Sunday 31 August 2014

आख्तुंग ५ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिने २७ दिवसांनी: १५ नोव्हेंबर २०२८
संकेत चक्रदेवांच्या घरी एक छोटीशी मीटिंग भरली होती:
गम्बादादा भोसले: "चक्रदेव दादा, नवीन "मावशी" आनलिय आपल्या रशियन दोस्तांकडून ज्यास्त रेंजची आख्तुंग बाबासाठी!
मार्केटमदी तीन किलोमीटरच्या वरची रेंज नाय मिळणार तुमाला पण ही एकदम लेटेष्ट हाय!
६ किलोमीटर वरचा डाव आरामात मोड्तीय!
तुमच्यासाठी काय पन!" 

चक्रदेव: "थॅन्क्स गम्बा! पण अंतर जास्त आहे रे... सी लिंक वरून शॉट घेतला तर किंवा होडीवरून?"

गम्बादादा: "नाय सी लिंक वर गाडी थांबवायला अलाउट नाय, बंद पडल्याचं नाटक केलं तरी लगेच आर.  टी.  ओ. वाले धावत यितील सोन्शय यील आनि हूडी लयच डूचमळणार"

चक्रदेव: "आख्तुंग बाळा जमेल इतक्या लांबचा शॉट तुला?
मला माहितीये रे तुझ्यासाठी पण हे अंतर जास्तच आहे… पण वेळ कमी आहे आपल्याकडे. 
अंकुश शिर्के सावध झालाय दादा शिर्के आणि बाबाच्या गेममुळे… पुढच्या आठवड्यात गाशा गुंडाळून तो दुबईला पळतोय अशी नक्की खबर आहे. मग सगळं आणखीच अवघड होईल." 

आख्तुंग खळ्या पडत हसला… हसला की त्याची बुब्बुळं अगदी बारीक व्हायची… मांजरासारखी!

Thursday 28 August 2014

आख्तुंग ४ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

डॉ. नाडकर्णींचा खून व्हायच्या सात दिवस आधी: ८ नोव्हेंबर २०१३
डॉ. नाडकर्णी प्रचंड एक्साईट झाले होते,
"तुझा भाचा म्हणजे एक चमत्कार आहे संकेत!
मी खरं तर डोळ्यांची डॉक्टरकी थांबवून पूर्ण वेळ अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्याला वाहून घेतलंय बरीच वर्षं. 
पण कसली अफलातून केस आहे तुझ्या भाच्याची:
सामान्य माणसापेक्षा तिप्पट लांबवरच बघू शकतोय तो. 
आणि वस्तूचा रंग लाल असेल तर जवळ जवळ दहा पट लांबचं… अगदी स्पष्ट!"

चक्रदेव भंजाळले,
"पण कसं?"

Sunday 24 August 2014

आख्तुंग ३ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिने १५ दिवसांनी: ३ नोव्हेंबर २०२८
'चमत्कारी' बाबा फ़ुल्ल फॉर्ममध्ये होते!
बऱ्याच दिवसांनी नवीन शिष्या गळाला लागली होती.
कसली मादक होती ती आणि तितकीच हुशारसुद्धा शिवाय प्रचंड बोल्ड!

अघोरी पंथ, त्याची मुळं, मंत्र-तंत्र विद्या, जारण-मरण आणि कायकाय तासंतास चर्चा चालायची तिच्याबरोबर!
पण अजूनपर्यंत अंगाला हात लावू दिला नव्हता तिनं.
बाबा त्यानं अजुनच कासावीस झाले होते.

पण आज चक्क लॉटरी लागली होती! नवीन शिष्या त्यांना तांत्रिक सेक्स शिकवणार होती:
सुखाचा डोंगर चढायचा अगदी हळू-हळू… लहान सहान गोष्टी पूर्ण करत… आणि मग गाठायचं उत्कट शिखर आणि तरंगत रहायचं तिथेच तीन तास, चार तास, तासंतास!

Friday 22 August 2014

आख्तुंग २ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

डॉ. नाडकर्णींचा खून व्हायच्या आठ दिवस आधी: ७ नोव्हेंबर २०१३
आख्तुंग किंचाळत झोपेतून उठला… परत त्याला आई बाबांच्या अ‍ॅक्सिडेन्टचं घाणेरडं स्वप्न पडलं होतं!
हमसाहमशी रडत होता तो, तेवढ्यात चक्रदेव बाजूच्या खोलीतून धावत आले आणि त्याला जवळ घेतलं.

