Monday 4 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १



आज : १६ नोव्हेंबर २०१३


- नमस्कार, सर्वात आधी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर संकेत चक्रदेव यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास जबरदस्तीने आपल्या रेस्टहाऊस मध्ये घुसून झडती घेतल्याचा आरोप आमदार दादा शिर्के यांनी केला आहे. कोणताही वॉरंट नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता ही झडती घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. पाहूया या बाबत आमदार शिर्के काय म्हणतायत-




“काल रात्री याठिकानि जबरदस्तीने कोनतीही परवानगी नसताना, कोनताही पुरावा हाताशी नसताना डॉ. नाडकर्णी यांच्या खुन्यांचा शोध गेन्यासाटीमनून ही जी अंधाधुंद कारवाई करन्यात आली त्याचा मी निषेध करतो. आमचे काही स्थानिक कार्यकर्ते याठिकानी काही नव्या कार्यक्रमसंदर्भात मीटिंगसाटी राहिले होते. आज सकाळी आमि भेटानार होतो मात्र मध्यरात्री एका कार्यकर्त्याचा फोन आला की इकडे अचानक पोलिसांची धाड पडली आहे. मी होतो त्या परिस्थितिमद्दे इते धाऊन आलो. कोनताही पुरावा नसताना आमच्या कार्यकर्त्यांना आरोपी म्हनून पकडण्यात आलं हे चुकीचं आहे. डॉ. नाडकर्नि यांचेबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आम्ही प्रार्थना करतो. मात्र हे कारन पुढे करून जर का कुनी व्यक्तीगत द्वेषाने काम करत असेल तर ते आम्ही सहन करनार नाही. आशा प्रकारची कारवाई करन्याचे कोनतेही आदिकार नस्ताना तेंनी हे पाऊल उचललेल आहे. जर का आमच्यासारके लोकप्रतींनिधी जर याटीकानी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांनी पाहावं कुनाकडे? आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो आहोत. या इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करा अशी आम्ही मागनी केलेली आहे, आणि तात्काळ करवाईच आश्वासन त्यांनी आमाला दिलेलं आहे. ”




- दरम्यान गृहमंत्र्यांशी आम्ही यासंदर्भात संपर्क करण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क होवू शकला नाही. मात्र इन्स्पेक्टर चक्रदेव यांना निलंबित करण्याचे आदेश दिले गेले आहेत अस खात्रीलायक वृत्त आमच्या विश्वासनिय सूत्रांकडून समजतं.


.......................................................


