Thursday, 20 December 2018

व्हॅकी लेखक

हा एक वर्षांपूर्वी नवलमध्ये एक कथा वाचलेली, "जीभ" नावाची.
त्यात नायकाला एक विचित्र कंडीशन असते, दारू प्यायला की त्याची जीभच बाहेर येते...
कालीमातेसारखी!
आणि तो मग कालिकेसारखाच "व्हिजिलांटे" होऊन दुष्टांना शिक्षा द्यायला लागतो वगैरे.
भारी आवडली होती ती कथा, पण लेखकाच्या नावाबद्दल फारसं बॉदर नव्हतं केलं.

मग आणखी काही वर्षांनी (बहुतेक हंस) "लेखक महोदय" (की महाशय?) नावाची कथा वाचली:
माझ्या आवडत्या पुण्यात चिल्ड-आऊट आयुष्य जगणाऱ्या,
मजबूत गोड खाणाऱ्या,
फारसं काम न करणाऱ्या,
अधून मधून वीड मारणाऱ्या,
नैतिकतेमध्ये जास्त न गुंतता समोरून आलेल्या मोहांचा पुरेपूर आनंद घेणाऱ्या पण कन्फ्युज्ड लेखकाची गोष्ट!

कथेवरचं चित्र मला लख्ख आठवतंय,
टिपिकल चंद्रमोहन कुलकर्णीं स्टाईलचं, बारीक सूक्ष्म डोकं आणि अज्रस्त्र धड असलेल्या माणसाचं सरिअल चित्र ...

ख - प - च च्या मोहांना अनअपोलोजेटिकली सामोरं जाणाऱ्या नायकाच्या आयुष्याबद्दल अनावर आकर्षण दाटून आलेलं!

आणि शैली खूप आवडलेली!
लेखक भारतभर-जगभर खूप फिरलाय, तो अजिबातच जजमेंटल नाहीये...
आपल्या क्षेत्रात प्रचंड हुशार असावा असं काय काय जाणवलं... 
ह्या वेळी आवर्जून लेखकाचं नाव बघितलं,
अनिरुद्ध बनहट्टी!

अरुण हेबळेकर, बशीर मुजावर, मिलिंद बोकील, वनश्री सावंत ('रोआल्ड डाल'ची रूपांतरं) ह्यांच्या कथांची
ठरलेल्या दिवाळी अंकांत वर्षभर वाट बघायचो...
त्यात बनहट्टींचंही नाव ऍड झालं.

त्यांच्या काही कथा तूफान आवडलेल्या,
काही थोड्या कमी!

पण शैली मात्र नेहेमी आवडायची!

जगभरची कल्चर्स, खाद्यसवयी, ड्रग्ज, सेक्सबिक्स चा बिन्धास्त उल्लेख,
आणि ह्या सगळ्यांना टॅंजंट जाणारी, वरवर असंबद्ध सायकेडेलिक वाटणारी तरीही खुबीनं बांधणारी त्यांची अशी एक खास शैली होती.

मग फेसबुकवर त्यांना शोधून ऍड केलं. 
तेव्हा प्रोफाईलवर त्यांचा, मध्ये साक्षात निऑन ब्लू रंगाचा मोहॉक केलेला आणि साईडनी डोकं तासलेला फोटो होता :)
तेव्हाच हा माणूस आवडलेला!

नंतर 'हंस'च्या ग्रुपवर त्यांचा नंबरच मिळाला आणि आम्ही बोलू लागलो.
बांधलेले सगळे अंदाज बिंगो होते.
जगभर फिरलेला, आपल्या इंजिनीअरींगच्या क्षेत्रात प्रचंड कमांड असलेला दिलखुलास माणूस होता तो.
कथा आवडली की सगळयांना सांगत, आवर्जून फोन-मेसेज करत.
एकदा भेटून आम्ही खूप बोलणार होतो... ते राह्यलंच.

आज अवचित जाणवलं की,
मी जेव्हा सेक्सबद्दल भरभरून मनसोक्त लिहितो (आणि भारी बरं वाटतं असं लिहायला )
तेव्हा बनहट्टींच्या खास करून पूर्वीच्या कथांवरून घेतलेलं इन्स्पिरेशन आणि हिंमत आहे ही.
ज्ञानदेवे रचिला पाया वगैरे...

त्याबद्दल थँक्यूच बनहट्टी सर.
पुढच्या दिवाळीला मिस् करेन मी तुम्हाला!  

-नील आर्ते
   
   

  
Saturday, 21 July 2018

त्रिकथा १: अंधाराची ^खरी चव

दोस्तांनो तुम्ही कधी त्या "अंधाराची चव" नावाच्या हॉटेलात गेलतात का?
आपल्या टुमदार पेन्शनर शहरात ते चालू झालं तेव्हा प्रचन्ड हाइप झालं होतं आठवतंय?
म्हणजे त्यांचा मेन सेलींग पॉईंट होता की ते आपल्या गिऱ्हाईकांना चक्क आंधळेपणाचा तात्पुरता आणि थरारक अनुभव देऊ करायचे वगैरे...

आयडीया तशी सिम्पल होती त्यांची,  की रेस्टॊरंटमध्ये शिरताना तुम्ही तुमचे फोन्स, लॅपटॉप्स वगैरे डिजिटल लळालोम्बा बाहेरच ठेवून आत जायचं...
कम्प्लीट काळ्याशार अंधारात.
त्यांचा स्टाफ तुम्हाला हाताला धरून घेउन जाणार...
बसायला मदत करणार...  
तुमची जी पण काय ऑर्डर असेल ती बनवणार...
जेवण सर्व्ह करणार... 
सगळ काही किर्र-मिच्च अंधारात!

तुमचं ते अंधार-जेवण झालं आणि बडीशेप-बिडीशेप चघळत तुम्ही लख्ख प्रकाशात बाहेर आलात की मग ते तुम्हाला सांगायचे की,
हॉटेलचा आख्खा स्टाफ: वेटर्स, ऑर्डर घेणारा कॅप्टन, मॅनेजर आणि शेफसुद्धा सगळे अंध आहेत खरोखरचे!

म्हणजे आयडीया तशी मुदलात चांगली होती पण या सगळ्यात एक मेजर उणीव होती... 
म्हणूनच बहुतेक त्या हॉटेलनं फारसं न चालता मान टाकली... 
आणि मग मी...

