गोष्ट "ऐकण्यासाठी" इथे क्लिक करा
----------------------------------------
मटणाच्या रश्श्याचा घमघमाट सुटला होता… दोन दोन पेग व्हिस्कीनं अरुकाका, एस. के., आणि पुनीत तिघांच्याही पोटात आग लागली होती!
तेव्हढ्यात मम्मीनी ताटंच घेतली.
चौघंही टेबलावर बसले.
स्टीलची चकचकीत ताटं… चकचकीत वाट्या… कांदा-टॉमॅटो-दह्याची कोशिंबीर… गरमागरम मऊसूत चपात्या… वाटीतला वाफाळता लालभडक मटणाचा रस्सा… आणि खास पुनीतसाठीच्या वाटीत मोठ्ठा नळीचा तुकडा!
पुनीत खुशारला, "मम्म्या आय लव्ह यू!"
त्यानं तीन चार किसेस हवेत फेकले आणि नळी गरम गरम असतानाच चोखली.
आतला बोन-मॅरोचा घसघशीत गोळा बक्कन त्याच्या तोंडात गेला!
किंचित तुपकट… उबदार… गुलगुलीत राखाडी-पांढऱ्या रंगाचा तो ऐवज पुनीतच्या घशातून खाली उतरला आणि त्यानं सुखानं डोळेच मिटले!
मम्मीना प्रेमाचं भरतं आलं, "माझं लेकरू गं ते पाय मोडून बसलंय बिचारं… खा बाळा खा… हाडात शक्ती यायला पाह्यजे लवकर लवकर… माझं पोर ते… ही मेली दळिद्री लोकं कुठेपण फुटपाथवर झोपतात आणि आम्हाला त्रा…"
एस. कें. नी त्यांच्या मांडीला हळूच चिमटा काढला तेव्हा कुठे त्या गप्प झाल्या.
"काय मग अरुशेठ कोणता नवीन प्रोजेक्ट चाललाय सध्या?" त्यांनी सफाईनं विषय बदलला.
आवडीचा विषय निघाल्यावर अरुकाका तरारला, "अरे सध्या आम्ही मायक्रॉइड्सवर काम करतोय!"
"मायक्रॉइड्स म्हणजे?"
"सांगतो… नॅनो-बॉट्स ऐकलेयत ना तुम्ही? म्हणजे सूक्ष्म यंत्रमानव!"
"नॅनो कार माहितीये माला", पुनीत फिदीफिदी हसला… "त्या दिवशी गाडी ठोकली तेव्हा एक नॅनो पण चेपली… ओय ओय"… एस. कें. नी त्याच्या धडक्या पायावर टेबलाखालून जोरात पाय मारला!
"अरू त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस… अहो तुमच्या पोराला अजून पेग देऊ नका आता, लगेच टाईट होतो तो… तू बोल पुढे!"
"तर आम्ही थोडा वेगळा विचार केला: नॅनो बॉट्स पूर्णपणे यांत्रिक असतात पण त्यांच्यात काही जैविक गुणधर्म आणता आले तर?"
उदाहरणार्थ मुंग्या किंवा वाळवी किंवा मधमाश्यांइतकी कार्यक्षमता आणि बुद्धिमत्ता!
ह्या मठ्ठ सूक्ष्म यंत्रांना चांगला मेंदू आणि थोडाफार कॉन्शस देता आला तर?
… म्हणजे मानवाएवढा नाही पण एखाद्या मुंगीएवढा?"