Thursday, 6 December 2012

ब. रा. गु. चो. ...च्या निमित्ताने

तुम्हाला कधी असं झालंय? म्हणजे आपण एखादा यम्मी पिक्चर (किंवा नाटक किंवा पुस्तक वगैरे) उगीचच वेळ काढूपणा करत ताजा ताजा गरम असताना बघत नाही.(पुणुलेच्या भाषेत मा sssssss ज)...
आणि मग सवडीने अवचित कधीतरी बघुन झाल्यावर वाटतं...अरे यार इतके दिवस आपण का टाइमपास करत होतो? कसे राहिलो याच्याशिवाय?? कसे जगत होतो?? इ. इ. 
(म्हणजे तसं रियलायझेशन मला अंमळ उशीरा ड्रायव्हिंग शिकल्यावरही झालं होतं आणि, तब्बल दहा वर्षांनी हॅरी पॉटर वाचल्यावर सुद्धा).

प्रत्येक गोष्टीचा टाईम यावा लागतो हेच खरं.

मुदलात 'माकडाच्या हाती शॅम्पेन' बघू बघू म्हणत राहून गेलेलं...
पण फायनली "बदाम राणी गुलाम चोर" बघितला आणि मी काय मिस करत होतो ते कळलं!

एकतर मला हटके नाववाल्या 'प्रोटॅगॉनिस्ट्स्'चं  भारी फॅसिनेशन...
आणि इकडे तर काय पुस्तक, पेन्सील, चाकू, माकड, काकडी वगैरे...हैदोसच सगळा!

त्यांची ती फाड-फाड विधानं, दुहेरी लेयर्स वर चालणारा प्लॉट, 
आणि रिलेशनशिप्सचा लख्ख आरसा दाखवणारे अफाट सीन्स...मस्तच.

बरेच जण म्हणतात त्या प्रमाणे ती डॉ. विवेक बेळेन्च्या नाटकाचीच मूळ जादू असेल कदाचित,
पण पुस्तक-पेन्सिल च्या रंगीत सीन मधले ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट चाकू आणि माकड,
"ह्यो पायजे का तुला त्यो पायजे" चा साउंडट्रॅक इ. नक्कीच सिनेमाध्यमाचे बोनस!
शिवाय क्लोज-अप्स ची सोय असल्याने पुष्कर, उपेंद्र, मुक्ता, आनंद सगळ्यांनाच फटकेबाजीला फुल्ल स्कोप! 
उदाहरणार्थ पानवाल्याकडून मोड घेण्याचा सीन...तुफान!

एकंदरीत काय जलसाच...

मागे मी लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने सिनेमावर न लिहीण्याविषयी बोललेलो,
पण 'पेन्सिल' बाइंनी म्हणूनच ठेवलयना, "मी भूतकाळात केलेल्या विधानांची कोणतीही जबाबदारी भविष्यात घेत नाही"
सो...साई सुट्ट्यो!!! :)

नोट्स टू मायसेल्फ: "काटकोन त्रिकोण" बघणे...प्रॉन्टो!
-नील आर्ते


Wednesday, 7 November 2012

"लेडी इन द वॉटर"...च्या निमित्ताने

खरं तर एक पॉलीसी म्हणून मी सिनेमावर लिहीत नसतो!
म्हणजे कसं आहे माहितीये का कि एका मंगळसूत्र चोराला पब्लिकने पकडलं!
ओके म्हणजे त्याचा गुन्हा निर्विवाद!
पण आधीच लोक त्याला एवढा एक्स्पर्टली मारत असतात की आपण काय मारायचं यार? ते रीडण्डन्टच होणार ना?
तसंच काहीतरी,
म्हणजे गणेशदादा मतकरी, मयंक शेखर, करण अंशुमान, आपले हेरंबराव ओक वगैरे
वगैरे इतकं झकास, मनापासून (आणि बऱ्याचदा डिट्टो आपल्याच मनातलंसुद्धा) शिणुमावर लिहित असतात की आपण का कष्ट घ्या?