पण थांबा!
पहिल्यांदा तुम्हाला मी थोडीशी बॅकग्राउंड सांगतो:
मी एक प्रचंड टॅलंटेड (असं लोक म्हणतात) शेफ आहे.  
पण माझा बाप फुलटू अंडरवर्ल्ड टच होता.  
एका क्षणी त्याला कायतरी उपरती झाली आणि सगळे वाईट धंदे सोडून तो माफीचा साक्षीदार बनला. 
अर्थात अंडरवर्ल्ड म्हणजे काय तुमचं नेटफ्लिक्स सब्स्क्रिप्शन नाय की वाटलं नको आणि केलं कॅन्सल. 
बाहेर यायची किम्मत त्याला चुकवावी लागलीच आणि त्याचे डोळे गेले. 
(तो किस्सा इथे: आ दा पा दा)
गम्मत म्हणजे डोळे गेल्यापासून त्याचा चवीचा सेन्स हजारपटीनी वाढला असं तो छाती ठोकून सांगायचा. 
म्हणजे उदाहरणार्थ पाणीपुरी त्याची फेव्हरेट... 
आधीही खायचा तो आवडीनी. 
पण... 
आंधळा झाल्यापासून पाणीपुरी खाताना चवीचे अक्षरश: स्फोट व्हायचे त्याच्या मस्तकात... 
मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...  
या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,
त्याच्या जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.
आनंदानी डोळे मिटून झेलपांडत नाचायचा तो.        

आणि तेव्हाच माझ्या लक्षात आली ग्यानबाची मेख:

Saturday, 2 June 2018

स्वमग्न लोनसमत्याला बघितल्या बघितल्या पहिल्यांदा मला आठवलं ते "अलिबाबा चाळीस चोर"...
लहानपणी बघितलेलं...
गिरगावच्या साहित्यसंघात...
सुट्टीत... अशाच रण्ण उन्हाळ्यात.
बहुतेक सुधा करमरकरांचं असावं कारण प्रॉडक्शन खूपच छान होतं.
खास करून गुहेतला खजिना:
त्यातल्या हंड्यातून सांडणाऱ्या धम्मक पिवळ्या सोनमोहोरा...
त्यांचं ते पिवळं गारूड अस्संच!

माझ्या सोसायटीच्या गेटमधून बाहेर पडून डावीकडे वळलं की भस्सकन NH4 हायवेच लागतो.
त्याच्या किंचित आधी हा हँडसम उभा असतो आजकाल...
बाजूच्या रखरखटावर पिवळाई शिंपडत.
त्याला रास असती तर ती लिओ असणार असं मला उगीचच वाटतं.
आणि नाव असतं तर: ईशान अवस्थी.
पेशा असता तर: प्रोफेसर.
आणि हा राजबिंडा प्रोफेसर आख्ख्या वर्गानी बंक मारला तरी तत्व म्हणून रिकाम्या क्लासरूमला शिकवेल असंही वाटत राहतं.

आठवत रहातात मग असे स्वमग्न आत्मे इथं तिथं पाहिलेले...
आपल्याच मस्तीत आतल्या डोहात बुड्या मारणारे...
बाहेरल्या जगाला एफ. ओ. देत भरभर आनंद सांडणारे.

ती मित्राच्या हळदीला 'वाजले की बारा'वर बेभान नाचणारी स्थूल बाई आठवते... जिचा नवरा अस्वस्थ चुळबुळ करत होता...
ती गोरेगाव स्टेशनावर पाहिलेली कानातल्या हेडफोन्सबरोबर मोठ्ठ्यानं 'शेप ऑफ यु' गाणारी मुलगी आठवते... जिच्या सावळ्या गालांवर मुंबईचा घाम ओघळत होता.
'व्हिप्लाश'च्या शेवटच्या सीनमधला जीव खाऊन ड्रम्स वाजवणारा अँड्र्यू आठवतो... जेव्हा तो ओरडतो, "आय'ल क्यू यु इन!"  

हा बहावाही एक दिवशी खच्चून ओरडणार नक्कीच ते पिवळं सुख मावेनासं होऊन...
मी वाट बघतोय!

-नील आर्ते


Friday, 11 May 2018

सिरीज तिसरी: ब्लॅक मिरर

सूचना:
या लेखात स्पॉयलर्स आहेत. खास करून ब्लॅक मिररच्या या एपिसोड्स विषयी: नॅशनल अँथम, फिफ्टीन मिलियन मेरिट्स, मेन अगेन्स्ट फायर, एन्टायर हिस्टरी ऑफ यु


धी आपण गाडीतून मस्त चाललेले असतो फॅमिलीबरोबर... सगळं सामान भरून लांब...
किंवा बाईकवरून डेमला पाठी घेऊन... टोचत असतात मखमली सुखद भाले आपल्या पाठीला...
किंवा एकटेच एंट्री टाकतो क्लबमध्ये... कडक शर्ट पॅन्ट मारून...

म्हणजे असं इन्व्हिन्सीबलच वाटत असतं आपल्याला...
पण अचानक कुठूनतरी कोणतरी भलं माणूस येतं आणि सांगतं,

"बॉस आपका डिक्की खुल्ला है..."
किंवा
"मॅडमका ओढणी टायरमे फसनेवाला हय..."
किंवा
"दोस्ता तुझी झिप् उघडी आहे..."

आणि बाल-बाल वाचतो आपण त्या संभाव्य आर्थिक/शारीरिक/मानसिक डॅमेजपासून!

'ब्लॅक मिरर'नं सुद्धा तसंच जागल्याचं काम केलंय... किमान माझ्यासाठी तरी!!

इथे ब्लॅक मिरर म्हणजे काळाशार आरसा... स्क्रीन...
आपल्या फोनचा, टॅबचा, टीव्हीचा, लॅपटॉपचा
काळा आरसा आणि त्याची काळी जादू...
या काळ्या जादूला आमच्या मालवणीत चपखल शब्द आहे: 'देवस्की'!

देवस्की म्हणजे एखाद्या माणसाचं गुंतत जाणं अनाकलनीय अभद्र गुंत्यात.
बरेचदा समजून-उमजून!

Saturday, 28 April 2018

सिरीज दुसरी: कॅलिफॉर्निकेशन


कॅ
लिफॉर्निकेशन माझ्या आयुष्यात आली तेव्हा कायतरीच विचित्र स्टेजमध्ये होतो मी.
पुरुष ज्या ज्या चुका करतो त्या सगळ्या करून झालेल्या आणि त्यांची किंमत चुकवायचा 'शीटी' दौर चालू होता.
आपल्याला हे हवंय की ते हवंय (इकडे मात्रा वेलांटीने रिप्लेस करता यावी) की नुसतंच उंडारायचंय अशी सगळी घालमेल घालमेल चालू होती.
आणि रप्पकन आयुष्यात हँक मूडी आला.
त्याचं पुरुषसूक्त घेऊन.

