Friday 22 April 2016

प्रोफॅनिटी

'मी काही शिव्या वगैरे काढणार नाहीये कथेतून',
ए. के. ठाम होती आणि ती अशी ठाम वगैरे असली की तिचा जबडा हटकून घट्ट आवळायचा!

'अगं पण थोडी टोन डाऊन कर ना कथा, केवढे ते एम-सी, बी-सी वर्ड्स? आणि सेक्स पण एवढा अंगावर येणारा दाखवलायस… वाचताना ठीक आहे एक वेळ पण इतक्या लोकांसमोर तू कथा वाचशील तेव्हा ऑकवर्ड होईल गं',
वैदेही तिच्या नेहमीच्या शांत-सॉर्टेड-ऋजू आवाजात.

'नाही ना पण वैदू… माझ्या कथेचा हिरो रस्त्यावरचा फाटका टप्पोरी आहे तो असा शिव्या देतच बोलणार आणि या कथेचा जर्मच सेक्स आहे तेव्हा ती वर्णनं  राहणारच.'

'पण स्त्री लेखिकेच्या कथेत एव्हढ्या शिव्या'… वैदेही चाचरत बोलली आणि ए. के. ची मेजर तार सटकली,
'अच्छा म्हणजे तुला शिव्यांबद्दल प्रॉब्लेम नाहीये तर मुलींनी शिव्या देण्याबद्दल प्रॉब्लेम आहे, यु ऑल आर ब्लडी हिप्पोक्रॅट्स!
मुलांनी सिगरेट ओढली चालते पण मुलीनी लाईट केली तर टवकारून टवकारून बघतात साले… भाडखाव!'

'अगं राणी पण कॅन्सर दोघांनाही होतोच ना?
तसंच शिव्यांचसुद्धा… मोठे-मोठे प्रकाशक लेखक येणार आहेत आपल्या हौशी लेखक मेळाव्याला… त्यांना हकनाक गांगरवून टाकण्यात काय अर्थ आहे?
गेले तीन महिने आपण सगळे हा मेळावा प्लान करतोय… थोडं तरी ऐक ना माझं.'

'नाही वैदू ही माझी क्रिएटीव्ह फ्रीडम आहे आणि त्याच्याशी तडजोड नाही म्हणजे नाही… मग भले कोणी माझी कथा ऐकली-वाचली नाही तरी चालेल '… जबडा घट्टच!

'तुझं नाव "आग्रही कारेकर" नसून "दुराग्रही कारेकर" पाहिजे होतं', वैदेही वैतागून बोलली… 'डी. के. नॉट ए. के.'

'नुस्तं डी. के. नाय "बॉस-डी. के." … हा हा हा!'

'प्लीज ऐक ना माझं… मला पळावं लागेल आता. आज लॅबमध्ये माझ्या नवीन प्रॉडक्टचा डेमो आहे'

'ओ के बेस्ट लक! डेमो चांगला झाला की मला ट्रीट द्यायचीस तू "मार्झोरीन"मध्ये'

'स्वीट-हार्ट "मार्झोरीन" काय तू कथेतल्या शिव्या काढल्यास तर तुला मी "मॅरीयट"मध्ये ट्रीट देईन गं राणी … फ़ाइव्ह स्टार सेव्हन कोर्स मील!', वैदेहीनी शेवटचा क्षीण प्रयत्न केला.

'वो तो नाही होगा डॉल!'

वैदेहीनी कपाळावर हात मारत हताशपणे स्कूटीला किक मारली!
-------------------------------------------------------------------------------------------------

एका आठवड्याने: लेखक मेळाव्याचा दिवस.