पण आज अगदीच रहावत नाहीये:

एक तर हे वेडसर एच. बी. ओ. + स्टामू वाले शुक्रवार-शनिवार रात्री महाटुकार सिनेमे लावतात पण वीक-डे ला रात्री मात्र  ** जळवायला ढासू सिनेमे.

अशीच मंगळवारी रात्री साडेअकराची वेळ...डबेवाल्या मावशीनी डब्यात खिमा दिलेला, नन्तर एक आक्खं फाईव स्टार चेपलेलं...पुणूल्यात थंडीची चाहूल लागलेली...म्हणजे एकंदरीत डोळे खजुराहोच्या हॉटीन्सारखे अर्धोन्मिलीत वगैरे झालेले.

आणि इतक्यात "लेडी इन द वॉटर" चालू झाला!

पहिलाच थोडासा आपल्या वारली पेंटिंग्जसारखा अ‍ॅनिमेटेड इन्ट्रो आवडून गेला.
आणि अडकलोच ना राव!

म्हणजे कसं माहितीये का...एका मिक्सर मध्ये जी एंच्या मिथककथा, बटाट्याची चाळ, विनोदकुमार शुक्ल आणि अर्थातच एम. नाईट. घ्यावा आणि दोनदा फुर्र करावं.
मग जे काही तयार होईल ते कोणताही पूर्वग्रह न घेता बघत बसावं.

खर तर जगभरात क्रिटिक्सनी फुल परतलेला या सिनेमाला...चाललासुद्धा नाही फारसा.
पण मला मात्र समहाऊ जमला!

पॉल जियामत्तीचा खिन्न पण सालस सोसायटीचा हरकाम्या,
फिलाडेल्फिया अपार्टमेन्ट मधले एकसे एक नग चाळकरी, (त्यातही चायनीज चंट पोरगी आणि तिची सर्किट आई टू गुड!)
आणि अर्थातच श्यामलनचे पेटंट रेड हेरीन्ग्स.

डोळ्यांवरची झोप आवरून बघावासा वाटणारा सिनेमा म्हणजे चांगलाच...माझ्यापुरता तरी!
मग भले रिव्ह्यूज काहीही असोत!

(ता. क. दुसर्या दिवशी ऑफिसला १ वाजता उगवलो...खिक्क :) !!!)

-नील आर्तेTuesday, 6 November 2012

गर्ल-टॉक

शी बाई, पतियाळा, सेमी-पतियाळा, मॅजेन्टा, वांगी-कलर, तुळशी-बाग, लक्ष्मी-रोड, चकल्यांच तयार पीठ.....

अकाउन्ट्स डिपार्ट्मेन्ट्च्या "अबव्ह ३५ + ऑल महिला वर्ग" क्युबिकल्स मधून असले रॅन्डम शब्द आज सकाळपासून माझ्या कानांवर आदळतायत...
आणि शर्टाच्या आतल्या बनियनच्या आतल्या केसाळ छातीच्या आतल्या बरगड्यांच्या आतल्या कॉलेस्टरॉलच्या आतल्या ह्र्दयाच्या आत-आत खोल कुठे तरी छान  वाटतंय.

Diwali is in the air :)

-नील आर्ते


Sunday, 29 July 2012

'लेट हर बी'हा 'लेट हर बी' प्रकार मला खूप आवडतो ...मराठीत ह्याला एक्झॅक्ट प्रती वाक्य नाहीये !

'लेट हर / हिम बी' म्हणजे माणसाला आहे त्या गुण दोषांसकट स्विकारणं... पुढल्या चुका ही करू देणं ...
पण तरीही 'डिस-ओन' न करणं!