मला ना लहानपणी आठवतंय,
काही चांगलं प्रोफाउंड नाटक-पिक्चर असलं ना की बहुतेकवेळा माझे बाबा खूर्चीवरून उसळून ओरडायचे, "ही साली माझी स्टोरी आहे माझी."
आणि आई मंदमंद हसत रहायची समजूतदारपणे.
कॅलिफॉर्निकेशन बघताना असे प्रसंग कैक वेळा आले.
हो म्हणजे 'आय ॲम माय फादर्स सन' वगैरे.

Sunday, 22 April 2018

सिरीज पहिली: आन्तूराश (Entourage)

पल्या मुंबईत काही एरियाजमधली मुलं भारी म्हणजे भारीच स्ट्रीट स्मार्ट असतात,
उदाहरणार्थ गिरगाव, भेंडीबाजार, लालबाग, बँड्रा - माउंट मेरी स्टेप्स आणि इतर अनेक.
(तुमच्या एरियाचं नाव ऍड करा बिन्धास्त :))
पण गम्मत म्हणजे हे सगळे भाग कनिष्ठ मध्यमवर्गीय म्हणावे असेच.
त्या त्या एरियातल्या पोरांची एक खास अदा असते, चालूपणा असतो, 
गोष्टी सहजासहजी न मिळाल्यानं दुनियादारीची एक तगडी समज असते,
दोस्ती दुष्मनीचे घट्ट हिशेब असतात इत्यादी इत्यादी...

क्वीन्स हा न्यूयॉर्कमधला अस्साच एक फारसा श्रीमंत नसलेला भाग,
आणि व्हिन्सेंट चेस उर्फ 'व्हिन्स'  हा क्वीन्समधला एक देखणा तरुण.
थोडं नशीब थोडं टॅलेंट असं काय काय जमून येतं...
व्हिन्स धाडकन एका रात्रीत सुपरहिट्ट पिक्चरचा सुपरस्टार होतो...
आणि हॉलीवूडला पोचतो.

पण एल. ए. च्या मायानगरीत तो एकटा येत नाही तर आपल्या तीन घट्ट दोस्तांना घेऊन येतो.
शिवाय त्यांना (पोसत असला तरी) पोसतोय असं वाटू नये म्हणून आपल्या क्रूमध्ये लुटूपुटूची काम देतो.
मॅनेजर, ड्रायव्हर, पर्सनल ट्रेनर नं काय काय,
ही गोष्ट आहे त्याची अन त्याच्या ताफ्याची...
म्हणूनच Entourage (उच्चार: आन्तूराश हे नाव.

Friday, 20 April 2018

तीन सिरीज

ला नेहमीच वाटत आलंय की सिनेमा, पुस्तकं, नाटकं, गाणी आणि सगळ्याच कलाकृती...
कलाकारासाठी पर्सनल असतातच येस्स!
पण रसिकासाठी त्याहून कैकपटीने जास्त पर्सनल असतात!
तो बनवणारा त्याला काय बनवायचं ते मस्त बनवतोच.
पण ते घेणाऱ्याला काय घ्यायचंय ते प्र - चं - ड सब्जेक्टिव्ह असतं.

म्हणजे "मॅट्रिक्स" बघून काही लोकांना त्यातले स्टंट्स आवडलेले,
काही लोकांना त्यातले 'प्राडा'चे ढासू स्टायलिश कपडे आवडलेले,
काही लोकांना भगवदगीता, बुद्ध, ताओइझम, निहीलिझम, अस्तित्ववाद असं काय काय मिळालेलं,
काही लोकांना पातळ शिडशिडीत कियानू आवडलेला,
तर काही लोकांना थंड सुरीसारखी सेक्सी धारदार कॅरी ऍन मॉस आवडलेली...
पण आत्ता आपण मॅट्रिक्सविषयी नको बोलूयात.
कारण मॅट्रिक्सवर मी चालू झालो की मला थांबवणं खरंच म्हणजे खरंच कठीण आहे सो कंट्रोल!

तर...
मला खूप दिवसांपासून या तीन विशिष्ट सीरीजविषयी बोलायचंय,

आयुष्याच्या विविध टप्प्यांवर सुदैवाने या तीन सीरीजशी माझी गाठ पडली हे मस्तच.

"अर्रे यार हे तर आपणच आहोत किंवा आपला खास यार-दोस्त असाच आहे,
किंवा हा च्युत्यापा आपण अस्साच केलेला,
किंवा आपणही असाच फकअप केलेला रिलेशनमध्ये,
किंवा हे असंच आजकाल आपण सगळॆ डोकं गहाण ठेवून वागतो..."

असं विविध कायकाय मला या सीरीज बघताना अक्षरश: लाखो वेळा वाटलेलं...

बेदरकारी, लॉयल्टी, इंटिग्रिटी, जज न करणं, क्षमाशीलता, प्रेम, सोशल मिडीयापासूनची सावधगिरी आणि इतर अनेक माणकं माझ्यावर उधळली...
दिलखुलास...
यातल्या पात्रांनी.
मला हसवलं, रडवलं, घाबरवलं, जोश दिला आणि बरंच कायकाय.

पण हे रिव्ह्यू नाहीयेत बरं का.
रादर... ही दाद आहे इतकं काही ऑस्सम बनवल्याबद्दल.
हे थँक्स आहे जास्त चांगला माणूस व्हायच्या वाटेकडे बोट दाखवल्याबद्दल.
आणि म्हणूनच हे सगळं मला तुम्हाला भडाभडा सांगायचंय.

आणि हो.
शक्यतो प्रयत्न सिरीज माझ्या गाभ्याला का आणि कशी भिडली ते सांगण्याचा आहे, पण लिहिण्याच्या ओघात काही स्पॉयलर येऊ शकतात.
सो बी अवेअर.


... लवकरच.

Monday, 9 April 2018

फॉर द लास्ट फकिंग टाइम पीपल

स्वस्त रुचकर जेवण, पाट्या आणि ऍटिट्यूडसाठी (इन दॅट ऑर्डर) साठी प्रसिद्ध असलेल्या सदाशिव पेठेतल्या "बादशाहीची" एक ब्रँच बाणेर मध्ये आलीय हे मस्तच.
त्यानिमित्तानं...
मला बरेच दिवसांपासून हे बोलायचं होतंच.

