Friday 14 January 2022

मांजा (sober)

संक्रांतीपूर्वी एक आठवडा:
कॉलनीतल्या गच्चीवर पोरांचा गलका चालला होता.
'नारळ', 'तपेली' आणि मन्या सिनियर पतंगबाज.
नारळ काय काटाकाटीतला नव्हता. तो आपला सुम्ममध्ये पतंग बदवून मजा बघत बसायचा... कोणाच्या अध्यात ना मध्यात.
तपेलीचा पतंग नुकताच 'कायपो छे' झालेला आणि क्लासची वेळ झाल्यामुळे तो कल्टी मारायच्या तयारीत होता.
मन्या मात्र फुल्ल फॉर्ममध्ये होता. तसा तो नेहमीच असायचा.
लागोपाठ चार पतंगी कापल्या होत्या त्यानं.
चार तोळे कडक खरवाल्या बदामी मांजाची पूर्ण फिरकी बदवून आकाशात इवलूसा ठिपका दिसत होता त्याचा पतंग.
पूर्ण स्थिर, गुम्म... घारी-बिरींनापण पाठी टाकून वर वर चालला होता त्याचा दुरंगा.

बाकी तीन-चार छोटी पोरं इकडे तिकडे लुडबुडत होती.
सुमितनं तर चक्क प्लास्टिकच्या पिशवीला दोरी बांधून तीच उडवायची ट्राय चालवली होती.
सिध्धूनी घरच्या घरीच लोकसत्ताचा हीराच्या काड्या लावून पतंग बनवलेला.
पण तो काय नीट जमला नव्हता. कठड्यावरच ठाप खाऊन परत परत सिध्धूच्या तोंडावरच येत होता तो.
पिनाकनं मात्र छान छोट्याश्या फिरकीला मांजा गुंडाळला होता.
आईच्या मागे लागून छोटूशी पतंगपण आणली होती.
खूप म्हणजे खूप आवडायची त्याला पतंग. या सगळ्या दादा लोकांसारखीच आकाशात उंच पतंग बदवून काटाकाटी करायचं त्याचं आवडतं स्वप्न होतं.
मागे एकदा तपेलीदादानं बदलेली पतंग पिनूच्या हातात दिली होती थोडावेळ, तेव्हा खूप मस्त वाटलेलं त्याला.
दूरवर गेलेली पतंग जवळजवळ आकाशाला टेकलेली... इतक्याजवळ की पतंगीवर मेसेज लिहिला तर तो बाबांपर्यंत पोचेल बहुतेक.
आणि तो मांजा... अस्सा वाऱ्यानं वाकडा झालेला... स्टाईलमध्ये.
मागच्या वर्षी बाबा होते तेव्हा तो, आई आणि बाबा त्या जंगल सफारीला गेले होते.
तिकडचा जंगलातला रोडसुद्धा असाच होता... ऐटबाज वाकडा... त्याची आठवण झाली त्याला.
पतंग तिकडे लांबवर असली तरी मांजा त्याची बोटं ओढत होता...
पॅंटला धरून हळूहळू खेचणाऱ्या माऊच्या पिल्लासारखा वाटलेला त्याला तो मांजा...
हातातून सोडूच नये असं वाटलेला... पण तेवढ्यात त्याला पाठीमागे काहीतरी टोचलेलं...
बघतो तर मन्यादादा त्याला एकदम पाठी चिकटून उभा असलेला...
आणि विचित्र हसत असलेला... पण मग नारळदादा मन्यादादाला ओरडलेला.
 
पण त्या दिवसानंतर पिनू मन्यापासून जरा लांबच राह्यचा.   
आत्ताही तो थोडं अंतर राखूनच होता.
पतंग काय विशेष उडत नव्हती त्याची खरंतर... पण तो आपला प्रामाणिकपणे सगळ्या दादा लोकांचं बघून पतंगीला टिचक्या देत होत्या.

इतक्यात वरती आकाशात दिलावरचा कौवा सरसरत आला आणि मन्या तरारला.
दिलावर म्हणजे मन्याचा एक नंबर रायव्हल. प्रेरणावरून दोघांमध्ये ठसन चालू होती.
मन्यानं कावळ्यासारखा एक डोळा समोरच्या खिडकीत वळवला.
दळवींची प्रेरणा चहा पीत खिडकीतच उभी होती... बेस्ट चान्स... इम्प्रेशन मारायचा.
त्यानं आपली पतंग किंचित उतरवून दिलावरच्या पतंगीवर क्रॉस टाकली आणि तो रापराप घसटी मारायला लागला.
दिलावर सुद्धा तिकडून घसटायला लागला.
प्रेरणापण वरच बघत होती.
'च्यायची दिल्याची पतंग लटकवून दोन्ही पतंगी उतरवून दाखवायच्या प्रेरू डार्लिंगला.'
मन्या तापला.

पिनाक थोडं बाजूला धडपडत होताच...
इतक्यात एक रँडम वाऱ्याचा झोत आला आणि त्याची पतंग मन्याला क्रॉस पडली...
अगदी हातभर अंतरावर...
पिनाक थोडा गडबडला आणि त्यानं पतंग खेचली... आणि...
मन्याचा मांजा सपकन तुटला!

मन्याला क्षणभर काही कळलंच नाही... की गॅलरीत प्रेरणा खदाखदा का हसतेय ते...
मग त्याला उं SSS च आकाशात गुल झालेली पतंग दिसली... आणि त्याची तार सटकली.
त्यानं भांबावलेल्या पिनाकच्या फाडकन एक कानफटात मारली, "चुत्या साला. मध्ये मध्ये आपली #$ घालतोय."
तो पिनाकला अजून मारणार होता पण तपेली आणि नारळनी त्याला पकडला.

पिनाकच्या डोळ्यासमोर अंधारल्यासारखं होत होतं...
फुटणारं रडू आवरत त्यानं पतंग घेतली आणि तो खाली आला.
त्यानं कुलूप काढून दार उघडलं. आई ऑफिसमधून यायला अजून दोन तास तरी होते.
वाटीत खाऊ काढून ठेवला होता तिनं... पण त्याचा गाल दुखत होता आणि मूडही नव्हता.
त्यानं पतंग-फिरकी टी.व्ही.खाली ठेवली आणि त्याला एकदम आठवलं,
'डांगूल'ला खाणं द्यायचं विसरूनच गेला होता तो.
त्यानं फ्रीजमधून डेअरी-मिल्कचा छोटासा तुकडा काढला आणि तो गॅलरीतल्या तुळशीजवळ आला.
त्यानं हलकेच हाक मारली आणि आणि कुंडीतून गांडुळासारखा दिसणारा सोनेरी-हिरवट रंगाचा डांगूल सरसरत बाहेर आला.
त्यानं प्रेमानं पिनूच्या हाताला हलकेच दंश केला आणि त्याच्या हातातलं चॉकलेट मटामटा खाल्लं.
डांगूल पिनूचा बेस्ट फ्रेंड होता. सगळं सगळं सांगायचा तो डांगूलला.