माझ्या एका प्रचण्ड वूमनायझर मित्राला बहिणीचं अफेअर कळल्यावर त्याचा रागाने तिळपापड झाला होता.
(येस धिस इज हिप्पोक्रॅटिक!!!)
तेव्हा दुसर्या शांत सालस मित्रानं त्याला समजावलं होतं,
"लेट हर बी यार ..इट्स हर लाईफ ..आणि चुका झाल्याच तर आपण आहोतच ना सांभाळून घ्यायला!"

तेव्हा पासून "लेट हर बी" चा आपण फॅन झालो!
सो लेट अस ऑल बी!!!

-नील आर्ते
Friday, 13 July 2012

बडबड कासव आणि त्याचं मुक्त चिंतन

साहिलचे भित्रे डोळे आळीपाळीने तिघांवरून फिरत होते.
एक प्रचंड आडमाप देहाचा होता. 
दुसरा उंच पण शिडशिडीत होता.
तिसरी मुलगी होती.
एखाद्या शाळकरी मुलीएवढ्या लहान चणीची...पण हत्यारे प्रचंड सराईतपणे हाताळत होती.  

त्या तिघांमधला कॉमन फॅक्टर होता त्यांची मुखवट्याआडची थंड निर्विकार नजर.
आयुष्यभर रक्त-वेदना बघितलेली, टार्गेटसाठी काहीही करायची तयारी असलेली भावनाहीन नजर!

साहिलचे हात खुर्चीला बांधलेले होते आणि सुटका अशक्य होती.
शेवटी त्याचा बांध फुटला आणि तो भडाभडा बोलायला लागला:

"मला मरायचं नाही हो.प्लीज मला मारू नका, वाचवा मला प्लीज...प्लीज सर!
मला नं साल्सा करायचाय खूप छान, 
साला मी खूप खराब नाचतो हो, क्लासमध्ये सगळ्यात स्लो...पण शिकेन मी. माझा हातांनी मुलीला द्यायचा लीड पण इम्प्रूव करेन मी.
जिया म्हणते ,'यु हॅव झिरो लीड'...पण मी काय करू हो...ती खरं तर माझी मैत्रीण...
मला खूप आवडते, मीच तिला साल्सा क्लास मध्ये आणली पण छान नाचणाऱ्या रिषभचीच ती पार्टनर झाली आणि तिने त्याला प्रपोजच केलं.
दोघांनी आनंदाने येऊन मलाच पहिलं सांगितलं खास मित्र म्हणून...जीव तुटला हो माझा!
पण देव त्यांना सुखात ठेवो मला फक्त चांगलं साल्सा करायला शिकायचंय. 
डान्स फ्लोअर वर एका छान मुलीला नाचवायचं, फिरवायचं, लिफ्ट्स आणि ड्रॉप्स करायचे ...
त्याच्या आधी मी नाही हो मरू शकत मला मारू नका प्लीज!
अजून तर खूप काही बाकी आहे आयुष्यात...
मला मस्त शिट्टी वाजवायला शिकायचंय...तोंडात दोन बोट घालून सगळ्यांचे कान वाजवणारी सणसणीत शिट्टी!
आणि उंच पतंग बदवायला शिकायचंय...लहानपणी राहूनच गेलं हो!
आणि मुक्यांची साईन  लँग्वेज शिकायचीय...ते बोलतात ना झपाझप हातवारे करून तेव्हा त्यांचा सगळा चेहेरा उजळतो.
मला त्यांना साईन लँग्वेज मध्ये फिजिक्स शिकवायचंय...
मी  एम एस सी फिजिक्स आहे हो....फिजिक्स खूप आवडतं मला आणि खास करून त्यातलं 
'हायझेनबर्ग'चं 'अन-सर्टनिटी प्रिन्सिपल': 
'कोणत्याही गोष्टीची जागा आणि वेळ दोन्ही एका मर्यादे पर्यंतच निश्चित करू शकतो .आपण जागा परफेक्ट करायला गेलो तर वेळेतली चूक प्रचंड वाढते आणि वेळ पक्की केली तर जागेतली'         

आपलं लाईफ पण असंच असतं सालं,
करीअर छान करावं तर रिलेशनशिप्स सफर होतात आणि नुसतं प्रेमच करत बसलं तर करिअरचा भोसडा होतो.