फॉर द लास्ट फकिंग टाइम पीपल,
आमचं (हो आमचंच) पुणे कधीच बदललंय...
खालील काही ठळक मिथ्स प्रचन्ड क्लिशेड आणि इनव्हॅलिड होऊन जमाना झालाय रे बाबांनो!

१. आमची कुठेही शाखा नाही:
वाचा बादशाहीबद्दलची पहिली ओळ.
एकुणातच पुण्यातली नामांकित दुकानं आणि हॉटेलं 'लेफ्ट-राईट-सेंटर' शाखा काढतायत.
चितळ्यांच्या तर पुण्यातल्या प्रत्येक मेजर एरियात शाखा आहेत.
आणि हो माझ्या मुंबईकर मित्रांनो, त्या प्रत्येक शाखेत तितक्याच ताज्या बाकरवड्या मिळतात यार...
सो बाणेरवरून लक्ष्मी रोडला मरवत जायची गरज खरंच नाहीये, ट्रस्ट मी!        

२. एक ते चार:
मी जे जे  बाणेर / विमाननगर / वानवडी सारखे कॉस्मो एरियाज बघितलेयत तिकडे प्रॉपर सगळी दुकानं रणरणत्या दुपारी चालू असतात आणि आत्ता बहुतेक चितळे सुद्धा ...
आणि झोपले चितळे तर झोपू देत थोडे दुपारी... सकाळी लवकर उठतात ते कळलं!
आमचा परममित्र मुंबईचा 'पार्ले बिस्कीट' मधला इंजिनिअर अवीसुद्धा दुपारी हळूच पार्किंगमध्ये जाऊन गाडीत डुलकी काढतो.
सो बिग डील!

Saturday, 7 April 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १२)

एका आठवड्याने:
मी हॉस्पिटलमधून डिस्चार्ज घेतला, सगळे पेपर्स घेतले...
केतकी आणि बाळाला घेऊन खाली उतरलो...
केतकी अजूनही घुश्श्यातच होती...
मागच्या आठवड्याचा राग अजून गेला नव्हता.

आम्ही गेटवर जाऊन रिक्षा शोधणार...
तितक्यात एक सोनसळी आणि काळ्या रंगाची मिनी कूपर सुळ्ळकन येऊन आमच्या समोर थांबली...


तिला सुंदर गिफ्ट बो बांधला होता.
आतून पटकन एक चटपटीत पोरगा उतरला आणि त्यानं गाडीची डिजिटल चावी आणि एक छानसा लिफाफा माझ्या हातात दिला.
केतकीचे डोळे बशीएवढे मोठे झाले होते.
मला काही कळेना...
मी लिफाफा उघडला,
आतमध्ये लिहिलं होतं:
"थँक्स फॉर एव्हरीथिंग"  
आणि खाली अल्फाजची लफ्फेदार सही होती.

झप्पकन बाजूनी एक टॅक्सी गेली आणि ड्रायव्हरनी मला हात दाखवल्याचा भास झाला.

---------------------------------------- समाप्त ----------------------------------------


तळटीपा:
*रासबेरी पाय*
हा छोटासा साधारण क्रेडिट कार्डाएवढा कम्प्युटर प्रोसेसर असतो.
अधिक माहिती:
https://www.raspberrypi.org/help/what-%20is-a-raspberry-pi/

*बिटकॉइन मायनिंग*
बिटकॉईन्स हे इलेक्ट्रॉनिक चलन (Cryptocurrency) आहे.
१ बिटकॉइन = साधारण सव्वासात लाख रुपये (आजचा रेट)
बिटकॉइन मायनिंग ही बिटकॉईन्स मिळवण्याची पद्धत आहे.
त्यासाठी जास्तीत जास्त प्रोसेसर स्पीड असलेले कम्प्युटर्स आवश्यक असतात.
अधिक माहिती:
https://en.wikipedia.org/wiki/Bitcoin
https://www.youtube.com/watch?v=GmOzih6I1zs

Friday, 6 April 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ११)

"हो पण रिलॅक्स!
तुझा प्रोब फारसा इनव्हॅजिव्ह नव्हता.
तुझ्या हेडरेस्टमधून एक सूक्ष्म नळी गेली तुझ्या डोक्यात फक्त १० मिनटं...
तुला जाणवलंसुद्धा नाही फारसं."

"का पण", मी कळवळून ओरडलो,

"कारण पुढे बसणारा माणूस जर स्वतः ड्रायव्हिंग करणारा असेल तर त्याचं मनातल्या मनात ड्रायव्हिंग चालू असतं.
त्याचा समोरचा व्ह्यू जवळजवळ ड्रायव्हरसारखाच असतो.
तो मनातल्या मनात ब्रेक मारतो, टर्न मारतो आणि समोरची गाडी जास्त जवळ आली की घाबरतो सुद्धा
आणि हा  पॅसेंजरचा पॅसिव्ह ड्रायव्हिंग करणारा मेंदू आणि ड्रायव्हरचा ऍक्टिव्ह ड्रायव्हिंग करणारा मेंदू...
यातला डेल्टा आम्हाला डेस्परेटली हवा होता.
तो आज मिळाला फायनली तुझ्यामुळे."

मी पुढे जाऊन रागाने अल्फाजची कॉलर धरली पण आधीच त्यानं मान टाकली होती आणि तो अर्धवट बेशुद्ध अवस्थेत काहीतरी बडबडत होता,
"डेटा -- अपलोड -- टायर -- हवा -- उंची -- झाड" असं काहीतरी.
त्याच्या मानेजवळ लाल नंबर्स आता २८ मिनिटांचा काउंट डाऊन दाखवत होते.

मला विलक्षण चीड आली या सगळ्यांची, पावसाची, केतकीच्या न लागणाऱ्या फोनची, पडलेल्या झाडाची  सगळ्याचीच...
मी बाइकवाल्याला बोललॊ,
"चलो मेरेको छोडो आगेतक"

तो बावरल्यासारखा झाला,
"लेकिन ये भाईजान का हालत भौत खराब है!"

"तो बैठ उसको पकडके, मै जा रहा हू!", मी वैतागून बोललो आणि झाडाखालून वाकून जायला लागलो...

