Friday, 30 December 2016

(देह-फुलं: ५) मालफंक्शन

'पूजा की थाली' सिरियलच्या हजाराव्या एपिसोडची पार्टी...
डिसेंबर महिन्यातला सुखद गारवा...
'मॅरियट-जुहू' च्या बाहेर एकामागोमाग एक गाड्या सुळ्ळकन लागत होत्या आणि तारे तारका आत शिरत होते.
सगळा पोर्च 'डिओर', 'शनेल', 'हर्मिस' ...आणि व्हॉट नॉट परफ्युम्सच्या वासानी प्रमत्त यौवनेसारखा घमघमत होता.

सगळ्यात आधी आली पी. के. टी. (पूजा की थाली) चा हिरो रचित सिन्हाची 'बीमर'.
आपल्या दोन्ही गालांवरच्या खळ्या फोटोग्राफर्सनी पुरेशा टिपल्यायत याची खात्री करून तो दोन्ही हातांनी विजयी बट्ट्या दाखवत आत घुसला.

त्याच्या पाठोपाठ पी. के. टी.ची व्हॅम्प सिम्रन शर्मा आली.
ऑडीतून उतरल्या उतरल्या तिनं सटासट पाठमोऱ्या पोझेस दिल्या.
खोल खोल उतरत्या बॅकलेस काळ्या गाऊन मधल्या संगमरवरी पाठीचे पुरेसे फोटो निघाल्यावर ती आत गेली.

तेवढ्यात काळीशार मर्स आली आणि फोटोग्राफर्स थोडे सैलावले.
सिरियलची हिरॉईन पूजाचं काम करणारी बरखा आतून उतरली... पांढऱ्या शुभ्र साडीत.
तिनंच होस्ट केली होती आजची पार्टी.
बरखाचा सत्यनारायणाच्या प्रसादासारखा गोड चेहेरा, ऑन आणि ऑफ स्क्रीन असलेला 'संस्कारी' ट्रॅक रेकॉर्ड,
आणि अंमळ बोअरिंगच पर्सनल लाईफ (शून्य बॉयफ्रेंड्स) यामुळे पापाराझ्झी फारसे मागे लागायचे नाहीत तिच्या.
हिरॉईन ती असली तरी आजकाल सिम्रनचीच जास्त हवा होती खरं तर.
फोटोग्राफर्सनी कर्तव्यभावनेनं तिचे दोन चार फोटो क्लिक केले...
तिनं पोर्चमध्येच उभं राहून स्वतःच्याच पार्टीला उशिरा पोचल्याबद्दल सगळ्यांची माफी मागितली...
आणि अचानक धुवाधार पाऊस सुरू झाला...
फोटोग्राफर्स आपले महागडे कॅमेरे झाकायला धडपडू लागले...
बरखा आत धावायला लागली... पण तिचा पदर कारच्या दारात अडकला होता...
तो सोडवायच्या प्रयत्नात ती चिंब भिजली...
इतक्यात एका फोटोग्राफरचं लक्ष तिच्या शुभ्र भिजक्या ब्लाऊजकडे गेलं...
त्याचे डोळे विस्फारले...
आणि मग शंभर हजारो लाखो फ्लॅश लखलखत राहिले.


Friday, 23 December 2016

भयभीषण MACABRE

आधी याचा उच्चार मी 'मकाब्र' करायचो पण मग कळलं की तो 'मकाबर्' असा आहे.
म्हणजे खास पुण्यातले लोकं बरं म्हणताना ... 'बर्' म्हणतात... 'र' ला जास्त भाव नं देता.
(फॉर दॅट मॅटर कशालाच जास्त भाव नं देता पण ते 'Pun'plicit च :))
ह्यातही 'र' तेवढाच ठेवावा.


तर 'मकाबर्'
मराठीत याच्या जवळपास जाणारे शब्द आहेतच: भीषण, अघोरी वगैरे.
पण याचा शेवटचा पोट फुटका 'ब' आणि पाय तुटका 'र्' माझी जास्तच फाडतात.

