Wednesday 7 December 2011

मुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग 2)

काळी सकाळी राजधानी बेकरीतून आणलेला खरपूस ताजा पाव,
८७,३१६ चा बस स्टॉप...सकाळचे साबण पावडरीचे प्रसन्न वास,
शेअर रिक्षाची गडबड...
ह्याच बस स्टॉपवर 'टेम्पा'ने नव्या कोऱ्या बाईकवरून शानमध्ये एन्ट्री टाकली होती..आणि हेल्मेट घातल्याचं विसरून तोंडाच्या काचेवरच गुटखा थुंकला होता.

विनायककडची वडा-उसळ  आणि एक्स्ट्रा उसळीबरोबर खाल्लेले २२ पाव.
पाटीलचा फेमस वडा-पाव.
समर्थ मधले चहा-सिगरेटचे अड्डे...उजाला बार मधली पिणार्यांची (खास करून शनिवारी रात्रीची) आनंदी मचमच.

कॉलनीने पोरांना खूप काही शिकवलं...मुख्य म्हणजे जग आपल्या बाबांचं असल्यासारखा कुठेही घुसायचा कॉन्फीडन्स दिला:
मग ते सह्याद्रितलं अवघड शिखर असो की पॉश फाइव स्टार हॉटेल!
पोलीस-स्टेशन असो किंवा हातात तलवारी घेतलेल्या पोरांची फिल्ड!

ही अत्रंगी पोरं..सगळ्यांना वाटायचं ह्यांचं आयुष्यात काही होणार नाही...

होळीला अती दारू पिऊन मेल्यासारखा निपचित झालेला 'तो'...
गर्लफ्रेंडसाठी उंदरांच विष पिऊन मरणाच्या दारातून परत आलेला 'तो'...
'डिस्को डान्सर'ची पट्टी म्हणून अंडरवेअरचं इलॅस्टिक डोक्याला अडकवणारा तो...
सायकली चोरणारा 'तो...
१२ वी ला ७ वेळा नापास होणारा 'तो...
घरची गाडी विकून आलेले सगळेच्या सगळे ७० हजार लेडीज बार मध्ये उडवणारा 'तो...
रोज शाळेत कर्कटकने मारामाऱ्या करणारा 'तो...
रोज नवीन मुलीला भिडणारा (प्रपोज करणारा) 'तो... हा रोज भिडायचा म्हणून याच नाव 'प्रदीप भिडे' ठेवलं होतं...

पण यथावकाश ह्यातले बहुतेक सगळे 'तो' सुधारले आणि मस्त सेटल झाले.

बरेचजण आता कॉलनीत पूर्वीची शान राहिली नाही म्हणून हळहळतात.
पण ते फारसं खरं नाहीये...आपण 'इन-डिस्पेन्सिबल' होतो असं वाटून घ्यायचा तो सोपा मार्ग आहे.

१९६५ साली बनलेल्या कॉलनीने २ ते ३ पिढ्या तरुण होताना बघितल्या आणि अजूनही कित्येक पिढ्या कॉलनीच्या कुशीत दुनियादारी शिकतील.


आणि मग कॉलनीतली अनुक्रमे  ३५ आणि ४१ वर्षाची दोन पोरं जगात कुठेही भेटली की...
विविध "फटका बहिणींच्या" जोड्यांच्या गुलाबी आठवणी काढतील,
रस्त्यावर पडलेलं बिस्कीट हळूच "राम की भूत?" विचारून खातील,
करवंदांचा "कोंबडा-कोंबडी" जुगार खेळतील,
आणि बोलतील "भेन्चोद कसली धमाल करायचो नं आपण"?



-पांढऱ्या
-उर्फ गोरा रणजीत
-उर्फ गणपत पाटील (च्यायला आवाज अंमळ उशीराच फुटला)
-उर्फ गाय उर्फ हम्मा
-उर्फ एक कॉलनीवासी.
(राहणार ब:२५३ / १  : नम्रता क्रीडा-मंडळ.)













Thursday 24 November 2011

मुंबई कोलाज: गव्हर्मेंट कॉलनी (भाग १)

का पोराच्या बाबांना हार्ट-अ‍ॅटॅक आला आणि डोम्बिवलीवरून खूप दगदग व्हायची म्हणून ते वांद्रे कॉलनीत शिफ्ट झाले.
तो पोरगा तेव्हा डोंबिवलीच्या आठवणीने खूप रडायचा...त्याचे मित्र, त्याचं घर आणि मिलिंद बोकिलांच्या 'शाळा' पुस्तकातल्यासारखी ती "गोड" डोंबिवली.

पण मग त्याने हळूच आजूबाजूला बघितलं आणि त्याला दिसलं प्रत्येक चौकातल मोठ्ठ मैदान, नवीन अफलातून मित्र, रिक्षाने पाच मिन्टांत समुद्रावर जाण्यातली गम्मत.
चौकातली छान छान झाडं, जग्याची पेरूची बाग, हर्शलच्या बागेतली जांभळी आणि जास्वंदीच्या झाडाचा टांगा.
त्याला कॉलनी खूप वेगात आवडायला लागली होती:

२६ जानेवारीची पूजा, त्याच्या आधीच्या पूजेच्या मिटींगा आणि त्यातली ती टाईमपास भांडणं.

७ नंबरच्या पोरांच्या कबड्डी मॅचेस,
ज्ञानेश्वर मंदीर आणि समोरच्या पुजारी पानवाल्याकडच्या जीरा गोळ्या.

कॉलनीमागची सुंदर खाडी आणि तिच्यात खोल घुसणारी फुटक्या पाईपची पाऊलवाट,
खाडीत घुसून होळीसाठी तोडलेली झाडं आणि ढोपरापर्यंत चिखल माखून आल्यावर आईचा खाल्लेला मार.

कॉलनीतल्या चौका-चौकातली चिंचेसारखी पानं असलेली झाडं...(http://en.wikipedia.org/wiki/Peltophorum_pterocarpum)
ही एप्रिल महिन्यात ऐन परीक्षेत मंद सुवासाच्या पिवळ्या फुलांचा भरभरून सडा टाकायची म्हणून यांचं नाव परीक्षा झाड!

पतंग, भोवरा, गोट्या, भूत भूत, डबा ऐसपैस, शीग रूपवा रुपवी असे  एक लाख खेळ!
सुट्टीतली घराबाहेर दोर्या बांधून आणि त्यांच्यावर पुस्तकं लटकावून केलेली लायब्ररी..आपलं कलेक्शन वाढवायला पोरं बिनधास्त हिरा पेपर मार्ट मधून कॉमिक्स ढापून आणायची!
जाधवकडच्या भाड्याच्या सायकली...आणि पंक्चर करून आणल्यावर त्याच्या खाल्लेल्या अस्खलीत शिव्या.

पावसाळ्यात शाळेत जाताना गटारात पकडलेले सप्तरंगी मासे आणि चतुर ...काही माश्यांना चक्क २ दिवसांनी हात पाय फुटायचे आणि मग कळायचं की ते बेडूक होते ;)
घरात इकडे तिकडे आरामात फिरणारे एक अब्ज पायवाले गोंडस 'पैसा' किडे. 

दही हंडी आणि चिखलातला फुटबॉल.
वरच्या थरातल्या कोणीतरी खालच्यांच्या अंगावर केलेली सू सू!

गणपतीतल्या घराघरात जाऊन म्हटलेल्या मनसोक्त आरत्या आणि निश्चलकडच्या गौरीच्या ३२ प्रकारच्या भाज्या.

जय अंबे क्रीडा मंडळाचा दांडिया आणि चुकीच्या टिपर्या मारत शेकून घेतलेली बोटे.

दिवाळी:
रात्री जागून केलेले अवाढव्य कंदील.
पहिल्या अंघोळीच्या पहाटे चौकात हळू हळू वितळणारा आनंदी अंधार...कोरे कपडे ...एका हातात फटाक्यांची पिशवी आणि दुसर्या हातात उदबत्ती.
खडूस लोकांच्या घरात टाकलेले उदबत्तीला बांधलेले टाईम बॉम्ब..
पीठ बॉम्ब..आणि तो फुटल्यावर पिक्चर मध्ये दाखवतात तसा आगीचा लोळ.
भाऊबीजेच्या रात्री सगळे फटाके संपवून टाकल्यावर लागणारी हूरहूर.

गच्ची:
पतंगींची काटा-काटी.
टप्प्यावरून मारलेल्या उड्या,
खजुराहोच्या वरताण काढलेली चित्र,
वर्गणी काढून सहा जणांत प्यायलेली एक बीअरची बाटली. (मुळू मुळू रडणारा तो पोरगा थोडा मोठा झाला होता! )
चोरटी मेकआउट सेशन्स..आणि खास मित्रांनी दिलेला पहारा!