तेव्हढयात मला काहीतरी क्लिक झालं,
अल्फाज अजूनही बरळत होता, "टायर -- झाड..."
मला रहावेना.
मी परत आलो...
बाइकवाल्याला पोलिसांसाठी थांबायला सांगितलं.
अल्फाजचा पडलेला फोन उचलला, मिष्टीनं लोकेशन पाठवलं होतं.
अल्फाजला पॅसेंजर सीटवर बसवून प्रोसेसरच्या उरलेल्या दोन वायर्स जोडल्या लगेच डेटाचं सिंक चालू झालं.
मग मी माझ्या खिशातलं पेन काढलं आणि टॅक्सीच्या चारही टायर्समधली हवा कमी केली...
पूर्ण नव्हे इंचभराने...
मग मी ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालू केली, गियर टाकला...
आणि गाडी झाडाखालून अलगद बाहेर काढली. (फक्त रेडिओ अँटेना तुटला.)

क्रमश:

Wednesday, 4 April 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १०)

"प्लीज एक औ र का म करो मेरा, ये भाई को बाइकपेसे घर छोड दे
उन की औ र त पेटसी हय"

"आणि तू / और आप?",
आम्ही दोघांनी एकदम विचारलं,

"मी अनप्लग होतो इकडेच... मशिनगनची फायरींग ऐकून कोणीतरी फोन केला असेलच सो पोलिसही येतील...
पण तो पर्यंत मी अनप्लग झालेला असेन..."

तेवढ्यात अल्फाजचा फोन वाजला... 'मिष्टी कॉलिंग'
अल्फाज चमकला,
त्यानं फोन स्पीकरवर टाकला,
"हॅलो मिष्टी तू जिवंत आहेस?"

Sunday, 1 April 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ९)

समोर एक झाडाची फांदी वादळी वाऱ्याने अर्धवट तुटून साधारण जमिनीपासून पाच फूट उंचीवर तरंगत होती.
टॅक्सी गेली नसती त्याच्याखालून... किंSSSचित अडत होती ती.
अल्फाजनं दात ओठ खाऊन स्टिअरिंगवर हात मारला.
पाठी रोंरावत येऊन फॉर्च्युनर थांबली आणि बारुआ खाली उतरला आता त्याच्या हातात मशिनगन होती.

"मी गाडी आडवी लावतो तू ... झाडाखालून पळून जा", अल्फाज पुटपुटला.
मला काहीच समजलं नाही...
पण दुसऱ्याच क्षणी अल्फाजनी फुल्ल स्पीडमध्ये रिव्हर्स मारला आणि बारुआच्या अंगावर पाठमोरी गाडी नेता नेता हॅन्डब्रेक खेचला...
त्यामुळे बेसिकली आमची गाडी बारुआच्या समोर आडवी लागली...
त्याच्या समोर अल्फाज असल्यामुळे मला कव्हर मिळालं आणि अल्फाजनी मला पॅसेंजर डोअरमधून बाहेर ढकललं.

त्याचवेळी बारुआनं  मशिनगन चालवली... रँडम गोळ्यांची फैर टॅक्सीवर तडतडली... 
इतक्यात पाठून अवचित वॉंव वॉंव करत आलेल्या बाइकवाल्यानं हाताचा फटका फाडकन बारुआच्या मानेच्या मागे मारला...
बारुआ त्या सडन थापेने उलटा-पालटा झाला त्याच्या मशिनगनचं तोंड मागे वळलं आणि मशिनगन त्याच्या फॉर्च्युनरवरच थडथडली...
पाठून बंदूक उपसून येणारा त्याचा ड्रायव्हर छाती आवळत खाली कोसळला.
अल्फाजनी दार उघडून बारुआवर झेप घेतली आणि त्याला लाथाबुक्क्यांनी बुकलायला चालू केला...
दूर उडालेली मशिनगन अल्फाजनं दात ओठ खाऊन हातात घेतली आणि तो बारुआला गोळ्या घालणार...  इतक्यात मी आणि बाइकवाल्याने त्याला कसाबसा थोपवला.

अर्धमेल्या बारुआला आम्ही टॅक्सीतल्या लगेजच्या रोपनी घट्ट बांधला.
अल्फाज तरीही त्याला लाथा घालत होता...
त्याला कसाबसा आवरत बाईकवाल्याने हेल्मेट उतरवलं... तोच होता मघासचा कडक्या ज्याला अल्फाजनं वाचवलं होतं.

तो भडाभडा बोलू लागला,
"भाईजान आपने मेरेको बचाया और हेल्मेट को वास्ते डांटा, तभी मै गर्लफ्रेंडको मिलने जा रहा था टाऊन साईडमें.
वो बेचारिका कल एक्झाम है फिर भी उसको प्यार का वास्ता देके बाहर बुला रहा था मै...
लेकिन वो ऍक्सिडन के बाद दिमाग ठिकाने आया मेरा...
उसको फोन करके बोला मै... नही मिलते है... तू पढ अच्छेसे करके.
और मै भी सिधा 'U' मारके वापस घर निकला.
वो बुर्जीपावकी गाडीके इधर आप दिखा तो सोचा आपको ठिकसे थँक्स बोलू...
लेकिन तब्बीच वोह गुंडे लोग आपके पीछे लगा और फिर मै भी चेस मारा उनको!"
एक्साईटमेंटनी थरथरत होता तो.

"थँक यु  दो स्त", अल्फाजचे शब्द थोडे अडखळत होते आणि आत्ता माझं लक्ष गेलं.
 त्याच्या मानेवरचा दिवा पूर्ण लाल रंगात कॉन्स्टन्ट लुकलुकत होता.

क्रमश:

Saturday, 31 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ८)

अल्फाजनी मला हळूSSSच पायाने ढोसलं.

"पासवर्ड: नदियां२५०४", अल्फाज बोलला...

बस अगदी समोर आली टॅक्सीच्या...
हायबीम लाइटने पाठच्या दोघांचेही डोळे दिपले क्षणभर...

त्याचक्षणी अल्फाजने बारुआची बंदूक वळवली आणि अंजाला गोळी घातली...
सायलेन्सरचा दबका आवाज झाला आणि अंजानी मान टाकली,
पण बारुआची बंदुकीवरची पकड घट्ट होती...
आता बारुआ आणि अल्फाजची बंदुकीसाठी झटापट चालू झाली,
तेव्हढ्यात माझीही ट्यूब पेटली आणि मीही अल्फाजच्या मदतीला गेलो...