धारपांच्या गोष्टींतले ते खुसूखुसू हसणारे बागुलबुवे आठवायला लागतात...
रोआल्ड डालच्या गोष्टीतली ती मृत नवऱ्याच्या जिवंत मेंदूसमोर सिग्रेट फुंकणारी मेरी...
म्हणजे कश्यप/नायरचा शैतान ठीक होता.
पण 'पांच'...
ते एकमेकांना बोचकारणारे रक्तबंबाळ करणारे मित्र...
ती अंधारी कोंदट मुंबई...
ती कचाकच हिंसा...
आणि यु-ट्यूब वरची ती ग्रेनी, धुरकट कधीच थिएटरचा उजेड न पाह्यलेली नल्ला प्रिंट! 

साक्षात 'मकाबर्'!

-नील आर्ते



 


Wednesday, 30 November 2016

अबलख

अबलख
हा अजून एक मस्त शब्द:

खरं तर इतके दिवस मला वाटायचं अबलख म्हणजे पांढरा शुभ्र घोडा.
पण शब्दकोषात कलर असा सांगितलाय:
चित्रविचित्र रंगाचा ; अनेक रंगांचा ; सर्व शरीर लाल असून त्यांत पांढरे , काळे , जर्दे पट्टे असलेला घोडा . हा घोडा फार दुर्मिळ होय . 

एनी वेज...
घोडा हा प्राणी आवडतोच आपल्याला.
अगदीच रहावेना म्हणून चित्र काढण्याची गुस्ताखी केलीये.
सगळ्या 'कुलकर्णी' चित्रकार मित्रांची माफी मागून :)

-नील आर्ते




Saturday, 26 November 2016

Epiphany: लख्ख_आकळण्याचा_क्षण

Epiphany!
कायच्या कायच आवडतो मला हा शब्द...
सगळा केऑस-कोलाहल-तडफड दोन क्षणांसाठी फ्रीझ होते...
शांत होऊन काहीतरी लख्ख उमगतं...
काय होतंय, काय हवंय, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे हे नीटच कळून जातं त्या क्षणी...

जसा 'लमाण' मध्ये डॉ. लागूंचा निर्णय झाला 'माउंट किलीमांजारो'वर... डॉक्टरकी सोडून ऍक्टींग मध्ये घुसायचा.

खरी लढाई याच्यापुढेच असते... जिकंण्या-हरण्याची गॅरंटी तर काय नसतेच.
पण अनिश्चयाचा अंधार कोपरा मात्र उजळलेला असतो.

-नील आर्ते




Sunday, 14 August 2016

ओ काका!

'बत्तीस' आणि त्याच्या तीस-चाळीस एव्हिएटर छबकड्यांनी जो काही वाय-झेड धुमाकूळ घातलाय या गाण्यावर...

प्रेमाचे कंटेम्पररी लिरिक्स: आवडेश
मधलाच छोटुसा हार्ड-रॉक पीस: आवडेश
सगळ्या पोरी मांजरी होऊन नुसत्या आऊट्टा कंट्रोल होतात: खूप आवडेश 
... आणि प्यांटीत झुरळ डान्स वाली स्टेप: आवडेश आणि गणपतीत कॉपी :) !!! 


इन योर फेस:
 


 

 
 

Tuesday, 2 August 2016

शाईन

केवढे साधे सोपे सुंदर लिरीक्स आहेत या गाण्याचे...
एखाद्या लहान मुलांच्या कथेसारखे आणि तितकेच प्रोफाउंड.
सर्व सोप्प्या कथा तशा असतातच...

सूर्य-चंद्राचं ते वैश्विक गुळपीठ...
जेव्हा एक सॉर्टेड, बलशाली मित्र दुसऱ्या व्हल्नरेबल कमी शक्तिशाली मित्राला मायेने समजून घेतो, समजावतो.
...गम्मत अशी की आपण हे दोन्ही रोल आलटून पालटून निभावतोच :)

आणि ते छातीत धम्म करणारे बिट्स.
सुहास शिरवळकरांच्या भाषेत "अय्याई ग्ग"!!!