नडींग:
समोरच्या चौकातल्या  पोरांबरोबरची खुन्नस...एक लाख मारामार्या.
डोक्यात खळकन फुटलेली ट्यूब लाईट आणि भळाभळा ओघळणारं रासबेरी.
कॉलनीतल्या मारामारीची पण एक खास स्टाइल आहे..
गुडघ्यात किंचित बसून दोन्ही हातांच्या मुठी वळून अंधाधुंद  हात फिरवणारा पोरगा दिसला की समजून जावं.. हा कॉलनीत मारामारी शिकलाय.

उसळ, नारळ, सुबल्या, टेम्पा, मडक्या, कांद्या, पोन्क्ष्या, कॅडी, हड्या, नल्या अशी पोरांची अफलातून नावं.

कॉलनी शब्द-कोष:
  1. सही मे दही: एकदम मस्त!
  2. सुमडीत: हळूचकन, कोणाला न समजता!
  3. आडी: प्रेयसी.
  4. डेम: वरीलप्रमाणे.
  5. टेबल: डेटवर जाणे.
  6. टेपा लावणे: थापा मारणे.
  7. बॉम्बर: थापाड्या 
  8. 'गोपाळा गोपाळा देवकी नंदन गोपाळा': टेपा लावणाऱ्याला थांबवण्यासाठी हा गजर केला जातो.
  9. आमी काय बॉल गिळला?: खोट्या आरोपांना उत्तर देण्यासाठी.
  10. वंटास: गायब होणे.
  11. 'नेवला न्यू आयटम फाईट': विशेष काही अर्थ नाही ..मूड आल्यास कधीही हे वाक्य ओरडावे.
  12. 'वर बघ' ..'हात बदल': रस्त्यांनी जाणार्या मुलाला त्रास देण्यासाठी.
  13. डबा टाकणे: 'शी' ला जाणे.
  14. किक येणे: 'शी' ला येणे.
  15. आडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो ..सोडी गुडी कुट्टी गुड्डी हेय्यो हेय्यो: मॅच जिंकून आल्यावर ओरडायचे विजयगीत. 

खालील शब्द थोडे जास्त सेन्सॉर्ड आहेत:
जिज्ञासूंनी विचारणा केल्यास पर्सनल ई मेल वर अर्थ पाठविण्यात येईल:
  1. टग्ग
  2. सड्डम 
  3. पापड तळणे
  4. चीमोऱ्या
  5. टीपा बघणे 
  6. बापट पिक्चर 
  7. कांदाचिरी 
  8. राजू 
  9. पडी
लवकरच..गव्हर्मेंट कॉलनी (भाग २)
-नील आर्ते







Sunday 6 November 2011

(गोष्टुली: ५) गच्ची

कोडच्या जंगलात तो हरवून गेला होता....आज कसंही करून बग फिक्स करायचा होता आणि सहज त्याचं लॅपटॉप च्या उजव्या तळाशी घड्याळाकडे लक्ष गेलं. आईच्या गावात... ४: १५ झाले होते!

त्याने धावत पळत लिफ्ट पकडली, 
लिफ्ट मिळून १३ व्या मजल्यावरच्या रिक्रिएशन रूममध्ये  येईपर्यंत ४: २० झालेच होते.
पण डान्स क्लासचं कोणीच पब्लिक अजून आलं नव्हतं...'आज क्लास कॅन्सल बहुतेक'!

त्याला हायसं वाटलं, 'म्हणजे चला आपली प्रॅक्टीस बुडाली नाही तर'!
कंपनीने एम्प्लॉयीजसाठी कंपनीतच हा डान्स क्लास चालू केल्यापासून त्याने एकदाही बुडवला नव्हता..
मिटींग्स, प्रेशर, डेड लाईन्स मध्ये दगदग व्हायची पण तो कसाबसा मॅनेज करत होता.

गच्चीला लागूनच रिक्रिएशन रूम होती, तिकडेच त्यांचा आठवड्यातून २ दिवस क्लास चालायचा.

आज कधी नव्हे तो गच्चीचा दरवाजा उघडाच होता ...तो सहजच पुढे गेला 
आपल्या कंपनीला एवढी सुंदर प्रशस्त गच्ची आहे हे त्याला माहीतच नव्हतं.... 
हिवाळ्यातली कलत्या दुपारची गोजीरवाणी उन्हं गच्चीभर पसरली होती आणि एवढ्या उंचावरून खाली अफाट पसरलेल पुणे दिसत होतं.

समोर चतु:शॄन्गीचा मोठ्ठा डोंगर...पावसाळा उशीरा सरल्याने हिरवी मखमल अजून कायम होती.
उजवीकडे मॅरीयट हॉटेलची सेवन स्टार बिल्डींग आणि त्यांचा ४ थ्या मजल्या वरचा स्विमिंग पूल...एखाद्या किमती खड्यासारखा तो निळाशार तुकडा चमकत होता.
डावीकडे थोडी पाठी वेताळ टेकडी, इकडूनही टेकडीवरचं छोटंसं चुनखडीच मंदीर आणि वॉक करणारी इवलुशी माणसं दिसत होती.

त्याने कठड्या वरून वाकून खाली पाहिलं...
त्याची नजर खाली गेली आणि त्याला ती प्राचीन कळ आली...
प्रत्येक मानवाला येणारी...उंचावरून बघताना! 
त्याच्या ओटीपोटातून चालू होऊन छातीत...तिथून  घशात आणि मग मेंदूत.
एकाच वेळी भीती आणि आकर्षण आणणारी!

खालची शिवाजी कॉलनीतली आंब्याची झाडं आणि छोटुलं जॉगर्स पार्क पण वरून मस्त दिसत होतं...जणू त्याला हात हलवत बोलावत होतं.
त्यानं हळूच आजूबाजूला पाहिलं...गच्चीवर चिटपाखरू सुद्धा नव्हतं. 

हलकासा वारा वाहत होता, त्याचं सकाळपासून ताणलेला मन शांत होत गेलं.
कामाचं प्रेशर, डेड लाईन्स... 
जॉब जाण्याची भीती, कर्जाचे हप्ते...
'तिच्या'एवढा चांगला डान्स येत नाही म्हणून तिने केलेलं भांडण, ब्रेक-अप आणि तिची रोज संध्याकाळी येणारी दुखरी आठवण.....  
सगळा सगळा कोलाहल शांत झाला.....

खूप दिवस तो हे करण्यासाठी धीर गोळा करत होता. 
तो कठड्या पासून थोडा मागे झाला, 
त्याने मन एकाग्र केलं, स्टार्ट घेतला...दोन्ही हात पक्ष्यासारखे पसरले आणि उडी मारली!!!


गर्रकन पाठीवरून उलटा फिरून तो पायांवर थोडा अडखळत लॅन्ड झाला....
त्याला चक्क "हिप-हॉप" ची "बॅक फ्लिप" जंप जमली होती!

त्याच्या चेहेर्यावर विजयी हसू पसरलं आणि जगाशी लढायला तो नव्या उत्साहाने गच्चीवरून खाली उतरला!!!


-नील आर्ते
   






Sunday 30 October 2011

ज बऱ्याच वर्षांनी 'तो' झिपमध्ये अडकला आणि बऱ्याच वर्षांनी ब्रम्हांड आठवलं!
लहानपणी 'तो' अडकलेला तेव्हा बाबा मदतीला आलेले.

आता बाबा नाहीत पण ब्रम्हांड मात्र आठवलंच.
डोळ्यांत टचकन पाणीच आलं...नव्हे बाबांच्या आठवणीने नव्हे...खूप झोंबल्यामुळे.
बाबांच्या आठवणीने रडू कधीच येत नाही....छातीत दुखतं मात्र खूप!

त्या वेळी बापाने आपल्या पोराला अलगद हळूच संकटातून सोडवलेलं...आणि मग वेदना आणि शरमेनी लाल झालेल्या पोराला दिलखुलास हसून थोपटलेलं.

आता मात्र पोरालाच स्वतःचा बाप होऊन स्वतःची मदत करायला लागली,
स्वतःची आणि स्वतःच्या छोट्या भावाची सुद्धा!

-नील आर्ते

Friday 28 October 2011

मुंबई कोलाज: वांद्रे पूर्व

बाबांबरोबर मी लहानपणी बरेचदा ठाण्याला जायचो.... रात्री उशीरा परत येताना सायन वरून उजवीकडे वळलो की खाडीचा तो चिरपरिचित वास नाकात घुसायचा आणि ड्राईव-इनच्या पडद्यावरचा पिक्चर रस्त्यावरूनही दिसायचा...
मग पेंगुळलेल्या मनाला खात्री पटायची की आपण घरी आलोय...वांद्र्यात! आणि उगीचच खूप छान वाटायचं.

