Tuesday 31 March 2015

ढब्बू आकाश-कंदील आणि ड्यूस एक्स माकिना

पुणे… 
प्रोफेसर शुक्ला आणि राधाचं एकदम इंटेन्स डिस्कशन चालू होतं.
एरंडवण्याच्या "वल्लभ" सोसायटीतल्या बागेत रातराणी घमघमत होती.
दोघंही नुकताच इंटर-स्टेलार पाहून आले होते आणि प्रचंड एक्साईट झाले होते.
शांत रात्रीत दोघांचा आवाज घुमत होता.
"पण हा  'टेसरॅक्ट 'काय प्रकार असतो मला कळालं नाही नीटसं"
"अरे रामू एकदम सोपं करून सांगते मी तुला", आता राधा मधला फिजिक्स प्रोफेसर जागा झाला होता.
तीन मितीतला क्यूब समजा एक काचेच्या पारदर्शक भिंतीला चिकटवून ठेवलास आणि एखादा सूक्ष्म प्राणी जो दोन मित्यांतच आहे तो भिंतीवरून लुटूलुटू चाललाय. तर त्याला फक्त क्युबची भिंतीला चिकटलेली बाजू दिसेल आणि "समजेल" जी एक चौकोन आहे.
म्हणजे तो चौकोन हे तीन मितीतल्या क्यूबचं द्विमितीय प्रोजेक्शन झालं.

आता हेच आपण तीन आणि चार मित्यांत पुढे नेऊया.
क्युबचा चार मितीय इक्युव्हॅलन्ट आकार म्हणजेच टेसरॅक्ट. 
समजा चार मितीतल्या बुद्धिमान प्राण्यांनी हा टेसरॅक्ट आपल्या पृथीवर पाठवला तर तो आपल्याला एका क्यूब सारखाच दिसेल आणि समजेल.
"हम्म आणि हे बाकीच्या आकारांना पण लागू असेल"?
"अफकोर्स उदाहरणार्थ पंचकोन षटकोन वगैरे सगळ्या आकारांना!
आणि मजा काय आहे माहितीय का? हे चार मितीतले आकार कदाचित आपल्या तीन मितीवाल्या जगात एकीकडून दुसरीकडे जायचे शॉर्टकट असू शकतील… कोणत्याही काळात कोणत्याही ठिकाणी!

राधा लगेच टिशू पेपर वर आकृती काढायला लागली…
प्रोफेसर शुक्ला आपल्या बायकोकडे कौतुकाने बघत राहिले.
राधूची मान केवढी लांबसडक आहे हे त्यांना परत एकदा जाणवलं.
तिच्या केसांत आलेली चंदेरी जर चांदण्यात चमचम करत होती…
आणि निघताना मारलेल्या  'बरबेरी 'परफ्युमचा मंद गंध रातराणीत मिसळला होता.
प्रोफेसर शुक्लानी तिला मायेनं जवळ ओढलं… आणि त्यांना खाडकन जाग आली.

मुंबई: धनत्रयोदशी २०१५ रात्र
अद्भुत ८७ नंबरच्या बसमधून माटुंग्याच्या सिटीलाईट स्टॉपवर उतरला आणि त्यानं चहूवार नजर टाकली.
रात्रीचे दहा वाजले होते पण लोकांची उत्साही गर्दी काय हटत नव्हती.
पणत्यावाले, उटणीवाले, रांगोळ्यांचे ढीग आणि ते रांगेत लटकणारे शेकडो हजारो कंदील!
लाल-पिवळे-हिरवे चमचमणारे लखलखणारे झिरमिळणारे कंदील!
हा रस्ता 'कंदील-स्ट्रीट' म्हणूनच तर फ़ेमस होता आख्ख्या जगात.