गाणं इथे ऐका

- नील आर्ते

Thursday, 7 July 2016

विज्ञानकथेचं कॉकटेल

विज्ञानकथा मला नेहेमीच एखाद्या छान कॉकटेल ड्रिंक सारखी वाटत आलीये.
म्हणजे कॉकटेलमध्ये कसं अल्कोहोल असतं आणि बाकी सरबत, सजावट वगैरे...
आता 'विज्ञान-कथे'तलं विज्ञान म्हणजे अल्कोहोल समजा आणि बाकी "काल्पनिक, सामाजिक संदर्भ" वगैरे नॉन अल्कोहोलिक भाग.
आणि मजा काय आहे माहितीये का कॉकटेलसारखीच सायफायची सुद्धा "अल्कोहोलच्या" बदलत्या प्रमाणानुसार असंख्य लोभस रूपं आहेत :)

उदाहरणार्थ:
काही लेखकांच्या कथेत विज्ञान अगदी तपशीलवार असतं, त्याचं प्रमाणही अधिक.
कडक स्कॉच ऑन द रॉक्स सारखं.
(पहा: आशिष महाबळ यांच्या गणिती अ‍ॅल्गोरिदम्सवर आधारित कथा )
काही कथांमध्ये विज्ञान आणि फिक्शनचं प्रमाण सम-समान:
मस्त रम आणि थम्सअप सारखं
(पहा: बाळ फोंडके सरांच्या कौशिक-अमृतराव कथा)
तर काही कथांमध्ये लेखनाची नजाकत जास्त असते आणि विज्ञान थोडं पार्श्वभूमीला.
एखाद्या छान छत्री-बित्री लावलेल्या 'पिना-कोलाडा' कॉकटेलसारखं
(पहा: प्रसन्न करंदीकर यांची मी... माधव जोगळेकर ही कथा!)

पण विज्ञान कथा आणि कॉकटेल्स मधलं साम्य इथेच संपतं:
कारण कॉकटेल्स मेंदू सैलावतात तर विज्ञानकथा बहुधा मेंदूला झडझडून जाग आणतात.
'बहुधा' म्हणण्याचं कारण की भविष्यातल्या विज्ञानामुळे होणारे सामाजिक नैतिक पेच विज्ञान कथा
आपल्यापुढे बरेचदा मांडते,
तिच्यातून वैज्ञानिक संकल्पनांची ओळख बरेचदा होत असते,
पण तो तिचा "सोल पर्पज" नसतो आणि नसावाही.

याचं उत्तम आणि सर्वदूर पोचलेलं उदाहरण म्हणजे "हिच हायकर्स गाईड टू गॅलेक्सी" ही कादंबरीमाला:
ती विज्ञान कथा आहे पण ढोबळमानातच:
आपल्याच मस्तीत जगण्याच्या असंबद्धतेची वैश्विक खिल्ली उडवत, 'इंग्लिश' विनोदाचे चिमटे काढत ती पुढे जाते.
आणि जगभरातल्या वाचकांच्या गळ्यातला ताईत होऊन बसते.
किंवा आपल्या अंगणातील सुबोध जावडेकर यांची 'कलावंताचा जन्म' ही कथा:
जी चित्रकाराची प्रतिभा, टॅलंट जन्मजात असतं की जीवापाड मेहनत करून मिळवत येतं? 
सर्जनाच्या त्या लख्ख चार-दोन क्षणांसाठी आख्ख्या जीवनाची किंमत द्यावी का आणि ती तशी देता येते का?
अशा अनेक अडनिड प्रश्नांचा ती धांडोळा घेते.

या आणि इतर अनेक चांगल्या विज्ञान कथा...

मुद्दा इतकाच की विज्ञानकथा ही  मुदलात कथा असते.
कथेच्या निखळ आनंदासाठी वाचक ती वाचतात आणि आमच्यासारखे होतकरू लेखक त्या सोनसळी क्षणांसाठी लिहितात!

-नील आर्ते




Monday, 9 May 2016

तो 'टिंब टिंब' पिक्चर संपून बाहेर पडताना त्याला छातीत हबका आल्यासारखं झालेलं…
असा हबका तो उंचावरून चुकीचा पाण्यात पडला की यायचा छातीत…
आता मात्र हबका की हुंदका कोण जाणे… पण हबकाच बहुतेक…

पुढे कित्येक दिवस त्या 'आवडत्या' गाण्यावर नाचायला नाय होणार त्याला…
काही गोष्टी "स्टेन" होतातच…
पिक्चर काय नी आयुष्य काय आपल्या पिताश्रींची जहांगीर नाय प्रत्येक वेळी गोग्गोड व्हायला!