बेहराम-पाडा आणि खेरवाडी! सगळं काही आलबेल असलं तरीही दोघांमधला अगदी सू sssssssssss क्ष्म ताण (जो ९२ नंतर कधीच पूर्ण जाऊ शकणार नाही. )

खेरवाडीतली २७ नंबरची नवरात्रीतली  स्निग्ध नजरेची देखणी देवी, "पास-नापास" मंडळाचा गणपती.
मनोहरकडचे समोसे, ३४ नंबरची भायगिरी.

अमेय मधली कोथिंबीरवडी, हाय-वे गोमंतक मधले स्टीलच्या चकचकीत थाळीतले ताजे फडफडीत सेक्सी फिश फ्राय, बोरकरची उकडलेला बटाटा मिक्स केलेली मिसळ!

एम. आय. जी. क्लबचे ग्राउन्ड, त्याच्यावरचा आजोबा पिंपळ आणि त्यावर हिवाळ्यातल्या कोवळ्या सकाळी बघितलेले बुलबुल, दयाळ, बार्बेट आणि इतर अनेक गॉर्जीअस पक्षी.  
गेट जवळचं आंब्याचं उतावळ झाड ज्याला जानेवारी एंड मध्येच इटुकल्या कैऱ्या लागतात. 

क्लब मध्ये साजऱ्या केलेल्या एक लाख थर्टी फर्स्ट आणि अंगात आल्यासारखा केलेला डान्स!

दातांचे डॉक्टर डिगीकर, त्यांचे पांढरे शुभ्र केस आणि दात कोरताना चालू असणारी विविध भारतीवरची जुनी भावगीतं.

शांत साहित्य सहवास आणि आतलं फणसाच झाड, त्याला लटकणारी अज्रस्त्र वटवाघळ!
वरती गच्चीवर अभी सावंत बरोबर घासलेलं बी. एस. सी. चं फिजिक्स...
आणि खाली पार्किंगमध्ये त्याचीच वयाच्या सव्वीसाव्या वर्षी निघालेली अंत्ययात्रा!

स्वामी नारायण मंदिरापाठी मिळणाऱ्या "अणुबॉम्ब"च्या बिया, ज्या पाण्यात टाकल्यावर बरोब्बर एक मिनिटांनी ठाप्प करून फुटायच्या.

गुप्ताजी भेळवाला, त्याच्याकडची मऊसूत रगडावाली पाणीपुरी आणि तोंडात टाकल्यावर होणारे तिखट आंबट गोडसर चवींचे स्फोट!

आणि तशाच एक लाख तिखट आंबट गोडसर आठवणी!

तुम्ही एक नोटीस केलंय?
नेहमी "बॅन्ड्रा वेस्ट" असतं आणि "वांद्रे पूर्व" ...
बॅन्ड्रा वेस्ट म्हणजे मीनीज घालणारी फुल्टू फटका बोल्ड मुलगी!
आणि वांद्रे पूर्व म्हणजे तिची सलवार कमीज घालणारी चष्मीस, शांत, पण तितकीच ग्रेसफुल मोठी बहिण! 

गव्हर्मेंट कॉलनीत अशा साध्या + चाबूक बहिणींच्या जोड्या खूप होत्या हे कॉलनीतला कोणताही पोरगा मान्य करेल ;)
अर्थातच खूप खूप लवकर : गव्हर्मेंट कॉलनी!!!

-नील आर्ते











Tuesday 25 October 2011

माटुंग्याच्या लेन मधून आणलेला षटकोनी ढब्बू आकाश कंदील.
त्याचे पहाटे तीन वाजता पडणारे लाल पिवळे उबदार कवडसे.
नमाच्या शाळेतील पोरांनी बनवलेल्या गॉर्जीअस पणत्या.
म. न. से. नी दारात अडकवलेल उटणे.
आईच्या शंकरपाळ्यान्चा बांद्रा स्टेशन वर येणारा खरपूस वास. 
फटाके ....सोड ना ... पैसा, कान, बालमजूर, पर्यावरण सगळ्यांचे छत्तीस. 
FCUK चा विक्केड काळा शर्ट.

उद्या आणि परवा आणि तेरवा सुद्धा ऑफिस नसल्याची गुदगुदलीदार जाणीव .
आणि चार वाजता उठून दिवाळी पीत पीत लिहिलेलं हे स्टेटस अपडेट. 


इन शॉर्ट हॅप्पी हॅप्पी हॅप्पी दिवाळी !!! :)

-नील आर्ते

Saturday 15 October 2011

"शनिवारचा" स्टड

प्रिल मधली शनिवार संध्याकाळ, शिवाजी पार्कचं सी सी डी तरुणाईने फुललेलं.
त्याने एन्ट्री टाकली आणि सगळ्या पोरींचं काळीज लक्कन हललं.
ट्रेंडी स्पाईक्स, "जॅक-जोन्स" ची मांडीवर फाटलेली डार्क ब्ल्यू जीन्स आणि "डिझेल"चा तलम स्लीवलेस टी शर्ट.
शिवाय कमरेवर उगीचच स्टायलीत बांधलेला लाल चेक्सचा "स्कॉच एन सोडा"चा फ्लॅनेल शर्ट.  
सव्वा सहा फूट उंची, शिडशिडीत बांधा पण फोर आर्म्स आणि दंडात दिसणारी प्रचंड ताकत.

सी सी डी मधल्या विविध मुली विविध कारणांसाठी तात्काळ त्याच्या प्रेमात पडल्या:

मियाला त्याच्या वाईड नेक टी शर्ट मधून दिसणाऱ्या रुंद  छातीवरला तीन मूर्तींचा एक्झॉटीक टॅटू आवडला,

सुहानीला त्याचे रुसक्या पोरासारखे किंचित फुगलेले गाल खूप क्युट वाटले,

आणि साल्साला आवडली त्याची नजर: एकाच वेळी किंचित रागीट, आश्वासक आणि निरागस, 
चक्क तिला पाहूनही तिच्या "गळ्याखाली" न जाणारी बेदरकार, शांत स्थिर नजर !

सगळ्या मुलींच्या प्रेमळ + त्यांच्या बॉय फ्रेंड्सच्या जळू नजरांना फाट्यावर मारत आपल्याच मस्तीत त्याने एक टेबल पकडलं आणि तो शांतपणे टिश्यू-पेपर्सवर काहीतरी लिहित बसला.

साल्सा तर वेडावली होती, माहित नाही किती वेळ गेला १० सेकंद? ५ मिनटं? की २ तास?

अचानक तो उठला,
हसत दाणदाण पावलं टाकत तो साल्साकडे आला, आणि त्याने तो टिश्यू-पेपर साल्साला दिला. 
साल्सा थुयथुयली, नक्की त्याचा नंबर देत होता तो. 
तिच्या डोक्यावर अलगद प्रेमळ हात ठेवून तो आला तसा परत फिरला आणि निघून गेला.

साल्सानी खुशीत टिश्यू उघडला आणि ती बावचळली अक्खा टिश्यू पेपर राम-नामाने भरला होता, आणि कुठेतरी हनुमान जयंतीची आरती जोरात चालू होती.
-------------------------------------------------


वाचकहो या गोष्टीला खालील श्लोकाचा आधार आहे :
अश्वथामा बळीर्व्यासो हनुमानाश्च  विभिषण कृपाचार्य च परशुरामां सप्तैता चिरांजीवानाम  
अर्थ : अश्वथामा, बळी, व्यास,  हनुमान, विभिषण, कृपाचार्य, आणि परशुराम  हे सात चिरंजीव आहेत.
-नील आर्ते


Wednesday 12 October 2011

(गोष्टुली: ४) वास


न्हाळ्यातली  प्रसन्न सकाळ!
सकाळी ८ वाजता पुण्यातल्या त्या छोट्याश्या सार्वजनिक बागेत अजूनही सुखद गारवा होता.
बहावा पिवळाधम्मक फुलला होता ...
माळ्याने निगुतीने लावलेला कवठी चाफा, पहाटे पडलेला प्राजक्ताचा सडा, वेडं बकुळीचं झाड,
आणि पाचोळ्याच्या शेकोटीचा धूर या सगळ्याचा मिश्र धुंद वास भरून राहिला होता. 
 बागेतील एका शांत कोपऱ्यात खुशीत त्याने सगळा वास छातीत भरून घ्यायची तयारी केली ...

आणि व्हाईटनरची  बाटली परत नाकाला लावली!


-नील आर्ते

Friday 7 October 2011

मुंबई कोलाज: बॅन्ड्रा वेस्ट


स्टेशनचं ब्रिटीशकालीन गेट आणि समोरचा 'यादगार' फालुदा : 
तिथे लटकवलेल्या नवसाच्या सुरया, फालुद्यावरची माव्याची खापरी आणि कधी कधी पोट खराब झाल्याने लागलेली "गाळण" :),
लकीची बिर्याणी आणि त्यातले खरपूस बटाट,
हिल रोडवरची गर्दी आणि तरतरीत सावळ्या 'माका-पाव' मुली,  
हर्श बेकरी आणि गोडसर मेयोवाला (विनीतच्या भाषेतला :)) "पॉवर" बर्गर.