· वरील घटनेच्या २१ तासांपूर्वी : १५ नोव्हेंबर २०१३


रात्रीचे साडे अकरा वाजलेले. चक्रदेव स्वतः गस्तीच्या गाड्यांच्या कामाची चाचपणी करत होते. तेवढ्यात टिपरचा फोन आला.
“हा बोल रे!”
“सर, पक्की खबर आहे. ऐकून खोटी वाटेल पण विश्वास ठेवा आपला शब्द आहे.”
“सध्या माझा कुणावरही विश्वास उरलेला नाही त्यामुळे तू कुणाचही नाव घे, मला फरक पडणार नाही.”
“नाडकर्णींचे खूनी दादा शिर्केंच्या रेश्टहाऊसवर आहेत.”
“काय? आमदार?”
“होय साएब. तिथे काम करणार्‍या पोर्‍याकडून बातमी काडलीय खोटी ठरली तर जबान कापून देईन आपली.”
“नक्की?”
“साएब जास्त वेळ काडू नका, उद्या सकाळी सुटणार ते तिथून. आऊट ऑफ श्टेट करणार त्यांना. तिकडून डायरेक फॉरेन. आज रात्रीचीच फक्त वेळ आहे.”
“ब्बरं! बघतो मी. आणि काही असेल तर कळवत रहा.”
चक्रदेवांनी फोन कट केला.
‘एकदम आमदाराच्या रेस्टहाऊसवर धाड घालायची? ती पण वॉरंट शिवाय? काय करू? काय करू? काय करू?’
पुन्हा फोन वाजला. यावेळी प्रतिमाचा होता. डोक्याला आठ्या घालून त्यांनी रिसिव्ह केला.
“बोल.”
“तुमचा तपास चुकतोय. ते खूनी पुलाजवळ गाडी लावून पळून गेले नाहीत. ते अजून जिल्ह्यातच आहेत.”
“आम्ही काय तपास करतोय ते तुला काय माहीत?”
“कारण मला माहीत आहे. आता कसं ते महत्वाचं नाही. त्यामुळे मला काय वाटत हा मुद्दा सोडून द्या, ते खूनी अजून बाहेर पळालेले नाहीत ते दादा शिर्केच्या रेस्टहाऊसवर लपून आहेत. मुळात ती बाइक त्यांनी त्या पूलाकडे नेलेलीच नाही. तुमची दिशाभूल करायला ती नेऊन तिकडे सोडणारे दुसरेच कुणीतरी होते, जे तिथून पुढे एस.टी. ने निघूनही गेलेत. ज्यांनी खरोखर खून केलाय ते दादा शिर्केंच्या_”
“एक मिनिट एक मिनिट! आणि हे कोण सांगतय? अंकुश शिर्केची गर्लफ्रेंड? आणि मी यावर विश्वास ठेवेन अस वाटतं? तुम्ही पत्रकार काय सवयीने अंग काढून घ्याल. आमचं काय?”
प्रतिमा काही क्षण शांत झाली.
“चक्रदेव मला कल्पना आहे की तुमचा माझ्यावर किती राग आहे. तो योग्यही आहे. पण आत्ता ही वेळ आपले वैयक्तिक हेवेदावे बघायची नाहीये. प्रश्न एका माणसाला न्याय मिळवून देण्याचा आहे आणि_”
“न्याय शब्द तुझ्या तोंडात चांगला नाही वाटत. मला फक्त एवढच सांग मी तुझ्यावर विश्वास का ठेवू?”
“मला पश्चात्ताप झालाय समजा. पण त्या खुन्यांना पकडा. प्लीज!” तिने कॉल कट केला.
चक्रदेवांनी लागलीच सबइन्स्पेक्टर खेरांना कॉल केला. आता वेळ दवडून चालणार नव्हतं. बातमी कन्फर्म झाली होती.
“हॅलो खेर! पेट्रोलिंग वॅन घेऊन शनिवार वाड्याजवळ भेटा. कुठे जायचं ते नंतर सांगेन.”
.....................................................

· वरील घटनेच्या एक तास आधी : १५ नोव्हेंबर २०१३
हवालदार जाधवांचा फोन वाजला.
“हॅलो?”
“प्रतिमा बोलतेय. कुठपर्यंत आलाय तपास?”
“ओ म्याडम तुमी फोन नका करत जाऊ आता. ते पूर्वीचे दिवस नाही राहिले. सदद्या सेक्षण गरम आहे. मी नाही काही बातमी फोडू शकत, चुकून सायबांना कळलं तर घरी बसवतील फुकटचा.”
“तुम्हाला तुमचं पाकीट मिळाल्याशी मतलब ना? जास्त भाव खाऊ नका, नाहीतर मी सांगेन तुम्ही या आधी काय काय गोष्टी फोडल्यात ते.”
जाधवांचा चेहरा हिरमुसला.
“बरं! आज शेवटचं; पुन्हा फोन करू नका. तुमचं पाकीटपण नको आणि ते टेंशन पण नको,पूर्वीचा सायब वेगळा होता तेव्हा चालायच सगळं.”
“प्रस्तावना पुरे, मुद्दयाचं बोला!”
…………………………………………