बारुआनी आम्ही दोघं त्याला भारी पडणार हे ओळखून टॅक्सीचा दरवाजा उघडला आणि बाहेर उडी मारली...
जरा लांब कोपऱ्यात बारुआची पांढरी फॉर्च्युनर उभी होती तिच्या ड्रायव्हरने गडबड पाहून गाडी चालू केली.
आमच्या टॅक्सीवर गोळ्या तडतडल्या आणि अल्फाजनी सुद्धा वॉंवकन टॅक्सी चालू केली.
अल्फाजनं रप्पकन राईट मारला.
आरशात मला बारुआ फॉर्चुनरमध्ये बसताना दिसला आणि फॉर्च्युनर शिकारी कुत्र्यासारखी आमच्या मागे लागली.
समोरचा रस्ता मेट्रोच्या कामासाठी बंद केला होता आणि डावीकडे उंच फूटपाथ होता...
गाडी चढली नसती त्याच्यावर पण अल्फाजनी थाड्कन पत्रा मरून एक मेट्रोचा जाड पत्रा खाली पाडला आणि तिरक्या पडलेल्या पत्र्यावरून गाडी रोंरावत फूटपाथवर चढवली.
फॉर्च्युनर तिकडे झक मारत रिव्हर्स घेत होती.
अल्फाजनं थोड्या अंतरावर कडक मातीचा फूटपाथला चिकटलेला एक उतार हेरला आणि गाडी त्याच्यावरून सर्व्हिसरोडवर उतरवली. आता आम्ही हायवेला लागलो की सुटलो...
तेव्हढ्यात अल्फाजनी काच्चकन् ब्रेक मारला...

क्रमश:

Wednesday, 28 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ७)

मार्शलची गाडी जस्ट वळणापलीकडे असल्याने त्याला आम्ही दिसणार नव्हतो आणि बाकी सामसूमच होती.
"बारुआ भडवे तूच असणार मला वाटलंच होतं..."
अल्फाज चिडून बोलला.
त्या बारुआनं अल्फाजच्या कानावर हलकेच दस्ता मारला आणि अल्फाजच्या कानशीलातून बारीक रक्ताचा ओघळ यायला लागला.
बारुआ आणि त्याच्या साथीदारानी आम्हाला ढकलत ढकलत टॅक्सीकडे नेलं आणि आत बसवलं:

अल्फाज ड्रायव्हिंग सीटवर, त्याच्या बाजूला मला कोंबला
पाठच्या सीटवर बारुआ आमच्यावर पिस्तूल रोखून बसला आणि त्याच्या साथीदारानं झटपट काम चालू केलं:
ड्रायव्हर सीटच्या पाठच्या चोरकप्प्यातून एक छोटासा *रासबेरी पाय* सारखा दिसणारा प्रोसेसर काढला.

"बॉस रूट पासवर्ड लागेल", तो म्हणाला.

"चल सांग लवकर नाहीतर तुझ्या या निष्पाप गोंडस पॅसेंजरला ठोकावं लागेल मला... काल तुझी सॉरी आय मीन आपली सगळी टीम ठोकली तसं.", बारूआनी पिस्तूल माझ्याकडे रोखलं.
मला 'शू'ची भावना व्हायला लागली होती... जोरात.

"त्याला जाऊ दे बारुआ, त्याचा काही संबंध नाही याच्यात, पासवर्ड देतो मी तुला"

"संबंध नाही कसा? तू त्यालापण वापरून घेतलास आज ते सांगितलंस का? एनीवेज त्याला सोडू आपण पासवर्ड दे."

"बॉस दोन पासवर्ड आहेत इनफॅक्ट...
प्रोसेसर क्लीन रिबूट झाल्यावर फॉरमॅटिंगच्या आधी दुसरा पासवर्ड मागेल पण पाच मिनटं लागतील त्याला."

"ठीक आहे अंजा, मग पाच मिनटं थांबू दे पॅसेंजरला, दुसरा पासवर्ड द्यायच्या आधी सोडूया त्याला प्रॉमिस!
अल्फाज मियाँ सांगा पहिला पासवर्ड पटापट"

"राखी१२०४" अल्फाज उत्तरला, आणि बारुआ खदखदून हसायला लागला.

Sunday, 25 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ६)

आम्ही मार्शलचं बिल देऊन पंक्चरवाल्याकडे आलो.
पंक्चर निघालंच होतं...
पंक्चरवाला पैसे घेऊन पुन्हा पांघरूण ओढून एका मिनटात गुडुप्प झोपून गेला...

आम्ही गाडीजवळ आलो... आणि अचानक अल्फाजच्या मानेजवळ एक शेंदरी दिवा लुकलुकला.

"चल जायला हवं लवकर गाडीत...
मी टॅक्सीशी फक्त एक तास डिस्कनेक्टेड राहू शकतो.. बॅकअप बॅटरीवर.
माझ्या हायब्रीड मेंदूचं चार्जिंग फक्त गाडीतूनच होऊ शकतं किंवा आमच्या बेस सेंटरच्या स्पेशल चार्जरमधून."
आणि ऑलरेडी ४५ मिनटं बॅकअपवर आहे मी.

"आणि एक तासापेक्षा जास्त डिस्कनेक्टेड राहिलास तर?"

"मग मात्र माझा मेंदू पॉवर सेव्हिंग मोडमध्ये जाईल:
पुढचा अर्धा तास मला दिसायचं बंद होईल, कारण आपली ऑप्टिक्स फंक्शन्स खूप जास्त बॅटरी खातात...
मी जवळ जवळ कोमात जाईन...
आणि त्यानंतरही नाही जोडलं चार्जरला तर मात्र खेळ खल्लास!
पण तशीही आजची शेवटची रात्र आहे ही सगळी कन्स्ट्रेन्ट्स सांभाळायची...
कारण आम्हाला हवा होता तो सगळा डेटा आता मिळालाय आणि माझा मेंदू आणि गाडीचा प्रोसेसर दोन्ही हायेस्ट परफॉर्मन्सला पोचलेयत... थँक्स टू यू !
शिवाय हा सगळा आर्टिफिशियल जुगाड सस्टेनेबल नाहीये...
पीक परफॉर्मन्स अचिव्ह झाला की २४ तासांनंतर माझ्या ब्रेनसेल्स प्रचंड वेगानी नष्ट होतील... आणि तसाही मी मरेनच.
सो... तूला सोडलं की नॅशनल पार्क जवळच्या कुठल्यातरी निवांत रस्त्यावर टॅक्सी लावून स्वतःला अनप्लग करेन, आणि झोपून जाईन शांतपणे कायमचा!
पण माझं एक शेवटचं काम करशील?
माझा क्लाउड ड्राईव्हचा पासवर्ड इलॉन मस्कपर्यंत पोचवायची व्यवस्था करशील?
मीच केलं असतं खरं तर पण मला त्यानं ब्लॉक करून टाकलंय आमच्या भांडणानंतर."