माउंट मेरी फेअर मधली गजबज, काळ्या चण्यांचा प्रसाद आणि त्यावरून पास केलेले एक लाख "ढामढूम"  जोक्स.
बॅन्ड-स्टॅन्ड वरची कपल्स, छक्के आणि पोलिसांच्या शिट्या.
कॅम्पचा ज्यूस!
बॅन्ड-स्टॅन्ड सी सी डी त  बसून प्यायलेली वाफाळती कॉफी आणि समोरचा उफाळता पावसाळी ग्रे समुद्र.
रॉक्समधले खेकडे पकडायचा वेडसर प्रयत्न, 
आणि कपारीतला लाजरा खेकडा लपल्यावर स्वतःही लपणारा थोडासा "टाईट" पुरी :)

कॅन्डीज मधले गोव्याचा फील देणारे रंगीबेरंगी दिवे आणि बनाना मिल्क-शेक.
लीलावतीमधली बाबांची अ‍ॅन्जिओग्राफी आणि फाटलेली %$#@.

रफिक भायच्या 'सेकण्ड चान्स' मधले अशक्य सुंदर स्टायलीश शूज,
कार्टर रोडवरचे गडगंज श्रीमंत पण 'वन्टाय ,वन्टाय' करत जीवाला जीव देणारे वैभवचे मुस्लीम मित्र.
स्टमक मधलं चायनीज!

गेइटी-गॅलेक्सी मधले समोसे आणि शेवटचा शो सुटल्यावर कब्रस्तानाजवळून भीत भीत मारलेला शॉर्ट्कट.

सेंट सबॅस्टीयन स्कूल मधले शामकचे डान्स क्लासेस.
जरी मरी मंदिर आणि बांद्रा तलावातली बदकं.

लिंकिंग रोड, चपलांची दुकानं आणि मुलींचे घासाघीस करून घामेजलेले पण अख्ख्या जगाची दौलत मिळाल्यासारखे फुललेले चेहेरे :)

एका दिवाळीत मी आणि नमानी केलेली बेहोष खरेदी आणि शेवटी रात्री १२ वाजता स्टाफ बरोबर बंद केलेलं शॉपर्स स्टॉप!

ह्यूज,फेंडी, कॅज्युअल्स, किंक, साय ब्रांश, रुचिरा (हे पोरींचं फेवरेट) .......असंख्य ट्रेंडी कपडे वाली बुटीक्स,
आणि जगातले सगळे ब्रॅन्ड्स!

मी कधी एल. ए. ला गेलो नाही (खरं तर अजून विमानातच बसलो नाहीये :) ) पण असं ठाम वाटतं की लिंकिंग रोड, पाली हिल, कार्टर रोड नक्की एल. ए., सनसेट बुले व्हा, बेवर्ली हिल्स सारखं असणार.
कदाचित थोडं कमी स्वच्छ पण शुअर शॉट जास्त प्रेमळ!


(लवकरच मेरी जान वांद्रे पूर्व )

Tuesday 4 October 2011

(गोष्टुली: ३) गुन्हा


त्याचे डोळे गिल्टी प्लेझरनी चमकत होते, 
समोर पडलेल्या देहातील निर्जीव डोळे धुरकट काचेसारखे दिसत होते.
त्याने अजून सटासट घाव घालून त्याचे बारीक तुकडे केले ..रक्त थिजलेल होतं पण एक ओघळ चाकूवर आलाच.
त्याने ओलसर ओठांवरून जीभ फिरवीत आजूबाजूला बघितलं ..सगळा पुरावा बेमालूम नष्ट करायला हवा होता. 
तो पकडला गेला असता तर वाट लागली असती.

सगळी सोसायटी फक्त व्हेज लोकांसाठी होती ..मासा तळण्यापेक्षा कालवण केल्यास वास फारसा बाहेर गेला नसता!


-नील आर्ते

Wednesday 28 September 2011

(गोष्टुली : २) कुणीतरी येणार येणार गं


चिमण्या पावलांची चाहूल लागल्या पासून तो तिला जीवापाड जपत होता.
डोहाळेजेवण, वनभोजन सगळं अगदी साग्रसंगीत झालं होतं ...तिचे डोळे तृप्तीने जडावले होते.
थोडं हिमोग्लोबीन कमी होतं पण डॉक्टर म्हणाले ,'फारसं काळजीचं कारण नाही'....
 आणि तो दिवस उजाडला!
त्याला ऑफिसमध्ये ती गोड बातमी कळली. 

नऊ महिन्यांपूर्वी केलेल्या अर्जाचे सगळे सोपस्कार पूर्ण झाले होते.
उद्या त्यांचं बाळ कर्जतच्या अनाथाश्रमातून घरी येणार होतं.


-नील आर्ते

Tuesday 27 September 2011

गोष्टुल्या!


या आहेत छोट्याश्या गोष्टी: गोष्टुल्या!
ट्विटर, फेसबुक आणि एसएमएसवर मावणाऱ्या.
पण यांना नाव , सुरुवात-मध्य-शेवट सगळं काही आहे.
आणि हो तुमच्या माझ्यासारखी अफलातून पात्रंसुद्धा!


(गोष्टुली : १) तिचं हसू 
ती गो sssssss ड हसली आणि तो पुन्हा एकदा तिच्या प्रेमात पडला.
ते तिचं खास ठेवणीतलं "ब्रेक-अप" स्माईल होतं!

-नील आर्ते

Saturday 24 September 2011

मुंबई कोलाज: शिवाजी पार्क


 टीब्सची आंबट-तिखट चवीची आमचूर वाली चिकन फ्रॅन्की, पार्काच्या कट्ट्यावरचा मारुती व्हॅनमधला मलई गोळेवाला!

 ओवन-फ्रेशमधलं मश्रूम रीसोत्तो आणि गूई चॉकलेट केक.
प्रकाशची मिसळ आणि आस्वादची गोड कचोरी. 
भागीरथी मॅन्शनमधला मंदारकडचा गणपती आणि विसर्जनाला केलेला सुसाट डान्स.
कॅडलरोड वरच्या सण्ण-सण्ण जाणाऱ्या कार्स. 

 मोहन निवास मधलं माई मावशीचं घर, तिथली थंड फरशी आणि तिचा कुसका दीर,
इकडे एकदा मुन्गळ्याने कडकडून चावून माझं रक्त काढलं होतं.

 समर्थ व्यायाम मंदिर आणि त्यांची रॉक क्लाइम्बिन्गची वॉल.
उद्यान गणेश आणि बंगाल्यांची मोट्ठे डोळेवाली देखणी देवी.

 गांधी पूल, सकाळचं चमचमत पाणी आणि व्हॉलीबॉल.
टॉपचा डायविंग बोर्ड, उजवीकडचा सोन-वर्खी  समुद्र....पोटातला गोळा आणि सगळ्या शंका १.५ सेकंदात पार करणारी टरकॉइझ पाण्यातली उडी!
शॉवरमधली भसाड्या आवाजात गायलेली गाणी, अस्लम भाईच्या कॅन्टीनमधला आम्लेट पाव,वडा उसळ आणि कैरीचं झाड. 
गेटबाहेरचा मोठ्ठ्या मिश्यावाला दाणे विकणारा चाचा. 

 स्लॅशसमोरचा ८७ चा बस-स्टॉप.
मी नेहमी स्लॅशकडचे ट्रेंडी कपडे हौसेनी बघत बसायचो पण आत जायची डेअरिंग व्हायची नाही.

 स्काउट हॉल मधलं पुस्तक प्रदर्शन, आणि बरिस्तासमोरचा बाईकवाल्यांचा शो ऑफ!
मैदानावरची नेट प्रक्टिस आणि चिखलातला फुटबॉल.
संध्याकाळी कट्टयावर लगडलेले विविध ग्रुप्स आणि फसफसता उत्साह.
वॉक करणाऱ्या चाबूक मुली आणि मुलांच्या टेबल फॅन सारख्या फिरणाऱ्या माना!!!

 एस. पी. जी. मध्ये टेनिस खेळणाऱ्या एका फटका मुलीवर माझ्या मित्राचा मेजर क्रश होता.
तिचं नाव आम्ही स्टेफी ठेवलं होतं आणि रोज संध्याकाळी ५ वाजता तिला फक्त जिमखान्याच्या आत जाताना बघायला आम्ही खास बांद्रयावरून जात असू :)

 सगळं आठवलं की वाटते तेव्हा आपण तरुण आणि वाय. झेड.  होतो
आणि आता .....फक्त वाय. झेड. !!!

