Wednesday, 7 December 2011

मुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग 2)

काळी सकाळी राजधानी बेकरीतून आणलेला खरपूस ताजा पाव,
८७,३१६ चा बस स्टॉप...सकाळचे साबण पावडरीचे प्रसन्न वास,
शेअर रिक्षाची गडबड...
ह्याच बस स्टॉपवर 'टेम्पा'ने नव्या कोऱ्या बाईकवरून शानमध्ये एन्ट्री टाकली होती..आणि हेल्मेट घातल्याचं विसरून तोंडाच्या काचेवरच गुटखा थुंकला होता.

विनायककडची वडा-उसळ  आणि एक्स्ट्रा उसळीबरोबर खाल्लेले २२ पाव.
पाटीलचा फेमस वडा-पाव.
समर्थ मधले चहा-सिगरेटचे अड्डे...उजाला बार मधली पिणार्यांची (खास करून शनिवारी रात्रीची) आनंदी मचमच.

कॉलनीने पोरांना खूप काही शिकवलं...मुख्य म्हणजे जग आपल्या बाबांचं असल्यासारखा कुठेही घुसायचा कॉन्फीडन्स दिला:
मग ते सह्याद्रितलं अवघड शिखर असो की पॉश फाइव स्टार हॉटेल!
पोलीस-स्टेशन असो किंवा हातात तलवारी घेतलेल्या पोरांची फिल्ड!

ही अत्रंगी पोरं..सगळ्यांना वाटायचं ह्यांचं आयुष्यात काही होणार नाही...

होळीला अती दारू पिऊन मेल्यासारखा निपचित झालेला 'तो'...
गर्लफ्रेंडसाठी उंदरांच विष पिऊन मरणाच्या दारातून परत आलेला 'तो'...
'डिस्को डान्सर'ची पट्टी म्हणून अंडरवेअरचं इलॅस्टिक डोक्याला अडकवणारा तो...
सायकली चोरणारा 'तो...
१२ वी ला ७ वेळा नापास होणारा 'तो...
घरची गाडी विकून आलेले सगळेच्या सगळे ७० हजार लेडीज बार मध्ये उडवणारा 'तो...
रोज शाळेत कर्कटकने मारामाऱ्या करणारा 'तो...
रोज नवीन मुलीला भिडणारा (प्रपोज करणारा) 'तो... हा रोज भिडायचा म्हणून याच नाव 'प्रदीप भिडे' ठेवलं होतं...

पण यथावकाश ह्यातले बहुतेक सगळे 'तो' सुधारले आणि मस्त सेटल झाले.

बरेचजण आता कॉलनीत पूर्वीची शान राहिली नाही म्हणून हळहळतात.
पण ते फारसं खरं नाहीये...आपण 'इन-डिस्पेन्सिबल' होतो असं वाटून घ्यायचा तो सोपा मार्ग आहे.

१९६५ साली बनलेल्या कॉलनीने २ ते ३ पिढ्या तरुण होताना बघितल्या आणि अजूनही कित्येक पिढ्या कॉलनीच्या कुशीत दुनियादारी शिकतील.


आणि मग कॉलनीतली अनुक्रमे  ३५ आणि ४१ वर्षाची दोन पोरं जगात कुठेही भेटली की...
विविध "फटका बहिणींच्या" जोड्यांच्या गुलाबी आठवणी काढतील,
रस्त्यावर पडलेलं बिस्कीट हळूच "राम की भूत?" विचारून खातील,
करवंदांचा "कोंबडा-कोंबडी" जुगार खेळतील,
आणि बोलतील "भेन्चोद कसली धमाल करायचो नं आपण"?-पांढऱ्या
-उर्फ गोरा रणजीत
-उर्फ गणपत पाटील (च्यायला आवाज अंमळ उशीराच फुटला)
-उर्फ गाय उर्फ हम्मा
-उर्फ एक कॉलनीवासी.
(राहणार ब:२५३ / १  : नम्रता क्रीडा-मंडळ.)