Friday, 22 April 2016

प्रोफॅनिटी

'मी काही शिव्या वगैरे काढणार नाहीये कथेतून',
ए. के. ठाम होती आणि ती अशी ठाम वगैरे असली की तिचा जबडा हटकून घट्ट आवळायचा!

'अगं पण थोडी टोन डाऊन कर ना कथा, केवढे ते एम-सी, बी-सी वर्ड्स? आणि सेक्स पण एवढा अंगावर येणारा दाखवलायस… वाचताना ठीक आहे एक वेळ पण इतक्या लोकांसमोर तू कथा वाचशील तेव्हा ऑकवर्ड होईल गं',
वैदेही तिच्या नेहमीच्या शांत-सॉर्टेड-ऋजू आवाजात.

'नाही ना पण वैदू… माझ्या कथेचा हिरो रस्त्यावरचा फाटका टप्पोरी आहे तो असा शिव्या देतच बोलणार आणि या कथेचा जर्मच सेक्स आहे तेव्हा ती वर्णनं  राहणारच.'

'पण स्त्री लेखिकेच्या कथेत एव्हढ्या शिव्या'… वैदेही चाचरत बोलली आणि ए. के. ची मेजर तार सटकली,
'अच्छा म्हणजे तुला शिव्यांबद्दल प्रॉब्लेम नाहीये तर मुलींनी शिव्या देण्याबद्दल प्रॉब्लेम आहे, यु ऑल आर ब्लडी हिप्पोक्रॅट्स!
मुलांनी सिगरेट ओढली चालते पण मुलीनी लाईट केली तर टवकारून टवकारून बघतात साले… भाडखाव!'

'अगं राणी पण कॅन्सर दोघांनाही होतोच ना?
तसंच शिव्यांचसुद्धा… मोठे-मोठे प्रकाशक लेखक येणार आहेत आपल्या हौशी लेखक मेळाव्याला… त्यांना हकनाक गांगरवून टाकण्यात काय अर्थ आहे?
गेले तीन महिने आपण सगळे हा मेळावा प्लान करतोय… थोडं तरी ऐक ना माझं.'

'नाही वैदू ही माझी क्रिएटीव्ह फ्रीडम आहे आणि त्याच्याशी तडजोड नाही म्हणजे नाही… मग भले कोणी माझी कथा ऐकली-वाचली नाही तरी चालेल '… जबडा घट्टच!

'तुझं नाव "आग्रही कारेकर" नसून "दुराग्रही कारेकर" पाहिजे होतं', वैदेही वैतागून बोलली… 'डी. के. नॉट ए. के.'

'नुस्तं डी. के. नाय "बॉस-डी. के." … हा हा हा!'

'प्लीज ऐक ना माझं… मला पळावं लागेल आता. आज लॅबमध्ये माझ्या नवीन प्रॉडक्टचा डेमो आहे'

'ओ के बेस्ट लक! डेमो चांगला झाला की मला ट्रीट द्यायचीस तू "मार्झोरीन"मध्ये'

'स्वीट-हार्ट "मार्झोरीन" काय तू कथेतल्या शिव्या काढल्यास तर तुला मी "मॅरीयट"मध्ये ट्रीट देईन गं राणी … फ़ाइव्ह स्टार सेव्हन कोर्स मील!', वैदेहीनी शेवटचा क्षीण प्रयत्न केला.

'वो तो नाही होगा डॉल!'

वैदेहीनी कपाळावर हात मारत हताशपणे स्कूटीला किक मारली!
-------------------------------------------------------------------------------------------------

एका आठवड्याने: लेखक मेळाव्याचा दिवस. 

Saturday, 13 February 2016

प्रिय अल्बर्ट काका यांस,

प्रिय अल्बर्ट काका यांस,
स. न. वि. वि. आणि मन:पूर्वक अभिनंदन.
स्वर्गात (आता हे मानण्या न मानण्यावर म्हणा) किंवा जिकडे असाल तिकडे मज्जाय बुवा आज एका माणसाची :)
'टोल्ड या' म्हणत कॉलर टाईट करूनच टाका…
क्षीण का होईना पण आवाज आलाय 'कृष्णा'-बेबी आणि 'विवर'-स्टडच्या धडकेचा…

कोणीतरी चिरगूट सडा-सिंग बोललाच,
"इतका बारीक आवाज आला तो ही इतक्या वर्षांनी त्याचं काय एवढं?"
त्याला काय सांगायचं यार?
कशी यशाची-प्रेमाची इटकू-बिटकू-इवलाली झुळूक काफी असते धडपड्या जीवाला ते?

