Saturday 27 July 2019

त्रिकथा २: आ दा पा दा

मी माधव डोळस उर्फ माध्या डोळस.

एक टाइम माझी पण थोडीशी हवा होती अंडरवर्ल्ड मध्ये.
शिवाय माझं नावही म्हणे २०-३० वर्षांपूर्वीच्या कोणत्यातरी नामचीन गुंडाशी मिळतं जुळतं होतं.

मला खरं तर आधी भारी वाटायचं हे सगळं.
डेअरिंग याहूम आपल्यात पहिल्यापासून.
केशूचा तर उजवा हात होतो मी... आणि डावा हात मदन्या.
पण केशूभाई म्हणायचाच, 'खरा जिगर माध्यातच आहे'
मदन्यात डेअरींगपेक्षा क्रौर्य जास्त होतं...
कुठे झुरळाला चटकेच दे, कुत्र्यांचे पायच बांध, आंधळ्या भिकाऱ्याला टपलीच मार असं काय काय करायला भारी आवडायचं त्याला.

त्यात मदन्यानं कुठूनतरी ती नार्कोझ सिरीज बघितली आणि केशूभाईला दाखवली.
त्यानंच केशूभाईच्या डोक्यात ते पुण्याचा पाब्लो एस्कोबार बनायचं भूत घातलं.
केशूभाई जास्तच खतरनाक जास्तच विकृत बनत चालला होता दिवसेंदिवस.

मला मात्र हळूहळू कंटाळा यायला लागला होता या सगळ्याचा.
त्यात त्या नदीवरच्या दंगली झाल्या दोन्ही जमातीतली शेकडो माणसं मेली.
मी कशात नव्हतो, पण एकदा केशूभाईला फोनवर आमदारबाईशी खुसपुसताना ऐकलं...
त्यानंच बाईच्या सांगण्यावरून दंगल भडकावलीय ह्याची जवळ जवळ खात्री होती मला.

मी मग जरा विचार करायला लागलो...
त्यात झिलिक पण प्रेग्नंट झाली आणि तिच्या पोटातली ती धडधड ऐकून वेगळंच कायतरी वाटायला लागलेलं.
धतिंग आणि खाणं, दोनच शौक होते आपले...
पण हळूहळू भाईगिरी सोडून द्यावीशी वाटायला लागलं होतं

खाण्यात मात्र पाणीपुरी फेव्हरीट!
आपला ठरलेला भैया पण होता पाणीपुरीवाला... गुप्ता!
चांगला होता बिचारा... गायीसारख्या मोठ्ठ्या पाणीदार डोळ्यांचा.
सेनापती बापट रोडवर त्याचा तो लाल अलवणातला लहानसा ठेला लावायचा.
कधीकधी बरोबर पोरगा असायचा.
त्याचीच छोटी कॉपी, तसेच पाणेरी डोळे...
गुप्ताच्या पाया-पायात घोटाळत... मांजराच्या पिल्लासारखा.
फारसं बोलायचा नाही तो...
मोठ्ठया डोळ्यांनी बघत मात्र रहायचा टुकूर टुकूर!

रोज न चुकता पाणीपुरी खायचो मी त्याच्याकडे.
अजब चव होती त्याच्या हाताला.
मुलायम रगडा, गोडूस चटणी, ठसकेदार पाणी, कुरकुरीत पुरी...  
या सगळ्यांचे एकाचवेळी एकत्र आणि स्वतंत्र उत्सव चालायचे..,
माझ्या  जिभेवर, घशात, गालांत, ओठावर, पोटात, छातीत, मेंदूत.

त्यादिवशी सुद्धा...

खरं तर माझी सगळी सेटींग झाली होती.
पुण्यातला माझा शेवटचा दिवस होता तो.
केशूभाईच्या फोनमधली ती दंगलीच्या संभाषणाची रेकॉर्डिंग मी सुमडीत माझ्या फोनवर घेतली आणि केंजळे सायबांना पाठवली.

आता इकडे केशू, मदन्या आणि त्या आमदार बाई बाराच्या भावात
आणि आम्ही तिकडे क्राईम ब्रँचच्या खबरी फंडातून केंजळसायबांनी दिलेले दीडलाख घेऊन कोलकात्याला छू.

मग कदाचीत कोलकात्याला बुर्जी पावची गाडी टाकली असती.
पण तिकडे लोक खातात तरी का आपल्यासारखे बुर्जीपाव? कोण जाणे??
का गुप्तालाच घेऊन जावा आणि पाणीपुरी टाकावी?

काय बरं म्हणतात तिकडे पाणीपुरीला?
पुचका  वाटते.

गुप्तावरून मला पाणीपुरी आठवली त्याची.
मी घड्याळ बघितलं.
माझा पाणीपुरीचा टाइम झालेला.
बरोब्बर साडेतीन तास होते केंजळे सायबांना भेटायला.
त्यांना भेटून पैशांचं पाकीट घेतलं की डायरेक् स्टेशनवर.
झिलिक कामावरून परस्पर तिकडेच येणार होती.
मग १० च्या लातूर हावरा एक्सप्रेसनी कलटेश!
डायरेक कोलकाता.
तिकडे झिलिकचा भाऊ होताच.

माझ्या डोक्यात कीडा वळवळला...
पाणीपुरीची तलफ आली.
तसाही आज शेवटचा दिवस पुण्यातला.
नाही म्हटलं तरी हुरहूर लागलेली.

पण नको जाऊदे तिच्यायला आज पोटपण खराब होतं...
सकाळपासून ढाम-ढूम चालू होतं.
ते सुद्धा नुसतं 'झागवालं' नव्हे तर डेंजर वासवालं.
माझ्याच नाकातले केस करपायची पाळी आली होती.
झिलिकनं जाताजाता धमकी दिली होती...
जाताना डब्यात प्रदूषण केलंस तर चालत्या ट्रेनमधून फेकून देईन म्हणून... ह्या ह्या ह्या!
जाऊ दे नको जायला आज...

दहाव्या मिंटाला गुप्ताकडे होतो मी :)
एक एक पाणीपुरी मन लावून खाल्ली मी.
ह्या शहराची शेवटची चव साठवून घेतली.
गुप्ताला पैसे दिले, छोटूला टाटा केला तेवढ्यात गुप्तानी मसाला पुरी पुढे केली.
हो म्हणजे चाटनंतरची कडक पुरीवर बटाटा, मसाला आणि शेव टाकलेली फ्री पुरी हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे.
कोलकात्यात अशी फ्री पुरी देतात का?
मला उगीचच सेंटी वाटलं,
मी पुरी तोंडात कोंबली... 
... 
... 
... 
तितक्यात केशूभाई आणि मदन्या बुलेटवरून फुदफुदत आले.

दोघांची नजर बघून मला चर्र झालं.
केशूभाई सरळ माझ्याकडे आला,
"तुझा फोन लागत नाय."
(मी सिम फेकून नवीन घेतलं होतं.)
"बॅटरी ऑफ आहे केशूभाई."
केशूभाईनी दोन क्षण रोखून बघितलं...
बुलेट साईडला लावली...
आणि अंगावर धावला... गुप्ताच्या.
त्यानं फाडकन गुप्ताच्या कानफडात मारली.
पाठून मदन्यानी त्याचा पाण्याचा मटका उचलून खाली आपटला.
रस्त्यावर तिखट शेवाळी पाणी पसरत गेलं.