तरी पण प्रेम करायचंय हो मला ती पण एक इच्छा आहे.
एक अशी मुलगी, अशी बायको कि जिच्या बरोबर मी मस्त म्हातारा होईन आणि आम्ही एकत्र राहू...चुकत माकत, हसत खेळत, भांडत आणि एकमेकांची टेर खेचत."

आणि तो खदा खदा हसता हसता ढसा ढसा रडू लागला !त्या तिघांनी हत्यारे खाली ठेवली...त्यांचं काम जवळ जवळ संपल्यातच जमा होतं.
साहिलच्या डोक्याला सिस्टर मरियमने सराईत हातांनी बँडेज बांधून टाकलं.

डॉक्टर पर्बतने  आपल्या आडमाप देहाला आणि नावाला न शोभणार्या मृदुपणे साहिलचा हात हातात घेतला आणि ते म्हणाले,
'यंग मॅन आपली भारतातली पहिली "अवेक ब्रेन सर्जरी" पूर्ण झालीय.
पूर्ण सर्जरी मध्ये बडबडत राहून आम्हाला सहकार्य केल्याबद्दल थॅन्क्स...
तुझा ब्रेन ट्युमर आपण काढून टाकलाय आणि थिंग्स आर लुकिंग रिअल गुड!

बाय द वे हे आपले लंबू डॉक्टर मिलन झकास पतंग उडवतात...कधी रविवारी ये तुला शिकवतील ते..आणि शिट्टी तर मी पण सरस वाजवतो पण हॉस्पिटलमध्ये नको...तुला मी बाहेर शिकवीन.
हि सिस्टर मरियम तर सर्टिफाईड साल्सा ट्रेनर आहे ती तुला लीड्स शिकवू शकेल.
आणि साईन लँग्वेज चे वर्ग तर आपल्याच हॉस्पिटल मध्ये दर शनिवारी दुपारी भरतात.
राहता राहिलं तुला झकास बायको शोधण्याचं काम...ते मात्र तुलाच करावं लागेल...गुड लक :)'

--------------------------
ता. क. या गोष्टीला टाईम्स   ऑफ इंडियातल्या एका बातमीचा आधार आहे 
एका रुग्णाचा ब्रेन ट्युमर काढताना पूर्ण वेळ तो डॉक्टरांशी गप्पा मारत होता.
डॉक्टर हे करतात कारण त्यांना समजावं लागतं की नक्की केवढा भाग ते कापू शकतात..रुग्णाच्या बोलण्यात अडखळ आली की लगेच धोक्याचा इशारा समजून ते थांबतात.
-नील आर्तेTuesday, 22 May 2012

पाइनॅपल सन्

सकाळी थंड पाण्याचा पहिला तांब्या डोक्यावर ओतला की 2 गोष्टी होतात: 
  1. मंगल चिन्ह बघून धारपांच्या कथेतल्या अभद्र भूतांनी कल्टी खावी तसा आळस पार पळून जातो. 
  2. मला शहाणपण आणि लॉजिकचे रॅन्डम पण प्रचंड प्रोफाउंड साक्षात्कार होतात. (असंच एकदा मी सहा वर्ष वाढवत असलेल्या कमरेपर्यंत लांब केसांना कापायचं ठरवलं होतं.) 
या वेळेस मला अचानक क्लिक झालं की आपल्या तुफान लोकप्रिय (तब्बल 19 फॉलोअर्स... आहात कुठे?)  ब्लॉगचं नाव चक्क अनएथिकल आहे. 

म्हणजे मान्य "चंद्रमाधवीच्या प्रदेशात" हे खूप सुंदर नाव आहे आणि ग्रेसच्या ह्या कविता-संग्रहाचं नाव मला खूप म्हणजे खूप जिनिअस वाटतं...  
पण ते ग्रेसना सुचलं होत आपल्याला नव्हे (करपलो  सालाबादप्रमाणे!)
आणि "मेमसाब हम गरीब है मगर चोर नही"!!! 

