Sunday 5 February 2012

अभद्र


 तुम्ही कधी दुपारची झोप तीन्हीसांजेपर्यंत ताणलीये?

बाहेर काळोख दाटत असतो आणि कुठच्या तरी घाणेरड्या स्वप्नाने तुम्हाला दचकून जाग येते.

"आपल्याला जीवापाड आवडणारी ती दुसर्या कोणाशी तरी रत होताना दिसते"
नाहीतर...
"ट्रकने उडवलेल्या कुत्र्याचा रक्त मांसाचा लगदा"
...
"तुम्ही त्या गरीब चेहेर्याच्या पोराला पाकीट मारल्याच्या संशयावरून कुत्र्यासारखं मारत असता"
किंवा दिसतं आपलं ते मेलेलं माणूस...आपल्याबरोबर नेहेमीसारखं  वावरताना...पण खूप खिन्न चेहेर्याने.

जाग आल्यावर जाणवते घश्याला पडलेली प्रचंड कोरड आणि गळ्याजवळ जमा झालेला मुंबईचा चिकट घाम.

आई थकून भागून ऑफिस मधून घरी येते आणि डुकरासारखं झोपल्याचा गिल्ट कुरतडत राहतो.

निस्त्राण मन आणि देह झडझडून तुम्ही उठता!
आईनं पर्स टाकून बाबांच्या फोटोपुढे छान वासाची उदबत्ती लावलेली असते...
आणि तुम्हाला उगीचच खूप बरं वाटतं!



-नील आर्ते
टीप : ही मुक्त कविता मला सौमित्रच्या "जॉइन्ट" कवितेवरून सुचली (कवितासंग्रह: "आणि तरीही मी")
हे म्हणजे थोडंसं भजीच्या वासाने चहाची तल्लफ येण्यासारखं...चहा आणि भजी म्हटलं तर सारखे पण वेगवेगळे सुद्धा.
भजी बेस्टच...चहा झक्कास झालाय की पांचट ते मात्र तुम्ही ठरवा.
--------------------------------------------------------------------