैनिकांना पाठवता येईल आत?"

"कदाचित… पण त्यांना माणसांच्या इतकं जवळ जाऊ देण्यासाठी बऱ्याच टेस्ट्स कराव्या लागतील आम्हाला. सो सध्यातरी नाही. चल बराच उशीर झालाय परत डबीत बोलावतो त्यांना.
वहिनी डेझर्टमध्ये काय आहे?"

अरुकाकाला गाडीपर्यंत सोडून एस. के. परत आले आणि आल्या आल्या बायकोवर बरसले…"अगं तुला देवानं अकलेचा भाग थोडा कमी दिलाय का? ते अ‍ॅक्सिडन्टचं सगळ्यांसमोर काय बडबडतेस?
तुझ्या लाडक्या पोरानं दारू पिउन फूटपाथवरच्या तीन जणांना गाडी ठोकलीय आणि स्वत:चा पाय मोडून घेतलाय… हे आता लाउडस्पीकर घेऊन सांग ना…"
मागचा आख्खा आठवडा हे सगळं निस्तरण्यात घालवलाय मी… पोलीस आले होते वास काढत माहितीये ना?
मोडकी गाडी बघून त्यांना संशय येऊ नये म्हणून बंगल्यातलं फणसाचं झाड तोडून पाडलं मी गाडीवर…
पुनीतचा पाय दोन दिवस आधीच मोडल्याचं खोटं सर्टिफिकेट आणलं डॉक्टरकडून…
माझे सगळे कॉन्टॅक्ट्स वापरून प्रकरण दाबलंय मी आणि माझे आई तू दवंडी पिटत चाललीयस.
आणि पोरगा झोपलाय मस्त डाराडूर ए. सी. मध्ये… बाप आहे ना सगळ्यांना मॅनेज करायला… युसलेस!
---------------------------------------------------------

पुनीतची बेडरूम:
पुनीत मेल्यासारखा डाराडूर झोपला होता… उशीवर मोडका पाय ठेवून.
ए. सी. ची झडप हलकेच वरखाली होत होती… पुनीतच्या उघड्या तोंडातून थोडी लाळ गळत होती!
तेवढ्यात प्लॅस्टरच्या कडेला लपलेला शायलॉक हळूच फटीतून आणखी आत घुसला…
कर्र-कर्र प्लॅस्टर खरवडून त्यानं थोडी जागा केली... आत… आणखी थोडं आत जात तो जखमेजवळ पोचला…
आणि त्यानं टाके हळूहळू कुरतडायला सुरुवात केली…
टाक्यांच्या आत जखम होती… अर्धवट सुकलेली पण कुठे कुठे अजूनही लसलसती लालसर जखम!
जखमेच्या आत चीर पडलेलं हाड आणि त्या हाडातला नळी-बाव… लुसलुशीत तुपकट!!
मघाशी नळी-बाव उकरल्यापासून तो वास आणि चव शायलॉकला वेडं करत होती…
हाडाची चीर आणखी मोठी करत शायलॉक आत आत घुसला …
आणि पुनीत गुरासारखा किंचाळू लागला!!!


-नील आर्ते 

7 comments:

 1. एकदम जबरी शेवट . आवडली

  ReplyDelete
  Replies
  1. Thanks Aparna ...hearing from u after long...where have you been?

   Delete
 2. भन्नाट आहे, आवड्या

  ReplyDelete
 3. भन्नाट आहे, आवड्या

  ReplyDelete