Sunday 4 March 2012

"तेरे सिवा"

१४० चा स्पीड,
रात्रीचा भण्ण वारा आणि...
एखाद्या कोड्यासारखा उलगडणारा काळाशार एक्स्प्रेस हायवे.

"दिल्ली बेली" मधलं "तेरे सिवा" लागतं शफलवर!!!
आणि छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात कसं तरी होतं.
"तेरे सिवा" वितळत जातं कानात...
आणि उतरतं छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात.


आठवण येते सगळ्याच "क्ष"न्ची.
वाटतं सगळ्या "क्ष"न्ची "क्ष"मा मागून टाकावी
किंवा आपणच माफ करावं त्यांना. 
आणि सांगावं  "तेरे सिवा" एकट्याने ऐकणं पाप आहे राणी!!!
विसरून जाऊया एकमेकांवर कचाकच केलेले वार.
का केले होते वार ते पण आठवत नाही खरं तर.
करून टाकूया तह या जीवघेण्या गाण्यासाठी.

ठरलं तर मग...इकडे थांबता येणार नाय.
पण एक्स्प्रेस वे संपला कि आधी फोन करायचा...


एक्स्प्रेस वे संपतोच आणि गाणं सुद्धा.
दबकून बसलेला मेंदू...
छाती, पोट, आतडी, फुफ्फुसं सगळ्यांवर थयाथया नाचतो.
'तिनी ५ वार केले होते आणि आपण फक्त ३ च'
तो निक्षून बजावतो.
'इगो बॉस' चा परफ्युम परत परत फसाफसा फवारतो.

तुमच्या "सेन्टी"पणाचं तुम्हालाच खिन्न हसू येतं...
आणि तुम्ही कुठेही न थांबता सरळ घरी जाता.  


-नील आर्ते