सो अंघोळ झाल्या झाल्या अंगही न पुसता...पुण्यात मेच्या दुपारी बारा वाजता जितकं कुडकुडता येईल तितकं कुडकुडत पापक्षालन करतोय:

आजपासून आपल्या ब्लॉगचं नाव "पाइनॅपल सन्" !

चंद्राचा सूर्य झाला इतकंच:
बाकी ब्लॉगची व्यामिश्रता, अभिजातता, खुसखुशीतपणा, जीवनाचं समग्र दर्शन,  मानवी मनाचे हळुवार उलगडणारे पापुद्रे, विचारांची खोली वगैरे-वगैरे कायम राहीलच ;)

...अवांतर... बारीक कापलेले ओले केस टॉवेलने खसाखसा पुसल्यावर फक्त पुढची दहा मिनिटंच सेक्सी दिसतात...आणि नंतर वॅक्स, जेल् किंवा जगातलं कुठलंही प्रॉडक्ट लावलं तरी तसे रहात नाहीत असं का बरं?

-एक स्वच्छ आणि गरीब पण चोर नसलेला मुलगा.
   

Wednesday, 16 May 2012

"यु नो व्हॉट": ४


के ...कबूल!
त्यांना 'सेक्सी' किंवा 'म्हातारे' म्हणायला माझी चक्क फाटतेय! 
म्हणजे आधीच्यांचं ठीक होतं:
इफ्तिकार तर गेलाच बिचारा! 
आणि मार्गु अण्णा किंवा ज्युडू बेबी कुठे मला आयुष्यात भेटायला...ते मस्त राहत असतील हॉलीवूड: सन स्ट्रीट बुलेवा नाय तर लंडन: वेस्ट एंडला! 
मी इकडे त्यांच्या नावाने काय तारे तोडतोय त्यांना काय घंटा कळायला??

पण 'डॉक्टर' कधी तरी कुठे पार्ल्यात बिर्ल्यात किंवा शिवाजी मंदीरला भेटू शकतात. 
आणि त्यांनी ती सर्जनच्या सुरीसारखी लख्ख घारी नजर रोखून आपली फेमस मान हलवली की...संपलंच
माझ्यासारखा नाचीझ-नोबडी तर वितळूनच जाणार जमिनीत...म्हणजे कंपोस्ट खतच एकदम!!!

पण ते एस इ एक्स वाय आहेतच!
(ही फेलो ब्लॉगर अपर्णाची लहान मुलांसमोर बोलताना वापरायची आयडिया..टू गुड ना ??)

लहानपणी कॉलनीत कुठेही गणपतीत प्रोजेक्टरवर एकच पिक्चर असायचा : 
"जानकी"  
फुल टू फिल्मी पिक्चर: डॉक्टरांवर खुनाचा आळ... अबला जानकी ... डोळ्यात धो धो पाणी वगैरे. 
पण ते मिल मजुराच्या डार्क ब्लू युनिफॉर्ममधले गोरे घारे डॉक्टर मला जाम आवडायचे.
आणि सीमा 'श्रीराम' लागूंना गाणं म्हणतेय "विसरू नको...श्रीरामा मला" म्हणजे कसलं क्लेव्हर ना??

मग थोडं कळायला लागल्यावर 'सामना' पाह्यला आणि वेडाच झालो1 
ते मास्तर.. त्यांची भणंग जिगर आणि तो प्रश्न...डॉक्टर-स्पेशल थरथरत्या आवाजातला: 
"पण मारुती कांबळेचं काय झालं?"

आणि मग डॉक्टरांचा तो लेख आला "देवाला रिटायर करायला" सांगणारा;
त्यानं सगळ्यांनाच हलवलं गदागदा...
इतका ठाम, क्लिनिकल आणि मुद्देसूद लेख वाचून देव असला तरी त्याने  चूपचाप व्ही आर एस घेतली असणार बहुधा! 

