सकाळी थंड पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ओतला की 2 गोष्टी होतात:
- मंगल चिन्ह बघून धारपांच्या कथेतल्या अभद्र भूतांनी कल्टी खावी तसा आळस पार पळून जातो.
- मला शहाणपण आणि लॉजिकचे रॅन्डम पण प्रचंड प्रोफाउंड साक्षात्कार होतात. (असंच एकदा मी सहा वर्ष वाढवत असलेल्या कमरेपर्यंत लांब केसांना कापायचं ठरवलं होतं.)
या वेळेस मला अचानक क्लिक झालं की आपल्या तुफान लोकप्रिय (तब्बल 19 फॉलोअर्स... आहात कुठे?)
ब्लॉगचं नाव चक्क अनएथिकल आहे.
म्हणजे मान्य "चंद्रमाधवीच्या प्रदेशात" हे खूप सुंदर नाव आहे आणि ग्रेसच्या ह्या कविता-संग्रहाचं नाव मला खूप म्हणजे खूप जिनिअस वाटतं...
पण ते ग्रेसना सुचलं होत आपल्याला नव्हे (करपलो सालाबादप्रमाणे!)
आणि "मेमसाब हम गरीब है मगर चोर नही"!!!
सो अंघोळ झाल्या झाल्या अंगही न पुसता...पुण्यात मेच्या दुपारी बारा वाजता जितकं कुडकुडता येईल तितकं कुडकुडत पापक्षालन करतोय:
चंद्राचा सूर्य झाला इतकंच:
बाकी ब्लॉगची व्यामिश्रता, अभिजातता, खुसखुशीतपणा, जीवनाचं समग्र दर्शन, मानवी मनाचे हळुवार उलगडणारे पापुद्रे, विचारांची खोली वगैरे-वगैरे कायम राहीलच ;)
...अवांतर... बारीक कापलेले ओले केस टॉवेलने खसाखसा पुसल्यावर फक्त पुढची दहा मिनिटंच सेक्सी दिसतात...आणि नंतर वॅक्स, जेल् किंवा जगातलं कुठलंही प्रॉडक्ट लावलं तरी तसे रहात नाहीत असं का बरं?
-एक स्वच्छ आणि गरीब पण चोर नसलेला मुलगा.