Monday 16 September 2019

त्रिकथा ३: बलम पिचकारी

ज मला कसंतरीच होतंय.
बऱ्याच वर्षांनी आज कोणतरी खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा पाहिजे होतं असं राहून राहून वाटतंय.
म्हणजे खरंतर लहानपणापासून बरीच वर्षं मी एकटाच राहिलोय.
आई मला जन्म देतानाच गेलेली, आणि बाबूजी मी पाच वर्षांचा असतानाच गेले... आत्महत्या केली त्यांनी.
नंतर सगळं शिक्षण पाचगणीला बोर्डिंग मध्ये... अमेरिकेत ग्रॅज्युएशन.. रिसर्च...
एव्हढी सगळी वर्षं एकटाच तर होतो मी.
आणि एकटेपणाची खतरनाक सवय होते हो...
आख्खच्या आख्ख डेअरी-मिल्क एकट्यानी खायची,
घरी नागडं फिरायची,
बिनधास्त जोरात पादायची,
नवीन सिनेमा एकटं बघायची,
आणि सगळ्यात मस्त म्हणजे एकट्यानी छान हॉटेलात सेव्हन कोर्स डिनर करायची.
जेवण म्हणजे माझी खास आवड आणि तिथेतर कंपनी नकोच वाटते मला.
एकेक डिशबरोबर माझा प्रणय चालतो म्हणाना, आणि प्रणय करताना एकांतच बरा.
हो म्हणजे ते अन्नाचे फोटो घेत बसणारे मठ्ठ मित्र, आणि वेटरला आपण जन्मभरासाठी विकत घेतल्यासारखं वागणाऱ्या एंटायटल्ड मैत्रीणी असल्यापेक्षा नसलेले बरे.

पण आजमात्र आयुष्यात पहिल्यांदा कोणीतरी शेअर करायला हवं असं वाटतंय.
कारण आज मला कळतंय लोकांना फाट्यावर मारून तुम्ही दुःख पचवू शकता, प्रॉब्लेम्स एकट्यानी हॅण्डल करू शकता...
पण तुमचा आनंद, तुमचं यश मात्र शेअर करायला कोणतरी हवंच बॉस! 

आणि मला अर्थातच खास मित्र/ बायको/ गर्लफ्रेंड/ भाऊ-बहीण/ आई-बाबा ह्यातलं कोणीच नसल्यामुळे मी माझ्या ब्लॉगवरतीच माझं मन मोकळं करतोय.

आता हा ब्लॉग शेयर करायचा किंवा नाही ह्या प्रश्नाचा पूल आपण थोडं नंतर ओलांडला तरी चालेल माझ्यामते...

'पूल ' म्हटलं ना की मला हटकून पाषाण लेक वरचा तो कमानदार पूल आठवतो.
चमचमणाऱ्या तळ्यावरचा तो इटकुला पूल...