मला काही कळेना,
"मीच का पण? तुझी ती टीम कुठे गेली?"
मी गोंधळून विचारलं.

"मी सांगतो ते", पाठून आवाज आला...
आणि आमच्या दोघांच्याही पाठीत कोल्टच्या गारेगार नळ्या घुसल्या.

क्रमश:

Thursday, 22 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ५)

अल्फाजनी चुकचुकत गाडी स्लो केली. 
नशीबानं समोरच एक ऑल-नाईट पंक्चरवाला होता.
अल्फाजनं परत त्याच्या मानेभोवतीच्या सगळ्या वायर्स काढल्या... (एकूण चार वायर्स होत्या मी मोजल्या.) 
आणि मग गाडी पंक्चरवाल्याकडे नेली. 
गुरगुटून मस्त झोपला होता तो, त्याला हलवून उठवला आम्ही. 
टायरमध्ये खिळा घुसला होता. 
पंक्चरवाला कामाला लागला...  

"चल भाई बुर्जी खाऊया, मार्शल अल्टिमेट बुर्जी बनवतो"
मला एकीकडे कधी एकदा घरी पोचतो असं झालेलं पण पंक्चर काढणं भाग होतं.
शिवाय वळणापलीकडच्या बुर्जीचा घमघमता वास इथपर्यंत येत होता.

Sunday, 18 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ४)

ड्रायव्हर माझ्याकडे मान वळवून थोडा हसला त्यानं मानेच्या त्या जोडलेल्या वायरींवर टॉवेल टाकला आणि गाडी चालू केली.

"हे सगळं क्काय आहे?", मला रहावेना.

तो परत विचित्र हसला आणि म्हणाला,

"हॅलो, आय ऍम अल्फाज टायरवाला!"

"क्काय!", मी तीन ताड उडालोच.

आम्हा आयटीवाल्यांचा देव होता 'अल्फाज टायरवाला' एके काळी.

जॉब्स, झुकरबर्ग, लायनस टॉर्वल्ड, इलॉन मस्क या सगळ्यांच्या बरोबरीला झपाट्याने येणारं भारतीय नाव होतं ते काही वर्षांपूर्वी.
प्रचंड गरीबीतून झालेलं त्याचं शिक्षण, मुंबईत टॅक्सी चालवून प्रचन्ड धडपड करून त्यानं कॉम्प सायन्समध्ये केलेलं मास्टर्स...
आणि मग कमावलेलं प्रचंड यश...अमाप पैसा
त्याचं ते कार पार्किंगचं तुफान पॉप्युलर ऍप...
ड्रायव्हिंगचे इंटरॅक्टिव्ह गेम्स...
मशीन लर्निंग वरचे टेड-टॉक्स...
सगळं झपाट्याने आठवत गेलं मला.
येस्स अल्फाजच होता तो, आत्ता माझी ट्यूब पेटली.
त्याच्या आत्ताच्या खप्पड चेहेऱ्यामुळे आणि पांढऱ्या केसांमुळे ओळखू येत नव्हता तो.

मी पुन्हा एकदा नीट बघितलं.

Saturday, 17 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग ३)

ड्रायव्हर तोपर्यंत बाइकवाल्याकडे पोचला होता.
बाइकवाला आधी निपचित वाटला... पण हळूहळू उठून उभा राहीला.
फारसं लागलं नव्हतं त्याला फक्त शॉक बसला होता.
जाड जीन्स घसपटून फाटली होती आणि थोडंसं खरचटलं होतं.
डोक्याचं कलिंगड फुटण्यापासून अर्थातच वाचलं होतं आमच्या ड्रायव्हरच्या कृपेने.
ड्रायव्हरनं त्याला एकदा चेक केलं वरपासून खालपर्यंत.
"ठीक है तू?"
"अं... अं... हा!", बाइकवाला उत्तरला. अजूनही थोडा सदम्यातच होता तो.

ती अशी टोळासारखी बाईकवर बसत... वॉंव वॉंव करत हेलकावे देत गाडी चालवणारी 'बंटाय' पोरं असतात ना,
तस्साच होता तो.
तोंडावर मुरुमं... साळींदरासारखे कापलेले केस आणि कडक्या.
बाइकलाही फारसं काही झालेलं नव्हतं.
फक्त लेफ्टचा इंडिकेटर तुटला होता.
आम्ही त्याला बाईक उभी करायला मदत केली.
बाईक दोन किक मध्ये चालूही झाली.
               
 बाइकवाला अजूनही सदम्यातच होता.
  "थ... थ... थॅंक्यू भाईजान", तो चाचरत बोलला...  

आणि आमच्या डायव्हरनं त्याची कॉलर पकडली,

Thursday, 15 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग २)

इतक्यात आमच्या टॅक्सीवाल्याने खालील तीन गोष्टी केल्या:
१. गाडीला हलकासा गचका दिला आणि गाडी चक्क फ्लायओव्हरच्या बुटक्या डिव्हायडर वरून रॉंग साईडला नेली. (कशी काय कोण जाणे)
२. कचाकच ब्रेक मारत गाडीचा स्पीड कमी केला.
३. आडवी होऊन स्ट्रायकरसारखी सुसाट येणाऱ्या बाईकच्या पुढच्या टायरला हलका प्रेमळ डिच्चू दिला.

त्याने खालील तीन गोष्टी झाल्या:
१.रस्त्याच्या कठड्याकडे झपाट्याने घसरणारी बाईक उलटी फिरली.
२. तिचा घसरण्याचा वेग थोडा कमी झाला.
३. आणि बाईक स्वाराचं हेल्मेटविरहीत डोकं कठड्यापासून दोन इंचांवर थांबलं... न फुटता.


काहीसं असं:


आमच्या टॅक्सीवाल्यानं टॅक्सी थोडी पुढे थांबवली आणि रिअर व्ह्यू मिरर मधनं मागे बघितलं.
बाईकवाला निपचित पडला होता.
तीन चार गाड्या अशाच निर्लज्जपणे पाणी उडवत पुढे पास झाल्या. 

टॅक्सीवाल्याची कसलीतरी घालमेल चालू होती... 
इंजिन चालू होतं... 
गाडी न्यूट्रलवर... 
त्यानं माझ्याकडे बघितलं... 
फर्स्ट गिअर टाकला...  
परत बाइकवाल्याकडे बघितलं... 
निपचित. 