(लवकरच बॅन्ड्रा वेस्ट )





Wednesday 21 September 2011

मुंबई कोलाज : दादर वेस्ट

 यडीअल बुक डेपो, पुस्तकांचा कोरा करकरीत आणि बाजूच्या मुतारीचा मिश्र वास,
फास्टर फेणेची अशक्य सुंदर पुस्तकं.
उभा वडा, छबिलदासची खोल खोल आणि कधी कधी बाउन्सर जाणारी नाटकं, धुरू हॉलमध्ये अनोळखी लग्नात घुसून हादडलेल जेवण.
प्लाझाचा लाफिंग बुद्ध, आणि टिळक ब्रिज वरचा पहाटेचा भाजी बाजार.
गोमंतकच्या बाहेरची ला SSSSSSS म्ब रांग, खांडके बिल्डींगमध्ये मावशीकडे खाल्लेला लालचुटुक मटणाचा रस्सा.

 लक्ष्मी कंगन कॉर्नर जवळ कशावरून तरी आई-बाबांचं झालेले मोठ्ठ भांडण आणि आता ते 'घफस्टोट' घेणार अशी उगीचच वाटलेली अल्लड भीती.
पाणेरी, सोनेरी, काचेरी, भंबेरी  ..अशी काय काय साड्यांची दुकानं आणि प्रदीप स्टोअरच्या बाहेरचा रफुवाला.
शिवाजी मंदिरातला तिसऱ्या घंटेनंतरचा गर्भ काळा अंधार आणि बाबांबरोबर परीक्षेच्या आदल्या दिवशी पाहिलेलं "कलम ३०२". 
छत्र्यांचे जगप्रसिद्ध डॉक्टर, कबुतर खाना आणि अतिरेक्यांच्या %#$% चा परत %^$%@.

 गणपतीत चालू होणारी आणि दिवाळीची वर्दी आणणारी व्यापारी पेठ, रानडे रोड वरचा दिवाळीच्या आदल्या दिवशीचा केऑस, आणि अ‍ॅडॅक्समधली आयुष्यातली पहिली इलॅस्टिकची फुल पॅन्ट.

......तुम्हाला काय वाटलं शिवाजी पार्क विसरलो ना ?? NO F#$%@G WAY! 
खास शिवाजी पार्कचा वेगळा कोलाज याच ठिकाणी याच वेळी उद्या :)


Monday 19 September 2011

मुंबई कोलाज : दादर इस्ट

स्वामीनारायण मंदीर (इकडे आमचा शैलू आणि शिल्पा पहिल्यांदा भेटले)!
स्टेशन बाहेरच्या इराण्याकडची ट्रेकर लोकांची मैफल.
हिंदू कॉलानीतली गर्द झाडं, शांत गल्ल्या आणि लाकडी जिने.
मुंबई पुणे बस स्टॅन्ड वरचे  चलाख ट्रॅव्हल एजंट्स आणि शिवनेरी वेटिंग रूम मधले सकाळचे प्रसन्न अभंग. रुईयातली तरुणाई, मणी'ज कडची अनलिमिटेड चटणी आणि बालदीतल सांबार.
कैलाशकडची दाट गोड लस्सी.

सगळ्यात अलीकडच्या रुळावर थांबलेल्या सुस्त मेल्स.

४ नंबर प्लॅट्फॉर्मवर सकाळी ७ वाजता येणारी इंटरसिटी आणि सोमवार सकाळची हुरहूर,
१ नंबर प्लॅट्फॉर्मवर शुक्रवारी रात्री ९ वाजता येणारी तीच इंटरसिटी आणि वीकएंडचा जोश! 

कोहिनूर हॉलमध्ये अटेंड केलेली लाखो लग्न आणि विधींनी पकल्यावर गोड जेवणाआधी हळूच मारलेली बिअर. 
एन जी के क्लास मधला रगडून केलेला अभ्यास आणि १० वीचं दडपण! 
गावावरून आल्यावर बाबांनी टॅक्सीवाल्याशी केलेला लफडा आणि प्रवासात विस्कटलेल्या चुकार कुरळ्या केसांत खूप व्हल्नरेबल, गो ssssss ड दिसणारी आई!

असं खूप काही काही!

(उद्या अर्थातच दादर वेस्ट :))

Saturday 17 September 2011

मुंबई कोलाज : गिरगाव

मुंबई कोलाज :
हे आहेत माझ्या डार्लिंग मुंबईच्या विविध भागांतले वास , आवाज , रंग आणि स्पर्श... एखाद्या कोलाज सारखे एकाच वेळी तरतरी आणणारे आणि हुरहूर लावणारे. चालू करतोय गिरगावपासून :

गिरगाव : चर्नीरोडचा ब्रिज , गायवाडीतला चिक्कीवाला , प्रार्थना समाजातला उदबत्तीचा वास, ओपेरा हाउस वरचे हिऱ्यांचे सौदागर आणि फाफडा जिलेबी (अतिरेक्यांच्या %#$% चा %^$%^ ), ती पत्रिकांची दुकाने, सी पी टॅन्क वरच्या गायी, चाळींच्या शेरीतला आंबूस वास आणि राजुदादाच्या सेंटचा घमघमाट, फडकेवाडीचा गणपती, प्रकाशची ती सूक्ष्म टेबल्स आणि स्वर्गीय साबुवडा, मिणमिणत्या चिमणीतला गंडेरीवाला. 
शेणवे वाडीतले राडे आणि मठाबाहेरचे गजरे....आणि या सगळ्यात असूनही नसलेला समुद्र!

उद्या (दादर इस्ट )






Saturday 3 September 2011

तो एक ब्लॉगर होता

तो एक ब्लॉगर होता ....रोज ब्लॉग टाकायचा आणि चेक करायचा एकसारखा ...
नवथर प्रेमिकाच्या उत्साहाने...
कोणाला आवडले कोणी कमेंट्स टाकल्या ...कोण फॉलो करतेय का ?
नवी कमेंट आली की तो तरारून यायचा .
आणि ६ चे ७ फॉलोअर झाले तेव्हा तर नाचता नाचता त्याचा टॉवेल सुटला .

तो एक ब्लॉगर होता ...पण त्याला भूकही लागायचीच आणि त्यामुळे अर्थातच कामही  करावं लागायचं.
पण प्रोग्राम लिहिता लिहिता ....एक्लिप्स आणि rally च्या गुंत्यात आणि...बोअरिंग मिटींग्समध्ये..
तो laptop अर्धवट झाकून साळसूदपणे टाईप करायचा ...
पावसाच्या थेंबांची गाणी ...प्रेमभंगाची तडफड आणि दही हंडीची नशा !!!

तो एक ब्लॉगर होता....त्याला सिरीअसली वाटायचं की लोकांनी दिवसभर त्याचा ब्लॉग चेक करायला हवा किमान फेसबुकवर लाईक तरी,
पण वेडे लोक मुलांची admission , कर्जाचे हप्ते , आजारपण वगैरे क्षुल्लक गोष्टींतच अडकून राहायचे ,
आणि त्याचा ब्लॉग तसाच राहायचा ....नटून छान तयार होऊनही बॉय-फ्रेंड ने टांग दिलेल्या पोरीसारखा ....वाट बघत.


पण तो फारसं वाईट वाटून घेत नसे ....कारण तो एक ब्लॉगर होता .
सकाळी उठून त्याने नव्या उत्साहाने ब्लॉग उघडला आणि ...
३ नवीन कमेंट्स होत्या ...मनापासून लिहिलेल्या ...
त्याचं पुन्हा फुलपाखरू झालं कारण तो एक ब्लॉगर होता....आणि ते तिघंसुद्धा :)

-नील 



Wednesday 31 August 2011

किरण येले यांची अप्रतिम कविता : "सुरमई" (मौज दिवाळी अंक 2010)

तुम्हाला सुरमई माहित आहे का ?
बरोब्बर !
चवदार रसरशीत सुरमई कुणाला माहित नाही ?
पण तुम्ही सुरमईविषयी आणखी काही सांगू शकाल ?
अरे तुम्हाला तर सगळंच माहिती आहे :
तिची चमचमती त्वचा ,
तिचं ताजेपण ओळखण्याची कला,
तिची महागलेली किंमत...
सगळंच.
आता आणखी विचारलं तर तुम्ही सांगालही :
तिला काय केलं म्हणजे ती जास्त चवदार होते ते ,
तिला एखाद्या पार्टीत सर्व्ह करताना कसं सजवावं ते .
किंवा तिला खाण्यापूर्वी कसं मुरवत ठेवावं ते.

पण माफ करा ,
तुम्हाला सुरमईविषयी सगळंच माहित आहे 
असं तुम्हाला वाटत असेल तर ते साफ चूक आहे :
तुम्हाला सुरमईच समुद्रातलं सळसळण माहित नाही ,
तुम्हाला सुरमईला काय आवडतं ते माहित नाही ,
तुम्हाला सुरमई आतल्या आत काय विचार करत असते ते माहित नाही ,
आणि जाळ्यात सापडल्यावर सुरमईची होणारी उलाघाल तर तुम्हाला नक्कीच माहित नाही !