"अरे बाळा… ब्रेव्ह आहे ना माझा टायगर?
असं रडायचं नाही मग!
आई बाबांना प्राउड करायचं ना आपल्याला?
तुझ्या ममाने म्हणजे माझ्या दीदीने तुझं नाव आख्तुंग का ठेवलं होतं माहितीये तुला?
तिला जर्मन भाषा खूप म्हणजे खूप आवडायची!
जर्मनमध्ये 'आख्तुंग' म्हणजे 'सावधान'… चलाख… फोकस्ड! तसाच होणार माझा भाचू है ना?
चल झोप आता, उद्या लवकर उठायचय, शाळा आहे ना?

आख्तुंगनं डोळे पुसले थोडा शांत झाला होता तो…
त्यानं खिडकीकडे बोट केलं!
सोसायटीच्या गार्डन पलीकडे लांबवर 'बी' बिल्डींग मधल्या भल्लांचा लाईट अजून चालू होता.
"मामा मला त्या विकीनं घातलंय बघ तसं टी शर्ट घेशील? रेड लेटर्स मध्ये हॅप्पी हॉलिडेज लिहिलेलं?"
-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते

Wednesday 20 August 2014

आख्तुंग १ ('पुरोगामी'चा सिक्वेल)

पाच कोवळ्या मुलींचा नर-बळी गेला त्यानंतर १४ वर्षं ११ महिन्यांनी : १८ ऑक्टोबर २०२८
प्रजा-सेवक पार्टीची उद्घाटन प्रचार सभा

खासदार दादा शिर्के खुर्चीवरून उठले आणि त्यांनी मसिहाच्या थाटात हात वर केले… खाली (पेड) टाळ्यांचा प्रचंड कडकडाट!

दादा शिर्केंनी धत्तुरे द्यायला चालू केले:


"तुमा सर्वांच्या मासायेब आणि माजी प्रिय पत्नी १४ वर्षांपूर्वी बाळंतपनात हॉफ जाली आनि मला सोडून गेली,
तवापासून माजे कार्यकर्ते आनि मद्दार-संग हेच माजी फ्यामिली हायेत (टाळ्या).

माजं तन मन धन रयतेचं हाये आनि गरज पडल्यास मी जनतेसाठी जीव पण दिऊ शकतो (टाळ्या).

तवा आजपासून मी पर्चाराचा शुबारंब जाल्याचं झाईर करतो" (जोरदार टाळ्या).

लगेच स्टेजवर उजव्या विंगेतून एक छान नटलेली युवती आली… सावळा तरतरीत चेहेरा… टप्पोरे डोळे आणि हंसिनीसारखी लांबसडक मान…
पांढरेशुभ्र दात दाखवत ती हसली आणि दादा शिर्केची नजर तिच्यावर हलकेच रेंगाळली!
तिनं लखलखती तलवार दिली आणि मग तबकातून कुंकवाचा टिळा त्याच्या घामानी चिकचिकलेल्या कपाळावर लावला. टिळा कसला कुंकवानी जवळ-जवळ मळवटच भरला त्याचा (अर्थात दादाला ते कळलं नाही म्हणा…)

दादानी तिला नजरेत पुन्हा एकदा पिउन घेतलं आणि तो परत जन-समुदायाकडे वळला:
लालभडक मळवट भरलेलं कपाळ… जुळलेल्या भिवया… वटारलेले बटबटीत डोळे आणि हातात उगारलेली तलवार!
त्यानं खच्चून आरोळी दिली,
"परजा-सेवक पक्षाचा SSS इजय…"
तितक्यात दोन किलोमीटरवरून  सूं सूं करत आलेली गोळी त्याच्या मळवटाचा मधोमध घुसली आणि त्याच्या डोक्याच्या चिंधड्या उडाल्या!
-------------------------------------------------------------------------------------------------
क्रमश:
-नील आर्ते

Saturday 16 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ४

१८ नोव्हेंबर

रात्रीचे बारा वाजून गेले होते. आकाशातून उल्का कोसळत होत्या. चमत्कारी बाबाने मोठा होम रचला होता. तोंडाने विचित्र मंत्र म्हणत तो घुमायला लागला.