परत त्यानं शिवी हासडत न्यूट्रल टाकला... 
हँडब्रेक खेचला... आणि म्हणाला,
"आपको ये दिखना नही था लेकिन उस येडेकी हालत देखने पडेंगी"'

त्यानं हळूच मानेभोवतीचा फडका काढला... 
त्याच्या मानेतून चार प्लग सीटच्या हेडरेस्टमध्ये गेलेले होते. 
थोडेसे गाडीच्या स्पार्कप्लगसारखे दिसत होते ते... 
त्यानं एक एक प्लग उपसून काढला आणि मान मोकळी करत तो गाडीतून खाली उतरला. 
मी थिजून त्याच्या मानेतल्या चार रक्ताळलेल्या भोकांकडे बघत राहिलो...
आणि पाठोपाठ खाली उतरलो.

क्रमश:

Tuesday, 13 March 2018

काळ्या-पिवळ्या रात्रीची गोष्ट (भाग १)

मी प्रचंड विनोदी हातवारे करत टॅक्सी थांबवली आणि पाऊस चुकवत आत घुसलो.
"भाय पासमे ही जानेका हय... स्टेशन."
मला गणेश मतकरीच्या कथेतलं वाक्य आठवलं,

'मुंबईच्या टॅक्सी रिक्षावाल्यांशी बोलताना तुमच्या आवाजातच काहीतरी असं असावं लागतं की नाही म्हणण्याची त्यांची हिंमतच होऊ नये.'... 
माझ्याकडे तरी तो आवाज नव्हता...
मग मी जगातली सगळी करुणा एकवटून ड्रायव्हरकडे बघितलं आणि "प्ली SSS झ" म्हटलं...
आणि फारशी आशा न बाळगता परत खाली उतरायची तयारी केली.
ओय!... पण चमत्कार झाला!
ड्रायव्हरनं चक्क मीटर टाकला...
मग गिअर टाकला...
आणि मला एक छानसं स्माईल दिलं.
येय!
चला अर्धी लढाई जिंकली आता शेवटची विरार ट्रेन जायच्या आत स्टेशनला पोचलो की जितं मया!

"थोडा मुष्कील है साब तीन मिनटमें स्टेशन पहुचना लेकिन ट्राय करेंगे इन्शाल्ला",
ड्रायव्हर मनातलं वाचल्यासारखं बोलला... आणि त्यानं स्पीड वाढवला...

Monday, 1 January 2018

दीपक मामा (भाग ३)

त्याचे असे अनेक स्ट्रॉंग फंडे त्या तीन महिन्यांतला तुटक वीकेण्ड्सना मी शिकलो.
हा अजून एक,
"निखिल, रस्त्यावरचे सगळेच्या सग SSS ळे... म्हणजे गाडीवाले, चालणारी लोकं, पोरं-टोरं, गायी-गुरं वेडे आहेत आणि तू एकटाच शहाणा आहेस असंच समजून गाडी चालवायची.  
वेड्या माणसाचा काय भरोसा नसतो, तो कुठेही कधीही काहीही करू शकतो.  
संभाळून घ्यायचंय तुलाच हे लक्षात ठेव."
थोडक्यात काय तर रस्त्यावर कधीही काहीही गृहीत धरायचं नाही,
हे त्याचे स्टुडन्ट्स शिकतातच.

किंवा हा...   
पेट्रोल (म्हणजे ऍक्सिलरेटर लक्षात ठेवा :)) फक्त आणि फक्त उजव्या पायाच्या अंगठ्यानीच द्यायचं ."
हे  पण  खूप  भारी  आहे!
पूर्ण पाय दाबून धश्चोट गाडी चालवण्यापेक्षा असं अंगठ्यानी पेट्रोल देण्याने आपला वेगावर अधिक चांगला आणि ग्रॅन्युलर कंट्रोल राहतो.

किंवा हा...   
निखिल, तुझी कार मेन रोड क्रॉस करत असेल तर एकतर थांबायचं ... 
किंवा गाड्या पुरेशा लांब असतील तर झप्पकन निघून जायचं ... 
चलबिचल केलीस तर बाजूने येणाऱ्या गाड्या तूला चिरडू SSS न टाकतील !!
इथे मामा 'चिरडून' हा शब्द एक्झॅक्टली 'रायगडाला जेव्हा जाग येते' मधल्या शिवाजी महाराजांसारखा ठासून बोलतो.
ते साहजिकच आहे म्हणा,
मराठी माणूस तोही गिरगावातला असल्यामुळे नाटकाचा किडा अर्थातच त्याच्यात आहे.
त्याचा 'तरुण तुर्क...' (त्वष्टा कासार ज्ञाती हौशी नाटक मंडळ) मधला 'प्रोफेसर बारटक्के' बघितलाय मी.
अप्रतिम करतो तो.

बरं पण एवढी सगळी धमाल करून मी ड्रायव्हिंग शिकलो का?
खरं तर नाही विशेष... पण ती दीपक मामाची चूक नव्हेच.
असं तीन महिने दर वीकेण्डला जाऊन ड्रायव्हिंग शिकणं म्हणजे...
दर दहा मिनीटांनी पाच सेकंद मेक-आउट करून 'गॅजमची अपेक्षा करण्यासारखं आहे
पण तेव्हा मात्र ऑन पेपर भारी वाटला होता हा प्लॅन...
असो... त्याचं एवढं काही विशेष नाही, नंतर पुण्यातच पंधरा दिवस क्लास लावून रप्पारप गाडी चालायला शिकलोच मी.
पण सिव्हिलाइझ्ड ड्रायव्हिंगचा ऍटिट्यूड मात्र मामानेच दिला.

शिवाय सरत्या हिवाळ्यातल्या रविवारच्या त्या गिरगाव, धोबी तलाव, मरीन लाईन्सच्या प्रसन्न सकाळी...
त्या राहतीलच कायम... आठवणीत.

अजूनही सकाळी गाडी काढताना मी आधी घोकतो,
'रस्त्यावरचे सगळे वेडे  आहेत ... आपणच एकटे शहाणे आहोत '
मग ऍक्सीलरेटर... चुकलो... 'पेट्रोल' वर फक्त आणि फक्त अंगठ्याने हलकेच तिरका दाब देतो...
नाईलाजाने निरोप द्याव्या लागणाऱ्या मित्रासारखा हळूहळू क्लच सोडतो...
आणि ट्रॅफिकच्या रणधुमाळीत घुसतो...
गाडी बंद न पाडता :)


----------------------------------------------------- समाप्त ------------------------------------------------------
-नील आर्ते