एक सांगतो ,
रागावू नका :
तुम्हाला खरं तर सुरमईची फक्त चव माहीत आहे ,
सुरमई नाही .

आणि जे सुरमईच्या बाबतीत 
तेच-
अगदी 
तेच-
बाईच्याही 


-किरण येले 


Thursday 25 August 2011

साठे सर

 पूर्व पार्ल्यातील पोह्यांना (स्विमिंग शौकिनांना :) साठे सर माहिती नाहीत असं होऊच शकत नाही. सर जवळ जवळ पन्नास वर्ष स्विमिंग शिकवतायत , पण अजूनही उत्साह तेवढाच दांडगा.माझी त्यांची ओळख तशी अलीकडली , चार वर्षांची !

 तो पण एक किस्साच , मी थोडा फार हौशी डाईव्हर .....एक दिवस माझ्या मनानं घेतलं पूलच्या सर्वात उंच मजल्यावरून हेड फर्स्ट सूर मारायला शिकायचं. पण अडचणी  बऱ्याच होत्या : आधीच मी मित्रांमध्ये "कडक-सिंग" म्हणून बदनाम , त्यात मार्गदर्शनाच्या नावानी बोंब ! मी हळू हळू १ मीटर , ३ मीटर , ५ मीटर, ७.५ वरून चुकत माकत थोडी फार डाईव्ह बसवली आता  बाकी फक्त Top फ्लोअर : १० मीटर !
 पण सालं १० मीटरवर गेलं की डोकच काम नाय करायचं , गोट्या फीट !
तरीसुद्धा डेअरिंग करून मारल्या उड्या , पण व्हायचं काय की उंचावरून खाली डोकं वर पाय असा आलो की फोर्सने माझं डोकं आणि पाय पाण्याच्या पातळीला समांतर व्हायचे आणि मी पाण्यात साटकन पाठीवर आपटायचो !
  काही केल्या हा प्रॉब्लेम काही सुटेना , नैराश्याचं मळभ दाटून यायला लागलं , वाटू लागलं की आपण कडक-सिंग होतो आणि कडक-सिंगच रहाणार !
कोणीतरी सांगितलं की पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे स्विमिंग पूलवर साठे सर असतात ते कदाचित तुला गाईड करतील .

 झाले मी पार्ल्याच्या प्रबोधनकार ठाकरे पूलवर थडकलो आणि आपल्याला बघताच क्षणी माणूस आवडून गेला:
वय वर्ष सत्तरच्या आसपास , एके काळी "य" स्विमिंग केल्याची साक्ष देणारे मजबूत खांदे , पण बांधा खरंतर कमी उंचीच्या मुष्टी-योद्ध्याशी जवळीक सांगणारा, उन्हात मनसोक्त पोहल्याने रापलेला मुळचा गोरा रंग आणि चेहऱ्यावर एकाच वेळी श्रीराम लागून्सारखं देखणेपण आणि बाळासारखे निर्व्याज भाव !

 त्यांना मी माझा प्रॉब्लेम सांगितला आणि ते सटकन उत्तरले ,"अरे म्हणजे तू ओव्हर जातोयस , बहुतेक लोक जास्त उंचीवरून अंडर जातात तू ओव्हर जातोयस".
माझी झापडं काहीच न कळल्यानं उघडी ...मग त्यांनी मला अंडर आणि ओव्हर म्हणजे काय ते सोप्प्या भाषेत समजावून दिलं.
"काळजी करू नको उद्या सकाळी ८ वाजता पूलवर ये आपण बसवू तुझी डाईव्ह".
 दुसऱ्या दिवशी माझ्या आधी ते पूलवर हजर ! मी चुकत माकत जंगली पद्धतीने शिकलेलं सगळं त्यांनी आधी unlearn करायला लावलं. tuck , pike इत्यादी डाईव्हचे प्रकार समजावून सांगितले. 
आम्ही परत अगदी साध्या डेकपासून श्री गणेशा चालू केला आणि माझी डाईव्ह हळूहळू बसू लागली.

 त्यांच्या पोतडीत छोट्या छोट्या फार छान युक्त्या असतात. उदाहरणार्थ :
जी डाईव्ह मी ७.५  मीटर वरून ठीकठाक मारायचो तीच डाईव्ह शेवटच्या १० मीटरवरून मारताना मात्र फाटायची. खरं तर दोन्ही फ्लोअरमध्ये फार तर ८ फुटांच अंतर पण डोक्यात psychological block बसलेला. साठे सरांची आयडीआ : "अरे आपण मध्ये आणखी एक लेवल टाकू , .७.५ मीटरवर एक स्टूल ठेवू. तेवढेच २ - २.५ फूट वाढतील ना !" तेव्हा मनोमन पटलं की हा माणूस जीनियस आहे !
एकंदरीतच गोष्टी हडेलहप्पी पद्धतीने करण्यापेक्षा , स्टेप बाय स्टेप शास्त्र-शुद्ध पद्धतीने करण्यावर भर!

खरं तर ते आता  कागदोपत्री रिटायर्ड झालेले पण रोज संध्याकाळी आणि बरेचदा सकाळीसुद्धा त्यांची पूलवर फेरी असते.खासकरून एप्रिलमधल्या चिल्ल्या-पिल्ल्यांच्या उन्हाळी स्विमिंग वर्गात त्यांची नजर घारीसारखी फिरत असते. रंगीबेरंगी चड्डी घातलेलं चेहऱ्यावर रडावे भाव असलेलं चिमणं पाखरू ते अलगद वेचून बाजूला काढतात आणि मग चालू होतो त्या पाखराचा स्पेशल क्लास ...'मार हात - मार पाय ...' साठे सर त्या बच्चूला चिथावत त्याच्याबरोबर काठाने धावतात तेव्हा त्याच्या अंगात काहीतरी संचारलेल असतं , डोळे चमकत असतात आणि मग त्यांना राहवत नाही ते झटकन कपडे काढतात आणि पाण्यात उडी ठोकतात.

 अशी हजारो पोरं त्यांच्या हाताखाली तयार झालीयत . आता तर त्यांचे विद्यार्थी जगभर विखुरलेत आणि ते त्यांना कुठून कुठून स्विमिंगवरची परदेशी मासिकं ,सी.डी. ज असं काय काय पाठवत असतात.
आता तर साठे सरांच्या हाती इंटरनेटच आयुध आलंय आणि ते टीन-एजरला लाजवणाऱ्या उत्साहाने माहिती गोळा करायला वापरतात.

पूर्व पार्ल्यात हनुमान रोड वर , दत्त रामानंद सोसायटीत त्यांची लहानशी सुबक मठी आहे , तिकडे ते स्वीमिन्गच्या नशेत एकटेच रहातात. माझा कधी मूड ऑफ असला की मी हटकून त्यांना भेटायला जातो ...त्यांचं ते स्विमिंगवरचं धबधबा बोलणं ऐकलं की सारं नैराश्य पार पळून जातं :)

या जिनिअसला आपला सलाम !

-नील आर्ते

Saturday 13 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

५."आय. टी." सुंदरी: सुंदर फिटिंगचा फॉर्मल top , trousers ! एका खांद्याला झकास पर्स आणि दुसऱ्या खांद्यावर laptop bag !

आढळण्याची ठिकाणे :  मुंबई किंवा पुणे शिवनेरी बस Stand : शुक्रवार संध्याकाळी ६ ते ९ !
पण बस stand वर त्यांच्याबरोबर हमखास एक आय. टी. मित्र / कलीग / वन वे आशिक असतो आणि तो नेहमी त्यांच्यापेक्षा बुटका असतो :)

-सुंदरी सिरीज समाप्त (निदान सध्यापुरती :))
-नील आर्ते

Wednesday 10 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

४."सर्किट" सुंदरी: आपल्याकडे देवानं काय ठेवा दिलाय , आपण केवढ्या सुंदर आहोत इ. इ. गोष्टींची बिल्कुल जाणीव नसलेला हा प्रकार ..
चुकीचा हेअर-कट , इल फिटिंग जीन्स , मळके शूज आणि शून्य मेक-अप !
पण या सगळ्यातून तरारून येणारा हट्टी फुलासारखा देखणेपणा !!
यांचं ९८ टक्के वेळा मुलींपेक्षा मुलांशी झकास जमतं , 
toilet ला चक्क जोडीदारीण न घेता एकटा जाणारा हा स्त्री वर्गातील दुर्मिळ उप-प्रकार.


आढळण्याची ठिकाणे : खदखदून हसणाऱ्या पोरांच्या ऑल दांडेकर ग्रुपच्या केंद्रभागी बहुधा सर्किट सुंदरी सापडते , प्रभात रोड वरची Film Institute , University ची library अशा जरा "डीप" आणि intelctual ठिकाणी पण सापडू शकतात.