आता त्या दिवशीचंच बघाना, मोठ्ठ्या ग्रुपमध्ये सगळे डिनरला बसलेलो आणि ती बाजूलाच.
म्हणजे आपलं बोलणंबिलणं काय नाय हां तिच्याशी जास्त… ती म्हणजे फ्रेंडच्या फ्रेंडची फ्रेंड…
कुठे चिपका उगीच… 
पण ते भोकर डोळे बघितले की छातीचा कापूस होतोच.
ते सोडा… 
तर पनीर हंडी मागवलेली आणि आम्ही अकराजणं…
दहा जणांत अर्धं अर्धं पनीर वाटलेलं… तिला शेवटचा तुकडा आणि आपल्याला इल्ला.    
पनीर म्हणजे आपला वीक-पॉइन्ट पण ग्रुपमध्ये चालतं यार… आपण कूल…
एकदिवशी पनीर नाय खाल्लं तर काय मरत नाय…   
माझी आपली समोर बसलेल्या विक्कीशी भंकस चालू…
त्याला टाळ्या देउन झाल्या…
आणि सहज प्लेटमध्ये बघितलं तर पनीर प्रगट…
तिच्या प्लेटमधलं पनीर गायब…
मॅडम बघतायत तिसरीकडेच…
देवा… दिल गार्डन गार्डन झालं आपलं!    
त्या पनीरची अंगठी करून  बोटात घातली असती राव मी…

शेवटी पनीर काय किंवा क्षीण आवाज काय… समझने वाले को इशारा काफी है… क्या चाचू?
आणि विंदा सरांनी म्हणून ठेवलंयचना, "तितके यश तुला रग्गड" वगैरे…
सो कॉन्ग्रॅट्स पुन्हा एकदा आणि हॅप्पी व्हॅलन्टाइन्स डे. 
आणि हो… ढासू हेअर-कट हां :)

-नील आर्ते   




    


Wednesday, 10 February 2016

(देह-फुलं: ४) घळ

सुजना शॉवरमधून बाहेर आली आणि आरशासमोर थबकली.
टॉवेल गुंडाळलेला आपला देह ती न्याहाळत राह्यली.
तिच्या चंदेरी केसांवर अजूनही कुठे कुठे पाणी चमकत होतं.
कपाळावर, गालांवर, डोळ्यांच्या कडेला काळानं साठोत्तरी खुणा उमटवल्या होत्या…
पण मान मात्र तशीच होती अजून… ताठ… हंसावलेली…
आणि मानेखाली तिची ती घळ… किंचित रुंदावलेली!

टॉवेल सोडून आपलेच उभार निरखले तिनं…
स्वच्छ नितळ सावळी जोडी… वयोमानानं थोडी उतरलेली…
एकाच वेळी उत्फुल्ल… आणि समजूतदारसुद्धा!

कबीर डोकं घुसळायचा त्यांच्यावर…
म्हणायचा पृथ्वीवर कुठे स्वर्ग असेल तर इथेच आहे… हमिनस्तू  हमिनस्तू  हमिनस्तू!
मग घट्ट लपेटायचा त्यांना चादरीत आणि उष्ण नि:श्वास सोडत रहायचा त्या घळीवर…
काहीतरी पुटपुटत चक्क गप्पा मारायचा त्यांच्याशी…
एकदा तर त्यानं कविता केलेली त्यांच्यावर…
मग ओढून घ्यायची ती त्याला आपल्या छातीवर आणि म्हणायची,
"घेऊन टाक तुझेच आहेत ते."
मग तो डोकं उचलून म्हणायचा,
"नाही ते तुझे आहेत फक्त तुझेच…
मी आहे एक वाटसरू ज्याला तू दिलीयस फक्त परवानगी आणि आसरा या मायाळू सावलीत…
जिथे मी लपू शकतो घटकाभर… जगाच्या भगभगीत प्रकाशापासून…
पण एरवी त्यांचं काय करायचं… ते किती आणि कोणाला दिसू द्यायचे हा सगळा हक्क तुझा आहे फक्त तुझा!"