त्यांचं अंधश्रद्धा निर्मुलन समितीचं कार्य असो किंवा व्यक्तिगत दुखाशी केलेला धीरोदात्त सामना 
rationalism is the way of his life...always!
त्यांची ती फालतू रूढी आणि चिंधी-चोर बाबा-बुवांवरची स्वच्छ मतं ऐकली/वाचली की...थंड पाण्यानी झडझडून अंघोळ केल्यासारखं काहीतरी वाटतं राव!!!

त्यांच्या आत्मचरित्राचं नाव पण कसलं ढासू आहे..."लमाण"!
मी तर करपलोच ...हे नाव आपल्या आत्मचरित्राला का नाय सुचलं म्हणून.
(तसा तर मी 'सिक्स्थ सेन्स'चा शेवटचा ट्विस्ट आपल्याला का नाय सुचला म्हणून पण करपलो होतो...असो!) 
"लमाण" मधली त्यांची ती डॉक्टरकी आणि नाटकामधली तगमग; 
आणि किलीमान्जारोच्या शिखरावर त्यांना झालेली एपिफनी तर परत परत वाचण्यासारखी. 

आजकालची त्यांची ती खादीची अर्ध्या बाह्यावाली पैरण आणि शुभ्र पांढरा लेंगा पण कसला दिसतो त्यांना.. 
"मित्र" मध्ये सरस दिसले ते ह्या क्लटर-फ्री लूक मध्ये!

त्यांच्याच 'पिंजरा' मधलं वाक्य थोडं वळवून लेखन सीमा करतो...
आमाला नक्को मिस्सळ ..आमाला हवा शिर्रा ssssssss 'म' :)

ता. क. (जास्तच समजतंय मला...कंपोस्ट खत नक्की!!! )

-नील आर्ते Tuesday, 8 May 2012

सेक्सी "M"haतारी: ३

जेम्सने नेहमी प्रमाणे धसमुसळा गोंधळ घातलाय आणि तिची तार सटकलीय. 
डोळे आग ओकतायत,कुप्रसिद्ध इंग्लिश स्टिफ अप्पर लीप रागाने थरथरतोय, 
आणि ताड ताड लाह्यांसारखे शब्द फुटतायत!  

"रागावल्यावर अजूनच सुंदर दिसणं" हे मिथ्थक नाही हे तिच्याकडे बघून पटतंच.

खास इंग्लिश फिटिंग वाला पॅन्ट-सूट, 
छोट्या बाबू सारखा गोड बॉय-कट,
ते प्लॅटीनम ब्लॉन्ड चमकदार केस...
तिचा तो साक्षात चौकोनी चेहेरा आणि छान वय झाल्यावर होतात तसे नरम गाल... आजीच्या दुलई सारखे. 
बॉन्डला फडाफडा बोलून झाल्यावर एकच गाल कळेल ना कळेलसा किं sss चित वाकडा होतो...राखाडी निळे डोळे एक दशांश क्षणभर बॉन्डच्या मायेने हळवे होतात. 
पण लगेचच तिची परत 'M' होते. 

-नील आर्ते 


Sunday, 22 April 2012

सेक्सी म्हातारे: २

तो खळ्या पाडत हसला कि त्याचे पांढरे शुभ्र वेडेवाकडे दात चमकतात!
काष्ठ शिल्पासारखं ते टिपिकल आफ्रिकन नाक...
जॅक डॅनिअल व्हिस्की सारखा आवाज...

आणि ते बोलके डोळे:
'ब्रूस ऑल मायटी' मधल्या मिस्कील जगन्नियन्त्याचे...
'अन-फर्गीव्हन' मधल्या सच्च्या साथीदाराचे...  
'सेवन' मधल्या रिटायर होता होता परत रक्ता मासाच्या खातेर्यात खेचला गेलेल्या पोलीस अधिकाऱ्याचे...
'वॉन्टेड' आणि 'लकी नंबर स्लेवीन' मधल्या हलकट बॉसचे...
'मिलिअन डॉलर बेबी' मधल्या एका डोळ्याने अधू बॉक्सरचे ...


