Saturday, 6 September 2014

आख्तुंग ६ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर बरोब्बर १५ वर्षांनी: १८ नोव्हेंबर २०२८ 
अंकुश शिर्केचा चाळीसावा वाढदिवस 
वरळीची ओशन व्ह्यू बिल्डींग: 
अंकुश तिच्याशी लिफ्टमध्येच खेळायला लागला होता पण सिक्युरिटी कॅमेराकडे बोट दाखवून तिनं त्याला थोपवलं होतं.  

ते दोघं अंकुशच्या तिसाव्या मजल्यावरच्या फ्लॅटमध्ये आले. 

समोरचा व्ह्यू बघून तिनं टूण्णकन उडीच मारली!
मोठ्ठ्या फ्रेंच विन्डो मधून दिसणारा अफाट समुद्र… दुपारच्या उन्हात चांदी वितळवल्यासारखा दिसत होता.
किंचित डावीकडे सी-लिंक वरून इटुकल्या गाड्या चालल्या होत्या. 
आणखी डावीकडे महालक्ष्मी आणि समोरच माहीम-वांद्र्याची स्कायलाईन! 

"दोनच मिनटं दे मला जान आत जाऊन फ्रेश होऊन येते मी आणि गिफ्ट मी आल्याशिवाय उघडू नकोस"

महुआनी आठवणीने पर्स आणि फोन बरोबर घेतला. 
'हो उगीच अंकुशने उघडायला नको'

अंकुश आरामात सोफ्यावर पाय ताणून बसला, या वरळीच्या फ्लॅटवर तो सुद्धा बऱ्याच दिवसांनी आला होता . 
समोर जुने पेपर पडले होते. पहिल्याच पानावर दादा शिर्केचा फोटो होता. महिन्याभरापुर्वीची त्याच्या हत्येची बातमी मोठ्ठ्या अक्षरात होती. आणि गोळी लागण्यापूर्वीचा दादाचा शेवटचा फोटो… प्रचारसभेत तलवार घेतानाचा. 

अंकुशला दादाच्या आठवणीनी थोडं वाईट वाटलं… आणि थोडी भीतीसुद्धा!
बरं आपण नव्हतो सभेत नायतर आपला पण गेम होता!!
त्यानं उगीच एक नजर खिडकीवर टाकली. 
'ह्या फ्लॅटवर बरंय 'सी-साईट'चा असल्यामुळं समोरून कोण गोळी मारणार नाय 
पन दादाचे शत्रू कमी नव्हते. उगीच आपल्यालापण गोळी बसण्यापेक्षा दुबईत गायब झालेलं बेष्ट!'
त्यानं सहजच परत त्या प्रचारसभेच्या फोटो कडे नजर टाकली. एक मुलगी दादाला तलवार देत होती… तिनं अगदी शालीनपणेवगैरे मान खाली घातल्याने तिचं तोंड दिसत नव्हतं. 
पण अचानक त्याच्या लक्षात आलं: 
तिच्या हातावर गोंदलेले  तीन मासे अस्पष्टपणे दिसत होते.