आज कबीर खूप आठवत राह्यला तिला…
पण असे काय दु:खाचे कढ वगैरे येत नव्हते, उलट छान वाटत राह्यलं तिला.
तितक्यात फोन फरफरला… लीना होती.
हॅप्पी पासष्टी बेब्स… आज बर्थ-डेला अ‍ॅवार्ड घेतेयस हे मस्तच…
बरं संध्याकाळी फंक्शनला भेटूच… मुआ मुआ मुआ…
नेहेमीसारखं चिवचिवून लीनानं फोन ठेवला.

'संध्याकाळी काय घालायचं ठरवायला हवं'
सुजनानं वॉर्डरोब उघडला,
ऑरेंज कुर्ता आणि पॅन्ट्स…
निळा कुर्ता आणि पॅन्ट्स…
लाल कुर्ता आणि जीन्स…
पण विलक्षण कंटाळा आला तिला ते सगळे कपडे बघून, गात्रं गळून गेल्यासारखं झालं…
जाऊच नये वाटलं…
आणि अचानक तिला तो दिसला: एल. बी. डी.
ती आणि कबीर लंडनला असताना घेतलेला… वीस एक वर्षांपूर्वी.
विव्हियन वेस्टवूडचा तो सुपर-डुपर लो-कट काळा शॉर्ट ड्रेस!
तिनं अलवारपणे तो हॅन्गरवरून काढला आणि त्याच्या काळ्या सॅटीनवर गाल घासले.
घालावा आज... पण नको खूप क्लीव्हेज दिसेल… तिनं परत आत ठेवला.
तितक्यात कुठून तरी हॉट-पॅन्ट्स पडल्या… त्या तर अजून जुन्या…
कधीतरी एका पार्टीत तिनं हॉट-पॅन्ट्स घातलेल्या आणि कोणत्यातरी पोरींनी "किती काळे पाय ते" वगैरे कायतरी कुजकट कमेंट्स पास केलेल्या...
तेव्हा कबीरनं समजावलेलं,
"अरे सोड ना बेब्स… तुझ्याइतक्या चांगलं नाचू शकत नायत म्हणून जळते त्यांची.
कसली गोड दिसत होतीस तू…
फाट्यावर मार त्यांना… आणि त्या काय आपल्याला जेवायला देतात काय? गेल्या उडत!"

कबीरच्या आठवणींनी ती मग दिवसभर मंद मंद हसत राह्यली.

संध्याकाळी:
------------------------------------------------------------------------------------------
खच्चून भरलेल्या हॉलमध्ये तिनं एन्ट्री टाकली आणि अचानक सगळे शांत झाले.
तिला खुद्कन हसूच यायला लागलं…
एका कोपऱ्यातून लीनी 'फाकडू' ची खूण करत होती तिला तिनं ओठांनीच कीस फेकला…
आणि ती सगळ्या नजर झेलत पुढे झाली…
छातीवर आगगोळे घेणाऱ्या खुल्या बुरजासारखी!

-सुझन सरेण्डन यांना सादर अर्पण!



    



Friday, 8 January 2016

(देह-फुलं: ३) हॅप्पी एन्डिंग

कोणे एके काळी माझा एकटा जीव सदाशिव शोधत फिरायचा स्पर्श आणि उब:
शरीराची आणि फक्त शरीराची बरं का!
मुंबईत बापाचे तीन-तीन बार ऑटो-पायलट वर चालत होते.
रग्गड पैसा, भरपूर वेळ, कमावलेली तब्येत आणि स्वर्गीय आईचे ढासू फीचर्स: गालांवर खळ्या वगैरे…
पोरी तर समोरून यायच्या कायम आपल्याकडे…
पण लहानपणापासून आई-बापाची भांडणं पायलेली आणि तेव्हाच ठरवलेलं हे प्रेम लग्न-बिग्न झंझट आपल्याला नको म्हणजे नको. 
मग कशाला उगीच फसवा कोणाला… 
आणि खरं सांगू का कॅज्युअल सेक्स असं काही नसतं… किती काही म्हणा पण दोन देह एक झाले की जीव गुंततोच.  
उगीच त्या मुलीला त्रास, आपल्याला त्रास!
मी तिला वापरलं तर आपल्याला हरामी वाटत राहणार, आणि तिनी मला वापरलं तर चुत्या!
नकोच तो रायता…
त्यापेक्षा पैसा फेको और हलका हो जाव सिम्पल हिशोब!
पण एक दिवशी अस्सा झटका बसला ना आपल्याला त्याचीच ही ष्टोरी:

त्या वर्षीच्या उन्हाळ्यात मुंबईत ज्याम बोअर झालेलं आणि तशात जिममध्ये वजनं उचलताना पाठीत उसण भरली!
पिताश्री बोलला, 'जा बँकॉकला मस्त मसाज-बिसाज करून ये पाठ मोकळी कर.'
आणि त्यानं हळूच डोळा मारला.
मग काय मी थडकलो बँकॉकला.
आता बँकॉकचा मसाज म्हणजे जगप्रसिध्द:
तीन-तीनदा वाकून लाघवी हसणारे गोड लोकं… घेऊन जातात हळूच आपल्याला नैतिकतेच्या बांधापलीकडे.
आणि खरं सांगायचं तर त्या बांधापलीकडे आपण फक्त पाय बुडवतो व्यभिचाराच्या त्या उबदार झऱ्यात… पूर्णपणे डुबकी नाय मारत.
शुद्ध मराठीत सांगायचं तर सेक्स-बिक्ससारख्या चीप गोष्टी होत नायत हां या पार्लर्समध्ये… 
फक्त थोडीशी गम्मत… थकल्या भागल्या 'गात्रां'चे लाड… ते सुद्धा दोन्ही पार्ट्यांच्या परमिशननी.
म्हणजे अगदी संसारी लोकांना सुद्धा अपराधी वाटायला नको काय?
खिसा मात्र हल्लका होतो ते सोडा.
पण आपल्या तर संसाराचा आणि पैश्याचा काहीच प्रॉब्लेम नाय.
पण तसंही खरं सांगू का अशावेळी नाही म्हणणं हेच जास्त अनैतिक आहे माझ्या मते.
म्हणजे भर दुपारी रणरणत्या उन्हात तुम्ही मित्राबरोबर शिवाजी पार्कच्या जिप्सी बार मध्ये गेलायत आणि तो तुम्हाला गारेगार फेसाळत्या बीअरचा ग्लास ऑफर करतोय तर उपास आहे म्हणून तुम्ही तो न पिणं हे उपास मोडण्यापेक्षा जास्त मोठं पाप आहे माझ्या मते.
मुदलात तुम्ही गेलातच का आत बार मध्ये? त्यापेक्षा समोर शुद्ध शाकाहारी 'प्रकाश' आहे तिकडे बसायचंत ना
आता उदाहरणार्थ माझ्या तेव्हाच्या परिस्थितीचा तुम्ही अगदी डिसपॅशनेटली विचार करा म्हणजे माझं म्हणणं पटेल तुम्हाला:
म्हणजे एका टॉवेल शिवाय तुमच्या अंगावर काही नाहीये…
तो टॉवेल सुद्धा काय गाठ बीठ मारलेला नाय…
असा नुसताच पसरलेला निष्काळजी… आपल्या कामाविषयी फार सिरियस नसलेल्या स्टार-पुत्रासारखा.
लाज राखली-नाय राखली… व्हॉट-एव्हर!
अज्ञातातून आल्यासारखं वाटणारं संगीत… मनाला, शरीराला, सगळ्या विश्वाला हुरहूर लावणारं…
आणि त्यात ती झोपाळू डोळ्यांची मसाजिस्ट…
अशी काय खूप सुंदर नव्हती ती… खरं सांगायचं तर मी तिच्यापेक्षा बराच स्टड होतो.
पण बोटांत जादू होती तिच्या… पाठीची उसण कुठल्या कुठे गायब केली होती तिनं.
आणि माझ्या शरीराच्या कानाकोपऱ्यातले सुखाचे झरे अनुभवी पाणक्यासारखे मोकळे केले.
दोघांचेही श्वास जड झालेले… 
दोघांचेही डोळे अर्धे मिटलेले… माझे निवांत सुखाने  आणि तिचे एशियन जीन्समुळे :)
तर अशा वेळी तिनं हळूच तिची ऑफर माझ्या कानात पुटपुटली… आणि मग माझ्या कानाची पाळी चाटली!
आता हे लक्षात घ्या की मी काय डेस्पो माणूस नाय…
पण ज्या तऱ्हेने ती पार्लरमध्ये घुसल्यापासून सिग्नल देत होती… मला थोडा अंदाज आला होता.
(आणि सिक्स्थ सेन्स ही काय फक्त पोरींची मक्तेदारी नसते बरं का!)
त्यामुळे जेव्हा ती काहीच न मागता 'बरंच काही' द्यायला तयार झाली तेव्हा मला फारसं आश्चर्य वाटलं नाही.
पण ज्या गोष्टीसाठी लोकं खास बँकॉकला येउन पैसे मोजतात ती मला चक्क फ्री मिळत होती... 'ऑन द हाउस' महाराजा… आहात कुठे? नाही म्हटलं तरी माझा पुरुषी ईगो खुषारलाच.