मॉर्गन फ्रीमन सौंदर्याच्या बोअरिंग कन्व्हेन्शनल व्याखेत बसत नाही.
पण काहीतरी खास आहे त्याच्यात...यम्मी, नो फ्रिल्स, आणि प्रचंड सकस...आदिवासी पाड्यावरची नाचणीची भाकर असते तसं!

खरं तर तो सुद्धा एक मळकं धोतर नेसवलं तर आरामात आपला आदिवासी म्हणून खपून जाईल!
'जैत रे जैत : भाग २' मध्ये "मार्गू"  म्हणून ??? :D


-नील आर्ते

Wednesday, 18 April 2012

सेक्सी म्हातारे: १

 माझी एक खडूस मैत्रीण काल मला "दादाजी" म्हणाली (#$%@#)  
आणि मला वेड्यासारखे एकामागोमाग एक सेक्सी म्हातारे आठवायला लागले:

 पहिला आठवला अर्थातच "इफ्तेकार"! कसला होता तो!!
उंच शिडशिडीत,
भव्य कपाळाला शिस्तीत इमानदारीत जागा करून देणारे पाठी वळवलेले केस,
उंचावलेली चीक-बोन्स, 
पेरेनिअल पोलीस ऑफिसरला शोभणारे ते करारी पण आधार देणारे डोळे,
दमदार आवाज,
आणि त्याची ती जगप्रसिद्ध पातळ जिवणी!

 पोलीसचा युनिफॉर्म त्याला अति अति म्हणजे अति सुट व्हायचा!
फुल खाकी शर्टाच्या त्या कोपराच्या वर पर्यंत दुमडलेल्या बाह्या,
 (हीच स्टाइल नंतर 'शत्रू'ने 'मेरे अपने', 'कालीचरण' वगैरे मध्ये उचलली),
पातळ जिवणीतून लोंबणारी ती सिगरेट,
आणि हातातली ती केन ...
मार डाला!

डॉन, जंजीर, शोले आणि एक लाख इतर पिक्चर मधला पोलीस ऑफिसर किंवा 'दीवार' मधला दिलदार स्मगलर बॉस...
ही वॉज जस्ट टेलर-मेड!

खरं तर तो स्टायलिश काउंट ड्रॅक्युला म्हणून पण मस्त शोभला असता, कुणा डायरेक्टरला कसं सुचलं नाही कुणास ठाऊक.

लहानपणी कधीतरी 'इत्तेफ़ाक़' बघितला आणि त्याच्यात हा 'इफ्तेकार'
माझ्या चिमुकल्या मेंदूत 'इत्तेफ़ाक़' आणि 'इफ्तेकार' मध्ये भारी कन्फ्युजन व्हायचं!
(तसं ते परवीन बाबी आणि झीनत अमान मध्ये पण व्हायचं; 
अनिल कपूर आणि राज किरण मध्ये सुद्धा )
पण मी तेव्हापासूनच ठरवून टाकलं होतं म्हातारं व्हायचं तर 'इत्तेफ़ाक़' आपलं...चुकलो 'इफ्तेकार' सारखं!

मला नेहमी वाटायचं की तो खऱ्या आयुष्यात ही एकटाच असणार आणि रोज रात्री आरामखुर्चीत बसून जुनी हिंदी गाणी नाहीतर क्लासिक वेस्टर्न म्युझिक ऐकत सुंदर कट-वर्कवाल्या ग्लासातून स्कॉच पीत असणार...
कुणास ठाऊक खरं काय होतं?
पण माझा मात्र तो "सेक्सी म्हातारा" होता; शेलाटा, क्लासी आणि एलीगंट!
-नील आर्ते

    


Sunday, 4 March 2012

"तेरे सिवा"

१४० चा स्पीड,
रात्रीचा भण्ण वारा आणि...
एखाद्या कोड्यासारखा उलगडणारा काळाशार एक्स्प्रेस हायवे.