· वरील घटनेच्या सहा तास आधी : १५ नोव्हेंबर २०१३
सब इन्स्पेक्टर खेर धावत केबिनमध्ये आले.
“सर बाइक चिंचवडबाहेर एका ब्रिजजवळ सापडलीय. तिथून दोन मिनीटावरच बस स्टॉप आहे. तिथल्या एका टपरिवल्याने साधारण तशा दोघांना सकाळी स्टॉपवर बघितलेल.”
“किती वाजता?”
“८ साडे ८च्या दरम्यान”
“कुठल्या बसने गेले कळलं?”
“नाही. पण नगरला गेले नक्की.”
“तरीही आठ तास होवून गेलेत. नगरला पोहोचायला साधारण दोन तास. अडीच धरू. म्हणजे अकरा. अकरानंतर नगरवरुन जाणार्‍या ट्रेनची चौकशी करा, लांब पल्ल्याच्या एस. टी. ची चौकशी करा. गेल्या चार तासात ते कुठे कुठे पोहोचले असू शकतात बघा.”
.............................................

· ‘तो’ दिवस : १५ नोव्हेंबर २०१३
डॉ. नाडकर्णी एका कार्यक्रमासाठी आपल्या घरी, पुण्यात आलेले. आपला एक लेख संपवून झोपायला त्यांना रात्रीचे ३ वाजले. पण रात्री कितीही वाजता झोपले तरी सकाळी साडे पाचला उठायची त्यांची सवय कित्येक दशकं अबाधित होती. प्रातर्विधी उरकले की धावत गरवारे चौक गाठायचा, बरोब्बर अर्धा तास लागतो. मग तिथून मागे वळून चालत घरी परतायचं. वयाच्या पासश्ठाव्या वर्षी असा मॉर्निंग वॉक करणारे ते एकटेच.
आजच्या एका कार्यक्रमात करायच्या भाषणाची मनात जुळवा जुळव चालू होती. लकडी पूल अर्धा पार झाला असेल नसेल आणि_
-‘थ्थाड’-
-वृंगर्रर्रर्रर्रर्रर्रर्रर्र-
पाठीमागून वेगाने आलेली मोटर सायकल करकच्चून ब्रेक मारून थांबली आणि ओढलेला एक्सलरेटर ओरडला.
पाठीमागे बसलेल्या माणसाने जमिनीवर कोसळलेल्या डॉ. नाडकर्णींच्या डोक्यात दुसरी गोळी झाडली... यावेळी...
फक्त तीन फुटावरून...
-‘थ्थाड’-
शेवटचा आचका देवून शांत झालेल्या नाडकर्णींच्या कृश शरीराकडे केविलवाण्या नजरेने पहात त्याने बंदूक शर्टात लपवली आणि पुढे बसलेल्या चालकाच्या पाठीवर थाप मारली...
दुचाकी स्वाराने ब्रेक सोडला आणि सुसाट वेगाने गाडी पळवली...
पहाटेच्या धुक्यात त्या गाडीचा धूर बेमालूम मिसळून गेला...
अशी हवा नाडकर्णींच्या नाकात जावू नये म्हणून वाराही थबकला असावा!
फुटपाथ रक्ताने भिजलेला...
तरीही त्याचा गळा कोरडा पडला असावा!
रक्ताचा एक थेंब पाण्याच्या ड्रेनेज होल मधून मुठेच्या पाण्यात विसावला...
आपल्यामुळे तो अस्वच्छ होईल की त्याच्या स्पर्शाने आपण शुद्ध होऊ हे न कळल्याने ती ही अस्वस्थ झाली!
मात्र…
त्या क्षणीही डॉ. नाडकर्णींची शांत, संयमी मुद्रा कायम होती.
.......................................................
क्रमश:

4 comments:

  1. अरे यातल्या स्पेसेस कमी कर. त्रास देतायत वाचताना त्या.

    ReplyDelete
    Replies
    1. Sanna, I have sent you invitation as write on this blog.
      Please accept it so you can make changes as you deem fit!

      Delete