- इकडे चक्रदेवनी गाडी काढली. आणखीन दोघांना प्रसाद देवून झाला होता. त्या मुलींना घेवून दादा शिर्के कुठे असेल याचा ठाव ठिकाणा लागला.

होमासमोर दादा शिर्के आणि त्याची पत्नी डोक्याला भस्म लावून हात जोडून बसलेले. उल्कांचा जोर वाढत चालला. त्यासरशी बाबाने बाजूच्या थाळीतली कसलीशी पूड मूठ भरून घेतली आणि मंतरुन होमात फेकली. ज्वाला उंच उंच जावू लागल्या. ते बघून बाजूला हात पाय बांधून बसवलेल्या त्या पाच मुली आणखीनच घाबरल्या. रात्रीच्या भयाणतेत रातकिडे अधिकच भर घालत होते.

- इन्स्पेक्टर चक्रदेवांनी कारचा यू टर्न घेतला. उजव्या हाताने स्टीयरिंग सांभाळत डाव्या हाताने कॉल केला.“हॅलो... हॅलो खेर... खेSSSर... हा ऐक... एक इम्पॉर्टंट टिप आहे... हॅलो.... ऐकतोयस ना?”“हॅलो सर... मी आत्ता स्टेशनमधेच आहे. २ मिनिटात मीटिंग आहे सो फार वेळ नाही बोलू शकत. सॉरी, कालच्या प्रकरणात आमदाराने फूल फिल्डिंग लावलिय. बहुतेक ट्रान्सफर नक्की आहे. नवीन इन्स्पेक्टर त्याचं मांजर असल्यासारखा वागतोय. सो काही करता येणार नाही. सॉरी! बाय”कॉल कट झाला.“शिट्ट!!!” चक्रदेवने फोन बाजूच्या सीटवर आदळला आणि गाडी टॉप गियरला टाकली.

Sunday 10 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण ३

आज : १६ नोव्हेंबर

- नमस्कार, सर्वात आधी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर संकेत चक्रदेव यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास जबरदस्तीने आपल्या रेस्टहाऊस मध्ये घुसून झडती घेतल्याचा आरोप आमदार दादा शिर्के यांनी केला आहे. कोणताही वॉरंट नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता ही झडती घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. आपण पाहू शकतो कशी सर्व समानाची उलथापालथ झालेली आहे. पाहूया या बाबत आमदार शिर्के काय म्हणतायत-

“काल रात्री याठिकानि जबरदस्तीने कोनतीही परवानगी नसताना, कोनताही पुरावा हाताशी नसताना डॉ. नाडकर्णी यांच्या खुन्यांचा शोध गेन्यासाटीमनून ही जी अंधाधुंद कारवाई करण्यात आली त्याचा मी निषेध करतो. -
इन्स्पेक्टर चक्रदेवांनी टी.व्ही. बंद केला. निलंबनाचं पत्र त्यांच्या समोर होतं. दहा वर्षांपूर्वी पोलिस दलात रुजू झाल्या नंतर आज पहिल्यांदा छत्तीसशे साठ दिवसांनंतर पहिल्यांदा ते शांतपणे आपल्या घरी बसलेले.
‘काहीच काम नाही. काहीच करण्यासारखं नाही. दहा वर्ष अविश्रांत धावपळ आणि आज शांsssत. काहीच काम नाही. काहीच नाही. डॉ. नाडकर्णींसारख्या माणसाचा खून होतो? तेही पुण्यात? तेही आपल्या शहरात? आत्ता सर्वात जास्त गरज आहे जास्तीत जास्त लोकांनी अस्वस्थ होण्याची,घराबाहेर पडण्याची, त्या खुन्यांना असतील तिथून शोधून काढण्याची आणि मी काय करतोय?शांSSSSत! आपल्या घरात बसून टीव्ही बघत शांSSSSत! काहीच काम नाही! काहीच नाही!आणि दादा शिर्के काय करतोय? तोही झोपलाय शांSSSSत मला घरी बसवून!
-ट्रिंग ट्रिंग-