बस्स आता काय काय झालं याचे डिटेल्स काही मी तुम्हाला देणार नाहीये.
आधीच सांगितलं मी काय व्हल्गर माणूस नाय.
तिनी कसं आणि काय काय केलं… ते करताना कसं माझ्या डोळ्यांत बघितलं सुद्धा नाही हे मी काहीच तुम्हाला सांगू शकत नाही… सॉरी बॉस!
मुलगी मग ती कोणीही असो मी तिचा रिस्पेक्ट करतोच करतो.
भले ती मला 'फ्री सर्व्हिस' देत होती पण म्हणजे लगेच काय ती गरजू आणि मी उपकारकर्ता होत नाही.
मी तिच्यापेक्षा बराच उजवा असलो तरी मी काय तोंड वाकडं करून समाजकार्य केलं असं नाही काही.
मलाही मजा आलीच:
जेव्हा तिचे लहानखुरे उद्धट उभार मोकळे झाले तेव्हा छातीत धम्म झालं माझ्या.
तिचे चुटूक ओलसर ओठ चाखायला आवडले असते मला पण भलतेच व्यग्र होते ते दुसरीकडेच…
चलता है… मी तसा लहानपणापासून हट्टी नव्हतोच.
आणि कधी कधी शरण जाण्यातही मजा असते.
मग शरण गेलो मी त्या छोट्याश्या कोंदट रूमला, त्या उग्र सुवासिक तेलाच्या गंधाला, तिच्या उबदार हाताला आणि पाठच्या त्या अज्ञात संगीताला…
आणि एका क्षणी अचानक आलाप घेतला त्या गाण्यानं…
आणि माझ्या शरीरानंसुद्धा…
मेंदू सुम्म झाला…
सगळे विचार जणू उसळी मारून बाहेर पडले शरीरातून…
'तू पहिला की मी पहिला' करत आक्रमण करणाऱ्या लाखो योध्यांसारखे…
उसळून उसळून दाद दिली मी तिच्या लयदार कामगिरीला.…
आणि मग झालो शांत तृप्त!
ती प्रेमळ आई सारखं समजूतदारपणे हसली क्षणभरच,
आणि मग लगेच तिनं मला एका चांगल्या हाताने रूमबाहेर ढकललं.
आत्ता तिचा दुसरा हात कुठे गेला ते प्लीज मला विचारू नका.
मी फक्त एवढंच सांगेन की तो 'चिकट खरकटा' हात जिकडे गेला तिकडे जायची माझी तमन्ना अधुरीच राह्यली .
------------------------

चार  वर्षांनी मी परत बँकॉकला गेलो मित्राच्या बॅचलर पार्टीला…
आम्ही रमतगमत त्याच एरियात फिरत होतो.
मला मिळालेल्या 'फ्री सर्व्हिसची' बढाई मी ऑल्मोस्ट मित्रांपुढे मारणार इतक्यात मला ती दिसली…
शांत तृप्त आनंदी…
आणि तिच्या हातात… होय त्याच 'हाता'त एका छोटूकल्या पोराचा हात होता ज्याच्या खळ्या सेम माझ्यासारख्या होत्या!

----------------------------------------------------- समाप्त -----------------------------------------------------
-नील आर्ते

निखिल क्षिरसागर ह्याच्या 'द फर्टिलीटी टेस्ट' ह्या कथेचे स्वैर रूपांतर. 

मूळ इंग्रजी कथासंग्रहाची लिंक: https://www.amazon.in/dp/B0978LHHF9