उद्या: लीनाच्या खास आग्रहावरून "आय. टी. " सुंदरी

Monday 8 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

3."नोज-रिंग" सुंदरी: डोळ्यात काजळ , चेहेऱ्यावर रागीट भाव आणि  अर्थातच नाकात रिंग .
हे नोज रिंग आणि रागीट चेहेर्याचं काय नातं आहे सालं माहीत नाही.
मला सांगा तुम्ही कधी तरी नोज रिंग सुंदरी हसताना बघितलीय ? मी तर नाही ..नाय नो नेव्हर !!!
खर तर एकदा MCdonald's मध्ये एक नो. रीं. सुं. तोंड उघडून हसतेय असं वाटत होतं पण तितक्यात तिनं विचकलेल्या तोंडात हात घालून दाढेत अडकलेला चिकनचा तुकडा काढला ..आणि हसरी नो. रीं. सुं. बघायचा तो पण चान्स गेला !
पण खरं तर तो रागीटपणा त्यांच्या चार्ममध्ये भरच घालतो !


कपडे: काळा टी शर्ट किंवा कुर्ता आणि जीन्स 
आढळण्याची ठिकाणे : बहुधा कॉल-सेन्टर्सचे स्मोकिंग झोन्स. 


उद्या: "सर्किट" सुंदरी

Sunday 7 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

२."बहुतेक" सुंदरी: या बहुतेक करून सुंदर असाव्यात असा दाट संशय येतो पण खात्री करणे  अवघड.
कारण हातात कोपरापर्यंत कापडी ग्लोव्ज....मुळातल्या ढासू top वर घातलेला प्रिंटेड पातळ apron , आणि चेहेराभर गुंडाळलेला डाकू स्टाईल स्कार्फ !
थोडक्यात काय तर डोळे सोडून बाकी सगळं सस्पेन्समध्ये....पण पाणीदार रेखीव डोळे मात्र तो सस्पेन्स सुंदर असल्याचं प्रॉमिस देणारे :)

उद्या: "नोज-रिंग" सुंदरी

Saturday 6 August 2011

पुण्यातील सुंदरींचे काही अफलातून प्रकार:

१."कायनेटिक" सुंदरी: या कायनेटिक / डीओ / अक्टीव्हा वर स्वार होऊन सुर्रकन इकडून तिकडे जाताना दिसतात. 
झक्कास ट्रेंडी top , वाऱ्यावर उडू नये म्हणून बांधलेले केस आणि भला मोठ्ठा गॉगल 
आढळण्याची ठिकाणे:
फर्ग्युसन कॉलेज रोड , कल्याणी नगर , औंध इन जनरल पुण्यातील हरियाली एरिया ;)

उद्या: "बहुतेक" सुंदरी 

Saturday 9 July 2011

केस

 वायूला आईने सकाळी सहा वाजताच गदागदा हलवून जागं केलं. 'वाईट बातमी. 
मेमेचे दादा गेले रे ' . 
वायूची झोप उडाली. 
मेमे मावशी आणि तिचे मिस्टर दादा दोघांचाही तो प्रचंड लाडका ...
तसं दादाचं वय झालेलंच होतं पण तरीही वायूच्या छातीत कळ आलीच. 

 'ठीक आहे ममा मी तयार होतो , पटकन निघू आपण ' , तो झपकन उठला आणि सवयीप्रमाणे समोरच्या आरशात त्याची नजर गेलीच. 
दोन्ही कानशिलावरून मागे हटणारी हेअर लाईन बघून त्याच्या छातीत दुखलंच...
परत त्याला स्वताचीच लाज वाटली , ' प्रसंग काय आणि आपण केसांबद्दल ऑब्सेस कसले होतोय '.
परत त्याच्या मनात चुकार विचार घुसलेच.  
डॉ. पात्रांच्या औषधाने फारसा फरक पडला नव्हता . 
आपले केस झपाट्याने मागे चालले आहेत असं त्याला राहून राहून वाटत होतं.
तो भराभर तयार झाला. आई आणि सायली तयारच होत्या. 
तशाही परिस्थितीत सायलीचे भरगच्च केस बघून त्याच्या मनात आलंच , 'कसले केस आहेत सायूचे , साला पोरींना बरं , टक्कल पडायची भानगड नाही , by default त्यांचे केस मस्तच असतात ! ' 
तिच्या सरळ दाट केसांवर , आणि पाणीदार डोळ्यांवरच तर तो कॉलेज मध्ये फिदा झाला होता.
त्याने भरकटणार मन सावरलं..केसांचे विचार झटकले आणि दादांचं जाणं एकदम त्याच्या अंगावर आलं.
तो दादांचा एकदम लाडका भाचा होता , त्यात त्यांना मुलबाळ नसल्याने मेमे मावशी आणि दादा त्याला मुलासारखाच मानत.
लहानपणी दादा कधीही घरी आले की त्याला मोठ्ठ cadbury चॉकलेट आणायचे , आणि तो thank you बोलला कि प्रेमाने त्याला कडेवर उचलून घ्यायचे. 
त्यांची ती कपाळावर रुळणारी स्टायलीश झुलपं आणि अंगाला येणारा नेव्ही कट विल्स सिगारेटचा वास. 
अजूनही कोणाच्या शर्टाला सिगारेटचा वास आलं कि त्याला हटकून दादा आठवायचे.

ते झटपट मावशीच्या flat वर पोचले.
मेमे मावशी बरीच सावरल्यासारखी वाटत होती. 
तुरळक लोकं होती . 
दादांना हॉलमधेच ठेवलं होतं. 
ते शांत झोपल्यासारखेच वाटत होते. 
चेहऱ्यावर नेहमीचेच प्रसन्न भाव...पटकन उठून सिगारेट लाईट करतील असंच वाटत होतं. 
लख्ख गोरा रंग,रुबाबदार चेहेरा आणि पांढऱ्या रेश्मासारखे सरळ चमकदार केस !
वायूचं मन परत भिरभिरल, 'दादा, वयाच्या ७८ व्या वर्षी सुद्धा कसले केस आहेत यार तुमचे.
तुम्ही तर चाललात आता मला द्याना ते ...प्लीईईज ! 
आयला दादांची पातळ लालचुटुक (एवढी वर्ष फुंकून सुद्धा ..) जीवणी किंचित विलग झाली का ? 
ते मिस्कील हसतायत , ते जिवंत आहेत ...वायू पुढे झेपावला ...''दादा दादा" !
दोन चार जणांनी त्याला झटकन सावरलं. दादांचा चेहरा तसाच होता प्रसन्न खट्याळ.
पाठी एक विशाल महिला कुजबुजली ,''पोराचं कित्ती ग बाई प्रेम !!" 
वायू ओशाळत मागे झाला. पुढच्या तासाभरात सगळा कार्यक्रम आटोपलाच.
दादांनी देहदान करायचे ठरवले असल्यामुळे फारसे सोपस्कार नव्हतेच.
वायूला खरंतर गळल्यासारखं वाटत होतं , पण उशिरा का होईना ऑफिसला जाणं भाग होतं, इलाज नव्हता ... clients बरोबर मिटींग्स होत्या. 
त्यानं रस्त्यात आई आणि सायूला सोडलं आणि तो कामाच्या रगाड्यात बुडून गेला पण दादांचं जाणं आणि त्याचे माघार घेणारे केस दोन्ही मनात आलटून पालटून ठुसठुसत राहिलंच 

३ महिन्यांनी ............

शनिवारची प्रसन्न सकाळ :

 'अरे किती हलतोस वायू...जरा शांत बस ना , नाहीतर हेअर-कलर नीट बसणार नाही हां..आधीच सांगून ठेवते '
'ओके बॉस ! पण बायको ब्युटिशिअन असल्याचा हा फायदा आहे , घरीच केस काळे करू शकतो आणि तोंड सुद्धा. हाहाहाहा ' वायू फुल फॉर्मात होता. 
'चूप रे फाजीलपणा करू नकोस' सायली वैतागली.
'पण खरं सांगू का ? हे असे रेश्मासारखे दाट पांढरे शुभ्र केस पण तुला छानच दिसतायत...कसे काय तुझे केस तीन महिन्यांत एवढे बदले यार '?
वायू गूढपणे हसला , 'हम्म्म पांढरे असले म्हणून काय झालं , मस्त आहेत ना ? "पिकोत पण टिकोत" !!! 

वायुने सायलीला जवळ घेतलं आणि आकाशाकडे बघत तो हळूच पुटपुटला,
"thank  you दादा" !!!