Wednesday 6 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण २

‘त्या’ घटनेआधी ८ दिवस : ९ नोव्हेंबर २०१३

दादा शिर्केंचा फोन वाजला.
“जय जय बाबा!”
“जयजयकार!”
“काय आदेश?”
“काल माळावर एक ‘डाव' मोडला कळलं असेलच!”
“जी! आपण काय करायचं? फुडं ढकलूया?”
“मूSSSSर्ख! ही वेळ वर्षातून फक्त एकदा. तुमच्या समस्येसाठी फक्त आणि फक्त हीच वेळ योग्य आहे. सिंह राशी महत्वाची आहे. सिंहेचा उल्कापात चुकवून चालणार नाही. ही वेळ चुकली की मग एकदम पुढल्या वर्षी. त्यामुळे येत्या १८ तारखेला हे कार्य सिद्धीस गेलं तरच फलप्राप्ती होईल.”
“पन मग आपल्यावेळी पुन्हा कुनीतरी तडमडल म्हंजे?”
“कुणीतरी नाही! काही मत्वाच मट्रियल एकदम ताजं मिळवावं लागतं आणि ते फक्त आदिवासी पाड्याजवळच मिळतं. त्यामुळे कार्याची माहिती आपण सोडून फक्त तिथल्या लोकांनाच असते. आता आदिवासीतर स्वतःहून पोलिस स्टेशनमध्ये जावून सांगणार नाहीत. म्हणजे असं कोण आहे जे आदिवासी पाडयाबाहेरचं आहे मात्र त्याला पाड्यातली सगळी आतली बातमी असू शकते?”
................................................

· ‘त्या’ घटनेआधी ९ दिवस : ८ नोव्हेंबर २०१३

“दादा एक गडबड झालीय!” अंकुश शिर्के धापा टाकत बोलला.

Monday 4 August 2014

पुरोगामी (लेखक: प्रसन्ना करंदीकर ) प्रकरण १



आज : १६ नोव्हेंबर २०१३


- नमस्कार, सर्वात आधी आजच्या दिवसाची सर्वात मोठी बातमी. इन्स्पेक्टर संकेत चक्रदेव यांनी रात्री साडे बाराच्या सुमारास जबरदस्तीने आपल्या रेस्टहाऊस मध्ये घुसून झडती घेतल्याचा आरोप आमदार दादा शिर्के यांनी केला आहे. कोणताही वॉरंट नसताना, कोणतीही पूर्वसूचना न देता ही झडती घेतल्याचं स्पष्ट झालं आहे. पाहूया या बाबत आमदार शिर्के काय म्हणतायत-




“काल रात्री याठिकानि जबरदस्तीने कोनतीही परवानगी नसताना, कोनताही पुरावा हाताशी नसताना डॉ. नाडकर्णी यांच्या खुन्यांचा शोध गेन्यासाटीमनून ही जी अंधाधुंद कारवाई करन्यात आली त्याचा मी निषेध करतो. आमचे काही स्थानिक कार्यकर्ते याठिकानी काही नव्या कार्यक्रमसंदर्भात मीटिंगसाटी राहिले होते. आज सकाळी आमि भेटानार होतो मात्र मध्यरात्री एका कार्यकर्त्याचा फोन आला की इकडे अचानक पोलिसांची धाड पडली आहे. मी होतो त्या परिस्थितिमद्दे इते धाऊन आलो. कोनताही पुरावा नसताना आमच्या कार्यकर्त्यांना आरोपी म्हनून पकडण्यात आलं हे चुकीचं आहे. डॉ. नाडकर्नि यांचेबद्दल आम्हाला सर्वांनाच आदर आहे. त्यांना लवकरात लवकर न्याय मिळावा अशी आम्ही प्रार्थना करतो. मात्र हे कारन पुढे करून जर का कुनी व्यक्तीगत द्वेषाने काम करत असेल तर ते आम्ही सहन करनार नाही. आशा प्रकारची कारवाई करन्याचे कोनतेही आदिकार नस्ताना तेंनी हे पाऊल उचललेल आहे. जर का आमच्यासारके लोकप्रतींनिधी जर याटीकानी सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य लोकांनी पाहावं कुनाकडे? आम्ही गृहमंत्र्यांशी बोललो आहोत. या इन्स्पेक्टरवर तात्काळ कारवाई करा अशी आम्ही मागनी केलेली आहे, आणि तात्काळ करवाईच आश्वासन त्यांनी आमाला दिलेलं आहे. ”