"दिल्ली बेली" मधलं "तेरे सिवा" लागतं शफलवर!!!
आणि छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात कसं तरी होतं.
"तेरे सिवा" वितळत जातं कानात...
आणि उतरतं छातीत किंवा पोटात किंवा आतड्यात किंवा फुफुस्सात.


आठवण येते सगळ्याच "क्ष"न्ची.
वाटतं सगळ्या "क्ष"न्ची "क्ष"मा मागून टाकावी
किंवा आपणच माफ करावं त्यांना. 
आणि सांगावं  "तेरे सिवा" एकट्याने ऐकणं पाप आहे राणी!!!
विसरून जाऊया एकमेकांवर कचाकच केलेले वार.
का केले होते वार ते पण आठवत नाही खरं तर.
करून टाकूया तह या जीवघेण्या गाण्यासाठी.

ठरलं तर मग...इकडे थांबता येणार नाय.
पण एक्स्प्रेस वे संपला कि आधी फोन करायचा...


एक्स्प्रेस वे संपतोच आणि गाणं सुद्धा.
दबकून बसलेला मेंदू...
छाती, पोट, आतडी, फुफ्फुसं सगळ्यांवर थयाथया नाचतो.
'तिनी ५ वार केले होते आणि आपण फक्त ३ च'
तो निक्षून बजावतो.
'इगो बॉस' चा परफ्युम परत परत फसाफसा फवारतो.

तुमच्या "सेन्टी"पणाचं तुम्हालाच खिन्न हसू येतं...
आणि तुम्ही कुठेही न थांबता सरळ घरी जाता.  


-नील आर्ते
 Sunday, 5 February 2012

अभद्र


 तुम्ही कधी दुपारची झोप तीन्हीसांजेपर्यंत ताणलीये?

बाहेर काळोख दाटत असतो आणि कुठच्या तरी घाणेरड्या स्वप्नाने तुम्हाला दचकून जाग येते.

"आपल्याला जीवापाड आवडणारी ती दुसर्या कोणाशी तरी रत होताना दिसते"
नाहीतर...
"ट्रकने उडवलेल्या कुत्र्याचा रक्त मांसाचा लगदा"
...
"तुम्ही त्या गरीब चेहेर्याच्या पोराला पाकीट मारल्याच्या संशयावरून कुत्र्यासारखं मारत असता"
किंवा दिसतं आपलं ते मेलेलं माणूस...आपल्याबरोबर नेहेमीसारखं  वावरताना...पण खूप खिन्न चेहेर्याने.

जाग आल्यावर जाणवते घश्याला पडलेली प्रचंड कोरड आणि गळ्याजवळ जमा झालेला मुंबईचा चिकट घाम.

आई थकून भागून ऑफिस मधून घरी येते आणि डुकरासारखं झोपल्याचा गिल्ट कुरतडत राहतो.

निस्त्राण मन आणि देह झडझडून तुम्ही उठता!
आईनं पर्स टाकून बाबांच्या फोटोपुढे छान वासाची उदबत्ती लावलेली असते...
आणि तुम्हाला उगीचच खूप बरं वाटतं!-नील आर्ते
टीप : ही मुक्त कविता मला सौमित्रच्या "जॉइन्ट" कवितेवरून सुचली (कवितासंग्रह: "आणि तरीही मी")
हे म्हणजे थोडंसं भजीच्या वासाने चहाची तल्लफ येण्यासारखं...चहा आणि भजी म्हटलं तर सारखे पण वेगवेगळे सुद्धा.
भजी बेस्टच...चहा झक्कास झालाय की पांचट ते मात्र तुम्ही ठरवा.
--------------------------------------------------------------------