Saturday 25 June 2011

गणपती बाप्पा मोरया


 १० जूलै शुक्रवार रात्रीचे १० 
पुणे स्टेशन शिवनेरी बस-स्टॅन्ड 
पावसाची संतत धार सकाळपासून लागलेली 
मुंबईहून येणाऱ्या बसेस रस्त्यातच अडकलेल्या आणि लोकं पार ७ वाजल्यापासून ताटकळलेली 

 बहुतेक सगळा क्राउड आय टी वाला..शिवनेरीचे लॉयल प्रवासी ! वीक एंड असल्याने टी शर्टस , थ्री फोर्थ , जीन्स चे नाना प्रकार. दोन गोष्टी मात्र कॉमन:  लॅपटॉप-बॅग आणि चेहऱ्यावर तीन तास साकळलेला प्रचंड कंटाळा.
एस. टी. कंट्रोलर मामांना सगळ्यांची दया येते आणि ते सर्व शिवनेरी भक्तांपुढे नामी पर्याय ठेवतात :
"आज काय शिवनेरी सुटणार नायत..पायजे तर आपण एक एशिआड बस सोडू , ज्या रिझर्वेशनवाल्यांना जायचंय त्यांचं तिकीट एशिआड साठी बदली करून देऊ, ज्यांना जायचे नाही त्यांना तिकिटाचे पैसे दोन दिवसांनी परत मिळतील . बोला !"

 सगळे बिच्चारे आई / बाबा / मुलं / नवरा / बॉयफ्रेंड / बायको / गर्लफ्रेंड च्या आठवणीत ताटकळलेले. पण शिवनेरी च्या एसीची ऐसपैस सीटची सवय झालेली , थोडासा संभावितपणा अंगात मुरलेला . काय करावं ?
थोडी चल-बिचल होते . आणि बहुतेक सगळेजण निर्णय घेतात एशिआड तर एशिआड घरी तर पोचू . 

 १० मिनटात समोरची एशिआड बस झपाझप भरली. जास्तच हाय फाय नाकं किंचित मुरडली पण ईलाज नव्हता.बस आता दोन मिनटात निघणार ...

आणि त्याच्या डोक्यात किडा वळवळला.मुंबईतल कॉलनी-चाळ ग्रूप मधलं त्याचं रक्त सळसळले , 'ओरडावं एकदा बस सुटताना ? मज्जा येईल! पण एरवी ट्रेकला ग्रुपमध्ये असताना गोष्ट वेगळी . तेव्हा सगळ्यांना अपेक्षित असतं आणि हमखास प्रतिसाद मिळतो.पण इकडे तर सगळे आधीच विवंचनेत त्यात हाय फाय ...ओरडलो आणि कोणीच साथ दिली नाही तर याहूम पोपट होईल.' त्याच्यातला कॉर्पोरेट आय टी वाला चरकला .

 तेवढ्यात बस घरघरत सुरूच झाली. ड्रायवरने मिनिटभर इंजिन गरम केलं. इकडे त्याचा जीव वर खाली ...ओरडू की नको ? घ्यावी रिस्क ?? मारावी उडी ??? काय फरक पडतो पोपट झाला तर ? आपल्याला तर आनंद होतोय ना घरी चालल्याचा , मग का ठेवायचा तो दाबून ? पण यातले काही चेहर तर दर शुक्रवारचे ठरलेले , एक तर त्याच्या खास आवडीचा , 'पोपट झाला तर पुढच्या शुक्रवारी लाज वाटणार ' त्याची तडफड चालू होती...

खड्ड-खाट ड्रायवरने पहिला गिअर टाकला ,बस दमात पुढे झेपावली आणि त्याची सगळी तडफड शांत झाली !
तो खच्चून ओरडला "गणपती बाप्पा " ..क्षण भर कोणालाच काही कळलं नाही आणि मग आख्खी बस ओरडली :

"मोरया " !!!

त्याच्या छातीत आनंद सरसरला आणि तो खुशीत ओला रस्ता बघू लागला 


-नील आर्ते


Saturday 18 June 2011

एपिफनी

ती आली आणि म्हणाली ,
"तू काहीच कामाचा नाहीस , संस्कृत 'कामाचा' सुद्धा 
इतकी वर्ष झाली मुंबईत एक घर घेऊ शकला नाहीस ...
डान्स सुद्धा चुकीचा करतोस आणि गीझर बंद करत नाहीस!!!"

खूप वाईट वाटलं त्याला ते ऐकून,
तीन दिवस तो भेलकांडत राहिला, 
दादर platform नं. ३ वरील दारुड्यासारखा,

आणि एका लख्ख सकाळी त्याला कळलं:
"कामाचा" असला-नसला तरी तो एक नम्बरचा किसर होता,
घर पुण्यातही घेऊ शकतो,
आणि डान्स आला नाही तरी धमाल करता येतेच म्युझिकवर 
..........
गीझर मात्र आता तो आठवणीने बंद करतो , लाईट गेले असले तरीसुद्धा!!!

-नील आर्ते

Sunday 12 June 2011

मूव्ह ऑन

जुन्याच जखमा जुनेच घाव 
तीच तडफड नवीन नाव

जुनेच चोर जुनेच साव
जुनीच आमिषे नवीन हाव 

जुनेच खडक जुन्याच नद्या
जुनाच काल नवीन उद्या 

जुनाच पडाव जुनाच थांबा 
जुनेच कलम नवीन आंबा 

जुनीच मैफिल जुने घराणे 
जुनीच वीणा नवे तराणे

जुनाच देह जुनाच स्पर्श 
जुनीच भूक नवाच हर्ष

जुनेच हसणे जुनेच रडणे 
जुनेच प्रेम नवीन पडणे   

-नील आर्ते

Saturday 11 June 2011

लूक अलाईक्स

च्यायला तुम्ही नोटीस केलंय ?

युवराज सिंघ अभिषेक बच्चन सारखा दिसतो (जरा जास्त चमको )
झरीन खान कत्रिना सारखी (पण जास्त रसरशीत ),
असीन एव्हा लोंगोरिया सारखी (जरा यंगर)

तुम्ही कोणासारखे दिसता :)???

-नील 

Thursday 26 May 2011

An ode to my rock-climbing buddy Sanju :)

मै जानता हूँ एक लडके को ...
उससे पत्थारोसे लगाव है पर वोह पत्थर दिल नहीं.
वोह है मेरा दोस्त हर तरह की भपोटिंगमें...
वोह है मेरा गाईड : जीवनमें ,जंगलमें और जीवनके जंगलमे .
वोह है मेरी दोस्ती के खजाने का एक बेशकीमती हीरा...
लेकिन उसे मैंने यह अब तक बताया नहीं है. 
जब हम दोनों बैठे होंगे सह्याद्रीके और एक शिखरपर...
सर पर करारी धुप लिए और पैरोंतले होगा सारा जहाँ 
तब शायद मै उसे यह बात बता दूंगा !

-नील 


सुख म्हणजे काय असतं ?

सुख म्हणजे काय असतं ?

एक स्वीमिंगची चड्डी आणि खाडी
एक तळलेला मासा आणि माडी :)
मेंढीकोटाचा डाव आणि चीम्बोरीचा बाव
खुर्चीतली झोप आणि भाताचा टोप
समुद्राची गाज आणि केसांतली वाळू
दोस्तीतला वितळता क्षण हळू हळू हळू

-नील
-Pristine beaches of Malavn here I come

Friday 29 April 2011

असंच काय नाय

खूप बटर म्हणजे टेस्टी पाव भाजी असंच काय नाय
खूप बडे स्टार्स म्हणजे चांगला मूव्ही असंच काय नाय
महागडी गिफ्ट्स म्हणजे चांगला BF असंच काय नाय
दिवसाला १०० कॉल्स म्हणजे चांगली GF असंच काय नाय
टाईट टी शर्ट म्हणजे चांगली बॉडी असंच काय नाय
टाईट जीन्स म्हणजे चांगली फिगर असंच काय नाय
गळ्यात हातात २ किलो सोनं म्हणजे ***त दम असंच काय नाय
कोलांट्या उड्या म्हणजे चांगला डान्स असंच काय नाय

जागो ग्राहक जागो :)

Saturday 22 January 2011

13 वी रास

म्हणे तेरावी रास ..अरे राशीन्चेच करा तेरावं
ग्रहांना घाबरून जगावं की ताठ मानेने मरावं

"बेजान" चक्रम ज्योतिष्याकडे माझं भविष्य ठरावं
की टाकावेत फासे बेदरकार
आणि मग जिंकावं किंवा हरावं

राशी-बीशी बरया असतात तिच्याशी first time बोलायला
घट्ट मिटल्या ओठांतून मैत्रीचे दरवाजे खोलायला ;)

पण जास्त त्यांना चढवू नये ..
Excuses नी ऊर बडवू नये

तुमचे भविष्य तुमच्या हाती हे तर मुतारीत पण शिकवतात
का मग सगळे भोंदू january त पकवतात ?

जास्तच लिहिले जरा थोडं अशुद्ध पण असणार
पण माझ्याच चुका त्या..तिथं numerologist नसणार

-नील